आत्मघाताचे रेड सिग्नल्स

TheMindTalks
0


आत्मघाताचे रेड सिग्नल्स


गेला  पूर्ण   आठवड्यात  घडणाऱ्या  घटनांमुळे  अस्वस्थ झालेय !  बातम्याच  तश्या  आहेत ! नुकतेच  वैवाहिक  जीवनाची सुरुवात  केलेल्या  दाम्पत्याने  आत्महत्या  केली , कॉलेज  च्या  फी  वरून  आई  बोलली  म्हणून  एका  तरुणाने  आत्महत्या केली ,गणपतीच्या  मिरवणुकीत  मोबाईल  हरवला म्हणून  तरुणाची  आत्महत्या !      बोर्डाची परीक्षा जवळ आली किंवा परीक्षेचा निकाल लागला तर पेपर उघडायची इच्छा होत नाही, किती कोवळी पानगळ  अकाली गळत जाते ते बघून कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचे मन हादरल्याशिवाय राहत  नाही ! दरवर्षी होणा ऱ्या शेतकऱ्याच्या  आत्महत्येची  आकडेवारीं  वाचुन बधीर  व्हायला होतें !      
                  आत्महत्येचे  प्रमाण  जरी  आजच्या  काळात  खूप  वाढलेय  तरी  ही आत्महत्या  कऱण्याची  प्रवृति  कींवा  आत्महत्येंचा विचार मनांत  येण्याची  प्रवृत्तींचे  मूळ  आपल्याला  रामायण , महाभारताच्या  काळात  सुध्दा  सापडते .  जेव्हा  मारुतीरायांना  सीतेच्या  शोधात  सुरुवातीला  अपयश  आले ,तेव्हा  हे  अपयशी  तोंड  रामाला  दाखवण्यापेक्षा  मेलेले  बरे हा  विचार त्यांच्याही  मनात  आला होता , पण त्या वेळी  त्यांना  सावरायला  जांबुवंत  पुढे आले !  सीता मातेला  जेव्हा  तिच्या  चारित्र्यावर  नेहमी उठणारे आक्षेप  सहन झाले नाही  तेव्हा  त्यांना  धरती मातेने  कुशीत  घेतले  असे  लौकिकार्था ने  म्हटले  जाते ,पण एकप्रकारे ती आत्महत्या होती ! 
      अभिमन्यू  च्या  जाण्याने  दुखावलेला  अर्जुन  सूर्यास्ता पर्यंत  जयद्रथाला  मारले  नाही  तर  अग्नीप्रवेश  करेल  असे  म्हणतो तेव्हा आत्महत्येचा  विचार  पक्का  केलेला  असतो , इथे  त्याच्या  मदतीला  श्री कृष्ण  येतात ,पण  दुखावलेली  अंबालिका जेव्हा  भीष्माच्या  प्रतिशोधाची  प्रतिज्ञा  घेऊन  अग्निमध्ये  झोकून  देते  ती  आत्महत्याच  असते  ना !
 सामान्य माणसाला  असा  प्रश्न  नक्कीच  पडत  असेल  ना  कि  असे  काय  घटक  असतात  की  ज्यामुळे  एखादी  व्यक्ती  आत्महत्येला  प्रवृत्त  होऊन  स्वतःचे  जीवन  संपवते  वा  तसा  विचार करते !
आत्महत्येची  प्रवृत्ती किंवा  आत्महत्येचा  विचार करण्याची  प्रवृत्ती आणि  व्यक्तीचे  भावभावना आणि  वैचारिक  जग  यांचा जवळचा संबंध आहे . बहुतेक  वेळा  आत्महत्यांच्या मुळाशी  विशिष्ट  नकारात्मक  भावना असतात ; त्यातही  प्रामुख्याने अपराधीपणा (GUILT ), शरमेची भावना (SHAME ) आणि  दुखावल्याची  भावना (HURT ) ह्या जास्त  प्रमाणात आढळून  येतात.  ह्या  भावना  व्यक्तीला  जे  पिक्चर  दाखवतात त्यानुसार व्यक्ती  स्वतःचे  नकारात्मक अवलोकन करत  आत्महत्येच्या  दिशेने  पाऊल  टाकायला  सुरवात  करते !
