मानसिक आरोग्यसंवर्धनात मानसोपचाराची भूमिका

TheMindTalks
0

                    
मानसिक आरोग्यसंवर्धनात मानसोपचाराची भूमिका 


           वयाच्या प्रत्येक टप्यावर मानसिक आरोग्यदृष्ट्या सक्षम असणे ही आजची खूपच महत्वाची गरज आहे. आपण मानसिक दृष्ट्यासुदृढ असणे म्हणजे आपण आपल्या भावनिक, मानसिक, सामाजिक वर्तुळात सक्षमपणे आणि सकारात्मकपणे कार्यरत असणे. हा सक्षमपणा आणि सकारात्मकपणा, आपले विचार, भावना, कृती आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे आपले समायोजन हया घटकावर परिणाम करतात. आणि हया सगळ्या घटकांना एक दिशा देतात. मानसिकदृष्ट्या आपण सुदृढ आणि सक्षम असणे हे आपल्याला दैनंदिन जीवनातील ताणतणाव हाताळण्यास, इतरांशी आपले सौजन्यपूर्व संबंध जपण्यास, आणि आपल्यासमोर आलेल्या पर्यायांपैकी योग्य आणि समतोल पर्याय निवडण्याचा निर्णय घेण्यास मदत करतो.
               आयुष्याच्या कोणत्याही टप्यावर जर आपले मानसिक आरोग्य डळमळीत झाले किंवा विस्कळीत झाले तर ह्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर, कृती, वर्तन आणि मूडवर होतो. एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडणे ही लगेच वा तात्काळ होणारी प्रक्रिया नाही. त्याला अनेक घटक कारणीभूत असतात:
१) बायोलॉजिकल घटक :-  यामध्ये  काही जेनेटिक आणि क्रोमोझोमोल घटकामध्ये निर्माण झालेली गुंतांगुंत ,   मेंदूला झालेली दुखापत वा मेंदूला झालेला जंतुसंसर्ग, मेंदूतील रसायने जसे की डोपामीन, सेरेटोनिन, नॉर-एपीनेफ्रिन , हिस्टॅमिन,अमिनोअसिड्स यांचे स्रवण्याचे प्रमाण कमी जास्त होणे.
२) शारीरिक घटक :- जुनाट आणि दीर्घकालीन आजारपण, आलेले अपंगत्व, दिर्घकाळाच्या वेदना, कुपोषण , उपासमार आणि शारीरिक आरोग्य कमकुवत असणे.
३) सामाजिक घटक :- लिंग, गरिबी, शिक्षण, आजूबाजूची सामाजिक परिस्थिती, चुकीची संगत, व्यसनाधीन मित्र वा सोबती. सामाजिक आणि आर्थिक बाजू कमकुवत असणे,
४) कौटुंबिक घटक :- कौटुंबिक कलह आणि ताण, भावंडांमध्ये सतत तुलना, आई वडिलांकडून दुर्लक्षित असणे. पालकांपैकी एक व्यसनाधीन असणे, घरातील किंवा नातेवाईकांमध्ये मानसिक आरोग्य विस्कळीत झालेली व्यक्ती होती/असण्याची हिस्टरी असणे, पालकांचा घटस्फोट.इत्यादी .
५) मानसिक घटक :- लहानपणी आलेला एखादा  दुःखाचा तीव्र अनुभव , झालेली अमानुष मारहाण, लैगिंक अत्याचार  झाल्याची घटना, अचानक पालकांपैकी एकाचे आयुष्यातून निघून जाणे, किंवा दोघांचे निघून जाणे. आपल्या आजूबाजूला  सगळे चांगलेच आणि आपल्याला अनुकूलच असेल अशी अवास्तव अपेक्षा. स्वतःकडून, नातीवाईकांकडून, जगाकडून अवास्तव व वाढवून ठेवलेल्या अपेक्षा.   आत्मविश्वास कमी  असणे वा अति आत्मविश्वास,इत्यादी.
