ह्युमॅनिस्टिक थेअरी

TheMindTalks
0

 

ह्युमॅनिस्टिक थेअरी

पर्सनॅलिटी ची ह्युमॅनिस्टिक थेअरी म्हणजेच मानवतावादी सिद्धांत फक्त एखादी व्यक्ती, व्यक्ती म्हणून कशी आहे, तिच्या विचारांची पद्धत आणि गुणधर्म ,तिच्या भावना आणि वर्तन तसेच हे सगळे व्यक्तिमत्वाचे पैलू किंवा गुणधर्म  तिच्यात कुठून निर्माण झालेत हेच जाणून घेत नाहीत तर एखादी व्यक्ती, ती मूलतः माणूस म्हणून घडवण्यासाठी किंवा स्वतःला हवी तशी पर्सनॅलिटी घडवण्यासाठी  स्वतःचा साचा कसा तयार करते ; स्वतःच्या दृष्टीकोनातून आपले आयुष्य कसे अर्थपूर्ण बनवते ;त्यासाठी त्या व्यक्तीचा स्वतःबद्दलचा ,स्वतःच्या पर्सनॅलिटी बद्दलचा अर्थ काय आहे ह्यावर सुद्धा प्रकाश टाकते .

ह्युमॅनिस्टिक पर्सनॅलिटी थेअरी सांगते कि एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी समजून घेण्यासाठी आधी त्याने किंवा तिने स्वतःला कसे जाणून घेतले आहे हे समजून घेतले पाहिजे . थोडक्यात एखाद्याला आतून जाणून घेणे !

ह्युमॅनिस्टिक पर्सनॅलिटी थेअरी , व्यक्तीमध्ये असलेल्या इच्छाशक्ती आणि त्या इच्छाशक्तीचा व्यक्तीची पर्सनॅलिटी ला आकार देण्याच्या भूमिकेवर भर देते .हा सिद्धांत पर्सनॅलिटी ठरवणाऱ्या फिक्स्ड आणि वैश्विक घटकांपेक्षा व्यक्तिनिष्ठ अनुभवांच्या पैलूंवर प्रकाश टाकतो ! 

ह्युमॅनिस्टिक पर्सनॅलिटी थेअरी मांडणाऱ्यांमधील ठळक नावे म्हणजे अब्राहम मॉस्लो आणि कार्ल रॉजर ज्यांनी अनुक्रमे हायरार्कीज ऑफ नीड्स म्हणजेच व्यक्तीच्या गरजांची मांडणी , सेल्फअक्चुअलाइझेशन म्हणजेच स्व -वास्तविकता चे भान चे सिद्धांत मांडले.

अब्राहम मॉस्लो ची थेअरी :

अब्राहम मॉस्लो ने १९४०-५० च्या दशकात हायरार्कीज ऑफ नीड्स चे मॉडेल विकसित केले आणि आज हि हे मॉडेल मोटिवेशन , मॅनेजमेन्ट ट्रेनिंग्स आणि पर्सनल डेव्हलोपमेंट साठी महत्वाचे मानले जाते मॉस्लो ने ह्या पिरॅमिड्स मध्ये प्राथमिक गरजांपासून सुरुवात करून एक पूर्ण झाल्यावर निर्माण होणारी दुसरी गरज अशी मांडणी करून शेवटी स्वतःला ओळखण्याचा प्रवास मांडला आहे .

 

शारीरिक गरजा (Physiological needs) :

शारीरिक गरजांमध्ये जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत, जैविक गरजाचा  समावेश होतो. यामध्ये हवा,, पाणी ,अन्न, निवारा,वस्त्र,उबदारपणा, सेक्स  इ.गरजा येतात. एखाद्या व्यक्तीच्या योग्य कार्यासाठी या गरजा पूर्ण करणे फार महत्वाचे आहे. मास्लोच्या मते, शारीरिक गरजा सर्वात महत्त्वाच्या आहेत कारण या मूलभूत गरजा पूर्ण होण्यावर बाकीच्या गरजांची निर्मिती अवलंबून आहे.

