मै ऐसा क्युँ हुँ?

TheMindTalks
0

                                         Self Knowledge

लक्ष्य सिनेमा मध्ये ग्रीक गॉड हृत्वीक रोशन च्या तोंडी एक गाणे आहे ;

मै ऐसा क्युँ हुँ? मै ऐसा क्युँ हुँ?

मै ऐसा क्युँ हुँ? मै जैसा हुँ, मै वैसा क्युँ हुँ ?

हृत्वीक रोशन ला हा पडलेला प्रश्न अनेकांना पडत असतो, अगदी पन्नाशी आली तरी!

                 मी नेमका कसा आहे, मी ह्याच पद्धतीने का वागत असतो नेहमी, मलाच खरंतर अजून मी पुरते  ओळखू शकलोय का? असे विचार जर तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही अशी एकटीच व्यक्ति नाहीत. आपल्यासारखे असे अनेक व्यक्ति आहेत की ज्याना स्वतःबद्दल किंवा स्वतःची पुरेशी माहिती नसते.

रोज सकाळी आपण घराबाहेर पडताना आरश्यात पाहत असतो. दर्पण जे प्रतिबिंब दाखवतो ते मनासारखे असल्यास खुश होतो, नसल्यास आपल्यामध्ये थोडा बदल करतो, कपड्यांच्या स्टाईल मध्ये,केसांच्या स्टाईल मध्ये! थोडं सौन्दर्यप्रसाधानांचा वापर करून स्वतःला पटेल असे तयार होतो. आरश्यासमोरून बाजूला जाताना मनात खुश होतो की मला माहिती आहे मी कसा दिसत आहे / कशी दिसत आहे.  खरंच आपण आपल्याला माहिती असतो का? कधी आपण तपासून पहिले आहे काय की स्वतःला स्वतःची किती माहिती आहे! जेव्हा कोणी तुम्हाला तुमचा आवडता रंग विचारतो किंवा जेवणात काय फेव्हरेट आहे हे विचारतात तेव्हा त्याचे दिलेले उत्तर म्हणजे स्वतःबद्दल पूर्णपणे ज्ञात असणे नाही होत! स्वतःबद्दल ज्ञात असणे हे ह्याच्या खूप पुढे आहे .

स्वतःबद्दल स्वतःला माहिती असणे म्हणजे नेमके काय ?

एका भाषणात आईनस्टाईन एके ठिकाणी म्हणतात, ”कित्येक माणसे त्यांच्या रोजच्या सवयींचे गुलाम

आहेत: ह्यामुळे त्यांचे आयुष्य काही प्रमाणात अज्ञानात, काही प्रमाणात घाबरण्यात तर काहीन्चे तटस्थ राहून उदासीन आयुष्य जाते! चांगले आयुष्य जगण्यासाठी आपण कसे जगतो किंवा जगायला हवं हे सतत निवडत राहिले पाहिजे!”

आपण कसे जगतो हे निवडण्यासाठी आधी आपल्याला आपल्याबद्दल,आपल्या जगण्याच्या पद्धतीबद्दल चे ज्ञान असणे गरजेचे आहे .


स्वतःबद्दलचे ज्ञान म्हणजे एखाद्याला स्वतःबद्दलची  अस्सल आणि खरी माहिती माहीत असणे . ही माहिती आपल्या भावनिक अवस्थेबद्दल, भावनिक उतारचढावाबद्दल, आपले व्यक्तिमत्व वैशिष्ट्य, वर्तनाची पद्धत आणि त्यातील चढउतार, नातेसंबंध, आपली मते, आपल्या ठाम समजुती आणि धारणा आपले विचार, आपली तत्वे, ध्येय, स्वप्न, गरजा, आपले प्राधान्य, सामाजिक ओळख ह्या सगळ्यांबद्दल असते !  

आपण बहुतेक वेळा दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःबद्दलची माहिती घेत असतो, जसे की लोक म्हणतात मी सहनशील आहे, पटकन कोणाला बोलत नाही. पण मी सहनशील आहे किंवा पटकन उलट उत्तर देत नाही म्हणजे काय? मी आतल्या आता स्वत:शी माझी काय प्रक्रिया चालू असते त्यावेळी हे मला माहीत असते का?

स्वतःबद्दलची माहिती आणि ज्ञान हे आत्म-चिंतन आणि सामाजिक प्रक्रियांचा परिपाक असतो ! तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीला स्व-ज्ञान पुढील पद्धतीने मिळते :

·         शारीरिक जग : ह्यामध्ये आपली शारीरिक ठेवण, वजन, ऊंची,डोळ्यांचा रंग, केसांचा रंग ह्यांचा समावेश होतो .

·         सामाजिक तुलना  : इतरंबरोबरची आपण स्वतःची केलेली सामाजिक तुलना मग ती  चांगली असो वा वाईट असो त्यावरून आपण आपल्याला इतरांच्या तुलनेत श्रेष्ठ वा दुय्यम ठरवतो. त्यानुसार स्वतःबद्दल काही माहिती तयार करतो .