         ह्या सगळ्या घटकांमुळे व्यक्तीचे मानसिक आरोग्य डळमळायाला सुरवात होते. पण आपले याकडे लक्ष जातच नाही. छातीत थोडेसे दुखले तरी आपण लगेच हॉस्पिटलकडे धाव घेतो ! वाढलेले ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल वा डायबेटिस  यासाठी आपण आयुष्य भर गोळ्यांवर राहण्याची तयारी करतो. पण ह्या शारीरिक पडझडीत कारणीभूत असणारा घटक म्हणजे  मानसिक आरोग्याची पडझड आहे. याकडे आपण दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करण्याचे एक कारण हे पण आहे की शारीरिक  दुखणे जसे आपल्याला पटकन लक्षात  येते तसे मानसिक दुखण्याचे होत नाही कारण आपल्याला त्याची लक्षणे एवढी माहीत नसतात. काही लक्षणे प्राथमिक आणि पटकन लक्षात येण्याजोगी असतात. जसे,
१.      खूप कमी वा जास्त झोपणे
२.      खाण्याचे प्रमाण अचानक वाढणे किंवा कमी होणे
३.      सतत थकवा जाणवणे .
४.      कोणतीही गोष्ट करण्यास उत्साह न वाटणे.
५.      पूर्ण शरीर भर वेदना जाणवणे किंवा शरीराच्या विशिष्ट भागात सतत वेदना जाणवणे.           
६.      अचानकपणे राग येणे वा अनामिक भीती वाटणे.
७.      लोकांपासून स्वतःला अलिप्त करणे.
८.      सहज रडू येणे किंवा डोक्यात खूप साऱ्या कल्पना येणे. अचानक थोडया काळासाठी खूप उत्साही / आनंदित वाटणे
९.      कारण नसताना दुःखी वाटणे.
१०.   विसराळूपणा वाढत जाणे. विचारात आणि कृतीत विसंगती जाणवणे.
११.   कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रांचा अचानक राग येऊन त्यांच्याशी भांडणे वा ओरडणे.
१२.   डोक्यात सतत विचारांची साखळी सुरू राहणे, भूतकाळातील कटू आठवणी सतत आठवत बसणे आणि प्रतिसाद देणे.
१३.   स्वतःला वा दुसऱ्यांना इजा करण्याची इच्छा  होणे.
१४.   अचानक  मूड बदलणे.
         वरीलपैकी सर्व नाही पण ३-४ लक्षणे व्यक्तीला स्वतः मध्ये  सतत जाणवत राहिल्यास वा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीमध्ये आढळून येत  असल्यास  तसेच ही लक्षणे खुपकाळ म्हणजे आठवड्याभरापेक्षा जास्त टिकून राहत असल्यास मदत घ्यावी. हि मदत तुम्ही तुमच्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टर, मित्र, साथीदार, सहकारी यांच्याकडेही मागू शकता. यापैकी कोणीतरी तुम्हाला मानसोपचार घेण्याचा नक्कीच सल्ला देईल. 
                   मानसोपचार किंवा Psychotherapy म्हणजे नेमके काय हा सर्वसामान्य माणसांना अजूनही व्यवस्थित न कळलेला विषय आहे !
                 Psychotherapy किंवा मानसोपचार म्हणजे प्रस्थापित मानसशास्त्रीय तत्वांचा माहितीपूर्वक आणि हेतुपुरस्सर वापर करून व्यक्तीच्या वर्तणूक , भावनिक, वैचारिक अडथळ्यामध्ये सुधारणा करण्यास मदत करणे तसेच त्यांचे वैशिट्यपूर्ण  वैयक्तिक गुणास योग्य दिशा देऊन त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करणे.         
             

