आनंदाचे रहस्य: क्षणिक आनंदापासून अर्थपूर्ण आनंदापर्यंत!

TheMindTalks
0


                                         आनंद म्हणजे भावना नाही तर ते एक कौशल्य आहे.

माझ्या सायकोथेरपीस्ट ह्या प्रॅक्टिस मध्ये क्लायंट कडून अनेकदा येणारे वाक्य म्हणजे ; "मी आनंद काय असतो तेच विसरलोय/विसरलीय! मला माझा आनंद शोधायचाय!" किंवा "मला माहिती नाही मी शेवटी कधी आनंदी होतो/होते, मला आता फक्त आनंदी राहायचे आहे !"

आपण सगळेच आनंदाच्या शोधात हा जगाचा प्रवास करत असतो. आनंदाचे आणि आपले तसे सूर जुळत नाहीत असे वाटते कारण आपण त्याच्या किती ही मागे मागे धावलो तरी तो पुढे पळत असतो आपल्या! ह्या पळापळीत आपली मात्र धमछाक होते. मध्यंतरी  2006 मध्ये एक मराठी सिनेमा आला होता, आनंदाचे झाड नावाचा! सिनेमा लक्षात नाही पण नाव लक्षात राहिले.

जर असे खरोखर आनंदाचे झाड असते तर किती मज्जा झाली असती; आनंदी व्हायचे तर आणा थोडा आनंद झाडावरून तोडून! आनंद वाटायचा, टोपलीभरून तोडा आणि मित्र नातलगांमध्ये वाटा, असे झाले असते .

पण हे शक्य नाही, असे झाडावरून तोडून किंवा कुठून आणून आनंद निर्माण करता आला असता तर व्यक्ती आनंदाच्या शोधात भरकटत राहिला नसता!

आनंद ह्या भावनेची व्याप्ती मोठी आहे, पण जर का ती समजली की मग आनंद आपल्यात सामावला जातो त्याला शोधण्याची गरज राहत नाही.

आजच्या लेखात आपण आनंदाचे शास्त्र समजावून घेऊ या.

आनंद म्हणजे काय ?

पॉसिटीव्ह सायकॉलॉजि मध्ये आनंद ची व्याख्या पुढीलप्रमाणे सांगितली आहे; "आनंद हा भावनिक आणि मानसिक आरोग्यपूर्णतेचा व्यक्तिसापेक्ष अनुभव आहे जो जीवनातील समाधान,वारंवार येणाऱ्या सकारात्मक भावना आणि क्वचित येणाऱ्या नकारात्मक भावना, जीवनाचे अर्थपूर्ण आणि फायदेशीर असणे ह्या जाणिवेने निर्माण होतो."

ह्या व्याख्येत एक महत्वाचा शब्द आहे; व्यक्तिसापेक्ष! सगळ्यांसाठी आनंद हा एक सारखा नसतो तर तो व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असतो. आपल्या प्रत्येकाचा आनंदाचा सेट पॉईंट वेगवेगळा असतो त्यावर ही भिन्नता ठरते. आनंदाचा सेट पॉईंट म्हणजे आनंद अनुभवण्याची प्रत्येकाची निर्धारित पातळी! समजा दोन व्यक्तींना एकाच रकमेची लॉटरी लागली, आनंद होणार पण एकाचा आनंद 2 दिवस टिकेल आणि तो लगेच रोजच्या आयुष्यात परत येईल तर दुसऱ्याचा आनंद हा 5 दिवस टिकेल त्याला रोजच्या आयुष्याच्या रुटीन मध्ये यायला 5 दिवस लागेल. एखादा ग्रुप जर सूर्यास्त बघत असेल तर प्रत्येकजण त्या दृश्याने भारावला जाणार नाही, कोणी सूर्यास्त  झाल्याझाल्या लगेच मोबाईल मध्ये डोकं घालेल, कोणी इकडे तिकडे वळेल तर कोणी अजून ही भारवल्यासारखा सूर्यास्त झालेल्या दिशेने पाहत राहील.