·         प्रतिबिंबित मूल्यांकन : स्वत:बद्दलच्या माहितीचा हा स्त्रोत दुसऱ्या व्यक्तीने आपले जे मूल्यांकन केले आहे त्यातून तयार होतो. ह्या माहितीचा मुख्य भर आपण सोडून इतरांच्या नजरेत दिसत असलेल्या आपल्या प्रतिबिंबा वर असतो

·         आत्म निरीक्षण : हा स्व-ज्ञात होण्याचा मार्ग आपल्या विचार, उद्दिष्टय, भावना, इच्छा अपेक्षांचे अंतर्गत निरीक्षण हयातून जातो. खरेतर आत्म-निरीक्षण हे स्वतःला जाणून घेण्याचे योग्य माध्यम आहे .

·         स्वतःची बोधणीकता : स्वतःला जाणून घेण्याच्या ह्या पद्धतीमध्ये आपण आपल्या विचार आणि वर्तनाच्या तटस्थ निरीक्षणातून स्वतःबद्दल माहिती करून घेत असतो .

अश्या पद्धतीने आपल्याला स्वतःबद्दलची माहिती शारीरिक ,सामाजिक आणि मानसिक घटकांपासून ज्ञात होते .



स्वतःबद्दल स्वतः ज्ञात असणे गरजेचे का आहे ?

स्व-ज्ञात होणे हे निरोगी कार्यक्षमतेसाठी अतिशय गरजेचे आहे कारण स्वतःला चांगल्या पद्धतीने जाणून घेणे हे एक अतिशय उत्तम निर्णय क्षमतेला जन्म देते जी आपल्या गुणवत्तापूर्ण आयुष्य जगण्याची महत्वाची चावी आहे!

खरंतर जी लोक स्वतःला खऱ्या अर्थाने जाणून घेत नाही त्यांच्यासाठी आयुष्यच हा मोठा धक्का आहे !

स्व -ज्ञात होण्याचे अमर्याद  फायदे आहेत; त्यापैकी काही फायदे आहेत :

·         तुम्ही स्वतःच्या भावना समजून घेवू  शकता आणि तुम्हाला काय जाणवत आहे हे ओळखता येते.  

·         तुम्हाला  स्वतःची असुरक्षितता आणि एखाद्या गोष्टीला सामोरे जाण्याची कुवत ओळखता येते.   

·         तुमच्या स्व धारणा की ज्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत त्याची जाणीव होते.

·         तुम्हाला कोणत्या गोष्टीनि आनंद मिळतोय आणि का मिळतोय ह्याचे आकलन स्पष्ट होते.   

·         तुम्ही तुमचे बलस्थ जागा आणि कमकुवत जागा ओळखू शकतात.  

·         नातेसंबंधामध्ये तुम्ही काय अपेक्षित करत आहेत आणि दुसऱ्यांना ह्या नतेसंबंधात काय देत आहेत ह्याची जाणीव होते.

·         तुम्ही स्वतःवर कधी विश्वास ठेवावा आणि कधी इतरांच्या मताचा आधार घ्यावा हे स्पष्ट होते.

·         तुम्हाला तुमची जगण्याची पद्धत ओळखता आली की तुम्ही ती बदलण्यासाठी प्रयत्नशील होता.

·         तुम्हाला तुमच्या मर्यादा कळतात तसेच तुम्ही इतरांसाठी ही स्वतःबाबत मर्यादा आखून देवू शकतात.

·         तुम्हाला कळते की तुमच्या नैतिकतेच्या व्याख्या काय आहेत तसेच तुमच्या बाबतीत आणि इतरांच्या बाबतीत तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे.

·         तुम्हाला अडचणीच्या वेळी स्वतःवर नियंत्रण राखायला जमते.

·         तुम्ही स्वतःचा आहे तसे स्वीकार करता आणि जे काही त्रुटि आहेत त्या कमी करण्यावर भर देवू शकतात.  

·         तुम्ही नकारात्मक विचार नि भावना सकरात्मकतेने हाताळायला सक्षम होता.

·         टीका सहजपणे स्वीकारून वितांडवाद टाळायला जमतो.

ह्या सगळ्याचा एकत्रित फायदा म्हणजे आपला स्व-स्वीकार, स्व-आदर, भावनिक मॅनेजमेंट, स्व-आकलन भावनिक बुद्धिमत्ता सुधारते त्यामुळे निर्णय क्षमता वाढणे, स्व–संशय, स्व-टीका कमी होणे, आत्मविश्वास वाढणे आणि तर्कसंगत आणि वास्तववादी विचारांची सवय लागने हे सुद्धा जोडीने येतात. आता जर हे सगळे घटक आपल्या जीवनात विकसित होत असतील तर आपले आयुष्य गुणवत्तापूर्वक जगण्याची सुरुवात आपोआप होते.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

/

 

  

 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)