मुलांवरील शैक्षणिक दबाव: कारणे,लक्षणे आणि उपाय.

TheMindTalks
0

                     मुलं घडवताना गुण नाही माणूस घडवा!!

आजकाल कीर्ती खूप शांत झाली होती. नेहमीचे कामं, अभ्यास, रुटीन सगळं चालू होते पण आधीची सतत उत्साही, नवनवीन कल्पना घेऊन गप्पा मारणारी कीर्ती नव्हती तर एक पोक्तपणा जाणवत होता. नववीतील मुलीला हा पोक्तपणा शोभत हि नव्हता. आई -बाबांच्या लक्षात हा बदल आला नाही,त्यांच्या लक्षात " आता कीर्ती अभ्यासाबाबत सिरियस झालीय, मन लावून अभ्यास करतेय, बाकी कुठे टाईमपास करत नाही, जास्त हसण्याखिदळण्यात वेळ घालवत नाही" हा बदल आला आणि त्या बदलाने ते खुश ही झाले कारण हाच बदल त्यांना अपेक्षित होता. एकदा कीर्तीचा मामा घरी आलेला, पण कीर्तीमधील सूक्ष्म बदल त्याने नोटीस केला. "कीर्ती खूप शांत झालीय ना?" बहिण आणि मेव्हण्याला बोलला! "अरे शांत नाही, अभ्य्सासाला लागलीय, अभ्यासातील महत्व लक्षात आले." हे उत्तर मिळाले त्याला!

तो कीर्तीशी बोलू लागला, अभ्यासातील काही अडचणी आहेत का विचारू लागला. कीर्तीने मन मोकळे करत सांगितले, मामा, अभ्यासाबाबत मला काही अडचण नाही, पण प्रॉब्लेम्स आहेत अपेक्षांचे! मी माझ्या आईवडिलांच्या अपेक्षा कधीतरी पूर्ण करू शकेल का ? मी करत नसेल तर मी चांगली,आदर्श मुलगी नाही होत त्यांच्या दृष्टीने! मी खूप प्रयत्न करते पण प्रत्येकवेळेस त्याचे म्हणणे असते कि तू अजून थोडा प्रयत्न केला असता तर अजून छान मार्क्स पडले असते! पेरेंट्स, नातेवाईक, शाळा सगळीकडून येणारे हे गुणवत्तेचे आणि अजून चांगले करण्याचे प्रेशर सतत डोक्यात असते. आणि आपण ह्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर काय ..ही भीती सतत मनात असते. त्यामुळे मी स्वतःला आक्रसून घेतलेय आता.

हा जरी कीर्तीचा प्रॉब्लेम असला तरी कित्येक आकाश, पूजा, समीर,सार्थक, अथर्व अश्या परिस्थितीतून जात असतात. आज अनेक मुले अभ्यासाच्या ओझ्याखाली नाही तर शैक्षणिक दबावाखाली वाढत आहेत. मुले अभ्यासात मागे नाहीत; पण सततच्या अपेक्षा,तुलना आणि अपयशाची भीती त्याच्या मनावर खोल परिणाम करत आहे. ह्या शैक्षणिक दबावाचे अनेकदा परिणाम आतल्या आत साचत जातात आणि आपल्याला ते दिसतात तेव्हा कधी कधी उशीर झालेला असतो. म्हणूनच मुलांवरील शैक्षणिक दबाव: कारणे, लक्षणे आणि उपाय या लेखातून आपण या समस्येकडे मानसशात्रीय दृष्टीकोनातून पाहणार आहोत.

काय असतो अकॅडेमिक प्रेशर अथवा शैक्षणिक दबाव?

"कुटुंब, शाळा आणि समाजाकडून मुलांच्या शैक्षणिक आणि शिकण्याच्या प्रकियेत टाकल्या जाणाऱ्या दबावामुळॆ मुलांमध्ये निर्माण होणारी अस्वस्थता, इतर नकारात्मक भावना आणि तणाव म्हणजे शैक्षणिक दबाव."

किशोरवयीन मुले सौम्य शैक्षणिक दबावामुळे प्रेरित होऊ ही शकतात, हे नॉर्मलच आहे! परंतु जर हा दबाव तीव्र आणि आग्रही असेल अनेक मुलांना ह्याचे जबरदस्त दडपण येऊन त्यांच्यामध्ये नकारात्मकता येते.

पौगंडावस्थेतील मुलांच्या विकासाचा एक भाग म्हणजे जीवनाच्या अनेक, शारीरिक, भावनिक, सामाजिक, वैचारिक विकास आणि मागण्यांमध्ये संतुलन कसे राखायचे हे शिकणे असते पण अति शैक्षणिक दबाव एखाद्याच्या वाढीस अडथळा आणू शकतो आणि वाढीच्या इतर क्षेत्रात प्रॉब्लेम्स तयार होतात! आग्रही शैक्षणिक दबाव मुलांच्या भावनिक, बौद्धिक, समायोजिक विकासामध्ये अडथळे निर्माण करतात.

विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक दबावाची कारणे
विद्यार्थ्यांवर शैक्षणिक दबाव येण्याची अनेक कारणे आहेत, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
1 पालकांच्या अपेक्षा: भविष्यातील यशासाठी उच्च गुण मिळविण्यासाठी पालक प्रयत्नशील असतात त्यामुळे नकळतपणे त्याची अपेक्षा आपल्या मुलाने सर्वोत्तम असावे, त्याला भविष्यात सर्वोत्तम मिळावे अशी होते. आणि ह्या सर्वोत्तम च्या नादात, शाळेत आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी साठी मुलांवर पालकांकडून अतिरिक्त दबाव टाकला जातो. त्याचवेळी इतर समवयस्क मुलांसोबत शैक्षणिक कामगिरीवरून केली जाणारी तुलना आणि हेटाळणी सुध्दा दबाव निर्माण करते.

2 अवजड अभ्यासक्रमाचा दबाव: विद्यार्थ्याला अवजड अभ्यासक्रमाचा देखील शैक्षणिक दबाव जाणवू शकतो. वेगवेगळ्या विषयांची एकाच वेळी अनेक कठीण असाइनमेंट हाताळणे तणावपूर्ण असू शकते. प्रत्येक विषयाच्या आणि वर्गाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात परंतु त्यामुळे शैक्षणिक ताण आणि दबाव वाढवू शकतात.
3 अपुरे टाईम मॅनेजमेंट आणि संघटन कौशल्ये: पौगंडावस्थेतील विद्यार्थी त्यांचे इतर ऍडजस्टमेन्ट कौशल्य वाढवत असतात. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट आणि त्यांच्या प्रायॉरीटी ठरवण्यासाठी ते आतून तसे ही झगडत असतात; अशी किशोरवयीन मुले जे त्यांचा वेळ व्यवस्थापित करू शकत नाहीत किंवा त्यांचे प्राधान्यक्रम व्यवस्थित आयोजित करू शकत नाहीत आपल्या आजूबाजूला असले तरी ते आश्चर्यकारक नाही. ह्या ऍडजस्टमेन्टशी झगडत असतानाच  सामोरे येणाऱ्या सतत च्या टेस्ट्स, परीक्षा, स्पर्धा मुलांमध्ये तणाव निर्माण करतात.
4 स्वतःकडून ठेवलेल्या अवास्तववादी अपेक्षांमुळे येणारा दबाव: सतत स्वतःच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करून स्वतःच्या बलस्थाने आणि कमकुवत बाजू विचारात घेता फक्त उत्कृष्ट कामगिरीच्या अवास्तववादी अपेक्षांच्या ओझ्याखाली राहिल्याने मनात तीव्र स्पर्धा निर्माण होते जी शैक्षणिक दबाव निर्माण करते.

5 योग्य मार्गदर्शनाचा अभाव: कित्येक वेळा मुलांना त्यांच्यासाठी योग्य काय आहे हे कळत नाही, अश्यावेळी ती भांबावून जातात. ह्या स्टेज ला योग्य मार्गदर्शन मिळता इतर लोकांच्या अपेक्षेनुसार वागण्याची किंवा शैक्षणिक मार्ग निवडण्याची केलेली जबरदस्ती हा दबाव वाढवते.

6 अंतर्गत समस्या : स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसणे, स्वतःबद्दल द्विधा अवस्था असणे, अभ्यासाबाबत सतत चिंता, भीती, इतरांकडून केल्या जाणाऱ्या मूल्यांकन चे दडपण शैक्षणिक दबाव वाढवतात .
7 इतर बाह्य स्रोतांकडून येणारा दबाव : अनेक बाह्य घटक जसे की चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळण्याची वाढती स्पर्धा, बरोबरीच्या मित्रांचे अभ्यासातील उत्कृष्ट कामगिरी, शिक्षकांकडून अथवा शिक्षण संस्थेकडून केला जाणारा भेदभाव, घरातील आर्थिक अस्थैर्य, कौटुंबिक वाद, शाळेतील रॅगिंग, शैक्षणिक कामगिरीची योग्यरितीने दखल घेतली जाणे इत्यादी गोष्टी ही शैक्षणिक दबावाला कारणीभूत ठरतात.

आपले मूल शैक्षणिक दबावात आहे हे कसे ओळखायचे?