             ज्या  वेळी  व्यक्ती  अपराधी पणाच्या  भावनेने ग्रस्त असते ,त्यावेळी  " मी  माझे नैतिक कोडाचे  उलंघन  केलेय म्हणजेच  मी चुकीचे  वागलोय , मी माझ्या नैतिक मूल्यानुसार जगण्यात अयशस्वी  झालोय म्हणजेच मी योग्य  गोष्ट करण्यात  अयशस्वी  ठरलोय  आणि  माझ्यामुळे  कोणीतरी दुखावलेय म्हणजेच मी  कोणाच्यातरी दुःखाचे  कारण  ठरतोय "  ह्या  नकारात्मक विचारांच्या पिंजऱ्यात  स्वतःला  कैद करते !  ज्या ज्या वेळी "मी चुकीची गोष्ट केली , मी समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या , मी योग्य गोष्ट करण्यास अयशस्वी ठरलो " हे  एकदा मनात पक्के बसले की  मग मी खरंच घोडचूक केली ह्या निष्कर्षाला  व्यक्ती येते . त्या वेळच्या वागण्याला असलेली परिस्तिथीची मागणी किंवा अजून काही कारणीभूत ठरलेले घटक ह्यांच्याकडे दुर्लक्ष करून     सगळ्याला  स्वतःला  जबाबदार  धरते , व्यक्तीला  तिच्या  कृत्याची शिक्षा  मिळायला  हवी  असे  वाटत  राहते ह्या  विचारांचे  प्रतिबिंब  मग  वागणुकीत  पण दिसते , ह्या  अपराधीपणाच्या  ओझ्यातून  किंवा  वेदनेतून  बाहेर पडण्यासाठी  स्वतःला  कश्या प्रकारे  शिक्षा करता येईल याचे  मार्ग  शोधत  राहते !  जे  दुखावले गेलेत  त्यांचाकडून  कश्याही  परिस्थितीत  माफी मिळायला हवी  मग त्यासाठी स्वतःला  कोणत्या ही  प्रकारचा  त्रास  करून  घेण्याची  तयारी  असते !
     अपराधीपणाच्या  भावनेत  व्यक्ती स्वतःच्या  वागणुकीला स्वतःला जबाबदार धरून स्वतःला  कमी लेखते ! पण  शरमेच्या  भावनेत  तिला  स्वतःच्या  वागणुकीची तर  लाज वाटत  असतेच  पण त्याच वेळी ती  ज्यांच्याशी  सामाजिकपणे , भावनिकपणे  जोडली  गेली  आहे किंवा ज्यांच्यामुळे त्या व्यक्तीची ओळख आहे  अश्या तिच्या  ग्रुप  मधील  लोंकाच्या वागणुकीची  पण  लाज  वाटत  राहते !
  " व्यक्तीच्या  बाबतीतील  किंवा  तिच्या  संलग्न  लोंकाच्या  बाबतीतील  काहीतरी  खूपच नकारात्मक  गोष्ट  एकतर व्यक्तीला स्वतःला  कळली आहे  किंवा दुसऱ्यांना  कळली आहे , बाकीचे  लोक  व्यक्तीला  /तिच्या ग्रुप मधील  माणसांना टाळत  आहेत  दुर्लक्ष  करत आहेत  असे  तिला  जाणवते किंवा वाटत राहते , किंवा  व्यक्तीने  तिच्या कार्यक्षमते पेक्षा कमी प्रतीची / हलक्या  क्वालिटीचे कामगिरी  केल्याची  तिची  भावना,"  ह्या  घटकांमुळे  व्यक्तीमध्ये  शरमेची  भावना घर  करते . एकदा  का शरमेने (shame ) व्यक्ती  ग्रासली  ली  की मग  तिचे विचारही  त्या दिशेने सुरु होतात . जी  माहिती  उघड झालीय तिच्यातील  नकारात्मक  बाजूलाच  व्यक्ती जास्त  महत्व  देते , आजूबाजूचे  लोंकाना  व्यक्तीच्या   नकारात्मक  माहितीत  जास्त रस  आहे ,त्यामुळेच ते  तिच्यात   इंटरेस्ट  दाखवतात , आणि  व्यक्तीचे /तिच्या  ग्रुप चे नकारात्मक  मूल्यांकन  करत आहेत !  