"जीवनात प्रतिकूलता आली कि आपण विचारतो; हे माझ्याच बाबतीत का ?"
"प्रतिकूलता अपवाद नाही, नियम आहे, हा नियम स्वीकारला कि मनाचा प्रतिकार कमी होतो."- गौतम बुद्ध
आपले आयुष्य हे एखाद्या ठराविक आदर्श चित्रासारखे आपल्यापुढे उभे नसते किंवा एखाद्या सरळसोट रस्त्याप्रमाणे आखीव रेखीव ही नसते. त्यात अनेक वळणे, अचानक आलेले चढ, उतार, आकस्मिक आलेले नागमोडे रस्ते, एखादी दरी, खड्डा, एखादी अनवट वाट तर एखादा डोंगर अचानकपणे उभे ठाकतात.
प्रत्येकाला कधी ना कधी अनुभवणारा आयुष्यातील हा बदल व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो. विचारांची, तीव्र भावनांची आणि काळजी व चिंतेची एक मोठी लाट निर्माण करतो. त्या लाटेत काही व्यक्ती सैरभर होतात, काही व्यक्ती मजबूत राहतात तर काही व्यक्ती लाट ओसरून जाण्याची शांतपणे वाट बघतात! आलेल्या बदलांची लाट कितीही मोठी असली तरी माणूस सामान्यतः कालान्तराने जीवन बदलणाऱ्या परिस्थिती आणि तणावपूर्ण परिस्थितींशी चांगले जुळवून घेतो; काही लवकर तर काहींना जरा जास्त वेळ लागतो.
हे आयुष्यातील वळणांशी, बदलांशी जुळवून घेणे व्यक्तीला जमते ते एका क्वालिटीमुळे; ती क्वालिटी म्हणजे - भावनिक लवचिकता; इमोशनल रेजिलन्स!
इमोशनल रेजिलन्स म्हणजे फक्त प्रतिकूल परिस्थितीच्या आव्हानांतून बाहेर येणे एवढेच मर्यादित नाही तर आयुष्य जे काही आव्हानं तुमच्यासमोर निर्माण करते त्यातून शिकून स्वतःचा विकास करणे आहे! कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये समायोजन, स्वतःची रिकव्हरी, आणि सकारात्मक विकासाची क्षमता निर्माण करणे हे सगळे इमोशनल रेजिलन्स मध्ये येते.
इमोशनल रेजिलन्स: प्रतिकूलतेतही स्थिर राहण्याचे कौशल्य! ह्या लेखात आपण इमोशनल रेजिलन्स मागचे सायन्स, हे कौशल्य कसे विकसित करायचे आणि ह्याचा आपल्या सेल्फ इम्प्रोव्हमेन्ट साठी कसा उपयोग होतो हे बघुयात!
इमोशनल रेजिलन्स चे सायन्स :
इमोशनल रेजिलन्स एक अत्याधुनिक सायकॉलॉजिकल आणि बायॉलॉजिकल प्रक्रिया आहे ज्याद्वारे मेंदू जीवनांतील अपरिहार्य आव्हानांशी कसे जुळवून घेतो हे स्पष्ट होते!
न्यूरोसायन्स
संशोधनाने हे स्पष्ट केले आहे की इमोशनल रेजिलन्स मूलभूतपणे मेंदूच्या प्लॅस्टिसिटीशी जोडलेली आहे! मेंदूची प्लॅस्टिसिटी म्हणजे अनुभवांवर आधारित स्वतःला बदलण्याची, वाढण्याची आणि पुन्हा जोडण्याची मेंदूची क्षमता! ह्यातून असे दिसते कि इमोशनल रेजिलन्स हे कौशल्यं जन्मजात नाही तर हे कौशल्ये व्यक्तीला आयुष्यभर विकसित करता येते; वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शिकता येते आणि ते मजबूत केले जाऊ शकते.
इमोशनल रेजिलन्स मध्ये मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमधील संवाद आणि सहयोग महत्वाचा ठरतो! जेव्हा व्यक्ती ताणतणावाचा सामना करत असते तेव्हा भावनिक प्रतिक्रिया सेंटर, विशेषतः भीती आणि चिंता ह्यामध्ये भूमिका बजावणारे, अमिग्डाला खूप जास्त प्रमाणात सक्रिय असते! परंतु प्रीफ्रंटल कॉर्टेक्स कि जे तर्क, निर्णय क्षमता असणारे आणि स्व -नियंत्रण करू शकणारे मेंदूतील सेंटर ज्याला शहाणा मेंदू ही म्हटले जाते ते अमिग्डाला च्या प्रतिक्रिया किती प्रभावीपणे नियंत्रित करू शकते ह्यावर इमोशनल रेजिलन्स अवलंबून असते. हे दोन्हींमधील संतुलन भावनिक लाटा टाळण्यास मदत करते, ज्यामुळे व्यक्तीला शांत राहण्यास, स्पष्टपणे विचार करण्यास आणि आवेगपूर्ण प्रतिसाद देण्याऐवजी संयत प्रतिसाद देण्यास मदतगार ठरतात.