शैक्षणिक दबाव हा चुकीचा नाही, पण हा दबाव नियंत्रणात असेल शैक्षणिक आव्हानांना तोंड देण्यात तर फायदेशीर होतो , अतिरिक्त दबाव नकारात्मक परिणाम दर्शवतात. आपल्या मुलात पुढील बदल दिसत असतील तर तो हा दबाव वाहत आहे :

·         अत्यंत स्पर्धात्मक स्वभाव

·         मार्कांबद्दलचे अतिवेड आणि अति जागरूकता.

·         सतत अभ्यासात राहणे.

·         चिंता

·         सामाजिक आणि कौटुंबिक संबंधापासून दुरी राखणे.

·         आराम करण्याबद्दल अपराधीभाव निर्माण होणे.

·         भूक लागणे

·         सतत एक थकवा जाणवणे.

·         सततची डोकेदुखी ची तक्रार असणे.

·         मान अथवा इतर शरीर दुखीची तक्रार असणे

·         झोपेचे चक्र बिघडणे .

·         पोट सारखे बिघडणे अथवा ऍसिडिटी चा त्रास वाढणे.

·         अशक्तपणा जाणवणे.

·         निरुत्साही वाटणे.

·         नैराश्य चे लक्षण दिसणे

·         पॅनिक अटॅक येणे

·         सततची चिंता जाणवणे.

·         स्वतःवरचा विश्वास हरवणे

·         आत्मविश्वास कमी पडणे.

·         पटकन मूड बदलणे

·         चिडचिड आणि वैतागलेपणा व्यक्त होणे

ह्या शैक्षणिक दबावाला सामोरे कसे जायचे ?

खरंतर हा दबाव अंतर्गत घटकांपेक्षा मुलावर बाह्य घटकाने जास्त निर्माण होतो ज्यात सुरुवात पालकांकडून, नातेवाईक, शाळा आणि सामाजिक घटकांपासून होते, त्यामुळे शैक्षणिक दबाव सकारात्मक पद्धतीने हाताळण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांची भूमिका तेवढीच महत्वाची आहे. पालकांनी काही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगली तर त्याच्या मुलांचे शैक्षणिक वर्षे बिना दबावाचे जातील आणि त्यांना शिकण्याच्या प्रक्रियेचा मनापासून आनंद घेता येईल:

मुलांच्या प्रयत्नांचे कौतुक करा: केवळ मार्क्स किंवा त्याची गुणवत्ता ह्याकडे लक्ष देता आपले मूल जे काही प्रयत्न करत आहे, धडपड करत आहे त्याचे कौतुक करा.त्याची छोटीसी जरी प्रगती असेल तरी तिची प्रशंसा करा.

मुक्त संवादावर भर द्या : तुमच्या मुलाला तुमच्याशी बोलताना भीती वाटली नाही पाहिजे अशी संवादाची पद्धत निर्माण करा. तुमचे मूल त्याचे मूल्यांकन केले जाईल ह्या भीतीने तुमच्याशी संवाद टाळत असेल तर त्याची हि भीती निघून जाऊन संवादासाठी एक सुरक्षित जागा तुमच्या नात्यात निर्माण करा.

वास्तववादी अपेक्षा ठेवा: आपले मुलाच्या सगळ्या बाजू आपल्याला माहिती असतात. त्याची स्ट्रेंग्थ आणि त्याचे विकनेस पण ! त्याची झेप आणि आपलीही ! त्यामुळे अवास्तव मागणी ठेवण्यापेक्षा वास्तववादी अपेक्षा ठेवा. त्याचे लहान लहान अचिव्हमेन्ट पण साजरे करा जेणेकरून त्याच्यामध्ये अजून उत्साह निर्माण होईल. त्याचा अभ्यास आणि त्याचे छंद किंवा आवडीचे काम ह्यात संतुलन निर्माण करा. कोणत्याही घटकाचा अतिरेक होणार नाही ह्याचे काळजी घ्या.

मजबूत सपोर्ट सिस्टिम निर्माण करा: आपल्या मुलासमोर चांगल्या वर्तनाचा आपली वर्तनांतू एक आदर्श निर्माण करा. वेळेवर झोप, पोषक आहार, मोबाईल चा नियंत्रित वापर, शारीरिक व्यायाम, तणाव हाताळण्याच्या योग्य आणि सकारात्मक पद्धती ह्यातून मुलासमोर पालकांचे सकारात्मक वर्तन उभे राहते ज्याचे आपले मूल निरीक्षण करत असते. आपल्या मुलाच्या अभ्यासाविषयी तक्रार आणि दडपणाबाबत त्याच्याशी मोकळेपणे बोलून त्याचे शिक्षक, सहाध्यायी, आणि इतर प्रौढ तज्ञ व्यक्तीचा ग्रुप बनवा जिथे त्याला योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळेल. आपल्या मुलाची तुलना इतर मुलासोबत अगदी स्वतःसोबत करता त्याचे स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र बुद्धिमत्ता, वेगळे व्यक्तिमत्व असणे ह्याचा स्वीकार करा. आपली आवड त्याच्यावर लादता त्याला काय आवडते आणि तो कश्यासाठी सक्षम आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या.

