वैशिष्ट्यात्मक सिद्धांत (ट्रेट थेअरी) आणि वर्तनवाद व्यक्तिमत्व सिद्धांत (बिहेव्हरल पर्सनॅलिटी थेअरी )

TheMindTalks
0

 

वैशिष्ट्यात्मक सिद्धांत  (ट्रेट थेअरी) आणि 

वर्तनवाद व्यक्तिमत्व  सिद्धांत  (बिहेव्हरल पर्सनॅलिटी थेअरी ) 

पर्सनॅलिटी विकासाचे दोन सिद्धांत आपण पाहिलेत : मनोविश्लेषणात्मक सिद्धांत  म्हणजेच सायकोऍनालीटीक थेअरी आणि मानवतावादी सिद्धांत  म्हणजेच ह्युमॅनिस्टिक थेअरी .

आता आपण वैशिष्ट्यात्मक सिद्धांत म्हणजेच ट्रेट थेअरी आणि वर्तनवाद व्यक्तिमत्व  सिद्धांत  म्हणजे बिहेव्हरल पर्सनॅलिटी थेअरी  पाहणार आहोत.

वैशिष्ट्यात्मक सिद्धांत म्हणजेच ट्रेट थेअरी

एखाद्या व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्ये जसे अंतर्मुखी, बाह्यमुखी, अबोल, खेळकर ,बोलका, बडबड करणारा , चिडका किंवा शांत प्रवृत्तीचा , मनात अढी धरून असणारा , सहज समोरच्याची चूक माफ करणारा ह्यावरून आपण त्याचे वर्णन करतो. जर आपल्याला कोणी विचारले कि तुझा हा मित्र/ नातलग / बॉस कसा आहे तर आपण लगेच तो शांत आहे / मनमिळावू आहे किंवा शीघ्रकोपी आहे असे सांगतो! आपण असे वर्णन करतो कारण त्या त्या व्यक्तींचे वर्तन, विचार आणि भावनांच्या सवयीचे काही विशिष्ट स्थिरस्वरूपाचे  पॅटर्न्स तयार झालेले  असतात आणि ते दिसतात ही ! ह्या पॅटर्न्स वरून आपण त्यांना ओळखायला लागतो

व्यक्तींच्या वैशिष्ट्यांवरून पर्सनॅलिटी विकासाचा जो सिद्धांत  मांडला गेला त्याला मानसशास्त्रात, वैशिष्ट्यात्मक  सिद्धांत (ज्याला स्वभावात्मक  सिद्धांत देखील म्हणतात) म्हणजेच ट्रेट थेअरी म्हटले जाते कि जो  मानवी व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासासाठी एक महत्वाचा दृष्टीकोन आहे.

व्यक्तीची हि स्वभाववैशिष्ट व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत त्याच्या सवयीच्या  विचार ,भावना नुसार वर्तन करायला भाग पाडतात . एका व्यक्ती मध्ये एकच वैशिष्ट्ये नसून अनेक वैशिष्ट्ये असू शकतात.वैशिष्ट्य सिद्धांत दृष्टीकोन व्यक्तींमधील व्यक्तिमत्त्वातील फरकांवर लक्ष केंद्रित करते.

गॉर्डन ऑलपोर्ट,हॅन्स आयसेंक,,रेमंड कॅटेल हि काही  नावे आहेत कि ज्यांचे  ट्रेट थेअरी मध्ये महत्वाचे योगदान  आहे .

गॉर्डन ऑलपोर्ट (१९३६) :

 1936 मध्ये गॉर्डन ऑलपोर्टने हे दाखवून दिले की एका इंग्रजी शब्दकोशात वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करणारे 4,000 पेक्षा जास्त शब्द आहेत ; एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये त्यांची प्रेरणा आणि कृती बनवतात. व्यक्तिमत्वाच्या ह्या वैशिष्ट्यांना ऑलपोर्ट नंतरच्या काळात व्यक्तिमत्व स्वभाव म्हणतात. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या ठळक व्यक्तिमत्व घटकांमुळे दुसऱ्या व्यक्तीपासून कशी वेगळी आहे यावर त्यांचा सिद्धांत केंद्रित होता. ऑलपोर्टचा असाही विश्वास होता की एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जन्माच्या वेळी जैविक माध्यमांद्वारे निश्चित केले जाते. त्यांनी गृहीत धरले की एखाद्या व्यक्तीचे अनुभव आणि वातावरण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी भूमिका बजावते. ऑलपोर्टच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांचे बालपणीचे अनुभव, सध्याचे वातावरण आणि ह्या दोन संकल्पनांमधील परस्परसंवाद यांचा प्रभाव पडतो; हे एक ग्राउंडब्रेकिंग गृहितक होते. ह्या वैशिष्टयांना त्यांनी बिल्डिंग ब्लॉक्स मानून त्याचे तीन स्तरांत वर्गीकरण केले :