कॉग्निटिव्ह म्हणजेच संज्ञानात्मक लवचिकता सुद्धा ह्यात महत्त्वाची भूमिका बजावते. संज्ञानात्मक
लवचिकतेमुळे मेंदूला दृष्टिकोन बदलण्यास, विचारसरणीशी जुळवून घेण्यास आणि समस्या सोडवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास
मदत होते. उदाहरणार्थ, अपयश किंवा एखाद्या तोट्याचा सामना केल्यानंतर, एक इमोशनल रेजिलन्स व्यक्ती आलेल्या परिस्थितीला कठीण अडथळ्या ऐवजी शिकण्याची संधी म्हणून पुन्हा बघण्याची शक्यता जास्त असते. या संज्ञानात्मक किंवा बोधनीक पुनर्रचना प्रक्रियेला
न्यूरल सर्किट्सद्वारे समर्थन दिले जाते ज्यामुळे सकारात्मक विचारसरणीच्या पद्धती आणि भावनिक
नियमन कौशल्य मजबूत होतात. याशिवाय इमोशनल रेजिलन्स व्यक्तींच्या भावनांचे नियमन म्हणजेच भावनिक स्व-नियंत्रण ह्या क्षमतेशी सुद्धा निगडित आहे; भावनिक नियमन म्हणजे त्रासदायक आणि कठीण भावनांना दडपून टाकणे वा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे नाही तर त्यांना स्वीकारणे आणि आपले भावनिक आरोग्य जपले जाईल अश्याप्रकारे त्या भावनांचे मॅनेजमेंट करणे. मानसशास्त्रातील संशोधनात असे
दिसून आले आहे की जे लोक प्रतिकूलता आणि आणि अडचणी सहन करून त्यात भावनिक संतुलन राखू शकतात ते संकटांना तोंड
देण्यासाठी अधिक सुसज्ज असतात. दीर्घकालीन ताणाचे जर योग्य पद्धतीने मॅनेजमेंट केले नाही तर तो मेंदूच्या
संरचनेवर आणि कार्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो. दीर्घकाळापर्यंतच्या ताणामुळे
वाढलेली कॉर्टिसोल पातळी मेंदूचा स्मृती आणि शिक्षणासाठी जो महत्त्वाचा भाग आहे त्या हिप्पोकॅम्पस मधील
आकुंचनाशी जोडली गेली आहे, या आकुंचनामुळे निर्माण झालेली हिप्पोकॅम्पस मधील कमजोरी आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे, सामना करण्याच्या रणनीती
लक्षात ठेवणे किंवा आशावादी राहणे ह्यावर परिणाम करून ही कौशल्याने कठीण करते . म्हणूनच, इमोशनल रेजिलन्स अशा यंत्रणा विकसित करण्याबद्दल देखील आहे जी मेंदूला ह्याप्रकारच्या नुकसानापासून
वाचवते. मानसशास्त्रीयदृष्ट्या, इमोशनल रेजिलन्स ही ग्रोथ माइण्डसेट (growth mindset) ह्या मानसिकतेशी जोडलेली असते! क्षमता आणि बुद्धिमत्ता प्रयत्नांनी सुधारू शकते असा
विश्वास ह्या ग्रोथ माइण्डसेट चा असतो! ही मानसिकता व्यक्तींना कायमस्वरूपी दोषांऐवजी
तात्पुरत्या अडचणी म्हणून अपयशांकडे पाहण्यास प्रोत्साहित करते. वास्तववादी
अपेक्षांवर आधारित आशावाद, सक्रिय समस्या सोडवणे आणि भावनिक चिकाटीला
प्रेरित करून इमोशनल रेजिलन्स अधिक सक्षम करते. महत्त्वाचे म्हणजे, इमोशनल रेजिलन्स मध्ये प्रतिकूलतेमध्ये अर्थ शोधणे समाविष्ट आहे, जे लोकांना त्यांच्या जीवनकथेत आव्हानात्मक अनुभवांना रचनात्मकपणे समाविष्ट
करण्यास अनुमती देते. व्हिक्टर फ्रँकलचे ह्या मानसशात्रज्ञा चे लोगोथेरपीवरील काम हे सुंदरपणे स्पष्ट करते; अत्यंत दुःखातही, उद्देश शोधणे अविश्वसनीय मानसिक शक्तीला चालना
देऊ शकते.
