टीकास्त्र

TheMindTalks
0

टीकास्त्र
( भाग १ )
        परवा  दुपारी निवांत पुस्तक वाचत बसले होते, फोन ची रिंग वाजली, पलीकडून एक अंदाजे २५/२६ वयाचा  मुलगा बोलत होता, "मॅडम मला तुमची माझ्या एका प्रॉब्लेम साठी मदत हवी आहे ! मी अमुक अमुक कंपनीत काम करत आहे.  तिथे मी जॉईन झाल्यावर माझे दोन मित्र  झाले.  मी त्या दोघांना माझ्या खूप जवळचा मानतो !  पण गेल्या वर्षभरापासून त्यांचे माझ्याबरोबरचे वागणे बदललेय !  ते माझ्यावर सतत टिका टिपण्णी करत असत. माझे  दिसणे, कपड्यांची स्टाईल यावरून सगळयांसमोर कमेंट्स करतात, माझ्या कामाच्या पध्दतीवर पण शेरेबाजी करत असतात. ह्या सगळ्याचा मला खूप त्रास होतो. मी ही नोकरी सोडू शकत नाही !  ह्या सगळ्या कंमेंट्स आणि त्यांच्या टीकेला मी  कसा  तोंड  देवू ? आता  लॉक डाऊन  च्या काळात मी  घरी आहे तर  त्यांचे  वागणे मला आठवत राहते मी अस्वस्थ  होतो !  ह्या सगळ्यांतून मी  कसा बाहेर पडू शकतो ?
           बरोबर  आहे, भल्याभल्यां चा ह्या  टीकास्त्रा पुढे  निभाव लागत नाही. आज आपण हे “टीकास्त्र " समजून घेऊया !!

                        'निंदकाचे घर असावे शेजारी ' असे जरी  आपल्यात म्हणत असले तरी प्रत्यक्षात आपल्यावर होणारी  टीका वा आपली केली जाणारी  आलोचना किती जणांना सहन होते ? काही लोक असतात की जे आपल्यावर होत  असलेल्या आलोचनेत  पण  विचलित वा अस्वस्थ होता तटस्थ राहतात  पण स्वतःच्या  होणाऱ्या आलोचनेमुळे अस्वस्थ होऊन  भावनिक  गर्तेत अडकणाऱ्या व्यक्तींचा ग्रुप ही मोठा आहे !
                     काय  असते  ही टिका  टिपण्णी ,निंदा , आलोचना ?
                     लहानपणापासून व्यक्तीचे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्यमापन होत असते.  हे मूल्यमापन व्यक्तीचे आचार, विचार, दिसणे, वागणे, पोशाख, अन्नपाण्याच्या सवयी, कृती, कृत्य ह्यावरून होत असते आणि  हे मूल्यमापन स्वतः व्यक्ती सोडून इतर सर्व आजूबाजूचे लोक करत असतात ! बरं यात व्यक्तीचे एक पूर्ण व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण मूल्यमापन नसते तर त्याचा एखाद्या दुसऱ्या वैशिष्ट्याचे, गुणाचे वा घटकाचेच मूल्यमापन असते !  हे  मूल्यमापन वा  मूल्यांकन  जर सकारात्मक असेल आणि त्यामुळे आपल्यात  आनंददायी भावना निर्माण होत असेल  तर आपण त्याला प्रशंसा  वा कौतुक  म्हणतो !  पण जर  हेच  मूल्यमापन वा  मूल्यांकन नकारात्मक असेल आणि त्यामुळे आपल्यात  निराशा वा दुःखी भावना निर्माण होत असेल तर आपण त्याला टीका किंवा आलोचना म्हणतो !
                             
