मनातल कसं बोलू च्या आधीच्या भागात आपण assertiveness किंवा ठामपणा म्हणजे काय, तो
का आवश्यक आहे नि काही व्यक्तिमध्ये ठामपणाची कमतरता का असते हे आपण पहिले .
आजच्या अंतिम भागात आपण ठामपणा निर्माण करताना होणाऱ्या गैरसमजुती आणि ठामपणा
विकसित करण्याचे काही स्टेप्स पाहणार आहोत.
ठामपणा विकसित करण्याच्या स्टेप्स काय असतात हे पाहण्याआधी आपल्या मनात ठामपणा
बाबत काही समजुती निर्माण होवू शकतात; त्यांच्यावर एक नजर टाकुयात :
ठामपणे वागले
म्हणजे तुम्हाला पाहिजे ते आपोआप मिळते: तुम्ही ठामपणा दाखवला म्हणजे
तुम्हाला हवे तश्या गोष्टी घडतीलच असे नाही. असे मनासारखे घडण्याची गॅरंटी नसते.
दुसऱ्या व्यक्तींना तुम्ही तुमचे जे अधिकार मागत आहेत त्याबद्दल काही देणघेण नसते
किंवा ते तुमच्या हक्काना विरोध करू शकतात
कारण तुम्ही तुमच्या म्हणण्याच्या बाबतीत दाखवलेला ठामपणा हा त्यांना त्यांच्या
हक्कांचे उल्लंघन अथवा नकार वाटू शकतो.
एकदा ठाम म्हणजे तुम्ही कायमच ठाम असेच वागले पाहिजे: ठाम असणे म्हणजेच विवेकी असणे! खूप वेळा आपण
शांत राहिल्याने किंवा माघार घेतल्याने काही अनिष्ट परिणाम टाळले जातात. त्यामुळे
काही प्रसंगामध्ये शांतता महत्वाची ठरते. ज्या प्रसंगांमध्ये तुम्हाला अडचणीची
परिस्थिति असेल किंवा आव्हानात्मक असेल त्यावेळी प्रत्येक वेळी ठामपणा हा ऑटोमॅटिक
प्रतिसादा म्हणून ना वापरता अनेक पर्यायांपैकी एक पर्याय म्हणून वापरता आला
पाहिजे. सतत आपल्या हक्काबद्दल ठामपणा दर्शवत राहिल्याने आपल्या सहकारी,
मित्रमंडळी किंवा फॅमिली मेंबर्स मध्ये नाराजी निर्माण होवू शकते.
तुम्ही ठाम असला म्हणजे लोकं तुमचा आदर करतात किंवा लोकाना
तुम्ही आवडतात : खरंतर जेव्हा तुम्ही स्वतःच्या मताबाबत आग्रही असतात, जास्त
ठामपणा दाखवता तेव्हा आपल्या आजूबाजूचे घरगुती, सामाजिक आणि कामाच्या ठिकाणचे
संबंध ताणले जातात. तुम्हाला टाळले जाते.हे ताणलेले संबंध लक्षात न येता तुम्हाला
तो रिस्पेक्ट वाटू लागतो. अश्या वेळी कधी कधी जवळचे संबंध दुरावले जावू शकतात.
ठाम असणे म्हणजेच मजबूत असणे: ह्या समजुतीनुसार
ठामपणा न दाखवणारी व्यक्तिला नेहमीच दुर्बल समजले जाणार! हे टाळण्यासाठी इतरानी आपल्याला दुर्बल समजू नये म्हणून काही व्यक्ति
जबरदस्तीने ठामपणा दर्शवतात; खरं तर हा अडेलतट्टूपणा असतो! उदा. वादात मी कधीच
झुकणार नाही !
ठामपणा तुम्हाला एक चांगली व्यक्ति बनवते : ठामपणा विकसित
केल्याने तुम्ही तुम्हाला जे काही पाहिजे ते जास्त प्रमाणात मिळवण्यात आणि जे नको
आहे ते कमी प्रमाणात मिळवण्यात यशस्वी होतात पण त्यामुळे तुम्ही आतून उत्कृष्ट
व्यक्ति ठरत नाही किंवा बनत ही नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसंगात ठामपणा दाखवत
नाही किंवा एखाद्या प्रसंगात ठामपणा यशस्वी ठरत नाही तेव्हा तुम्ही लगेच स्वतःचे
अवमूल्यन करायला सुरुवात करून स्वतःला कमी समजायला लागतात किंवा समोरच्याबद्दल मनात
अढी निर्माण करतात.