इमोशनल रेजिलन्सचे फायदे
इमोशनल रेजिलन्सची
खरी शक्ती केवळ व्यक्तींना संकटातून बाहेर पडण्यास मदत करण्यातच नाही तर त्यांना
त्या संकटातही यशस्वी होण्यास सक्षम करण्यातही दिसते. सक्षम चा अर्थ मजबूत होणे, नवीन शक्ती शोधणे आणि केवळ अस्तित्वाच्या पलीकडे विकास साध्य करणे असा आहे. हे
वेगळेपण अत्यंत महत्त्वाचे आहे, विशेषतः आजच्या वेगाने बदलणाऱ्या आणि अनेकदा
तणावपूर्ण जगात !
मानसिक आरोग्य
संशोधनातून असे दिसून आले आहे की इमोशनल रेजिलन्स चिंता, नैराश्य आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर सारख्या दीर्घकालीन मानसिक
विकारांचा धोका कमी करते. जास्त इमोशनल रेजिलन्स असलेले लोक आघातातून लवकर बरे
होतात आणि तणावपूर्ण काळात अधिक स्थिर भावनिक आधाररेखा राखतात. लवकर "परत मुसंडी मारून उभारण्याची" ही क्षमता एकूण जीवनातील समाधान आणि एखाद्याच्या परिस्थितीवर नियंत्रण
ठेवण्याच्या सकारात्मकता आणि अंतर्गत शांती ह्या भावनांशी जोडलेली आहे.
व्यावसायिक वातावरणात, व्यावसायिक स्ट्रेस आणि आणि शारीरिक मानसिक थकवा रोखण्यासाठी इमोशनल रेजिलन्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. हे कौशल्ये असलेले लोक सामाजिक आधार शोधणे, स्वतःची काळजी घेणे आणि सकारात्मक चिंतनशील विचारसरणीमध्ये गुंतणे यासारख्या
अनुकूली धोरणांचा वापर करून व्यवसाय आणि भावनिक आरोग्य मॅनेजमेंट करून ते टिकवून ठेवण्यास पाऊल उचलतात. ज्या संस्थांमध्ये इमोशनल
रेजिलन्स प्रशिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते तिथे अनेकदा कर्मचारी गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी होते, कर्मचाऱ्यांमध्ये समाधान जास्त असते आणि टीम डायनॅमिक चांगली असते.
व्यक्तिगत पातळीवर इमोशनल रेजिलन्स व्यक्तीला आयुष्यातील प्रत्येक घटनांना सामोरे जाण्याच्या आणि स्विकारण्याच्या मानसिकतेच्या विकासासाठी मदत करते. ते वास्तववादी ध्येये निश्चित करण्यास, अडचणींमधून शिकण्यास आणि
कृतज्ञता आणि आशा जोपासण्यास प्रोत्साहन देते. हा विकास-केंद्रित दृष्टिकोन
सकारात्मक मानसशास्त्राच्या तत्त्वांशी जे आनंदाचा पाया म्हणून व्यक्तीच्या मूल्ये आणि सदगुणानांवर भर देतात त्याच्याशी सुसंगत आहे.
अनेक वैज्ञानिक संशोधनामध्ये
इमोशनल रेजिलन्स आणि शारीरिक आरोग्याचे सकारात्मक नाते सिद्ध झाले आहेत. उदाहरणार्थ, इमोशनल रेजिलन्स असलेल्या व्यक्तींमध्ये
शरीरदुखी, शरीरावर किंवा शरीरांतर्गत सुजन आणि वेदना कमी
असते तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, ज्यामुळे
हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो. हे मन-शरीर सकारात्मक
संबंध संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असतो आणि त्यात इमोशनल रेजिलन्स महत्वाची भूमिका
बजावते.
(क्रमशः)
(इमोशनल
रेजिलन्स कसे निर्माण करायचे आणि विकसित करायचे हे पुढील लेखात पाहुयात)
रोहिणी फुलपगार
मानसोपचार तज्ज्ञ, लाईफ कोच