             एखाद्या ला त्याचे एखाद्या वैशिष्ट्याचे केलेले कौतुक किती काळ  आठवते ??   एक आठवडा !  जास्तीत जास्त एक महिना !  नंतर फक्त तो प्रसंग आठवणीत राहतो, बाकी भावनांची तीव्रता  ओसरली जाते !  पण  टीकेबाबतीत तसे  होत  नाही. जसजसे दिवस जातात तसतसे व्यक्ती स्वतःची  झालेली आलोचना विसरत तर नाहीच पण भावनेची तीव्रता ही ओसरली जात नाही . टीकेचा प्रसंग आठवल्यावर नकारात्मक भावना ही तीव्र होते ! याचे कारण दडलेले आहे, व्यक्ती त्या टीकेला काय अर्थ लावतो यामध्ये ! प्रत्येक जण आपल्यावरील आलोचनेला वा टीकेला काही अर्थ जोडत असतो आणि तो अर्थच व्यक्तीला अस्वस्थ करतात . साधारणपणे प्रत्येकालाच एखाद्या व्यक्तीकडून वा खास व्यक्ती जसे आई, वडील, पती, पत्नी, मुलं, जवळचे        मित्र/मैत्रिणी, शिक्षक, वरिष्ठ अधिकारी वा जवळचा सहकारी ह्यांच्या नजरेत आपल्याबद्दल प्रशंसा, सन्मान   वा कौतुक दिसावे असे वाटते व यासाठी व्यक्ती सतत प्रयत्नशील असते. बहुतेकवेळा खास वा स्पेशल व्यक्तींच्या म्हणण्यानुसार वागायचा व्यक्तीचा कल ही असतो! या सगळ्या धडपडी मागे, आपण कोणाच्यातरी दृष्टीने महत्वाचे आहोत, अर्थपूर्ण आहोत ! कोणाला तरी माझी कदर आहे, मी सन्माननिय आहे ह्या जाणिवेची सुप्त आस असते. अश्या वेळी झालेल्या आलोचनेमुळे / टीकेमुळे व्यक्ती जास्त विचलित होते कारण ह्या टीकेचा :
1   .     इतरांनी वा समोरच्याने मला दुखावलेय ,मी आतून दुखावला गेलोय .
2   .      इतरांनी  वा समोरच्याने मला लज्जास्पद  स्थितीत टाकलेय ,मला माझी शरम वाटतेय .
 हे अर्थ काढते म्हणजेच व्यक्तीचे दुखावले जाणे आणि लज्जास्पद वाटणे हे दोन अर्थ ती आपल्यावरील आलोचनेला लावते .
     दुखावले गेलेच्या  भावनेत  व्यक्तीला असे वाटत राहाते की समोरच्या व्यक्तींकडून त्याचे ,त्याच्या कामाचे, नात्याचे व्यवस्थित मूल्यमापन केले गेले नाही, आदर ठेवला गेला नाही. " मी ह्या व्यक्तीसाठी इतके सारे करतोय, तरी ही त्याला माझी कदर नाही, माझा आदर नाही. मी असे त्याचे माझ्याबरोबरचे वागणे अजिबात डिझर्व्ह नाही करत !" असा विचार करत आपल्याला योग्य वागणूक व सन्मान मिळत नाही ह्या भावनेने दुखावली जाते. उदा. एखाद्या कष्टाळू कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्याच्या अधिकाऱ्याकडून  कामाच्या पध्दतीवर, एखादया बिझनेस मध्ये पार्टनर कडून दुसऱ्या पार्टनर च्या निर्णय क्षमतेवर, एखाद्या पत्नीला पती वा सासरच्या माणसांकडून, किंवा एखादया तरुण मुलाला / मुलीला तिच्या मित्र मैत्रिणींकडून तिच्या राहणीमान वा दिसण्यावरून जर सतत आलोचना, टीका टिपण्णी सहन करावी लागते तेव्हा ह्या व्यक्तींमध्ये दुखावले गेल्याची भावना तीव्र होत जाते. 