मानसोपचार उपचार पद्धतीला टॉक थेरपी  म्हणजे बोलण्यातून दिली जाणारी उपचारपद्धती असेही म्हणतात कारण यात कोणत्याही प्रकारच्या औषधांचा/गोळ्यांचा वापर केला जात नाही तर क्लायंट  वा  रुग्ण आणि  मानसोपचार तज्ञ (Psychotherapist)  यांच्या आपपासांतील बोलण्यातून व चर्चेतून उपचार केले जातात.
मानसोपचारतज्ञ मनोचिकित्सेच्या पद्धतीतून क्लायंट ना/ रूग्णांना त्यांच्या भावना समजावून घेण्यास सक्षम करतात आणि कोणते घटक त्यांना  चिंताग्रस्त, उदास किंवा सकारात्मक राहण्यास मदत करतात. हे घटक ओळखायला शिकवून त्यांना मानसोपचाराच्या मदतीने अधिक अनुकुलतेच्या मार्गाने कठीण परिस्थितींचा सामना करण्यास सुसज्ज करतात. मानसोपचारामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या, भावनिक आव्हाने आणि काही मनो आजार ह्यांच्यावर उपचार करता येतात. मानसोपचार, नैराश्यापासून आणि आत्मविश्वास कमी असण्यापासून ,  आत्महत्या प्रवृत्ती ,मनोविकार, जुनाट शारीरिक वेदनामय आजार , व्यसने, उन्माद,कौटुंबिक विवादांपर्यंत अनेक समस्यांमध्ये  मदत करू शकतात. जे कोणी पुढील पैकी कोणत्याही समस्येने ग्रासून गेलेले आहेत  आणि ह्या समस्यांना  तोंड देऊ शकत नाही त्यांना मानसोपचार उपचार पद्धतीचा नक्कीच उपयोग होतो. जसे की दुःख आणि असहायतेची जबरदस्त भावना, दररोजच्या समस्यांचा सामना करण्यास असमर्थता, बहुतेक वेळा कामावर लक्ष न लागणे, अभ्यासावर लक्ष केंद्रित करू न शकणे, जास्त मद्यपान करणे(व्यसनाधीन), स्वभावात आक्रमकता वाढणे, अनावश्यक काळजी करणे, सतत भीती वाटत राहणे, नेहमीच दडपणाखाली असल्याची भावना असणे, रोजच्या जगण्यात समायोजन साधण्यास अयशस्वी ठरणे. माझ्या अडचणी कधीच संपणार नाही व मी यातून कधीच बाहेर पडणार नाही, हा विश्वास निर्माण होणे. ह्या आणि अशा अनेक प्रश्नांवर मानसोपचार उपचार पद्धती हा एक खूप चांगला पर्याय आहे.
                 मानसोपचारामध्ये कोणत्याही एकाच पद्धतीच्या किंवा शैलीचा वापर नसतो. मानसोपचार हे वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात आणि त्या प्रत्येक पद्धतीची स्वतःची शैली आहे आणि उपचारपद्धतीचा स्वतःचा गाभा आहे.
त्यातील निवडक आणि सध्या जास्त प्रमाणात प्रचलित असलेल्या उपचार पद्धती :- 
1.      बिहेव्हरल थेरपी  ( B.T.)
2.      बिहेव्हरल आणि कॉग्नेटिव्ह थेरपी (CBT )
3.      रॅशनल इमोटीव्ह बिहेव्हरल थेरपी (REBT)
4.      सायकोडायनॅमिक  थेरपी
5.      डायलेक्टिकल थेरपी
6.      ट्रान्झॅकशनल अनालयसिस  (T.A )
7.      गेस्टेल्ट थेरपी
8.      माईंड फुलनेस थेरपी (MBT  )
        ह्यांच्या  सोबत अजून डान्स थेरपी ,म्युझिक थेरपी,प्ले थेरपी ,आर्ट  थेरपी  आणि  इतर  खूप  उपचार  पद्धती  आहेत ! ह्या सगळ्या  थेरपींची  शैली वा  उपचार पद्धती वेगळी असली तरी सगळयांचा  उद्देश  एकच असतो, तो म्हणजे आपल्या क्लायंट  वा रुग्णाचे आयुष्य अधिकाधिक सहज ,सोपे आणि आनंदी करणे !
