मानसिक लवचिकता - रेजिलन्स (Resilience)

TheMindTalks
0

                                  एखाद्या वस्तूवर जास्त ताण अथवा बल दिले  असता तिचा आकारमान किंवा आकार दोन्ही बदलतात पण ते बल काढून घेतल्यास ती वस्तू आपल्या मूळ आकारात नि आकारमानात परत येते, ह्याला आपण स्थितिस्थापकत्व म्हणतो. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रबर! लवचिक असणे हे रबराचा एक गुणवैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे अनेक माणसांमध्ये सुद्धा हे गुणवैशिष्ट्य आढळतात.

 लवचिकता, रेजिलन्स (resilience ) हे वैशिष्ट्ये असणारी माणसे ही त्यांच्यावर बाहेरून कितीही ताण येवो, त्यांचे आयुष्य कितीही ढवळून निघो, ते पुनः पुनः स्वतःच्या मूळ सकारात्मक,चैतन्यमय आणि आनंदी अवस्थेत परत येतात. आज आपण मनाचे स्थितिस्थापकत्व, लवचिक किंवा रेजिलन्स असणे म्हणजे काय आणि त्याचे विविध पैलू बघूयात!

       रोजचे जीवन जगताना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही प्रमाणात प्रतिकूलता आणि संकटे येत असतात. त्यांचे प्रकार आणि स्वरूप वेगेवगळे असते, यादीच बनवायला घेतली खूप मोठी यादी होईल! पण आपण बघतो की एखादा व्यक्ति आयुष्यात कितीही मोठी प्रतिकूलता येवो दर वेळेस त्याला स्थिर मनाने आणि सकारात्मकतेने सामोरे जावून आपली क्रियाशीलता टिकवून ठेवतो तर एखादी व्यक्ति थोड्याश्या प्रतिकूलतेने भांबावून जाते, डगमगते आणि स्वतःच त्या प्रतिकूलतेचा बळी ठरते. अशी उदाहरणे आपण आजूबाजूला पाहतो! इथे पहिली व्यक्ति ही रेजिलन्ट (resilient) आहे तर दुसऱ्या व्यक्ति मध्ये रेजिलन्ट(resilient) ही क्वालिटी कमी आहे.

*      रेजिलन्स (resilience) म्हणजे काय ?

 आव्हानात्मक आणि कठीण जीवनानुभवाना मानसिक, भावनिक आणि वर्तणूक च्या लवचिक मार्गाने यशस्वीरीत्या सामोरे जाण्याची नि जुळवून घेण्याची प्रक्रिया आणि परिणाम म्हणजेच लवचिकता किंवा रेजिलन्स (Resilience)!



ज्या माणसांमध्ये, रेजिलन्स, लवचिकता असते त्यांच्याकडे मजबूत कोपिंग क्षमता असते.

रेजिलन्ट लोकांमध्ये अनेक वैशिष्ट्ये असतात की जी त्यांना अवघड परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम करतात त्यापैकी काही वैशिष्ट्ये:

Ø  लढाऊ मानसिकता: लवचिक माणसांमध्ये लढाऊ वृत्ती असते,कितीही आव्हानात्मक परिस्थिति येवो,त्यातून बाहेर पडेपर्यंत आपण प्रयत्न सोडणार नाही हे त्यांना पूर्णपणे माहीत असते.

Ø  प्रभावी भावनिक रेगुलेशन: जीवनातील ताण तानावांचा सामना करताना आपल्या भावनांचे योग्य नियंत्रण करण्याची क्षमता असणे हे रेजिलन्स व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे. ह्याच अर्थ असा नाही होत की रेजिलन्स व्यक्तिना राग, भीती, दु:ख, डिप्रेशन,चिंता ह्यासारख्या तीव्र नकारात्मक भावना निर्माण होत नाहीत,पण ह्या भावना ओळखून त्या तात्पुरत्या आहेत हे जाणून अश्या व्यक्ति आपल्या भावनांची तीव्र आणि जलद प्रतिक्रिया देत नाहीत.

Ø  स्व नियंत्रण: रेजिलन्स व्यक्तीचे स्वतःवर नियंत्रण असते, ते जाणून असतात की कोणत्याही परिस्थितीतील त्यांची कृती त्या परिस्थितीचे परिणाम ठरवण्यात महत्वाची आहे

Ø  समस्या निवारण कौशल्ये: रेजिलन्स व्यक्ती कोणत्याही समस्येकडे तर्कसंगत पद्धतीने पाहतात आणि समस्या निवारण्याचा असा मार्ग काढतात की जो बदल घडवू शकतो.

Ø  स्व करुणा : रेजिलन्स व्यक्तीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे स्वतःला स्वीकारणे आणि स्वतःबद्दल दयाळू दृष्टीकोण असतो. कठीण प्रसंगात ते स्वतःशी हळुवारपणे आणि दयाळूपणाने वागतात.

