इमोशनल रेजिलन्स: प्रतिकूलतेतही स्थिर राहण्याचे कौशल्य! (भाग 2)

TheMindTalks
0

 

रेजिलन्स: प्रतिकूलतेतही स्थिर राहण्याचे कौशल्य!

(भाग 2)

इमोशनल रेजिलन्स: प्रतिकूलतेतही स्थिर राहण्याचे कौशल्य! ह्या लेखाच्या मागच्या भागात आपण इमोशनल रेजिलन्स म्हणजे काय आणि ते आपल्या आयुष्यात कसे महत्वाचे ठरते हे जाणून घेतले. आजच्या लेखात इमोशनल रेजिलन्स कसे विकसित करायचे आणि ते विकसित करण्यात काय अडथळे येऊ शकतात हे पाहुयात!

इमोशनल रेजिलन्स निर्माण करणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे ज्यात आपले प्रयत्न आणि सातत्य महत्वाचे ठरते. आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे इमोशनल रेजिलन्स हे कौशल्य वयाच्या कोणत्याही टप्प्यावर विकसित करता येते, त्याचे संगोपन करता येऊ शकते. पुढील काही गोष्टींचा उपयोग करून आपण इमोशनल रेजिलन्स निर्माण करू शकतो,त्यामुळे आपल्या भावना नियमन आणि जगण्याचे उद्दिष्ट्यांची जाणीव मजबूत करू शकतो.

 

आत्म-जागरूक असणे : आत्म- जागरूक असणे म्हणजे स्वतःच्या बाबत जागरूक असणे. हे जागरूक असणे बाह्य नसते तर ते आपल्या आत मध्ये काय चालू आहे ह्याबद्दल सावधगिरी आणि जागरूक असणे असते. आपले विचार, भावना आणि शारीरिक संवेदना किंवा शारीरिक बदल ह्याकडे लक्ष देणे. ह्यामध्ये कोणताही पूर्वग्रहदूषित भाव ठेवता त्यांच्या बाबत जागरूक राहणे. उदा. एखादे नवीन काम सुरु करताना भीती वाटतेय किंवा नवीन प्रोजेक्ट चे प्रेसेंटेशन देताना टेन्शन येतेय. तर हे जे टेन्शन, भीती ची नोंद घेणे, त्यामुळे जे शारीरिक बदल होतात ते फील करणे आणि हे सगळे आपल्यात बदल होतात तर ते नाकारता त्यांचे निरीक्षण करणे. हे बदल, भावना आपल्याला काय सांगतात, त्याचे आपण काय अर्थ काढतोय, ते अर्थ खरंच वास्तववादी आहेत का ह्याचे परीक्षण ह्या सगळ्या गोष्टी  स्व जागरूकता ह्यामध्ये येतात. त्याच वेळी आपल्याला भीती किंवा दडपण वाटलेच नाही पाहिजे किंवा आपण हे सगळे बिना टेन्शन चे पार पडायलाच पाहिजे असा स्वतःकडून परफेक्ट असण्याचा आग्रह दूर सारता आला पाहिजे. आत्म-जागरूकता विकसित केल्याने राग,चिडचिडेपणा, थकवा किंवा चिंताजनक विचार यांसारख्या तणावाची चिन्हे लवकर ओळखून, व्यक्ती या प्रतिक्रिया वाढण्यापूर्वीच त्यावर उपाय करू शकतात. दैनंदिन नोंदी ठेवणे म्हणजे जर्नालिन्ग, डायरी लिहिणे किंवा सजगता म्हणजेच माईंडफुलनेस ध्यान ह्यांचा सराव हे आत्म-जागरूकता वाढवण्यासाठी प्रभावी माध्यम आहेत. नियमित आत्मपरीक्षणामुळे व्यक्तींना त्यांच्या तणावाच्या प्रतिसादांचे जे विशिष्ट पॅटर्न बनलेत ते ओळखता येतात आणि तणावाचा सामना करण्याच्या अधिक आरोग्यदायी पद्धती विकसित करता येतात.