मानसोपचार हे एकटी व्यक्ती ,दोन व्यक्ती किंवा काही लोकांच्या ग्रुप मध्ये  पण  करता येते तसेच  लहान मुले ,किशोरवयीन ,प्रौढ  आणि वयस्कर लोकांसाठी ही  उपयोगी  ठरते . मानसोपचार  पद्धती हि संरचीत  आहे ,ह्यांचे  सेशन  साधारणतः आठवडयातून  एकदा  ४५ ते  ५० मिनिटांचे असते तसेच  व्यक्तीच्या त्रासाची तीव्रता  आणि स्वरूप  ह्यावर सेशन  ची संख्या  अवलंबून असते ! 
गोपनीयता हा मानसोपचाराचा मुख्य आणि   महत्वाचा भाग  आहे !
                 मानसोपचार ही औषधोपचार आणि इतर  उपचार  पद्धती सोबत पूरक म्हणून  पण उपयोगात आणली जाते. मानसोपचार  ह्या उपचारपद्धतीवर जगभरात अनेक संशोधने झाली आहेत ,त्यातून असे सिद्ध झालेय की ज्या  ज्या  व्यक्तींनी मानसोपचार घेतले आहेत , त्यांची  त्यांच्या समस्येच्या  लक्षणापासून सुटका होऊन ते त्यांचे आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे जगत  आहेत!  मानसोपचारांमुळे  त्यांच्या भावना ,वर्तन  विचार यांमध्ये  सुधारणा होऊन  त्यांच्या  मेंदूत  आणि शरीरात सकारात्मक बदल झाले  आहेत. तसेच त्यांच्या  रोजच्या आयुष्यात हि  बदल झालेत जसे कि वैद्यकीय रजा  घेण्याचे प्रमाण कमी झाले,शारीरिक तक्रारी कमी झाल्या,  जगण्यात आनंद शोधता येऊ लागला आणि उत्साह वाढला,कामाचे समाधान  मिळू लागले ! अश्या पद्धतीने मानसोपचार उपचार पद्धती ही शात्रीय पद्धती आहे आणि मानसोपचार तज्ञ वा  मनोचिकित्सा तज्ञ हे मानस शास्त्र ह्या विषयात पदवीत्युत्तर  शिक्षण  घेतलेल्या  तज्ञ व्यक्ती असतात.
मानसोपचारामुळे व्यक्तीला  स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेता येते. मानसोपचारामध्ये व्यक्तीला आपले म्हणणे किंवा होणारा त्रास मनमोकळेपणाने व अडथळा न ठेवता सांगायला एक तज्ञ व्यक्ती समोर असते की जी क्लायंट वा रुग्णास कोणत्याही तराजू मध्ये तोलत  नाही ! त्यामुळे व्यक्ती चा स्वतःच्या समस्ये  कडे पाह्ण्याचा एक नवीन दृष्टीकोन तयार होतो. मानसोपचार तज्ञ वा मनोचिकित्सक व्यक्तीला समस्येचे  निराकरण करून  देत  नाही  तर समस्येला सामोरे जाण्यास आणि समस्येच्या मुळापर्यंत जाऊन  निराकरण का करायचे आणि कसे करायचे ह शिकवतात. इथे  एका  गोष्टीची आठवण येते,  दोन दिवसापासून उपाशी  असलेला मुलगा सकाळीच नदीकिनारी  येतो ,तिथे एक व्यक्ती मासे पकडत असते,  तो मुलगा त्या व्यक्तीला  मासे देण्याविषयी विनंती करतो ... " तुम्ही मला थोडे मासे दिले तर माझी भूक भागेल आणि माझा त्रास कमी  होईल." अशी याचना करतो ! ती व्यक्ती थोडा वेळ थांबते आणि त्या भुकेल्या मुलाला म्हणते," आता तुला मासे देण्यापेक्षा मी तुला मासे कसे पकडायचे ते शिकवतो , त्यामुळे तुझ्यावर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही  आणि हा त्रास तुझा तूच  कमी  करशील !"
                मानसोपचाराची भूमिका ही त्या मासे पकडणाऱ्या व्यक्ती सारखी असते, ते तुम्हाला सक्षम करते !
             मानसोपचारा बद्दल अवास्तव भीती किंवा गैरसमज न  बाळगता तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून ही उपचार पद्धती अंमलात आणू शकता !!

रोहिणी खरात फुलपगार
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट,सायकोथेरपीस्ट
९६०४९६८८४२

                                      



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)