मुलांनी ह्या शैक्षणिक दबावाला सामोरे जाताना पुढील गोष्टीं अंमलात आणल्या तर शैक्षणिक कार्यकाळ आनंदी आणि उत्साहाने भरलेला होऊ शकतो:

टाइम मॅनेजमेंट : जेव्हा एखादा विषय आवाक्याबाहेर वाटतो किंवा ठरवले ध्येयाचे दडपण वाटते तेव्हा ते ध्येय छोट्या छोट्या स्टेप्स आणि ऍक्शन मध्ये विभागून त्यानुसार वेळेचे मॅनेजमेंट करणे. आपला उपलब्ध वेळेचे नियोजन आपल्या प्रायॉरीटी ने असे करणे ज्यात अभ्याससोबत आपले छंद, आरोग्य, झोप आणि शारीरिक व्यायामाला वेळ काढता येऊ शकेल.

कोपिंग स्किल्स विकसित करणे: शैक्षणिक दबावाला सामोरे जाण्यासाठी कोपिंग स्किल्स जसे निर्णय क्षमता, समस्या निराकरण, स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट च्या स्किल्स विकसित करणे. ह्यासाठी पालकांची, शिक्षकांची अथवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञाची मदत घेणे.

संवाद वाढवणे: आपल्या पालकांसोबत संवाद वाढवणे. त्यांनी मला समजून घेतले पाहिजे, त्यांना कळले पाहिजे किंवा त्यांना कळणार नाही माझे म्हणणे, ते समजूनच घेणार नाही ह्या समजुतीमध्ये अडकता पालकांसोबत मुक्त संवाद साधला पाहिजे. तुम्हाला काय त्रास होतो, कोणते घटक आवाक्याबाहेरचे वाटतात, कुठे आणि कसल्या प्रकारची मदत हवी आहे,दडपण कश्याचे जाणवते, तुलनात्मक वागण्याचा कुठे त्रास होतो हे सगळे आपल्या पालकांपर्यंत पोहचवले गेले पाहिजे.

वास्तववादी ध्येय : आपल्या स्वतःकडून परिपूर्णतेचा अट्टाहास हा अनेकदा दडपण वाढवतो, आपल्या स्वतःकडून ठेवलेल्या अपेक्षाची पूर्तता झाल्यास आत्मविश्वास कमी होतो, आत्मग्लानीने मन भरू जाते. मग पुढील स्टेप्स घेता येत नाही किंवा खूप उशीर होतो. त्यामुळे स्वतःच्या सर्व स्ट्रेंथ आणि विकनेस बाजू स्वीकारून वास्तववादी ध्येय ठरवणे. अपयश हे कायमचे अपयश मानता तात्पुरते अपयश मानून लगेच पुढील स्टेप्स घेणे, व्यक्ती व्यक्ती मधील फरक लक्षात घेऊन दुसऱ्या व्यक्ती आणि स्वतःमधील क्षमता मान्य करणे जेणेकरून आपल्यावर दुसऱ्यांच्या क्षमतांचा आणि मागे पडण्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही.

बाह्य मदत घेणे : जर शैक्षणिक दबावामुळे नैराश्य,सततची चिंता, अनामिक भीती, थकवा आणि डोकेदुखी, परफॉर्मन्स ची भीती जाणवत त्याला सामोरे जाण्यासाठी मेडिटेशन, माईंडफुलनेस, सायकोथेरपी ह्या गोष्टींची मदत घेणे .

                                         खरंतर शिकण्याचे जे वर्ष असतात ते व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचे, उत्साहाचे आणि खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्याचे वर्ष असतात, हे आयुष्याचे वर्षे परत सापडत नाहीत. ते आपल्या मुलासाठी नकारात्मक पद्धतीने विस्मरणीय बनवता सकारात्मक पद्धतीने विस्मरणीय बनवणे ही आपल्या सगळयांची सामूहिक जबाबदारी आहे.

गुणांच्या ओझ्याखाली बालपण नको दडपणे,

स्वप्नांना पंख द्या परीक्षेत आयुष्य नको तोलणे.

तुलना नको ताण नको, मुलांचे मन फुलू द्या,

मार्कशीट पेक्षा आधी त्यांचे हसू जपू या .

 

 

रोहिणी फुलपगार

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि लाईफ कोच

 

 

 

 

 

 

 

Bottom of Form

 

 

 

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)