                                    आपण सगळी माणसं जी आनंदाच्या मागे लागलीत त्यांना आपण नेमकी कोणत्या प्रकारचा पातळीचा आनंद घेऊ इच्छितो हे ही माहित नसते. आपण आनंदाच्या ह्या पातळ्यांवर एक दृष्टिक्षेप टाकूया :

1 हेडोनिस्टिक म्हणजेच सुखवादी आनंद: हा इंद्रियतृप्ती मधून मिळणारा तात्काळ आनंद असतो. आवडीचे अन्न, मनोरंजन, आराम इत्यादी. एखाद्याने रात्रभर जागून एखादी वेबसिरीज अथवा सिनेमा पाहिला, आवडते फ्लेवर चे आइसक्रीम मिळाले, ,मनासारखे चवीचे जेवण खाल्ले, एखादे नवीन फोन,शूज, ड्रेस,साडी खरेदी केली ह्या सगळ्यांनी होणारा आनंद हा ह्या कॅटेगरीमध्ये येतो. हा आनंद क्षणभंगुर आणि स्वकेंद्रित असतो.

2 तुलनात्मक म्हणजेच अहंकारवादी आनंद: हा काही आव्हानात्मक शर्ती पूर्ण केल्याने मिळणारा आनंद आहे. काही ध्येय,ठरवले आणि ते पूर्ण केले. जसे अमुक परीक्षा एवढ्या मार्कानी पास होणार, प्रोजेक्ट ठरवलेल्या वेळेच्या आधी पूर्ण करणार, दोन वर्षात घर आणि गाडी घेणे हे आव्हान पूर्ण केले, एखादी स्पर्धा जिंकली, इतरांना जे जमत नाही ते मी करून दाखवले, मी मला सिद्ध करून दाखवले, त्यांच्या मुलांपेक्षा माझी मुले जास्त यशस्वी आहेत, ह्या गोष्टी ह्या प्रकारात येतात. ह्या आनंदाने स्वतःचा अभिमान सुखावतो, सेल्फवर्थ वाढतो पण तरीही हा आनंद क्षणभंगुर असतो. वैयक्तिक कामगिरीमुळे स्व-कर्तृत्वाची भावना निर्माण होते पण जर कुठे कमी पडल्यासारखे झाले किंवा कोणी आपल्यापेक्षा थोडे वरचढ किंवा पुढे गेल्यासारखे वाटले कि हा आनंद तणावात बदलतो.

3 योगदानात्मक म्हणजेच परोपकारी आनंद: इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यामधून आणि निरोगी सहृदय संबंध बनवण्यातून मिळणारा हा आनंद आहे. ह्यात व्यक्ती वैयक्तिक फायद्यांचा पलीकडे जाते आणि इतरांच्या कल्याणासाठी योगदान देण्यावर लक्ष केंद्रित करते. इतरांना मदत करणे, सेवा करणे आणि प्रेम करणे, क्षमा करणे आणि गोष्टी सोडून देणे ह्यामार्फत इतरांसोबत गाढ आणि सखोल संबंध तयार करणे ह्या गोष्टी ह्या आनंदात येतात. हा आनंद क्षणभंगुर नसतो तर ह्यामुळे एक समाधानाची आणि आयुष्याच्या पूर्ततेची भावना मनात असल्याने हा आनंद वाढत राहतो.