आता आपण एखाद्या प्रसंगात ठामपणा कसा विकसित करण्याच्या
स्टेप्स पाहणार आहोत .
·
भावनिक नियंत्रण : ठामपणा विकसित
करण्याच्या प्रोसेस मध्ये जाण्यापूर्वी सगळ्यात आधी व्यक्तिला आपले भावनिक अडथळे
शोधून त्यावर काम करावे लागेल. जसे ठामपणा व्यक्त करताना काही भीती, चिंता, अपराधिपणा,
मनासारखा प्रतिसाद न मिळाल्यास होणारी चिडचिड, येणारा राग, अपमानास्पद नकारात्मक
भावना किंवा परत ठामपणा व्यक्त करण्याचे धाडस न करणे ह्या सगळ्या घटकांचे व्यवस्थित व्यवस्थापन करायला शिकले पाहिजे.
·
लक्ष वेधून घेणे: तुम्हाला जो मुद्दा
मांडायचा आहे त्यासाठी समोरच्या व्यक्तीचे पूर्ण लक्ष तुमच्याकडे वेधून घेणे.
तुम्ही बोलताना जर समोरची व्यक्ति मोबाईल किंवा पेपर वाचन अथवा दुसऱ्या एखाद्या
कामात गुंतलेली असेल तर तुम्हाला जे सांगायचे आहे ते तिच्यापर्यंत पोहोचू शकणार
नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे तुमच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष वेधून घेणे
महत्वाचे आहे.
·
त्रासदायक वर्तनाचे वस्तुनिष्ठपणे वर्णन : समोरच्या
व्यक्तिच्या ज्या वर्तनाचा त्रास होतो त्याचे वस्तुनिष्ठ वर्णन करणे म्हणजे जे
त्रासदायक वर्तन आहे त्याचे वैयक्तिकृत न करता, कोणतेही आरोप किंवा निष्कर्ष न
काढता त्या त्रासाबद्दल सांगणे आणि जे वास्तव आहे त्यावर फोकस करण. उदा. “मला जेव्हा बोलायचे असते तेव्हा तू
मुद्दाम मोबाइल मध्ये डोकं घालून बसते / बसतो. मला काय सांगायचे हे तुझ्यासाठी
अजिबात महत्वाचे नसते!” ह्यापेक्षा “मला तुझ्याशी बोलायचे आहे आणि तू
मोबाइल मध्ये लक्ष देते /देतो आहे.” जेव्हा तुम्ही वस्तुनिष्ठपणे सांगता
तेव्हा तुमच्या टिप्पण्या किंवा कमेंट्स थोडक्यात असू द्या, नाहीतर समोरचा व्यक्तीला
ही मानसिक थकवा येवू शकतो.
·
रचनात्मक भावना व्यक्त: समोरच्याबद्दलच्या मग
ते कोणीही असो, आपला जोडीदार,नातलग , सहकारी किंवा अधिकारी ह्यांच्याबद्दल
विरस,अपेक्षाभंग किंवा थोडी चिडचिड होणे स्वाभाविक आहे ह्याला आपण रचनात्मक भावना
म्हणू शकतो पण ह्यांच्याबद्दल राग, त्यांच्याकडून दुखावले गेलो ही भावना किंवा
मत्सर, हेवा ह्या भावना रचनात्मक नसतात. त्यांच्यामुळे तुमच्या ठामपणाच्या प्रयत्नाना
खिळ बसते. उदा. जर तुम्ही रागात असाल तर “मी तुला काहीतरी महत्वाचे सांगतेय /
सांगतोय; पण तुला त्याचे काही नाही, तुला माझी कदर नाही, मी तुझ्यासाठी महत्वाची
नाही!” ह्यापेक्षा “मी तुझ्याशी बोलताना तू माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता
मोबाइल मध्ये लक्ष देतेय/देतोय ह्यामुळे मला चीड येतेय.”