भावनिक नियमन कौशल्ये निर्माण करणे: भावनिक नियमन म्हणजे कठोर भावना किंवा व्यक्तीला अस्वस्थ करणाऱ्या भावनांना दाबून टाकणे नाही, तर अस्वस्थ आणि त्रासदायक भावनांवर प्रक्रिया कशी करावी आणि त्यांना विधायकपणे प्रतिसाद कसा द्यावा हे शिकणे आहे. दीर्घ श्वासोच्छ्वास, प्रगतीशील स्नायू शिथिलीकरण (प्रोग्रेसीव मसल रिलॅक्सएशन) किंवा आनापान सारखी तंत्रे तणावाच्या क्षणी मज्जासंस्थेला शांत करू शकतात. उदाहरणार्थ, हळू आणि खोल श्वास घेण्याच्या साध्या सरावामुळे पॅरासिम्पॅथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते, ज्यामुळे कोर्टिसोलची पातळी कमी होते आणि स्पष्टता वाढते. हे छोटे विराम प्रतिक्रियात्मक वर्तनाऐवजी विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी जागा निर्माण करतात.

स्वीकृतीचा सराव करा:

जरी आपण सर्व व्यक्ती तणावपूर्ण घटनांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो, तरी काही व्यक्तींना जे घडत आहे त्या सत्याचा स्वीकार करण्यास जमत नाही. जे घडत आहे ते नाकारून अश्या व्यक्ती एकप्रकारे स्वतःचे भावनिक संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अखेरीस, आपण एखाद्या संकटाचा सामना करत आहोत हेच नाकारल्यास, सामान्यतः अनियंत्रित असलेल्या घटनांवर आपले काहीतरी नियंत्रण आहे, असा आपण स्वतःचाच गैरसमज करून घेऊ शकतो.हि नाकारण्याची वृत्ती कधीतरी व्यक्तीला एखाद्या दुःखद घटनेच्या धक्क्याशी जुळवून घेण्याची संधी देऊ शकते पण ते जुळवून घेणे तात्पुरते असते, दीर्घकालात त्यामुळे व्यक्ती दुःखीच होते. नाकारण्याच्या मनःस्थितीत राहिल्याने व्यक्ती तिच्या नवीन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकणार नाही,त्यामुळे अडचणींवरील उपाय शोधण्यापासून किंवा कृती करण्यापासून व्यक्ती स्वतःला रोखले जाईल आणि समस्यानिवारण प्रक्रियेत अडथळा निर्माण होईल.

त्यामुळे आलेली परिस्थिती स्वीकारा! बदल हा जीवनाचा एक अटळ भाग आहे आणि बदलत्या जगाचे अनेक पैलू व्यक्तीच्या वैयक्तिक नियंत्रणाबाहेर असतात. अश्या अगणीत रोजच्या आयुष्यातील गोष्टी आहेत कि ज्या आपण नियंत्रित करू शकत नाही ! हे मान्य करणे कठीण असले तरी, आपल्या नियंत्रणाबाहेरील घटना किंवा परिस्थितीबद्दल तक्रार केल्याने आपलीच ऊर्जा वाया जाईल आणि आपल्याला चिंताग्रस्त व निराश वाटेल. पण त्याचवेळी आपण समोर आलेली परिस्थिती स्वीकारल्याने, ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण आहे, त्यांवर आपली ऊर्जा केंद्रित करण्यासाठी वेळ आणि मोकळीक मिळते.

त्यामुळे आपल्या नियंत्रणातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही नियंत्रित करू शकत नसलेल्या सर्व गोष्टींची एक यादी बनवा आणि त्याबद्दल काळजी करणे थांबवा! त्याऐवजी, तुम्ही जे करू शकता अशा कृतींवर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही बेरोजगार असाल, तर तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळेल की नाही किंवा एखादा अधिकारी तुम्हाला मुलाखत साठी बोलावेल कि नाही , हे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. परंतु तुम्ही नोकरी शोधण्यात किंवा तुमची कौशल्ये सुधारण्यात किती वेळ आणि प्रयत्न करता हे तुम्ही नियंत्रित करू शकता. त्याचप्रमाणे, जर एखादी प्रिय व्यक्ती जीवघेण्या आजाराने त्रस्त असेल, तर तुम्हाला वैद्यकीय तज्ञांच्या हातात नियंत्रण सोपवावे लागेल, परंतु तरीही तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला शक्य तितका भावनिक आधार देण्यावर लक्ष केंद्रित करू शकता.

तुमच्या भूतकाळाकडे पाहून बदल स्वीकारा. तुम्ही यापूर्वी अनिश्चितता आणि बदलांना कसे सामोरे गेला आहात याची उदाहरणे पाहिल्याने तुम्हाला तुमची सध्याची परिस्थिती स्वीकारण्यास मदत होऊ शकते. तुमच्या भूतकाळातील यशांचे परीक्षण केल्याने तुम्हाला सध्याच्या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल आणि तुम्ही पुन्हा एकदा यातून बाहेर पडू शकाल असा आत्मविश्वास मिळेल. आत्म जागरूक ह्या कौशल्याचा एक भाग म्हणजे तुमच्या भावना स्वीकारा!