4 चिरस्थायी म्हणजेच वास्तववादी आयुष्याच्या स्वीकाराचा आनंद: जेव्हा व्यक्ती तिचे जीवन तिच्या जगण्याच्या मूल्यांशी जुळवून घेते. सत्य ,प्रेम ,चांगुलपणा आणि श्रद्धा ह्यामधून आत्मसाक्षात्कार आणि जगण्याचा अर्थ शोधते तेव्हा ती हा आनंद अनुभवते! आपल्या अध्यात्मकि, वैचारिक आणि मानसिक श्रद्धेनुसार जगणे, आयुष्यभर शिक्षण आणि वैयक्तिक विकासासाठी वचनबद्ध असणे, एखादया कारणासाठी किंवा ध्येयासाठी जीवन समर्पित करणे, आयुष्य एका उद्देश्याने जगणे आणि त्यानुसार त्याला आकार देत राहणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या आनंदात येतात. हा आनंद चांगले समाधान आणि आंतरिक शांतीची भावना निर्माण करते जी व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व पैलूंना म्हणजेच शारीरिक, भावनिक, मानसिक आणि अध्यात्मिक पैलूंना व्यापून टाकते.

                                      ह्या चार पातळ्या जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण आपले जीवन कसे जगत आहोत हे लक्षात येते. जर आपण पहिल्या पातळींवर अडकलो, सतत क्षणिक सुखांच्या मागे लागलो, तर दीर्घकाळात स्वतःला अतृप्त ठेवतो! त्याचप्रमाणे दुसऱ्या पातळींवर राहिलो तर तात्पुरता अहंकार सुखावेल ही परंतु त्यामुळे अनेकदा बर्नआउट आणि दुःख होते, शिखरावर एकटे उभे असल्यासारखे होते. खरा आनंद हा तिसऱ्या आणि चौथ्या पातळ्यांवर जाण्याने मिळतो-इतरांवर लक्ष केंद्रित करणे आणि स्वतःपेक्षा मोठ्या घटकांशी स्वतःला जोडून घेणे, आयुष्याच्या वास्तवाचा स्वीकार करण्यामुळे आपले अर्थहीन आणि रिकामे आयुष्य किती प्रकारे अर्थपूर्ण करू शकतो आणि कश्या पद्धतीने त्याला परिपूर्णता देऊ शकतो ह्या गोष्टी ह्या पातळ्यांवर साकार होतात. बाह्य घटकांनी होणाऱ्या क्षणभंगुर आनंदापेक्षा आतून समाधानामुळे आलेला आनंद हा टिकणारा आनंद तिसऱ्या आणि चौथ्या पातळ्यांवर व्यक्तीला जाणवतो.

               आता जेव्हा आपल्याला आनंदाच्या पातळी कळल्या आहेत आणि आपण सध्या कोणत्या पातळीवर उभे राहून आपला आनंद शोधत आहोत हे लक्षात आल्यावर साहजिकच प्रश्न पडला असेल की माझ्या आनंदाच्या कक्षेमध्ये कशापद्धतीने बदल करावा?

ह्यासाठी आपल्या मदतीला येते डॉ. मार्टिन सेलिग्मन ह्यांचे PERMA मॉडेल!

ह्या मॉडेल मध्ये व्यक्तीच्या आनंदाला चालना देणारे 5 घटक मांडले आहेत; ते म्हणजे सकारात्मक भावना,(POSITIVE EMOTIONS) सक्रिय सहभाग(ENGAGEMENT), निरोगी नातेसंबधं (RELATIONSHIP) अर्थ (MEANINGS) आणि कर्तृत्व (ACCOMPLISHMENT).

I सकारात्मक भावना:
आपल्या आनंदासाठी आणि मानसिक कल्याणासाठी सकारात्मक भावना अनुभवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकारात्मक भावना अनुभवण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याबद्दल आशावादी दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. काही सामान्यतः अनुभवल्या जाणाऱ्या सकारात्मक भावना म्हणजे कृतज्ञता, आशा, अभिमान, शांतता, प्रेरणा, प्रेम आणि मनोरंजन. जर तुम्ही वारंवार सकारात्मक भावना अनुभवत असाल, तर तुम्ही जीवनातील कठीण परिस्थिती सहजपणे हाताळण्याची शक्यता जास्त असते. खरं तर, अभ्यास दर्शवितात की सकारात्मक भावना अनुभवल्याने परिस्थितीबद्दल तुमचा दृष्टिकोन विस्तृत होऊ शकतो, लवचिकता निर्माण होऊ शकते आणि समस्या सोडवण्यासाठी सर्जनशील उपाय शोधण्यास मदत होऊ शकते.