लोकं  टाळतात आणि किती काळ  टाळणार  याचे  नकारात्मक  आणि  अतिशोयपूर्ण  अंदाज बनवते  ह्या  आणि  अश्या प्रकारच्या विचारांत व्यक्ती  गुरफटत  राहते  आणि  मग  हे तिच्या  वागणुकीत दिसू  लागते !व्यक्ती  लोंकाच्या  नजरेपासून स्वतःला  लपवायचा  प्रयत्न  करते , सगळ्यांपासून  स्वतःला  बाजूला  करते ,विलग  करते , सामाजिक  सबंध  पुनर्प्रस्थापनाच्या  इतरांच्या प्रयत्नांकडे  दुर्लक्ष करते , व्यक्तीचा  धोक्यात  असलेल्या  आत्मसन्मानाचा बचाव  करण्यासाठी  स्वतःला  त्रास  करून  घेण्याची  ही  तयारी  असते , ज्याने  व्यक्तीवर  ही  वेळ  आणली  किंवा  जिच्यामुळे  शरम  जाणवू  लागली ,त्यावर  हल्ला  करून  वा  मानसिक ,शारीरिक  त्रास  देऊन  व्यक्ती  स्वतःचा  बचाव  करू  पाहते. त्यासाठी व्यक्ती ची  स्वतःला शारीरिक इजा  करण्याची  पण तयारी असते.
 ज्यावेळी  "दुसरे  लोक  माझ्याशी वाईट पद्धतीने   वागत  आहेत , आणी  त्यांचे  माझ्याबरोबरचे हे  वागणे  मी  सहन नाही  करू शकत  तसेच इतर  व्यक्तींनी  आपल्या नात्याचे  अवमूल्यन  केलेय . . ह्या नात्यांना माझ्या दृष्टीने जेवढे   महत्व आहे तेवढे महत्वाचे  इतर लोकांना हे  नाते  वाटत  नाही"  अश्या विचारांची  व्यक्तीच्या मनावर  पकड बसली  की व्यक्ती  मनातून दुखावल्या गेल्याच्या भावनेने ग्रस्त होते . एकदा  की ह्या  भावनेने घर केले की  व्यक्तीचे  विचार ही  त्या प्रमाणे  तयार होतात, मग  व्यक्ती  समोरच्या  व्यक्तीच्या  वागणुकीचे  नकारात्मक अतिशयोक्ती पूर्ण  मूल्यांकन करत बसते.  व्यक्तीला  वाटते इतर  माणसांना तिच्याबद्दल  काहीच वाटत नाही  किंवा  तिची  पर्वा नाही ,मग  व्यक्ती स्वतःला  एकटे समजते, कोणीही  मला व्यवस्तिथ  समजून घेत  नाही, माझ्यावर प्रेम करत नाही, कोणाला माझी पर्वा नाही ह्या विचारांच्या कोशात गुरफटून  जाते .  अश्या  वेळी  बिघडलेले  नाते संबंध  सुरळीत  करण्यासाठी  समोरच्या माणसाने वा  इतर  माणसांनी  आधी  पाऊल उचलावे  ही  तिची अपेक्षा असते .
  ह्या विचारांमुळे त्या  व्यक्तीची  वागणूक पण  बदलते . इतर  माणसांबरोबरचे  संवादांचे   मार्ग   ती  तिच्यापुरती  बंद करते . व्यक्ती  तिच्या ह्या दुखावले  गेल्याच्या  भावनेत च इतकी  वेढलेली असते की  जे काही  घडलेय त्या बद्दल  आणि  तिला hurt  झालेय याबद्दल  ती समोरच्याला काही सांगत ही  नाही !
समोरच्याने  जो गुन्हा केलाय याची शिक्षा त्याला मिळायला पाहिजे मग मला स्वतःला मी दुखापत केल्याशिवाय  माझी  किंमत कळणार नाही . हे विचार प्रत्यक्षात आणायचा व्यक्ती प्रयत्न  करते .