कार्डिनल ट्रेट्स म्हणजेच मुख्य वैशिष्ट्ये : कार्डिनल वैशिष्ट्ये ही अशी वैशिष्ट्ये आहेत ज्याभोवती एखादी व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य गुंफते !ऑलपोर्टच्या म्हणण्यानुसार हे गुणधर्म दुर्मिळ आहेत मुख्यतः ते नंतरच्या आयुष्यात विकसित होतात परंतु, ही वैशिष्ट्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनात इतकी महत्त्वाची भूमिका बजावतात की ते अनेकदा त्या व्यक्तीच्या नावाचे समानार्थी बनतात म्हणजे एखादी व्यक्ती विशेषतः या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाऊ शकते.जसे कि शिवाजी महाराज आणि बाणेदार शूरपणा ,अब्राहम लिंकन आणि प्रामाणिकपणा , कर्ण आणि दानशूरता , बुद्ध आणि शांती करुणा , गांधीजी  आणि अहिंसा , डॉ. आंबेडकर आणि विद्वत्ता, हिटलर आणि निर्दयता ही काही कार्डिनल ट्रेट्स ची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत .

सेंट्रल ट्रेट्स म्हणजेच मध्यवर्ती वैशिष्ट्ये - एखाद्या व्यक्तीची प्रमुख वैशिष्ट्ये दर्शविणारी वैशिष्ट्ये हि सेंट्रल ट्रेट्स म्हणून ओळखली जातात.ह्यांना एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया बनविणारी वैशिष्ट्ये म्हणूनही मानले जाऊ शकते.हे कार्डिनल वैशिष्ट्यांसारखे प्रबळ नसतात. ऑलपोर्टच्या सिद्धांतानुसार, प्रत्येक व्यक्तीमध्ये 5 ते 10 मध्यवर्ती वैशिष्ट्ये म्हणजेच सेंट्रल ट्रेट्स आहेत. ते प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात उपस्थित असतात.ही अशी वैशिष्ट्ये आहेत जी केवळ विशिष्ट परिस्थितींमध्ये दिसून येतात. बुद्धिमत्ता, लाजाळूपणा,चिडकेपणा, रागीटपणा,प्रामाणिकपणा,हाव ,अप्रामाणिकपणा, भित्रेपणा हि काही सेंट्रल ट्रेट्स ची उदाहरणे आहेत. हि वैशिष्ट्ये व्यक्तीच्या बहुतेक वर्तन ठरवण्यामधील मुख्य घटक आहेत .

सेकंडरी ट्रेट्स म्हणजेच दुय्यम गुणधर्म -दुय्यम गुणधर्म केवळ विशिष्ट परिस्थितीत घडणाऱ्या सामान्य वर्तनामध्ये दिसून येतात . जसे सार्वजनिक सभेत बोलताना नर्व्हस होणे. सेकंडरी ट्रेट्स हे कधी कधी व्यक्तीच्या दृष्टिकोन आणि पसंतीक्रमाशी संबंधित असतात .उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीचे कार्डिनल ट्रेट्स खंबीरपणा आहे त्या व्यक्तीला वेगानं गाडी चालवल्याबद्दल  पोलिस  थांबवतात तेव्हा ती व्यक्ती शरणागतीची  चिन्हे दर्शवू शकते . हे फक्त एक परिस्थितीजन्य वैशिष्ट्य आहे जे व्यक्ती व्यक्तीमधील परस्परसंबंध आणि संवाद दरम्यान दिसून येऊ शकते किंवा दिसू शकत नाही.


आर.बी. कॅटेल

ऑलपोर्ट नंतर, आर.बी. कॅटेल यांनी वैशिष्ट्य सिद्धांतामध्ये मोठे योगदान दिले. त्यांनी वैशिष्ट्य गुणधर्म चे पृष्ठभागीय वैशिष्ट्ये (surface traits) आणि स्त्रोत वैशिष्ट्ये (sourse traits ) ह्यांमध्ये वर्गीकरण केले .