  सकारात्मक भावना कशा निर्माण कराव्यात:

कृतज्ञतेचा सराव: कृतज्ञता ही एक महत्त्वाची सकारात्मक भावना आहे, ज्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तुमच्या दिवसातून थोडा वेळ काढून किमान एका व्यक्ती, वस्तू, कल्पना किंवा ठिकाणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि आभार माना. हे दररोज करण्याचा प्रयत्न करा.

जिवलगांसोबत वेळ घालवा - तुमच्या वेळापत्रकात अशा लोकांसाठी वेळ काढा, ज्यांची तुम्ही काळजी करता आणि जे तुम्हाला आनंद देतात. मित्र आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवा त्यांच्याशी संवाद साधा आणि तुमच्या विश्वासातील लोकांशी तुमचे विचार आणि भावना शेअर करा.

एखाद्या छंदांमध्ये रमून जा - तुमच्या दिवसातून किंवा आठवड्यातून काही वेळ तुम्हाला आवडणाऱ्या कामांमध्ये घालवा - यामध्ये तुमचे छंद आणि/किंवा आवडीच्या गोष्टींचा समावेश असू शकतो. जर तुमचे आयुष्य खूप व्यस्त असेल आणि मनोरंजक कामांसाठी वेळ काढणे कठीण जात असेल, तर एक छोटेसे ध्येय निश्चित करा, त्याबद्दल एखाद्या मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला सांगा आणि तुम्ही मनोरंजनासाठी वेळ काढत आहात याची खात्री करण्यासाठी त्यांना तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगा.

संगीत ऐका - आपल्या भावनांवर प्रभाव टाकण्याची संगीतामध्ये प्रचंड शक्ती असते. तुमची आवडती उत्साही गाणी ऐकल्याने आणि त्यावर नाचल्याने किंवा गुणगुणल्याने तुमचा मूड सुधारू शकतो. दररोज संगीतासाठी वेळ काढा - तुम्ही काम करताना किंवा घरची कामे करतानाही गाणी ऐकू शकता.

व्यायाम करा - व्यायामामुळे तुमच्या शरीरात एंडोर्फिन नावाचे रसायन बाहेर पडते; ही अशी रसायने आहेत जी तुम्हाला त्वरित चांगल्या मनःस्थितीत आणू शकतात. दररोज ३० मिनिटे कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. नाचणे, चालणे किंवा घरची कामे करणे यांसारख्या गोष्टींचाही यात समावेश होतो.

II सक्रिय सहभाग: जेव्हा व्यक्ती एखादे काम करताना खऱ्या अर्थाने त्यात मग्न होते, तेव्हा तिच्या शरीरातील जैवरासायनिक प्रक्रिया बदलते. व्यक्तीचे  मन अधिक उत्तेजित होते आणि मेंदू शरीरात आनंददायी संप्रेरके (हार्मोन) सोडतो. यामुळे व्यक्तीच्या आनंदात आणि कल्याणात एक शक्तिशाली वाढ होऊ शकते. एखाद्या कामात मग्न झाल्यामुळे व्यक्ती 'फ्लो' (प्रवाह) अवस्थेत पोहोचू शकता. 'फ्लो' ही अशी अवस्था आहे, जेव्हा तुम्ही केवळ हातात असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करता आणि इतर कोणत्याही गोष्टीचे महत्त्व वाटत नाही. तुम्ही जे करत आहात त्यात पूर्णपणे रमून जाऊ शकता आणि वेळ कसा जात आहे हे तुमच्या लक्षात येत नाही किंवा तुमच्या सभोवताल काय घडत आहे याची तुम्हाला पर्वा वाटत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या कृतीमध्ये सक्रिय सहभागी असता, तेव्हा तुम्हाला नियंत्रणाची अधिक जाणीव होते आणि यामुळे तुम्हाला शांत, एकाग्र आणि आनंदी वाटण्यास मदत होते.