Ø  सामाजिक सपोर्ट: रेजिलन्स व्यक्तीचे सामाजिक संपर्क दांडगा असतो. ह्या व्यक्तीना सपोर्ट चे महत्व माहीत असते आणि संकटात जेव्हा त्यांना मदतीची गरज लागते तेव्हा ते नि:सकोच मागतात.

रेजिलन्सचे प्रकार: व्यक्तिमधील लवचिकता,रेजिलन्स हा पैलू त्याला जीवनातील अडथळयांना सामोरे जाण्यास आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करते, परंतु हा एक पैलू नसून त्याचे अनेक प्रकार आहेत जे व्यक्तिला विविध प्रकारच्या प्रतिकूलतेचा सामना करण्यास सक्षम करतात. 

·         शारीरिक रेजिलन्स: शारीरिक रेजिलन्स म्हणजे शरीर त्यातील बदलाना, गरजांना,  सामोरे जाणे  तसेच आजारपण,दुखापती किंवा जखमांमधून स्वतःला बरे करणे! रिसर्च मधून हे दिसून आलेय की आरोग्याच्या बाबतीत  रेजिलन्सचा हा पैलू महत्वाचा ठरतो. आपण शारीरिक रेजिलन्स निरोगी जीवनाची  शैली स्वीकारून म्हणजेच पुरेशी झोप, चौकस आणि पौष्टिक आहार, नियमित व्यायाम हयाद्वारे जोपासू शकतो.

·         मानसिक रेजिलन्स: मानसिक रेजिलन्स म्हणजे जीवनातील बदल आणि अनिश्चितता स्वीकारण्याची आणि त्यासोबत जुळवून घेण्याची व्यक्तीची क्षमता. ह्या प्रकारच्या व्यक्ति संकटांमध्ये लवचिक आणि शांत राहतात. अश्या व्यक्ति आपल्या मानसिक शक्तीचा वापर समस्या सोडवण्यासाठी, अडचणीमधून मार्ग काढत असताना आशावादी आणि सकारात्मक राहण्यासाठी वापरतात. 

·         भावनिक रेजिलन्स: भावनिक रेजिलन्स म्हणजे तणावपूर्ण काळात स्वतःच्या भावनांचे योग्य नियमन करण्याची क्षमता असणे. अश्या व्यक्ति स्वतःच्या भावनिक अंतर्गत प्रक्रियेबाबत जागरूक असतात आणि आपल्या भावनांची प्रतिक्रियेबाबत पण सजग राहतात. आणि ह्यामुळे जेव्हा त्यांना नकारात्मक परिस्थिति हातळायची वेळ येते तेव्हा ते आपल्या भावनाना नियंत्रित करून नकारात्मक अनुभवाना शांतपणे सामोरे जातात. हा पैलू व्यक्तीला आव्हानात्मक काळात आशावादी राहण्यास मदत करतो, हा काळ आणि संकटे कायमस्वरुपी टिकणारी नाहीत, तात्पुरती आहेत ही जाणीव व्यक्तिमध्ये जागृत असते.

·         सामाजिक रेजिलन्स : सामाजिक रेजिलन्स म्हणजे संकटातून सावरण्याची समूहाची क्षमता! ह्यामध्ये माणसे एकमेकांशी जोडली जातात आणि वैयक्तिक किंवा समूहाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे कामे करतात. ह्यामध्ये एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये एकत्र येणे, एकमेकाना आधार देणे, सावरणे आणि त्यातून बाहेर पडण्यास एकमेकाना मदत करणे ह्या गोष्टी येतात. 



           रेजिलन्ट माणसांच्या आयुष्यात प्रतिकूलता किंवा संकटे येत नाहीत असे नाही, पण त्यांची त्या आव्हानात्मक प्रसंगाना सामोरे जाण्याची वाट ह्या संकटामधूनच जाते. काही माणसांचा स्वभावात  नैसर्गिकरीत्या रेजिलन्स असतो, पण ह्याच अर्थ असा नसतो की रेजिलन्स हे वैशिष्ट्य जन्मजातच असते किंवा ते नंतर विकसित करता येत नाही. माणसाला स्वत: मध्ये कधीही कोणतेही वैशिष्ट्ये अंगिकारता येतात त्याच प्रमाणे रेजिलन्स हे वैशिष्ट्ये सुद्धा स्वतःमध्ये विकसित करता येवू शकतात.

त्यासाठी प्रयत्नपूर्वक आ ना स्व नि यो सा क्ष हा सहा अक्षरी मंत्र समजून घेवून त्याची जोपासना केल्यास कितीही आव्हानात्मक प्रसंगांना तोंड देण्याची तुमची तयारी झालेली असेल.