व्यक्तीला जेव्हा वाटते की त्याच्यावरील आलोचनेमुळे / टीकेमुळे त्याच्यात असलेले दोष ( इतरांना वाटणारे आणि व्यक्तीने स्वतःशी मान्य केलेले ) आता सगळ्यांना कळेल ! मला लज्जास्पद वाटते कारण मी समोरच्याने जे माझे अवगुण शोधून माझ्यावर टीका केलीय ते मी मान्य करतोय, स्वीकारतोय ! ते अवगुण आता इतरांना ही कळतील व ते सगळे माझ्यापासून दुरावतील ह्या भीतीने माझी आलोचना/टीका  मला लज्जास्पद वाटतेय, मनात शरमेची भावना निर्माण होतेय. उदा. एखाद्या अंतर्मुख स्वभावाच्या मुलाला त्याचे मित्र त्याच्या भिडस्त स्वभावावरून त्यामध्ये सोशल स्किल्स कमी आहेत अशी आलोचना  करत असतील तर तो मुलगा ते मान्य करतो आणि आपल्यात ही कमतरता आहे हे त्याला लज्जास्पद वाटत राहाते. एखादा व्यक्ती जर वयाच्या २८/३० वर्षापर्यंत कायमस्वरूपाची नोकरी मिळवून आर्थिक बाजूने मजबूत झाला नसेल आणि यामुळे त्याचे पालक वा इतर  नातेवाईक त्याची आलोचना करत  असेल इतरांच्या म्हणण्यानुसार स्वतःला अपयशी असल्याचे मान्य करतो व हे अपयशी असणे त्याला लज्जास्पद वाटते. एखादा पती जर आपल्या पत्नीची मॉडर्न न दिसण्यावरून आलोचना करत असेल तर  ती स्वतःला गावंढळ आणि पतीच्या मनाप्रमाणे नसणारी पत्नी हे मान्य करते. मॉडर्न आणि चांगली पत्नी  नसणे हे तिला लज्जास्पद वाटते.
  हे ' सोशल स्किल्स नसण, अपयशी असणे वा आधुनिक आणि चांगली पत्नी नसणे ' ह्या आपल्या कमतरता आहेत आणि त्या जर चारचौघांना कळल्या तर बाकी लोक पण आपली आलोचना करणार, आपल्याला एकटे पडणार ह्या अर्थाला व्यक्ती घट्ट धरून ठेवते व अस्वस्थ होत जाते. बहुतेकवेळा  व्यक्ती आपल्यावरील टीकेला प्रतिसाद एकतर बचावात्मक पवित्रा घेऊन वा राग व्यक्त करून देतो. जेव्हा  आलोचनेमुळे व्यक्ती मध्ये शरमेची भावना निर्माण होते तेव्हा व्यक्ती बचावात्मक पवित्रा घ्यायला लागतो ! स्वतःची बाजू सतत पटवून द्यायचा प्रयत्न करतो ! " मी तसा नाही " वा " इतर लोक ज्या मुळे माझी  सतत आलोचना करत असतात, ते गुण वा घटक माझ्यात नाही " हे इतरांना परोपरीने आपल्या कृतींतून, देहबोलीतून पटवून द्यायचा प्रयत्न करते आणि त्यांनी मान्य करावे म्हणून धडपड करत राहते. जेव्हा व्यक्ती दुखावली जाते तेव्हा ती राग व्यक्त करत टीकेला प्रतिसाद देते. हे राग व्यक्त करण्याचे पण  वेगवेगळे मार्ग असतात, रागाने आतल्याआत धुमसत राहणे, कम्युनिकेशन बंद वा कमी करणे, देहबोलीतून आणि शब्दांतून नाराजी व्यक्त करणे किंवा पूर्णपणे अलिप्तता बाळगणे.
            टीकास्त्रा बद्दल  एवढे  सगळे कळले ,त्याच्यामुळे  व्यक्तींवर  होणारे  परिणाम कळले ,पण  जर  ह्या  अस्त्राला  सामोरे जायचे असेल  तर  कसे  जायचे ?
( क्रमश: ). . .

रोहिणी फुलपगार
सायकॉलॉजिस्ट सायकोथेरपीस्ट
9604968842
www.evergreeneverhappy.blogspot.com









Post a Comment

0Comments

Post a Comment (0)