सक्रिय सहभाग कसा वाढवायचा:

तुमची स्ट्रेंथ ओळखा - जेव्हा तुम्हाला तुमची स्ट्रेंथ किंवा बलस्थाने कोणती आहेत हे समजते, तेव्हा तुम्ही असे जीवन घडवू शकता जे तुमच्या आवडीनिवडी आणि कौशल्यांशी जोडलेले असेल. तुमची स्ट्रेंथ ओळखा आणि त्यांचा नियमितपणे वापर करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा विचार करा. तुमच्या सामर्थ्यांचा वापर केल्याने तुम्हाला 'फ्लो'च्या अवस्थेत पोहोचणे सोपे होऊ शकते आणि अधिक सहभागी जीवन जगण्यास मदत होऊ शकते.

माइंडफुलनेसचा सराव करा - माइंडफुलनेस ही कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय किंवा पक्षपाताशिवाय तुमचे लक्ष वर्तमान क्षणावर केंद्रित करण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही ध्यान, योगाचा सराव करून अधिक माइंडफुल होऊ शकता. एखादे काम किंवा दैनंदिन क्रिया करताना तुमच्या इंद्रियांवर लक्ष केंद्रित करण्याचा साधा व्यायाम देखील तुम्हाला अधिक माइंडफुल होण्यास मदत करू शकतो.

प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या - 'सेव्हरिंग' म्हणजे तुमचे सकारात्मक अनुभव आणि भावना वाढवण्यासाठी तुमच्या इंद्रियांचा आणि मनाचा वापर करणे. दररोज काही वेळ जाणीवपूर्वक थांबा आणि एखाद्या अनुभवाचा आनंद घ्या. तुम्ही जेवण करताना किंवा प्रिय व्यक्तीशी बोलताना हे करू शकता. तुम्ही काय करत आहात याकडे लक्ष द्या आणि फक्त एकाच कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. या काळात विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा.

तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा - तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या लिहून घ्या आणि दररोज किंवा दर आठवड्याला तुम्हाला आवडणारी किमान एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. उच्च पातळीचा सहभाग अनुभवण्यासाठी याला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा.

III निरोगी नातेसंबंध

PERMA मॉडेल मधील घटकाचा केंद्रबिंदू व्यक्तीच्या सभोवतालच्या लोकांशी असलेल्या नात्यावर आहे. व्यक्तीचे कुटुंब, मित्र, सहकारी आणि सहकाऱ्यांशी मजबूत, सकारात्मक भावनिक आणि मानसिक, शारीरिक संबंध असणे त्याला प्रगती करण्यास मदत करू शकते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, घनिष्ठ, सुरक्षित संबंध आरोग्यासाठी आणि खरं तर, दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचे आहेत. चांगले नातेव्यक्तीला आधार असल्याची भावना देते, प्रेम आणि जवळीक वाढवते आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनण्यास मदत करते. निरोगी नाते संबंधांचे शारीरिक फायदे देखील आहेत, असे संबंध की व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, हृदयविकाराचा धोका कमी करते आणि मानसिक क्षीणतेपासून संरक्षण करते.