आ: आत्मविश्वास, आत्मविश्वास ही स्व आदराची अशी भावना आहे की आपण आपल्या क्षमतेवर आणि निर्णयांवर विश्वास ठेवतो; अगदी कठीण काळात ही! आत्मविश्वास असणे ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला कधी भीती वाटणार नाही किंवा स्वतःबद्दल शंका निर्माण होणार नाहीत, पण ह्या भीती आणि शंका जेव्हा त्रासदायक ठरतात तेव्हा आपण त्यावर मात करू शकतो ही आपल्याबद्दलची खात्री म्हणजे आत्मविश्वास!

ना: नातेसंबंध, मजबूत आणि सकारात्मक नातेसंबंध रेजिलन्स साठी उपयोगी ठरतात. कुटुंब, मित्र, सहकारी आणि सामाजिक सकारात्मक संबंध आपल्याला सल्ला आणि मार्गदर्शन करून, आपल्यासोबत राहून आव्हानात्मक काळात आपण एकटे नाही आहोत ही भावना निर्माण करतात. त्यामुळे संकटकाळात असहाय्यतेच्या जाणिवेने आपण गळपटून जात नाही.

स्व: स्वभाव, आपला स्वभाव अथवा चारित्र्य म्हणजे आपण कोण आहोत, आपली मूल्ये आणि तत्वे काय आहेत हे माहीत असणे आणि कोणत्याही दबावाखाली सुद्धा आपली मूल्ये आणि तत्वाशी प्रामाणिक असणे. ह्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ह्यातील फरक जाणून घेवून काय आपल्या हिताचे आहे हे निवडणे येते! स्थिर स्वभाव आणि भक्कम चारित्र्य असलेल्या व्यक्तीकडे विश्वासार्ह म्हणून पहिले जाते.

नि: नियंत्रण, कंट्रोल म्हणजे आपल्या जीवनातील असे पैलू ज्यावर आपण प्रभाव पाडू शकतो,आपले नियंत्रण आहे ते ओळखणे आणि ज्यावर आपण प्रभाव पाडू शकत नाही, आपल्या नियंत्रणात नाही असे पैलू स्वीकारणे. ह्यामुळे ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्यावर आपण लक्ष केंद्रित करतो आणि ज्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी सोडून देतो. हे आपली असहायतेची भावना कमी करून शक्य त्या सकारात्मक कृती करण्यास सक्षम करते.

यो: योगदान, आपल्या सभोवतालच्या जगावर सकारात्मक प्रभाव पाडल्याने ही आपल्यामध्ये रेजिलन्स, लवचिकता निर्माण होवू शकते. हा प्रभाव आपल्या योगदाना ने मग ते पैसे दान असो, स्वयंसेवा देण्याच्या स्वरूपात असो किंवा नुसते इतरांशी दयाळूपणाने वागणे असो! हे आपले योगदान आपल्याला इतरांशी जोडून असण्याची भावना आणि जीवन उद्देश्यपूर्ण असल्याची भावना निर्माण करते. संकटकाळात योगदानाची भावना अधिक सशक्त होवून आव्हानात्मक स्थितित पण आपण इतरांशी जोडलेले आहोत ही जाणीव असते.

सा: सामना करणे, सामोरे जाणे म्हणजे ताण तणावाना आणि त्रासाना तोंड देण्याची  सकारात्मक आणि योग्य पद्धत! ह्यात स्ट्रेस मॅनजमेन्ट चे योग्य स्ट्रॅटजीचा वापर करून स्वतःला तनावमुक्त केल्यास आव्हानात्मक परिस्थितिशी सामना करण्यास आपण सक्षम असतो.  

क्ष: क्षमता, सक्षम असणे म्हणजे कठीण परिस्थितिसाठी आपण तयार आहोत आणि ही परिस्थिति हाताळण्यास सक्षम आहोत. आपल्याकडे आव्हानाचा सामना करण्याची आवश्यक कौशल्ये आहेत आणि आपल्याकडील ज्ञानाचा उपयोग करून ह्या आव्हनात्मक प्रसंगातून बाहेर पडू शकतो ही आपल्यामधील क्षमतेची जाणीव निर्माण करणे. ही जाणीव रेजिलन्स साठी महत्वाची ठरते .

रेजिलन्स म्हणजे संकटांना अथवा ज्या मुळे आव्हाने समोर उभी राहिलीत त्या कारणाना मग ति कारणे व्यक्ति असो वा परिस्थिति; त्यांना दोषारोपण न करता आपल्या बलस्थाने आणि कमकुवत बाजू ओळखून स्वतःला डगमगू न देता त्यातून सावरणे आणि परत आपल्या मूळ सकारात्मक आणि क्रियाशील  चैतन्याकडे वळणे.

रोहिणी फुलपगार

मानसोपचारतज्ञ

Mental health adviser 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)