कठीण काळातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वेदनादायक भावनांकडे दुर्लक्ष करणे आणि 'धैर्य दाखवणे' असा विश्वास ठेवण्याचा मोह होतो. पण तुम्ही त्या भावनांना स्वीकारण्याचा निर्णय घेतलात किंवा नाही, तरीही अप्रिय भावना अस्तित्वात असतातच. तुमच्या भावनांना वर येऊ न देण्याचा प्रयत्न केल्यास तुमचा ताण वाढेल, नवीन परिस्थितीचा स्वीकार करण्यास विलंब होईल आणि तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखले जाईल. भावनांची ही स्वीकृती सगळीकडे उपयोगी पडते.  स्वतःला तुमच्या भावना अनुभवण्याची परवानगी दिल्यास, हे तुमच्या लक्षात येईल की अगदी तीव्र, त्रासदायक भावना देखील निघून जातात, या कठीण काळातील आघात कमी होऊ लागतो आणि तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग सापडतो.

सामाजिक संबंध निर्माण करणे: सामाजिक संबंध निर्माण करणे हे इमोशल रेजिलन्स विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मानव स्वभावतःच सामाजिक प्राणी आहेत आणि आधार देणारी नाती भावनिक पोषण आणि व्यावहारिक मदत पुरवतात. विश्वासू मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा सामुदायिक गटांशी संवाद साधणे हे तणावाच्या काळात आधार म्हणून काम करू शकते. अर्थपूर्ण संवादांमुळे ऑक्सिटोसिन नावाचे रसायन स्रवते, जे सुरक्षितता आणि आपलेपणाची भावना वाढवते. भारतीय संस्कृतीत, कुटुंब आणि समाजाच्या आधार प्रणाली भावनिक आधार पुरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मोकळा संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे आणि आवश्यकतेनुसार मदत मागणे हे नात्यांमध्ये इमोशल रेजिलन्स मजबूत करण्याचे व्यावहारिक मार्ग आहेत.

आशावाद आणि विकासाभिमुख दृष्टिकोन जोपासणे: इमोशल रेजिलन्स व्यक्ती अनेकदा आव्हानांकडे विकास, शिकणे किंवा आत्म-सुधारणेच्या संधी म्हणून पाहतात. हा सकारात्मक दृष्टिकोन अडचणींकडे दुर्लक्ष करत नाही, तर तो पीडितपणाच्या किंवा परिस्थितीचा बळी ह्या भावनेऐवजी कृती करण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करतो. सकारात्मक स्व-वचने, कृतज्ञता व्यक्त करणारी दैनंदिनी लिहिणे किंवा लहान, साध्य करण्यायोग्य ध्येये निश्चित करणे या दृष्टिकोनाला बळकटी देतात. लहानसहान यशांचा आनंद साजरा केल्याने प्रेरणा वाढते आणि प्रगती शक्य आहे असा संदेश मेंदूला मिळतो, ज्यामुळे कालांतराने इमोशल रेजिलन्स टिकून राहते.

शारीरिक आरोग्य जोपासणे: शारीरिक आरोग्य थेट इमोशल रेजिलन्स वर परिणाम करते. पुरेशी झोप, संतुलित पोषण आणि नियमित शारीरिक हालचाली मेंदूचे कार्य, मनःस्थितीचे नियमन आणि ऊर्जेची पातळी वाढवतात. विशेषतः, व्यायामामुळे एंडोर्फिन आणि न्यूरोट्रॉफिक घटकांच्या प्रकाशनाला चालना मिळते, ज्यामुळे संज्ञानात्मक लवचिकता आणि भावनिक स्थिरता सुधारते. दररोज थोडा वेळ चालण्याने किंवा साध्या योगासनांनीही मानसिक आरोग्यासाठी लक्षणीय फायदे मिळू शकतात, ज्यामुळे इमोशल रेजिलन्स निर्माण करणे सुलभ आणि शाश्वत होते.