पृष्ठभाग वैशिष्ट्ये - नावाप्रमाणेच हे व्यक्तिमत्त्वाच्या परिघावर आढळतात म्हणजेच हे व्यक्तीच्या दैनंदिन

कृती -संवादातून व्यक्त होतात .त्यांचे व्यक्त होणे इतके स्पष्ट असते की व्यक्तीच्या  व्यक्तिमत्त्वातील त्यांच्या अस्तित्वाबद्दल कोणतीही शंका राहत नाही.

स्त्रोत  वैशिष्ट्ये  - हे व्यक्तिमत्त्वाच्या रचनेचे प्रतिनिधित्व करतात. पृष्ठभागीय वैशिष्ट्यांपेक्षा हे संख्येने कमी असून व्यक्तीच्या दैनंदिन कृती -संवादातून लक्षात येत नाहीत. हि वैशिष्ट्ये तुलनेने स्थिर असतात कारण ती टप्प्या -टप्प्याने विकसित होतात.जेव्हा काही पृष्ठभागीय वैशिष्ट्ये स्रोत वैशिष्ट्यांबरोबर एकत्र येतात तेव्हा ते जाणवतात . उदा.परोपकारी असणे हे जर पृष्ठभागीय वैशिष्ट्य असेल तर त्याचे स्त्रोत वैशिष्ट्य निस्वार्थीपणा, लोभी नसणे, वाटून घेण्याची वृत्ती आणि विचारशील असणे हे होयजर क्रोधिष्ठ हे पृष्ठभागीय वैशिष्ट्ये असेल तर राग, स्वार्थीपणा, ताठरपणा, आणि प्रभुत्व गाजवणे हि स्त्रोत वैशिष्ट्य होय!

त्यांना व्यक्तिमत्व संरचनाच्या वैशिष्ट्यांचे १६ स्रोत वैशिष्ट्ये आढळून आले ज्यांचे त्यांनी पर्यावरणीय मोल्ड,(environmental mould traits ), घटनात्मक वैशिष्ट्ये (constitutional traits), गतिशील वैशिष्ट्ये (dynamic traits), क्षमता वैशिष्ट्ये (ability traits) , स्वभाव वैशिष्ट्ये (temperamental traits)  ह्यामध्ये विभागणी केली .

काही स्त्रोत वैशिष्ट्यांच्या विकासामध्ये अनुवांशिक घटकांपेक्षा पर्यावरणीय घटक अधिक महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणून अशा वैशिष्ट्यांना पर्यावरणीय मोल्ड वैशिष्ट्ये म्हणतात. अनुवांशिक घटकांद्वारे निर्धारित स्त्रोत वैशिष्ट्यांना घटनात्मक वैशिष्ट्ये म्हणतात. गतिशील वैशिष्ट्ये  म्हणजे असे वैशिष्ट्ये  जे एखाद्या  व्यक्तीच्या वर्तनास एका विशिष्ट दिशेला  मार्गदर्शित करतात. वृत्ती आणि भावना ही गतिशील वैशिष्ट्यांची उदाहरणे आहेत. समजा एखाद्या व्यक्तीला मुलींचे  शिक्षण / स्त्री शिक्षण हा जिव्हाळ्याचा विषय वाटत असेल तर त्याला त्याबद्दल आपुलकीची  भावना निर्माण होऊन तो एखाद्या  महिलांच्या शिक्षण प्रसाराशी संबंधित असलेल्या एनजीओ किंवा संस्थेमध्ये सामील होऊ शकते. त्याचे हे वैशिष्ट्ये महिला आणि मुलींच्या शिक्षणाचे त्याचे कार्य, वर्तमानपत्रे आणि इतर विविध मासिकांमध्ये त्या दृष्टीने केलेले लेखन ह्या सगळ्यांमधून व्यक्त होते.ध्येय गाठण्यासाठी ज्या गुणांची मदत होते त्यांना क्षमता वैशिष्ट्ये म्हणतात.उदाहरणार्थ, संगीत क्षमता, संगीतकार होण्यासाठी असणे आवश्यक आहे. ध्येय गाठण्यासाठी व्यक्तीने केलेले प्रयत्न, त्याची त्यामुळे निर्माण झालेली भावनिक स्थिती आणि ऊर्जा ह्यामुळे विकसित होणाऱ्या वैशिष्ट्यांना कॅटेलने स्वभाव वैशिष्ट्ये म्हटले आहे.