        जेव्हा  आपण  आजूबाजूला  ऐकतो कि  रागाच्या भरात  त्याने  आत्महत्या केली  किंवा  मानसिक  ताण तणावातून  एखाद्याने  आत्महत्या केली  तेव्हा  त्या  आत्महत्येला  त्या वेळेचा राग  किंवा  ताण एवढेच फॅक्टर कारणीभूत नसतात ! हे  फॅक्टर  पाण्याच्या वर दिसणाऱ्या  हिमनगाच्या भागाएवढे  असतात ,मनाच्या  तळाशी  कोणत्या  भावना  लपल्यात  त्यावर हे फॅक्टर्स  अवलंबून असतात ! ह्या  नकारात्मक भावना  व्यक्तीला  दुःखी करत जातात आणि मग कुठून  सपोर्ट  मिळत नसल्याने  व्यक्तीमध्ये  helplessness ,hopelessness ची भावना तीव्र होऊन  जगण्यातील रस कमी होत जातो आणि  हे  सगळे व्यक्तीला स्व –इजा, स्व-हत्ये च्या रस्त्याला  नेऊन  ठेवतात .
         हे  सगळे  विचार  आणि  वर्तन  व्यक्तीच्या  रोजच्या  जगण्यात  दिसत  असतात , फक्त  गरज आहे  थोड्या सावधगिरीची  आणि संवेदनशीलतेची ! आपल्या  जवळच्या  व्यक्तींमध्ये ,आजूबाजूच्या  माणसांमध्ये  कुठे  guilt ,shame ,hurt  ह्या भावना बोलण्यात, वागण्यात जाणवत असेल  तर आपले सगळे वैयक्तिक मानपान, झगडे  बाजूला  ठेवून  त्या व्यक्तीशी  सकारात्मक  संभाषण  वाढवले  पाहिजे. तिला मदतीचा  हात  पुढे  करा !  तू एकटी / एकटा नाही, आम्ही  तुझ्यासोबत  आहोत हा विश्वास व्यक्तीमध्ये रुजवला गेला पाहिजे.
   व्यक्तीमधील guilt, shame, hurt ह्या  भावनांना  कसे तोंड  द्यायचे, ह्या भावना म्हणजे वास्तव  नाही  तर वास्तव  वेगळे आहे आणि हे वास्तव  आहे तसे पाहण्याची  नजर  विकसित केली पाहिजे.व्यक्तीची ह्या नकारात्मक भावनांना  सहन करण्याची मानसिक  क्षमता   वाढली  कि व्यक्ती  आत्महत्येच्या  रस्त्याला जाणार  ही  नाही . यासाठी  कुटुंबांमध्ये ,नात्यांमध्ये सुसंवाद  आणि निरोगी  संबंध  असणे, तो वाढवणे गरजेचे आहे . ह्यासाठी  आपण मानसशात्र एक्सपर्ट ची ही मदत घेऊ शकता. मारुतीरायांना जसे जांबुवंतानी मार्गदर्शन करुन त्यांच्या  स्व  सामर्थ्याची  जाणीव  करून दिली, किंवा श्रीकृष्ण जसे अर्जुनाचे पथदर्शक झाले, तश्याच पथदर्शकांची  भूमिका आपण  आपल्या जिवलगांच्या  बाबतीत  घेऊ  शकतो ना !
ज्या  व्यक्ती  ह्या, भावनिक  वादळात  सापडल्या असतील त्यांनी स्वतःला यासगळ्यातुन बाहेर पडण्यासाठी मदती साठी  आलेला  हात  घट्ट  पकडणे गरजेचे आहे.  असा  हात  जर  पुढे  येत  नसेल तर स्वतःच स्वतःची  मदत  केली  पाहिजे  यासाठी  एखाद्या  expert  चे  मार्गदर्शन  घेण्यात  काही  गैर नाही .  शेवटी  काय  ! तुमच्या पासूनच तर तुमचे विश्व  आहे ,ते किती सहज, सुंदर बनवायचे हे पण तुमच्याच हातात आहे !!
(ह्या  लेखात  आत्महत्येशी  संबंधित  फक्त  तीन  महत्वाच्या घटकांची चर्चा केली  आहे )
रोहिणी  फुलपगार
क्लिनिकल सायकोलोजिस्ट  सायकोथेरपिस्ट
9604968842
www.evergreeneverhappy.blogspot.com  
  

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)