सुरक्षा आणि संरक्षणात्मक गरजा (safety and security needs)

शारीरिक गरजांच्या पूर्ततेनंतर सुरक्षा आणि संरक्षणाची गरज निर्माण होते . या गरजा एखाद्याच्या जगण्यासाठी सामाजिक अशांतता, संकट, युद्ध, संघर्ष इत्यादीपासून स्वतःचे संरक्षण आणि सुरक्षा करतात कारण ह्याठिकाणी व्यक्तीचा सुरक्षित परिस्थिती, स्थिरता, संरक्षण शोधण्यात स्वारस्य आहे. हि आयुष्यातील सुरक्षितता आणि स्थैर शोधण्याची गरज व्यक्तीचा विकास करते.

उदाहरणार्थ, आर्थिक सुरक्षा जसे की रोजगार, सामाजिक सुरक्षा जसे की सामाजिक पत आणि प्रतिष्ठा आणि स्थिरता, कायदा आणि सुव्यवस्था, शारीरक सुदृढता आणि आरोग्य !

प्रेम किंवा मालकी हक्क गरजा (love and belonging needs)

मूलभूत आणि सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण झाल्या की, तिसऱ्या स्तरांमधील आपुलकीच्या गरजा निर्माण होतात. लोकांना सुरक्षित वाटत असल्याने, त्यांना आता , मैत्री, कुटुंब, मुलंबाळं आणि समाजातील इतर घटकांशी प्रेम आणि आपुलकी निर्माण करण्याची गरज वाढते . इथे आपण असे हि म्हणू शकतो कि हि गरज भावनिक गुंतण्याची आणि गुंतवणूक होण्याची गरज असते .

आपुलकीच्या गरजांच्या उदाहरणांमध्ये नातेसंबंध, प्रेम, जवळीक, मैत्री, विश्वास, स्वीकृती आणि आत्मसमर्पण , काळजी घेणे आणि काळजी घेतली जाणे यांचा समावेश होतो.

सन्मानाची गरज ( esteem needs )

मास्लोच्या गरजांच्या पिरॅमिड्स मधील  गरजांचा चौथा स्तर आहे सन्मानाचा ! ह्यात  सेल्फ वर्थ , कर्तृत्व आणि आदर या गरजा आहेत. एकदा व्यक्तींनी  स्वतःला ओळखले आणि त्यांना सामाजिक वातावरणात सुरक्षित वाटले की, व्यक्ती स्वाभिमान,सेल्फ रिस्पेक्ट ,प्रतिष्ठा, स्टेटस  आणि सेल्फ वर्थ  शोधतात.

मास्लोच्या मते, सन्मानाच्या गरजा आणखी दोन प्रकारच्या असतात:

अ) स्वतःचा आदर  ब) इतरांचा आदर.

 मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी हि गरज , गंभीर गरज बनते कि  जी खऱ्या अर्थाने आत्मसन्मान आणि आदर मिळवण्याचा मार्ग मोकळा करते.

स्वत: ची वास्तविकता ओळखण्याची गरज (self-actualization needs )

मास्लोच्या गरजांच्या पिरॅमिड्स मध्ये हि गरज सर्वोच्च ठिकाणी आहे. ह्यात व्यक्तीची पूर्ण कार्यक्षमता साध्य करणे,स्वत:च्या विधायक विकासाचा ध्यास आणि त्याची पूर्तता करणे आणि स्व-अनुभवांची  सर्वोच्च अनुभूती  मिळवणे ह्या संबंधित गरजा असतात.

मास्लोच्या मते, ही गरज एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार सर्वकाही बनवते, त्याला त्याची सर्वोच्च क्षमता प्राप्त करते. व्यक्ती उच्च क्षमतांच्या जणिवेची ओळख होण्याच्या गरजा लक्षात घेण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करतात.

उदाहरणार्थ, एखाद्याला आर्थिकदृष्ट्या वा  राजकीय दृष्ट्या एक भक्कम स्थान  साध्य करण्याची प्रबळ इच्छा असू शकते, तर दुसऱ्याला वैवाहिक आयुष्यातील  एक आदर्श जोडीदार  बनण्याची इच्छा असू शकते.तर आणखी कोणाला प्रस्थापित नियमांच्या पलीकडे जाऊन यशस्वी करिअर करण्याची प्रबळ इच्छा असते.

मास्लो या सर्व गरजाना  जगण्याच्या अंगभूत गरजा म्हणून पाहतो, आपल्या अनुवांशिक अंतःप्रेरणाप्रमाणे !