·
मूल्यांकन तपासणे आणि प्रतिसादाला उद्युक्त करणे : तुम्ही जरी
समोरच्या व्यक्तिच्या वर्तनाबद्दल वस्तुनिष्ठपणे त्याला सांगितले असेल तरी
प्रत्यक्षात तुम्ही त्याच्या वर्तनाचे जे मूल्यांकन (interpretation)केले आहे ते त्याच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायचे असते. आपले मूल्यांकन म्हणजे
वास्तव नसते त्यामुळे मूल्यांकनला वास्तव न मानता चर्चा एकांगी न होण्यासाठी समोरच्याला
सुद्धा प्रतिसादा साठी उद्युक्त करणे गरजेचे ठरते. उदा. “मला माहीत आहे तुला
मला त्रास होतोय हे कळतेय,आपल्यात अंतर वाढतेय हे पण कळते पण तुला त्याची पर्वा
नाही” ह्यापेक्षा “तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय, ह्यामुळे आपल्यात
अंतर वाढतेय हयाबद्दल तूला काय वाटते? तू ह्या सगळ्याच कसा विचार करतेय/ करतोय?’
·
प्रतिसाद ऐकणे आणि अभिप्राय देणे: इथे ऐकणे म्हणजे समोरच्या व्यक्तीने उत्तर दिल्याबरोबर त्याला तोडून
टाकणे नाही तर खुल्या मनाने त्याचे म्हणणे ऐकणे आणि नंतर आपले म्हणणे सांगणे किंवा
त्यावर अभिप्राय देणे. जर समोरच्या व्यक्तिच्या उत्तराने तुमचे समाधान झाले नसेल तर
आपल्या शंका त्याच्यावर शाब्दिक हल्ला न करता मांडणे. उदा. “ तुला काय वाटले ,तू
मला सांगशील आणि मी लगेच तुझ्यावर विश्वास
ठेवेल, मी काही एवढी/एवढा मूर्ख नाही!” ह्यापेक्षा तू जे सांगतोय/सांगतेय ते
मला पटलेले नाही, हा फक्त मी तुझ्याशी बोलत असताना मोबाइल बघण्याचा प्रश्न नाही तर
तू मला कितीतरी गोष्टीमध्ये गृहीत धरत असते/ असतो ह्याचा ही आहे”.
·
स्पष्टपणे आणि मुद्देसूद प्राधान्य मांडणे: तुम्ही समोरच्या
व्यक्तीकडून काय अपेक्षित करता त्याला स्पष्टपणे प्राधान्य द्या, त्याचा अट्टाहास किंवा
आग्रह धरू नका. जे काही सांगायचे आहे ते स्पष्टपणे सांगणे आणि त्यावेळी भविष्यात ह्याच्या
चांगल्या परिणामांचा आशावाद निर्माण करणे. उदा. “तू असेच वागलेच पाहिजे” ह्यापेक्षा
तुंला असे वागण्याची गरज नाही पण जर तू मला गृहीत न धरता तुझ्या निर्णयामध्ये अथवा
कामांमध्ये मला सहभागी करून घेतले तर मला आवडेल! कदाचित ह्यामुळे आपले एकमेकांबरोबरचे
संबंध अजून चांगले होतील”
·
सहकार्याची विनंती : जेव्हा समोरची व्यक्ति
तुमचा प्रस्ताव मान्य करते तेव्हा त्या प्रस्तावच्या इतर बाबींकडे लक्ष देणे. पण जर
समोरच्या व्यक्तीला तुमचे म्हणणे मान्य झाले नाही तर ती व्यक्ति दुसरे काय बदल करू
इच्छिते ते विचारणे. त्यातून ही जर समोरची व्यक्ति बदल करायला तयार नसेल तर तिथे किती
वेळ आणि ऊर्जा वाया घालवायची ह्याचा फेरविचार करणे इथे गरजेचे ठरते.
ठामपणा हा नेहमीच सोपा, सहज नसतो, आपले भावनिक अडथळे आपल्याला ठामपणाचे कौशल्ये
शिकण्यापासून आणि ते व्यक्त करण्यापासून अडवतात; तसेच आपल्या ठामपणा बद्दलच्या कल्पना
स्वतःकडून अवास्तव अपेक्षा वाढवतात. जेव्हा हे भावनिक अडथळे दूर केले जातात आणि अवास्तव
अपेक्षांचे ओझे बाजूला केले जाते, ठामपणाचे कौशल्ये निर्माण केली जातात तेव्हा तुमची
खंबीरपणाची कृती जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुमच्यासाठी उभी राहते!
रोहिणी फुलपगार