हॅन्स आयसेंक

एच.जे. आयसेंकने च्या मते की व्यक्तिमत्त्व हे दोन व्यापक परिमाणांमध्ये,न्यूरोटिसीझम आणि एक्स्ट्राव्हर्शन-इंट्रोव्हर्शन मध्ये विभागले जाऊ शकते तसेच ही परिमाणे जैविक आणि अनुवांशिक घटकांवर  आधारित आहेत आणि प्रत्येक परिमाण त्याच्या अंतर्गत अनेक विशिष्ट वैशिष्ट्यांचा समावेश करते. त्यामुळे त्यांनी एक अशी स्केल  विकसित केली; जिच्या एका टोकाला सामान्य परिमाण आहे आणि दुसर्या टोकाला न्यूरोटिझम आहे. या दोन टोकांदरम्यान, ह्या परिमाणांचा भाग असलेले अनेक वैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रमाणात व्यक्तीमध्ये दिसू शकतात.

प्रथम न्यूरोटिझम आणि त्याच्या अंतर्गत येणारी वैशिष्ट्ये पाहुयात!

न्यूरोटिझम

ज्या डायमेन्शन मधील व्यक्ती मध्ये "नर्व्हस" हा गुणधर्म जास्त प्रमाणात आढळतो त्याला आयसेंकने न्यूरोटिझम हे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच ह्या डायमेन्शन मधील व्यक्तींची सतत वेगेवेगळ्या प्रकारच्या गोष्टींनी चिंताग्रस्त होण्याची प्रवृत्ती असते. पण त्याचा अर्थ असाही होत नाही कि जे लोक न्यूरोटिझम स्केलवर हाय स्कोअर  मिळवतात ते अपरिहार्यपणे चिंताविकाराने ग्रस्त असतात, हे  परंतु हे स्कोअर केवळ अशा व्यक्ती सामान्य व्यक्तींच्या तुलनेने अधिक संवेदनाक्षम आहेत आणि त्यांच्यात न्यूरोटिक समस्या/ चिंताग्रस्त विकार समस्या विकसित होण्याचे चान्सेस अधिक आहेत हे दर्शवितात .

"सामान्यता आणि न्यूरोटिझम हे स्वभावाचे वास्तव परिमाणे आहेत कि जे अनुवांशिकदृष्ट्या निर्धारित असतात आणि शारीरिकदृष्ट्या व्यक्तिमत्वाला आकार देतात" हे त्यांचे म्हणणे आयसेंक खात्रीपूर्वक मांडत असत. त्यांनी ह्या आपल्या म्हणण्याचे संभाव्य स्पष्टीकरण शोधण्यासाठी शारीरिक क्रियांच्या अभ्यास केला. त्यांनी काही लोकांची सिम्फथेटिक नर्वस सिस्टीम हि इतरांपेक्षा जलद आणि पटकन प्रतिसाद देणारी असते असा हायपोथेसिस मांडला. काही व्यक्ती इमरजन्सी च्या काळात ही खूप शांत राहतात,तर काही व्यक्तींमध्ये लक्षणीय भीती किंवा इतर नकारात्मक भावना जाणवतात.काही व्यक्ती अगदी किरकोळ घटनांनीही घाबरून जाऊन विचलित होतात तर काही व्यक्ती कितीही मोठे संकट आले तरी स्वतःवरचे नियंत्रण न हरवता विचलित होत नाहीत,घाबरत नाहीत .आयसेंकच्या मतानुसार अधिक आणि पटकन विचलित होणाऱ्या, घाबरणाऱ्या व्यक्तींच्या ग्रुप चा प्रॉब्लेम हा सिम्फथेटिक नर्वस सिस्टीम ची अतिक्रियाशीलता आहे,जी त्याच्यामध्ये न्यूरोटिक विकार विकसित होण्यास कारणीभूत ठरते  .कदाचित सर्वात "आर्किटाइपल" न्यूरोटिक लक्षण म्हणजे पॅनीक अटॅक ! उदा. तुम्ही एखादा पूल ओलांडताना हलकेच घाबरले आहात,ह्यामुळे तुमची सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय झालीय.  ह्यामुळे तुम्ही अधिक चिंताग्रस्त आणि संवेदनक्षम होता . हे तुमचे चिंताग्रस्त उत्तेजित होणे तुमच्या सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये अजून गोंधळ निर्माण करते आणि त्यामुळे तुम्ही परत अजून जास्त संवेदनक्षम आणि चिंताग्रस्त होत जात आहेत. न्यूरोटिक व्यक्ती ह्या भीतीच्या मूळ वस्तूपेक्षा त्याच्या स्वतःच्या घाबरण्याला जास्त प्रतिसाद देत आहेत!

