विचारांचं बीज
पावसाळा हा ऋतू मला नेहमीच भावतो. एक गंमत असते ना पावसाळ्यात..!!!
तुम्ही जिकडे नजर टाकाल, तिकडे जमिनीतुन काही तरी उगवलेले असते आणि नजर जाईल तिथपर्यंत जमीन हिरवीगार असते .
मला नेहमीच आश्चर्य वाटत राहते की एवढं सगळं उगवुन येण्यासाठी लागणारे बीज जमिनीने कुठे ठेवलेले असते?
हिवाळा, उन्हाळा ते आपले अस्तित्व पण जाणवू देत नाही पण पावसाच्या एका सरीने त्यांचं असणं जाणवतं.
रणरणत्या उन्हात धरती स्वतः खूप आतपर्यंत तापते तरी हे बीज कुठे जपून ठेवत असेल बरं?
फक्त एखादा किंवा दुसरा पावसाच्या पाण्याचा तिला स्पर्श झाला की हे सगळे बीज तिच्यातून सरसरून वरती येतात आणि तिला व्यापून टाकतात.
मानसोपचार तज्ञ असल्यामुळे मला नेहमीच ह्या नैसर्गिक बदलांचा मानवी विचार प्रक्रिया आणि स्वभाव यांच्याशी सांगड घालायचा मोह होतो.
आपली तरी काय वेगळी अवस्था असते ह्या पेक्षा?
आपण ही आशा कितीतरी विचारांच्या ठाम समजुतीचे बीज आपल्यात खूप आतमध्ये जपून ठेवत असतो आणि त्या विचारांवर ठाम राहतो. निद्रिस्त अवस्थेत ते आपल्या मनात असतात, मग एखाद्या सरी सारखी त्या विचारांना पाणी देणारी पोषक घटना घडली की ते विचार सरसरून बाहेर येतात आणि आपले भावविश्व व्यापून टाकतात.
पावसाळ्यात जसे रानफुले , पौष्टिक रान भाजी असे उपयोगी वनस्पती उगवतात तसेच खूप निरुपयोगी तण, आणि टोकदार काटे असलेले कुसळ पण येतात, तसेच विचारांचं पण आहे.. !!!
आपल्या मनात जपून ठेवलेल्या ठाम समजुतीच्या बीजानुसार आपले विचार दिशा घेतात !!!
त्यातील काही आपल्याला अत्यंत उपयोगी असतात...!
तर
काही अगदी निरुपयोगी..... तर काही खूपच त्रासदायक असतात...!!
पण
आपल्याला मिळालेली एक जबरदस्त दैवी देणगी म्हणजे "आपल्याला चॉईस आहे..."!!
ती म्हणजे ..... कोणते ठाम समजुतीचे बीज मनात रुजवायचे आणि कोणत्या बीज ला रुजू द्यायचं नाही हे सर्वस्वी आपल्यावर आहे...!!
"सुंदर फुलांनी बहरलेल्या कास पठाराची सर
कुसळ असलेल्या माळरानाला येत नाही.!!"
रोहिणी फुलपगार
सायकॉलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट
+91 96049 68842
सायकॉलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट
+91 96049 68842