निरोगी नातेसंबंध निर्माण कसे करायचे :

कौटुंबिक सदस्य आणि सहकाऱ्यांसोबत जेवण करा - अभ्यासातून असे दिसून आले आहे की, एकटे जेवण केल्याने व्यक्तीमध्ये नैराश्य येण्याचा धोका वाढू शकतो. दुसरीकडे, प्रिय व्यक्तीसोबत जेवण केल्याने तुम्हाला त्यांच्याशी जोडल्यासारखे वाटते आणि तुम्ही तुमच्या जेवणाचा अधिक आनंद घेऊ शकता. आठवड्यातून काही वेळा तुमच्या कुटुंबासोबत, सहकाऱ्यांसोबत किंवा मित्रांसोबत जेवण करण्याचा प्रयत्न करा - तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हिडिओ कॉलवरही हे करू शकता!

नवीन मैत्री करा - नवीन मित्र बनवण्यासाठी तयार रहा; याचा अर्थ तुमच्या सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण वागणे किंवा एखाद्या वर्गात किंवा गटामध्ये सामील होणे जिथे तुम्ही नवीन लोकांना भेटता. , तुम्ही नवीन लोकांशी जोडले जाण्यासाठी ऑनलाइन समुदाय देखील शोधू शकता. समवयस्क आणि समविचारी अश्या एखाद्या क्लब मध्ये स्वतःला जोडून घ्या जिथे तुम्हाला आनंद आणि प्रेरणा मिळेल.

तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जाणून घ्या - लोकांशी संवाद साधून आणि त्यांच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारून त्यांच्यासोबतचे तुमचे नातेसंबंध सुधारा. तुमच्या आयुष्यातील इतरांबद्दल मनापासून उत्सुक असण्याने तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत होते आणि त्यामुळे तुमचे त्यांच्यासोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा विचार करा आणि त्यांच्या कुटुंब, वैयक्तिक आयुष्य, करिअर, आवडीनिवडी आणि छंदांबद्दल प्रश्न विचारा.

प्रियजनांच्या संपर्कात रहा - तुम्ही सांभाळत असलेल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे, तुमच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात राहणे कठीण होऊ शकते. जर तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये राहत असाल तर हे आणखी कठीण होते. तुम्ही ज्यांच्याशी काही काळापासून बोलला नाही अशा एखाद्या व्यक्तीचा विचार करा आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याची योजना बनवा. त्यांना फोन करा किंवा त्यांच्याशी व्हिडिओ चॅटवर संपर्क साधून गप्पा मारा.

तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे कौतुक करा - तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे कौतुक केल्याने आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने केवळ त्यांना स्वतःबद्दल चांगले वाटत नाही, तर तुमचे नातेही अधिक घट्ट होते. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तीमध्ये असलेला एखादा गुण, कौशल्य किंवा सामर्थ्य शोधा आणि त्याचे तुम्ही किती कौतुक करता हे त्यांना सांगा. तुम्ही तुमच्या आईने /पत्नीने बनवलेल्या पदार्थाबद्दल तिचे कौतुक करू शकता किंवा एखाद्या प्रकल्पावर केलेल्या कामाबद्दल सहकाऱ्याचे कौतुक करू शकता. मित्राने /मैत्रिनीने केलेल्या विचारपुशीबद्दल हि कौतुक करू शकतात.

IV जीवनात अर्थ शोधणे

जेव्हा तुम्ही तुमचा वेळ, कृती आणि प्रयत्न तुमच्या जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यावर केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला जीवनाचा अर्थ अनुभवता येतो. "आपण पृथ्वीवर का आहोत?" आणि "जीवनाचा उद्देश काय आहे?" यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास तुम्हाला समाधान वाटू शकते. अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या एखाद्या गोष्टीशी जोडले जाणे आवश्यक आहे. जीवनाचा एक मोठा उद्देश आहे हे ओळखणे आणि त्या उद्देशाचा एक भाग असणे तुम्हाला सहभागी आणि गुंतलेले वाटण्यास मदत करू शकते. तुमच्या कामात अर्थ शोधल्याने तुमचा सहभाग आणि उत्पादकता वाढते, तुमच्या नात्यांमध्ये अर्थ शोधल्याने तुम्हाला समाधान आणि तृप्ती मिळते, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात अर्थ शोधल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

तुम्ही जीवन अर्थपूर्ण कसे बनवू शकता :

तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कार्यांना पाठिंबा द्या - प्रत्येकाचे असे काहीतरी कार्य असते ज्यावर त्यांचा विश्वास असतो. या कार्यांसाठी काम करणाऱ्या गटांमध्ये सामील व्हा किंवा संस्थांसोबत स्वयंसेवा करा आणि तुम्हाला तुमच्या जीवनात अधिक अर्थ सापडेल.