जीवनाचे अर्थ आणि ध्येय निश्चित करणे: दैनंदिन जीवनात अर्थ आणि उद्देशाचा समावेश करणे हे इमोशल रेजिलन्स वाढवणारे एक शक्तिशाली माध्यम ठरते. जेव्हा लोक त्यांच्या कृतींना एखाद्या मोठ्या ध्येयाशी जोडतात—मग ते कुटुंब, करिअर, अध्यात्म किंवा समुदाय असो—तेव्हा त्यांना अधिक प्रेरणा आणि सहनशक्ती मिळते. उदा. समाजासाठी काही तरी करणे, करिअर मध्ये अमुक उंची गाठणे, विशिष्ट्य अध्यात्मिक अथवा सामाजिक नियमांचे पालन करणे.त्यामुळे ही उद्देशाची भावना अडचणींच्या काळात चिकाटी वाढवते आणि व्यक्तींना पुढे जात राहण्यास प्रोत्साहित करते. आपल्या नैतिक मूल्यांचे स्पष्टीकरण किंवा आपल्याकडून दिली जाणारी एखादी स्वयंसेवा यांसारख्या चिंतनशील पद्धती जीवनाला अर्थपूर्ण ध्येयांमध्ये स्थिर ठेवण्यास मदत करतात.

अडॅप्टबिलिटी आणि प्रॉब्लेम सोलविंग : जुळवून घेण्याचा म्हणजेच adaptabilityआणि समस्या सोडवण्याच्या (problem solving) कौशल्यांचा सराव केल्याने इमोशल रेजिलन्स वाढते. परिस्थितीचे वास्तववादी मूल्यांकन करणे, उपायांवर विचारमंथन करणे आणि निर्णायक कृती करणे यामुळे असहायतेची भावना कमी होते. समस्यांवर विचार करत बसण्याऐवजी इमोशल रेजिलन्स व्यक्ती ज्या गोष्टींवर त्यांचे नियंत्रण आहे त्यावर लक्ष केंद्रित करतात आणि ज्या गोष्टींवर नियंत्रण नाही त्या स्वीकारतात. समस्या सोडवण्याचे सुनियोजित दृष्टिकोन आणि परिस्थितीचे नियोजन मनाला अनिश्चिततेचा आत्मविश्वासाने सामना करण्यास तयार करतात.

वर उल्लेखिलेल्या ह्या स्ट्रॅटेजि स्वतंत्रपणे प्रभावी असल्या तरी, अनेक स्ट्रॅटेजि एकत्र केल्याने सर्वोत्तम परिणाम मिळतात. सजगता, सामाजिक संवाद, शारीरिक आत्म-काळजी आणि ध्येय निश्चिती यांचा समावेश असलेली दैनंदिन दिनचर्या इमोशल रेजिलन्स ची एक 'परिसंस्था' तयार करते, जी मानसिक सामर्थ्याला सतत आधार देते.

      शेवटी काय तर इमोशल रेजिलन्स निर्माण करणे म्हणजे आव्हाने टाळणे किंवा केवळ अडचणी सहन करणे नव्हे, तर प्रतिकूल परिस्थितीत जुळवून घेणे, प्रगती करणे आणि अगदी भरभराट करणे होय. आपण पाहिल्याप्रमाणे, इमोशल रेजिलन्स ही एक गतिशील प्रक्रिया आहे, जी आपली मानसिकता, वर्तन, सामाजिक संबंध आणि आपण आपल्या सभोवतालच्या जगाशी कसा संवाद साधतो यावर अवलंबून असते. लवचिकतेमागील विज्ञान आणि मानसशास्त्र हे दर्शवते की आपले मेंदू उल्लेखनीय अनुकूलन करण्यास सक्षम आहेत आणि व्यावहारिक, पुराव्यावर आधारित धोरणे वापरून कोणीही आपली मानसिक कणखरता मजबूत करू शकतो.

सूर्यास्तानंतर ही नद्यांचे वाहणे थांबत नाही ..

उलट त्या अधिक वेगाने गहाण काळोखात,

काईने माखलेल्या निसरड्या शिळांवर उड्या घेत झेपावतात;

धोकादायक उंच कड्यांवरून स्वतःला झोकून देत अंधाऱ्या, अथांग दऱ्यांत,

झुडुपात, खोल भेगांमधून जातात जंगलाला चिरत..

आणि मग वाटत राहतं ...

त्यांच्या आत कुठेतरी एक दिसणारा प्रकाश आहे,

जो अंधारातही त्यांच्या सोबत शान्तपणे वाहत राहतो !

 

रोहिणी फुलपगार

मानसोपचार तज्ज्ञ ,लाईफ कोच

9604968842

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)