 कार्ल रॉजर ची थेअरी

ह्युमॅनिस्टिक थेअरी मधील अजून एक ठळक नाव म्हणजे कार्ल रॉजर ! कार्ल रॉजर मॉस्लो च्या मॉडेल शी सहमत होते ; त्यात त्यांनी व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी "पोषक वातावरण" हा घटक सामील केला . असे पोषक वातावरण कि ज्यात व्यक्ती मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो, जिथे त्याचा बिनशर्त स्वीकार असतो; जिथे त्याचे ऐकले जाते आणि समजून घेतले जाते; अश्या वातावरणामुळे  त्याला विकसित होण्यास संधी निर्माण होतातजसे सूर्यप्रकाश आणि पाण्याशिवाय झाड वाढत नाही तसेच अश्या वातावरणाशिवाय  नातेसंबंध आणि निरोगी व्यक्तिमत्त्व जसे पाहिजे तसे विकसित होत नाहीत. रॉजर्सचा असा विश्वास होता की प्रत्येक व्यक्ती जीवनात त्यांचे ध्येय, इच्छा आणि आकांक्षा साध्य करू शकते.जेव्हा हे घडते तेव्हा सेल्फ अक्चुअलाइझशन आकार घेत असते. मानसशास्त्र मध्ये सेल्फ अक्चुअलाइझशन संकल्पना  हे कार्ल रॉजर्सचे सर्वात महत्वाचे योगदान आहे .

सेल्फ अक्चुअलइझशन

कार्ल रॉजर चे असे म्हणणे आहे कि प्रत्येक माणसाचा एक मूळ हेतू असतो तो म्हणजे स्वतःमधील क्षमता ओळखून ती वापरण्याच्या  प्रवृत्तीचा शोध घेणे आणि शक्य तेवढी मनुष्यत्वाची उच्च पातळी साध्य करणे. रॉजर्सचा असा विश्वास होता की लोक मूलतः  चांगले आणि सर्जनशीलआहेत.ते तेव्हाच विध्वंसक बनतात जेव्हा स्वतःबद्दलची संकल्पना कमी असते  किंवा बाह्य मर्यादा व्यक्तीच्या दृष्टीकोन तयार होण्याच्या प्रक्रियेला  झाकोळून टाकतात !

जसे योग्य वातावरणात एखादे फुल त्याच्या पूर्ण क्षमतेने फुलते पण तेच योग्य वातावरण अभावी  कोमोजते त्याच प्रमाणे माणसाचे हि असते : योग्य वातावरणात व्यक्ती त्याच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेतो .

कार्ल रॉजर चे असे हि मानने होते कि एखाद्या व्यक्तीला सेल्फ -अक्चुअलइझशन प्राप्त करण्यासाठी व्यक्तीचा आत्म सुसंवाद महत्वाचा आहे . ह्याचा अर्थ असा आहे कि सेल्फ अक्चुअलइझशन तेव्हाच घडते जेव्हा त्याचा आयडिअल सेल्फ (म्हणजेच आपण जसे असायला पाहिजे असे व्यक्तीला वाटते ) आणि व्यक्तीचे वास्तव वर्तन ह्यात योग्य संतुलन साधले जाते . रॉजर्सचा प्रत्येक व्यक्ती आपले ध्येय साध्य करू शकते ह्यावर विश्वास होता . म्हणजेच व्यक्ती वेळोवेळी मिळणाऱ्या स्वानुभवांच्या आणि भावनांच्या आधारे सतत स्वतःमध्ये बदल करत असतो आणि विकसित होत असतो ह्यावर विश्वास होता !

रॉजर ने परिपूर्ण कार्यक्षम व्यक्तीची पाच वैशिष्ट्ये सांगितली आहेत :