तुमच्या श्रद्धेवर लक्ष केंद्रित करा - अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या लोकांची धार्मिक किंवा आध्यात्मिक,वैचारिक अथवा मूल्यांत्मक श्रद्धा मजबूत असते, त्यांना जीवनात अधिक अर्थ सापडतो. जर तुमचा अशा श्रद्धांवर विश्वास असेल, तर दररोज तुमच्या श्रद्धेचे संगोपन करण्यासाठी वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.

दयाळूपणाची कृत्ये करा - इतरांच्या गरजांबद्दल सहानुभूती बाळगणे आणि इतरांना मदत करण्यासाठी प्रयत्न करणे तुम्हाला जीवनात अर्थ शोधण्यात मदत करू शकते. तुमच्या दिवसात दयाळूपणाची काही कृत्ये करण्याचा प्रयत्न करा - मग याचा अर्थ एखाद्या अनोळखी व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत करणे, तुमच्या जोडीदाराला फुलांनी आश्चर्यचकित करणे, एखाद्याला पत्ता सांगणे किंवा फक्त सहकाऱ्याला मदत करणे असो.

प्रामाणिक जीवन जगा - प्रामाणिक असणे म्हणजे खरे आणि वास्तववादी असणे. यामध्ये आत्म-ज्ञान आणि आत्म-जागरूकता असणे आणि तुमच्या सामर्थ्य आणि कमकुवतपणाचा स्वीकार करणे समाविष्ट आहे. तुम्ही कोण आहात आणि तुमची मूल्ये काय आहेत यानुसार जीवन जगल्याने तुम्हाला अधिक प्रामाणक राहण्यास मदत होते.

 V कर्तृत्व

कर्तृत्व ही एक अशी भावना आहे, जी व्यक्तीला आपल्या ध्येयांच्या दिशेने कृती केल्यानंतर आणि ती साध्य करण्यात यशस्वी झाल्यावर अनुभवता येते. ध्येये असल्यामुळे आपल्याला एक दिशा मिळते आणि त्या दिशेने काम केल्याने आपल्याला प्रेरित, उत्साही आणि आनंदी वाटण्यास मदत होते. ध्येये महत्त्वाची असतात, ती तुम्हाला स्वतःला आव्हान देण्यास आणि एक व्यक्ती म्हणून वाढण्यास व प्रगती करण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही एखादे ध्येय साध्य करता, तेव्हा तुम्हाला कर्तृत्ववान आणि उत्पादक असल्याची भावना येते. यामुळे तुम्हाला जीवनाचा उद्देशाची जाणीव होते, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला अधिक समाधान वाटते.

जीवनात कर्तृत्व निर्माण करण्यासाठी टिप्स :

स्मार्ट ध्येये निश्चित करा - स्वतःसाठी ध्येये निश्चित करणे आणि ती साध्य करणे तुम्हाला कर्तृत्वाची भावना अनुभवण्यास मदत करू शकते. स्वतःसाठी स्मार्ट (SMART) ध्येये निश्चित करा;याचा अर्थ विशिष्ट, मोजता येण्याजोगी, साध्य करण्यायोग्य, वास्तववादी आणि वेळेनुसार मर्यादित ध्येये असा आहे. तुमच्या जीवनातील विविध पैलूंचा विचार करा - तुमचे काम, तुमचे कुटुंब, तुमची आर्थिक स्थिती आणि तुमचा वैयक्तिक आणि सामाजिक विकास आणि या प्रत्येकासाठी ध्येये निश्चित करा.