एक्सट्रॅव्हर्जन -इन्ट्रोव्हर्जन   (बहिर्मुखता-अंतर्मुखता)

त्याचे दुसरे परिमाण म्हणजे बहिर्मुखता-अंतर्मुखता. त्याच्या दृष्टीने ह्याचा अर्थ म्हणजे अभिव्यक्त बडबडणारे, समाजात मिसळणारे व्यक्ती विरुद्ध शांत,अबोल आणि लाजाळू व्यक्ती ! हे परिमाण देखील प्रत्येकामध्ये आढळते, परंतु ह्याचे शारीरिक स्पष्टीकरण थोडे अधिक क्लिष्ट आहे. आयसेंकच्या मते, बहिर्मुखता-अंतर्मुखता

हि मेंदूमधील "प्रतिबंध" आणि "उत्तेजना" च्या संतुलनाची बाब आहे!

उत्तेजना म्हणजे मेंदू स्वतः जागृत होतो, सतर्क होतो, शिकत असतो! प्रतिबंध म्हणजे एकतर  नेहमीच्या आराम करण्याच्या आणि झोपायला जाण्याच्या पद्धतीने  किंवा आपल्यावर हावी होऊ पाहणाऱ्या  किचकट परिस्थितीपासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या पद्धतीने मेंदू स्वतःला शांत करतो !

अशा प्रकारे आयसेंकने गृहीत धरले कि,जो बहिर्मुखी आहे त्याचे मेंदू प्रतिबंध चांगले,मजबूत आहे: जेव्हा आघातजन्य उत्तेजनाचा सामना करावा लागतो; जसे की कार अपघात -एक्स्ट्राव्हर्ट्स व्यक्तीमधील मेंदू स्वतःला प्रतिबंधित करतो, याचा अर्थ असा होतो की तो “सुन्न होतो, आणि म्हणूनच आघातादरम्यानचे  जे घडले ते फारच कमी आठवत असेल. व्यक्तीला असे वाटते कि आघातादरम्यान तो ब्लॅक आऊट झाला ,त्यामुळे त्याला जे आठवत  नाही त्या गाळलेल्या जागा तो इतरांकडून माहिती घेऊन भरतो . ह्या सगळ्या अपघाताचा त्याच्या मानसिकतेवर पूर्ण प्रभाव न पडल्याने (मेंदूच्या प्रतिबंध चे आभार !) ती व्यक्ती दुसऱ्याच दिवशी पुन्हा ड्रायव्हिंग करण्यास तयार असेल .

दुसरीकडे,अंतर्मुख व्यक्तीमध्ये खराब किंवा कमकुवत मेंदू प्रतिबंध आहे:जेव्हा आघातजन्य उत्तेजनाचा सामना करावा लागतो - जसे की कार अपघात - इन्ट्रोव्हर्टस व्यक्तीमध्ये त्याचा मेंदू त्याचे पुरेशा वेगाने संरक्षण करत नाहीत, कोणत्याही प्रकारे ते "सुन्न" होण्याऐवजी, मेंदू उत्तेजित होऊन व्यक्ती अत्यंत सतर्क होतात  आणि जे काही घडले ,घडत आहे ते व्यवस्थित अनुभवतात आणि म्हणून लक्षात ठेवतात . त्यांना बारीकसारीक तपशील आठवत असतो .ते कदाचित त्यांनी संपूर्ण अपघात "स्लो मोशन " मध्ये पाहिला अशी देखील तक्रार करू शकतात.अशा व्यक्ती अपघातानंतर लगेचच गाडी चालवू शकत नाही किंवा कदाचित गाडी चालवणे पूर्णपणे थांबवू शकतात.