  • ओपन टु एक्सपेरियन्स म्हणजेच अनुभवांसाठी तयार असणे : ह्यात व्यक्ती येणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक अनुभवांसाठी तयार असते , नकारात्मक अनुभव टाळणे किंवा त्याच्यापासून पळ काढला जात नाही तर त्यातून मार्ग काढला जातो .
  •  एक्सिस्टिन्शल लिविंग म्हणजेच आयुष्याच्या जवळ राहणे  : ह्यात व्यक्ती पूर्वग्रह आणि पूर्वकल्पना टाळून जगण्याचे वेगवेगळे अनुभव घेत असते. सतत भूतकाळ किंवा भविष्यकाळावर लक्ष केंद्रित न करता वर्तमानात सजगतेने आयुष्य जगण्यास सक्षम असते .
  • ट्रस्ट फीलिंग्स म्हणजेच जे जाणवते त्यावर विश्वास ठेवणे : ह्यात व्यक्ती अंतःप्रेरणा , भावना , गट फीलिंग्स ह्यावर लक्ष देते ,विश्वास ठेवते . व्यक्तीचा स्वतःच्या निर्णय प्रकियेबद्दल आत्मविश्वास असतो आणि आपल्या निर्णयांची जबाबदारी घेतली जाते .
  • क्रिएटिव्हिटी म्हणजेच सर्जनशीलता : सर्जनशील विचार आणि जोखीम घेणे ही व्यक्तीच्या जीवनाची वैशिष्ट्ये आहेत. व्यक्ती नेहमीच सुरक्षित खेळी खेळत नाही. ह्या वैशिष्ट्यांमध्ये व्यक्तीच्या नवनवीन अनुभवांसाठी स्वतःला तयार करणे  ,समायोजित करणे आणि स्वतःमध्ये बदल करण्याच्या क्षमतांचा समावेश होतो.
  •  फुलफिल्ड लाईफ म्हणजेच परिपूर्ण आयुष्य : ह्या वैशिष्ट्यानुसार व्यक्ती जीवनात आनंदी आणि समाधानी असते आणि नेहमी नवीन आव्हाने आणि अनुभव शोधत असते.

रॉजर साठी पूर्ण  कार्यक्षम व्यक्ती म्हणजे ज्यांच्यात  योग्य आणि चांगले समायोजन, संतुलन आणि आयुष्याबद्दल रुची आहे .




पर्सनॅलिटी थेअरी मध्ये रॉजर ने  महत्व दिलेले सेल्फ म्हणजे स्वतःबद्दलच्या धारणा ,समजुती आणि विश्वासांचा संघटित, सुसंगत संच ! ह्या सेल्फ वर व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवांचा आणि व्यक्तीने त्या अनुभवांचे लावलेले अर्थ ह्यांचा पगडा असतो .  व्यक्तीच्या सेल्फ वर  जास्त प्रभाव टाकणारे प्राथमिक दोन घटक म्हणजे व्यक्तीचे लहानपणीचे अनुभव आणि व्यक्तीचे इतरांनी केलेले मुल्यांकन !

रॉजर म्हणतात , व्यक्ती आपल्या आइडिअल सेल्फ नुसार आपली प्रतिमा बनवू इच्छितो . जेवढे आइडिअल सेल्फ आणि सेल्फ प्रतिमा ह्यांच्यात साम्य असते तेव्हडा जास्त व्यक्तीचा आत्म सुसंवाद वाढतो . आत्म सुसंवाद वाढला कि आत्मसन्मान वाढतो . रॉजर ने सेल्फ चे तीन घटक सांगितले आहेत :

  1. सेल्फ वर्थ म्हणजेच आत्म सन्मान ह्यात आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे पैलू येतात .
  2. सेल्फ ईमेज म्हणजेच स्व प्रतिमा ह्यात आपल्या शारीरिक प्रतिमांचा (म्हणजेच चांगले किंवा वाईट , सुंदर वा कुरूप) आपल्या अंतर्गत व्यक्तिमत्वावर होणार परिणाम हे पैलू येतात .
  3.  आयईडील सेल्फ म्हणजेच आदर्श -स्व . आदर्श स्व म्हणजे व्यक्तीला आपण स्वतः कश्या प्रकारची व्यक्ती असायला हवे असे वाटणे ! ह्यात व्यक्तीचे ध्येय आणि महत्वाकांक्षा येतात कि ज्या गतिमान असून सतत बदलणाऱ्या असतात . त्यांचा पाठपुरावा हे पैलू ह्यात येतात . 





ह्युमॅनिस्टिक पर्सनॅलिटी थेअरी व्यक्तीमधील अंत:र्प्रेरणा , गरजा ,स्व विकासाची भूक , आणि जे तो मिळवू शकतो ते मिळवण्याची त्याची क्षमता ह्यावर प्रकाश टाकते . ह्यामध्ये व्यक्तीसाठी पोषक वातावरण , स्व -संकल्पना आणि बिनशर्त स्वीकार ह्या गोष्टी कार्यक्षम व्यक्तीसाठी महत्वाच्या मानल्या गेल्यात .

 

रोहिणी फुलपगार

psychotherapist 

7840908441

Themindtalks4u@gmail.com

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)