नवीन गोष्टी शिका - तुमचे मन नवीन कल्पनांसाठी खुले ठेवणे आणि नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा सक्रियपणे प्रयत्न करणे तुम्हाला अधिक कर्तृत्ववान वाटण्यास मदत करू शकते. तुमच्या दिवसातील किंवा आठवड्यातील काही वेळ नवीन किंवा वेगळे काहीतरी करण्यासाठी घालवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ऑनलाइन कोर्स सुरू करू शकता, एखादे वाद्य वाजवायला शिकू शकता, किंवा एखादी नवीन पाककृती बनवण्याचा प्रयत्न करू शकता.

तुमच्या विजयांचा उत्सव साजरा करा - जेव्हा तुम्ही तुमची ध्येये पूर्ण करण्यात यशस्वी होता, तेव्हा तुमच्या यशाचे कौतुक करा आणि त्या क्षणाचा आनंद घ्या. स्वतःला बक्षीस देऊन किंवा स्वतःसाठी काहीतरी छान करून यशाचा उत्सव साजरा करा. केवळ परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुम्ही मार्गातील प्रगतीसाठी स्वतःला बक्षीस देण्यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे.

अपयशी झाल्यावर चिकाटी ठेवा - जर तुम्ही अयशस्वी झालात, तर निराश होऊ नका. हार मानणे टाळा आणि त्याऐवजी, पुन्हा प्रयत्न करा. अपयशाकडे शिकण्याची, वाढण्याची आणि सुधारण्याची संधी म्हणून पहा. या अनुभवांतून मिळालेल्या प्रतिसादाचा वापर करा आणि अधिक चांगले करण्यावर लक्ष केंद्रित करा - जर तुम्ही शेवटी यश मिळवले, तर तुम्हाला आणखी कर्तृत्ववान वाटेल. निदान एवढे तरी लक्षात ठेवा की तुम्ही या प्रवासात खूप काही शिकला आहात.

हे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही PERMA मॉडेलचा तुमच्या फायद्यासाठी वापर करू शकता आणि स्वतःसाठी अधिक आनंदी जीवन निर्माण करू शकता.

 

                             अगदी पूर्वापार काळापासून अनेक तत्वज्ञानी आणि संतांना सापडलेले आनंदाचे रहस्य आज आपण धावपळीच्या काळात विसरत चाललो आहोत आणि क्षणभंगुर आनंदात रममाण होतो आहे.                                                                        

आनंदाचे अर्थ उलगडण्याचा प्रयत्न अनेक तत्वज्ञानी व्यक्तींनी केलाय आणि आपल्या संशोधनानुसार आनंदाचे अर्थ ही सांगितले आहेत. सॉक्रेटिस म्हणतात, "आनंदाचे रहस्य हे तुम्ही किती मोठ्या गोष्टी शोधात आहेत ह्यात नाही तर क्षुल्लक आणि साध्या गोष्टींमध्ये तुम्ही किती समाधानी आहेत ह्यात दडलेय!"

प्लुटोच्या म्हणण्यानुसार ; "जी व्यक्ती आनंदासाठी फक्त स्वतःवर अवलंबून आहे, इतर कोणत्या दुसऱ्या व्यक्तीवर नाही त्याने आनंदाचे आयुष्य जगण्याची सर्वोत्तम पद्धत स्वीकारली आहे!" अरिस्टोटल च्या तत्वज्ञानानुसार "आनंद आपल्यावर अवलंबून असतो "

ह्या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने हेच सांगितले आहे कि " तूच तुझ्या आनंदी आयुष्याचा शिल्पकार !"

 

रोहिणी फुलपगार

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि लाईफ कोच

 

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)