न्यूरोटिझम आणि बहिर्मुखता-अंतर्मुखता

आयसेंकने आणखी एका गोष्टीकडे लक्ष दिले ते म्हणजे ह्या दोन परिमाणांचा परस्परसंवाद आणि विविध मानसिक समस्यांमध्ये ह्या परस्परसंवादाची भूमिका काय असू शकते ! उदा.त्याला से आढळूनआले कि फोबिया किंवा भीतीग्रस्त आणि .सी. डी .किंवा ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर असलेले व्यक्ती हे अगदीच अंतर्मुखी आहेत तर कॉन्व्हर्जन डिसऑर्डर (जसे कि हिस्टेरिकल पॅरालीसीस वा उन्माद पक्षघात ) आणि डीसोशिएटिव्ह डिसऑर्डर ( जसे कि स्मृतीभंश वा अम्नेशिया ) असलेल्या व्यक्ती अधिक बहिर्मुख असतातह्या साठी त्यांचे स्पष्टीकरण असे आहे: अत्यंत न्यूरोटिक लोक उत्तेजनांना जास्त तीव्रतेने प्रतिसाद देतात; आणि जर ते अंतर्मुख आहेत,ते खूप लवकर आणि जलदतेने घाबरवून टाकणाऱ्या परिस्थिती टाळण्यास शिकतील आणि  अश्या परिस्थितीच्या अगदी क्षुल्लक चिन्हांमुळे उत्तेजित होऊन घाबरून जात राहतील आणि हि स्थिती त्यांना फोबिया विकसित होण्यापर्यंत पोहोचवतो ! इतर अंतर्मुखी व्यक्ती ज्यामुळे त्यांची भीती काही काळ थांबू शकेल असे विशिष्ट वर्तन त्वरीत आणि पूर्णपणे शिकतील ; जसे की गोष्टी अनेक वेळा तपासणे , पुन्हा पुन्हा हात धुणे किंवा एखादा मंत्र वा वाक्य पुन्हा पुन्हा म्हणणे .

दुसरीकडे, अत्यंत न्यूरोटिक एक्स्ट्रॉव्हर्ट्स ज्या गोष्टी त्यांना हावी होऊ शकतात वा भीतीदायक वाटतात,त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यातआणि विसरण्यात चांगले एक्स्पर्ट आहेत. ते "नाकारणे आणि दडपून टाकणे" ह्या  क्लासिक 

स्व -संरक्षण यंत्रणेत गुंतलेले असतात . उदाहरणार्थ,अश्या व्यक्ती सोयीस्करपणे एखादा  वेदनादायक दिवस वा घटना विसरू शकतात किंवा शारीरिक वेदना अनुभवण्याची आणि शारीरिक अवयव वापरण्याची त्यांची क्षमता हि विसरू शकतात .

सायकॉटिझम किंवा मनोविकार

आयसेंकने अजून एक तिसरा घटक ओळखला ज्याला त्याने मनोविकार म्हणून लेबल केले. न्यूरोटिझम प्रमाणे, सायकॉटिझम  स्केल वर हाय स्कोअर दाखवणारी एखादी व्यक्ती मनोरुग्ण आहे असा अर्थ होत नाही तर फक्त ती मनोविकारांमध्ये सामान्यतः आढळणारे काही गुण प्रदर्शित करते आणि इतर व्यक्तींच्या तुलनेत ती मनोरुग्ण होण्यास अधिकसंवेदनाक्षम असण्याची शक्यता आहे .

सायकॉटिक लोकांमध्ये विशिष्ट बेपर्वाईचा आणि अयोग्य वर्तनाचा समावेश होतो तसेच ते सर्वसामान्य नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि काही प्रमाणात अनुचितपद्धतीने भावनिक अभिव्यक्ती व्यक्त करतात .हे परिमाण ज्यांना संस्थात्मक उपचारांची गरज आहे अश्या लोकांना इतरांपासून वेगळे करते.

वर्तनवाद व्यक्तिमत्व  सिद्धांत  (बिहेव्हरल पर्सनॅलिटी थेअरी ) 

वर्तनात्मक व्यक्तिमत्व सिद्धांत, ज्याला वर्तनवाद देखील म्हणतात, हा  पर्यावरणाशी संबंधित मानवीवर्तनाचा अभ्यास आहे .या विचारसरणीच्या समर्थकांचा असा विश्वास आहे की सर्व वर्तन शिकले जातात आणि वर्तनातील बदल हे लोक, परिस्थिती आणि ठिकाणाशी  संबंधित असतात. हा सिद्धांत मांडणारे  मानतात की लोक बक्षीस आणि शिक्षा प्रणालींवर आधारित वर्तन शिकतात आणि एखाद्या व्यक्तीचा वर्तनात्मक विकास बाह्य शक्तींमुळे होतो.या बक्षीस प्रणालीला कंडिशनिंग म्हणतात, आणि हि कंडिशनिंग  मानवी वर्तनाची व्याख्या निद्रिस्त मनाचे परिणाम  किंवा निरीक्षण करता येणाऱ्या  मनाचे परिणाम म्हणून नाही तर एखाद्याने त्याच्या वातावरणीय परिस्थितीला दिलेल्या प्रतिसादानुसार करते .

