हसते नैराश्य

TheMindTalks
0

हसते नैराश्य (स्माईलिंग डीप्रेशन)



Smiling depression

मागच्या महिन्यात एका शिबिरामध्ये काही कष्टकरी स्रियांचे स्ट्रेस लेव्हल चेक करताना बहुतेक स्रिया म्हणाल्या कि आम्ही स्ट्रेस घेतच नाही,जे समोर येते त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो, आम्ही सतत हसत असतो. ह्या त्यांच्या म्हणण्यावर दुर्लक्ष करत  अजून जास्त त्यांच्या स्ट्रेस घटकांपर्यंत खोल गेले. आणि ह्या स्त्रिया ह्या तणावाच्या घटकांना कसे तोंड देतात हे विचारल्यावर त्यांचे म्हणणे होते कि मनाला खूप लागतात काही गोष्टी! कोणाला सांगायच्या आणि कश्याला सांगायच्या ! त्यापेक्षा कोणी नसताना भरपूर रडून घेतो किंवा काही काळ कोणाशीच बोलत नाही.  मग इतरांच्यासमोर हसतमुखाने बाहेर येतो .पण डोक्यात ह्या गोष्टी राहून जातात, आतल्या आत घुसमट होत राहते,कामे करताना तात्पुरता विसर पडतो पण एकटे असताना हे सगळे मनात फिरत राहते नि मग आतल्या आत अस्वस्थ होवून जाते.

हि अशी अवस्था आपल्यापैकी बहुतेकांची असते. कित्येक माणसे आपले दु:ख, आपल्याला होणारा त्रास इतरांपुढे व्यक्त न करता सगळे मनात ठेवून बाह्यकारणी सगळे ठीक आहे , नॉर्मल आहे असे भासवत असतात. जेव्हा आपण एखाद्याला आंनदी आणि नेहमी कार्यक्षम असणारे सकारात्मक व्यक्तिमत्व म्हणून ओळखत असतो ती व्यक्ती किंवा मिडिया मध्ये सतत प्रकाशझोतात असणारे एखादे व्यक्तिमत्व जर नैराश्यात गेले किंवा त्यांनी आत्महत्त्या केली किंवा त्यांच्याकडून अउचित वर्तन घडले तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो .

मध्यंतरी माझे एका  निवृत्त मुख्याध्यापकांशी २/३ वेळा बोलणे झाले होते. पत्नी वारल्यानंतर एकटे राहत होते, मुले शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात, कन्या लग्न होवून सासरी, आई आणि ते राहत होते.त्यांचे म्हणणे होते , खूप छान मन रमवलेंय मी ताई ! पुस्तके वाचतो, सकाळ संध्याकाळ फिरायला जातो. यु ट्यूब वर सिनेमे पाहतो !

वरवर आनंदी चित्र दिसत होते पण जसजसे जास्त बोलणे झाले तसे कळायला लागले कि ते हसते नैराश्य (स्माईलिंग डीप्रेशन) मध्ये आहेत. पटकन रडायला येणे, प्रचंड एकटेपणा जाणवणे, असहाय वाटणे, आपल्याला काही झाले तर कोणी जवळपास नाही हि धास्ती नेहमीच जाणवणे ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये जाणवत होत्या .

मनातील वेदना,नैराश्य लपवून बाह्य जगात सर्व काही नॉर्मल असल्याचा बनाव करून हसतमुख चेहऱ्याने वावरण्याच्या प्रकाराला हसते नैराश्य (स्माईलिंग डीप्रेशन ) असे म्हटले जाते. हसते डिप्रेशन असणारी व्यक्ती बाह्य वरवर आनंदी अक्टिव असतात पण प्रत्यक्षात आतल्याआत एकटेपणाच्या, अगतिकतेच्या आणि नैराश्याच्या भावनेशी झगडत असतात. 

स्माईलिंग डीप्रेशन हे काही वैद्यकीय निदान नाही,हि टर्म मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडून नैराश्यशी आतल्याआत झगडणाऱ्या पण त्यांची लक्षणे जगापासून लपवणाऱ्या व्यक्तींबाबत वापरली जाते.