प्रथम जॉन वॉटसनने 1913 मध्ये वर्तनात्मक व्यक्तिमत्व सिद्धांत विकसित केला. त्याचा असा विश्वास होता की त्याच्या रुग्णांमध्ये आणि समाजातील लोकांच्या वागणुकीमध्ये आढळत असलेल्या वर्तनाच्या पद्धतींचा अभ्यास करून मानवी वर्तनाचा अंदाज लावता येतो आणि त्यावर नियंत्रण ठेवता येते.त्याचा असा विश्वास होता की मन हे एकटॅब्युला रस” किंवा "कोरी पाटी" आहे. वॉटसनचा असा विश्वास होता की पर्यावरण हेच व्यक्तिमत्व आणि वर्तन घडवणारी एक शक्ती आहे. त्याचा "छोटा अल्बर्ट" प्रयोग हा प्रसिद्ध प्रयोग होता, ज्यामध्ये त्याने छोट्या अल्बर्ट   उंदीर आणि इतर विविध वस्तूंना घाबरण्याची संधी  घडवून आणली . ही प्रक्रिया नंतर कंडिशनिंग म्हणून ओळखली गेली आणि B.F. स्किनरच्या कार्याद्वारे अधिक प्रसिद्ध झाली.

बी. एफ. स्किनर

बी. एफ. स्किनर हे त्यांच्या पर्सनॅलिटी थेअरी आणि स्किनर बॉक्ससाठी प्रसिद्ध वर्तनवादी संशोधक आहेत. वॉटसन वर्तनवादाचे संस्थापक असताना, स्किनरने  उत्तेजनांच्या उपस्थितीत एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याला विशिष्ट प्रकारे कार्य करण्यासाठी विशिष्ट पुनरावृत्ती आणि विविध पर्यावरणीय घटकांद्वारे प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया-कंडिशनिंगवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा सिद्धांत दोन प्रकारचे कंडिशनिंग; क्लासिकल आणि ऑपरंट कंडिशनिंग द्वारे मांडला.

क्लासिकल कंडिशनिंग हे दोन जुळवून आणलेल्या परिस्थितीच्या संधी द्वारे वर्तन शिकवले जाण्याच्या पाव्हलॉव आणि कुत्रा च्या प्रयोगाच्या आधारावर आहे. नवीन वर्तन तयार करण्यासाठी दोन उत्तेजनांचा वापर केला जाऊ शकतो, हे ह्या प्रयोगाच्या विश्लेषणाने सुचवले.उदाहरणार्थ, पावलोव्हने प्रत्येक वेळी आपल्या कुत्र्याला खायला घालताना एक घंटा वाजवली. असे अनेक वेळा घडल्यानंतर अखेरीस, पुरेशा पुनरावृत्तीनंतर, फक्त घंटेच्या आवाजाने कुत्रे लाळ पाझरायला लागले कारण कुत्र्याने घंटेचा आवाज त्याच्या अन्नाशी जोडला.वॉटसनला हा प्रयोग आणि क्लासिकल कंडिशनिंग हे मानवी वर्तन स्पष्ट करण्यास पुरेसा आहे असे वाटत होते पण स्किनरला फक्त हेच  पुरेसे वाटत नव्हते.त्याने वेगळ्या प्रकारच्या संधी चा सिद्धांत मांडला, ज्याला ऑपरंट कंडिशनिंग म्हणतात.



ऑपरेटंट कंडिशनिंग एखाद्या वर्तनाची पुनरावृत्ती होण्याच्या शक्यतेच्या संबंधात प्रतिसादाच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करतेजर एखाद्या वर्तनाला पुरस्कृत केले गेले तर त्या वर्तनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त असते तसेच एखाद्या वर्तनाला शिक्षा झाल्यास, ते विशिष्ट वर्तन कमी होण्याची किंवा थांबण्याची शक्यताही असते हे ऑपरेटंट कंडिशनिंग सूचित करते. क्लासिकल कंडिशनिंग निवड आणि प्रतिसादाचे बारकावे अचूकपणे स्पष्ट करू शकते ह्याबद्दल स्किनरला शंका होती; म्हणून त्याने असा बॉक्स तयार केला, ज्यामध्ये प्राणी ठेवून त्यांचे वर्तन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलात्यांनी प्राण्यांसाठी आवाजापासून ते खाण्यापर्यंतचे आणि बक्षिसे किंवा  शिक्षाचे  वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती वापरल्या परंतु  निवड आणि वागणूक केवळ परिणामातून उद्भवते हे स्किनर बॉक्स ने दाखवून दिले . स्किनर ह्यांचा सिद्धांत चुकीचा नव्हता कारण त्याच्या सिद्धांताने अशी मुले निर्माण केली ज्यांनी पुरस्कारासाठी कठोर परिश्रम केले आणि कोणत्याही किंमतीत शिक्षा टाळली. त्याला असे वाटले की कंडिशनिंगचा हा प्रकार सकारात्मक आणि नकारात्मक संबंधांवर लक्ष केंद्रित करून मानवी वर्तन अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो.



बांडुरा चा सामाजिक संज्ञानात्मक सिद्धांत

अल्बर्ट बांडुरा हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे मानसशास्त्रज्ञ होते. पौगंडावस्थेतील आक्रमकतेचा अभ्यास करताना, शिकण्याच्या संकल्पनेची आणि मॉडेलिंग आणि अनुकरणाशी असलेली त्याची जोड याबद्दल रुची निर्माण होऊन त्याबद्दल च्या संशोधनाद्वारे, त्यांना खात्रीपूर्वक जाणवले की निरीक्षणात्मक शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे. ह्यावर आधारित बांडुरा नी सामाजिक शिक्षण सिद्धांत म्हणजेच सोशल लर्निंग थेअरी विकसित केली ज्याला आता सामाजिक संज्ञानात्मक सिद्धांत वा सोशल कॉग्नेटिव्ह थेअरी म्हणून ओळखले जाते. ह्या सिद्धांतनुसार शिक्षण हे सामाजिक, किंवा ग्रुप मधील परस्परसंवादांमधून होते आणि त्यातील परस्परसंवाद, मजबुतीकरण आणि प्रभाव या सर्व गोष्टी शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. SCT एखादी  व्यक्ती कोण आहेत आणि ती  कसे शिकते ह्यातील अनुभवांची ही नोंद घेते. बंडुरा यांना वाटले की लोक त्यांच्या पद्धतीने का वागतात आणि ते भविष्यात कसे वागतील ही सगळी माहिती आणि एखाद्या व्यक्तीचे भूतकाळातील वातावरण  अचूकपणे ठरवू शकते.त्यांनी सामाजिक संज्ञानात्मक सिद्धांत वा सोशल कॉग्नेटिव्ह थेअरी पाच रचनांमध्ये विभागलेला आहे:

1. परस्पर निर्धारवाद

2. वर्तणूक क्षमता

3. निरीक्षणात्मक शिक्षण

4. मजबुतीकरण

5. अपेक्षा

6. स्वयं-कार्यक्षमता

SCT हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की लोक त्यांचे वर्तन स्व-नियंत्रण आणि मजबुतीकरणाद्वारे नियंत्रित आणि स्थिर करू शकतात .



व्यक्तींचे वर्तन,विचार,कृती  आणि आपसातले  साद -प्रतिसाद समजून घेण्यात पर्सनॅलिटी  विकासाच्या ह्या वेगेवेगळ्या थिअरीज चा महत्वाचा रोल आहे . व्यक्तिमत्व विकासात व्यक्तीचे अनेक पैलू जसे अनुवांशिक घटक,जेनेटिक मटेरिअल,सामाजिक वातावरण, कौटुंबिक वातावरण ,पोषण,त्याची स्वतःची मानसिकता सहभागीअसतात . व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व कसे विकसित होत जाते, त्याची वेगेवेगळी गृहीतके ,संशोधने ,आणि सिद्धांत समजून घेतल्याने आपल्याला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळा का आहे ,काही व्यक्ती काही विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट पद्धतीनेच का वागतात हे समजू शकते तसेच  काही विशिष्ट परिस्थितींना आणि त्यांच्या आवडीच्या आणि महत्त्वाच्या गोष्टींना व्यक्ती कसा प्रतिसाद देतील याचा अंदाज लावू शकतो.


Rohini Phulpagar

psychologist 

7840908441

themindtalks4u@gmail.com



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)