अश्या व्यक्ती आतल्याआत नकारात्मक भावनांशी/ तणावांशी लढत असताना सुद्धा दैनंदिन आयुष्यातील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत असतात . ह्या व्यक्तींचे सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्य अगदी परिपूर्ण दिसत असते , ते सामाजिक कार्यक्रमांमध्ये अधिक कार्यक्षम,अधिक उत्साही दिसत असतात, सगळ्यांची काळजी करतात, पुढाकार घेवून कामांची स्वतःवर जबाबदारी घेतात. पण आतल्या तणावाचा बाह्य जगात मागमूस हि लागू देत नाहीत. अश्या व्यक्ती त्यांच्या नैराश्याच्या भावना एका हसणाऱ्या मुखवटयामागे लपवण्याच्या मागे अनेक कारणे असू शकतात. जसे कि लोक काय म्हणतील याची भीती / चिंता, त्यांना इतरांवर आपले ओझे लादणे नको वाटते.रिकामे आणि एकटे राहण्याची भीती , सतत आनंदी राहण्याच्या बनाव करत राहिले तर त्यांचे डिप्रेशन निघून जाईल असे वाटणे. खूप वेळा ते नैराश्यात आहे हे न कळने. कुठून आणि कशी मदत मिळवावी ह्याबद्दल अपुरी माहिती असणे. आपल्याला नैराश्य आहे हे किंवा आपल्यातील नैराश्याची लक्षणे नाकारणे. आपल्याला नैराश्य येऊच शकत नाही असा भ्रम निर्माण करणे .

हसते नैराश्य (स्माईलिंग डीप्रेशन) मध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये डिप्रेशन ची लक्षणे जाणवतात जसे कि उत्साह कमी होणे , थकवा आणि सुस्ती येणे, उदास मनस्थिती , भुकेचे आणि झोपेचे चक्र बदलणे ,चीडचिडेपण वाढणे आणि मूड्स बदलने,आत्मविश्वास कमी वाटणे. हाताशपणाचा आणि निराशेचा एक पातळ थर मनावर जाणवणे, अपराधी वाटणे, ज्या गोष्टींमध्ये आधी रुची होती त्यात आता मन न रमणे. इतरांसाठी आनंदी असण्याचा सतत देखावा करत राहणे. वेगवेगळ्या काळजीच्या नि आत्महत्येच्या विचारांची मनात ये जा चालू राहते.  



अश्या लोकांपर्यंत उपचार पोहोचणे अवघड असते . कारण एकतर ते स्वतःच आपले नैराश्य नाकारतात आणि त्यांची लक्षणे इतरांच्या लक्षात हि येत नाहीत. पण जसे उफानत्या पाण्याला खूप काळ बांध घालून अडवता येत नाही तसेच ह्या नैराश्याला पण हसणारा मुखवटा जास्त काळ थोपवू शकत नाही . मग एकतर अतिगंभीर नैराश्य ,इतरांना इजा किंवा स्वतःला धोका ह्यात त्याचे रुपांतर होते.जी व्यक्ती अश्या उपचार न मिळालेल्या डिप्रेशन सोबत जगत असतात त्यांच्यामध्ये दुसर्यांना वा स्वतःला इजा करण्याचा धोका किंवा आत्मघात करण्याच्या  धोक्याचे प्रमाण जास्त असतो .

हसते नैराश्य (स्माईलिंग डीप्रेशन) वरचे उपचार हे सर्वसाधारणपणे डिप्रेशन मध्ये लक्षणांच्या तीव्रतेनुसार दिल्या जाणाऱ्या उपचारांसारखे असतात, औषधे आणि सायकोथेरपी, ताण तणावाचे व्यवस्थापन, मेडीटेशन, सकस व पोषक आहार, व्यायाम ह्यांनी मिळून सर्वसमावेशक उपचार केले जातात.

आपल्या आजूबाजूला , कुटुंबामध्ये वा मैत्री मध्ये एखादा / एखादी कायम सगळे व्यवस्थितच आहे असे भासवत असेल तर त्या पिक्चर कडे न जाता त्यांना मदतीचा हात पुढे करायला हवा कारण ते स्वतःहून मदत मागणार नाहीत ! कोणीतरी त्यांना हि हे विचारणारे पाहिजे असते : 

                    तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,क्या गम है जिस को छुपा रहे हो !

                 ऑखो में नमी हंसी लबो पर क़्या हाल है क़्या दिखा रहे हो..

 

 

रोहिणी फुलपगार

Psychotherapist

9604968842

themindtalks4u@gmail.com

 

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)