मातृत्वाचा प्रकाश आणि मनातील अंधार
माधवीला दुसऱ्यांदा मुलगा झाला, आधीची लेक
4 वर्षाची होती. सगळ्या घरादाराला आनंदात न्हाहून टाकले. तिला जरी ती दुसऱ्यांदा आई झाली तरी अनेक सूचना, सल्ले, जबाबदाऱ्यांची
आठवण हे सगळे परत सुरु झाले. दिवसभर गडबडीत जायचा, रात्री तिची झोप पूर्ण व्हायची नाही, बाळ झोपल्यावर ती बाळाकडे पाहत राहायची, हसायची आणि अचानक तिच्या डोळ्यात पाणी यायचे, तिला रडू यायचे! तिला कळत नव्हते कि तिला आनंद झालाय कि नाही! सगळ्या कसरती करताना तिला हळूहळू जाणवायला लागले कि तिची ऊर्जा संपत चालली आहे. तिची चार वर्षाची मुलगी म्हणाली; आई तू पहिल्यासारखी हसत नाही, तू नेहमी थकलेली का असते? हे वाक्य बाणासारखे मनावर बसले, माधवीला समजले ती स्वतःसाठी आणि मुलांसाठी ही मनाने हजर नाही. संध्याकाळी नवऱ्याशी बोलली कि मी खरंच वाईट आई आहे का? मला का नाही आनंद घेता येत? मी सगळ्यांना का नाही सांभाळू शकत? नवरा शांतपणे म्हणाला, तू सर्वात चांगली आई आहेस, पण तू थकली आहे आणि सगळे कर्तव्य पूर्ण करण्याच्या नादात ह्या थकव्याकडे दुर्लक्ष करतेय. माधवीला घेऊन तो एका समुपदेशकाकडे
गेला आणि तिथून पुढे माधवीच्या लक्षात आले कि आई होणे म्हणजे फक्त बाळाला जन्म देऊन त्याची काळजी घेणे नाही तर स्वतःलाही पुन्हा जन्म देणे आहे.
प्रसूती हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा, आनंदाचा आणि भावनिकदृष्ट्या नवे रूप देणारा क्षण असतो. बाळ जन्माला येते तेव्हा घरात आनंद, उत्साह आणि नवीन जबाबदारीचे स्वागत असते, पण ह्या सगळ्यात आईचे मानसिक बदल दुर्लक्षिले जातात. अनेक स्त्रियांना बाळाच्या जन्मानंतर काही दिवस उदासी, चिडचिड, रडणे, चिंता जाणवत असते ह्यांना पोस्ट पार्टम डिप्रेशन म्हटले जाते; प्रसूतीपच्छात
नैराश्य!
आज आपण पोस्ट पार्टम डिप्रेशन (PPD ) काय असते समजून घेऊयात
बाळाच्या जन्मानंतर साधारणपणे 70% स्त्रियांमध्ये पोस्ट पार्टम डिप्रेशन (PPD ) दिसून येते.
बाळ जन्मल्यानंतर एक दुःखाची, चिंतेची भावना मनात भरून राहते आणि काही दिवस ती टिकते पण जर 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ ती टिकून राहिली
तर तिचे निदान पोस्ट पार्टम
डिप्रेशन (PPD ) केले जाते.
पोस्ट पार्टम डिप्रेशन (PPD ) लक्षणे
खालीलप्रमाणे :
भावनिक आणि मानसिक लक्षणे: उदासीन मन:स्थिती, सतत दुःखी राहणे, सारखा सारखा मूड बदलणे, तीव्र राग आणि चिडचिडेपणा, सतत चिंता करणे, खूप गोष्टींचे दडपण येणे, अगतिक, असहाय आणि कमीपणाची भावना सतत असणे, बाळासोबत बॉण्ड तयार करण्यात अडचण येणे किंवा बाळाबद्दल उदासीनता निर्माण होते. चांगली आई न होण्याची भीती निर्माण होते. कुटुंब आणि मित्रांपासून अंतर राखणे.
वर्तणुकीच्या समस्या
: पूर्वी ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटायचा त्या गोष्टींमध्ये आता रुची वाटत नाही. स्पष्टपणे विचार करण्यात, निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होणे, सतत अस्वस्थ वाटणे. बाळाची काळजी घेण्यास असमर्थता! बाळाकडे दुर्लक्ष करणे किंवा अति काळजी घेणे. कधी कधी बाळाला इजा करण्याची शक्यता निर्माण होणे.
शारीरिक लक्षणे: अत्याधिक थकवा जाणवणे. एनर्जी कमी असणे. अति झोप किंवा निद्रानाश , भुकेच्या चक्रात बदल म्हणजे भूक मंदावणे किंवा अति भावनिक खाणे वाढणे.सतत स्नायू दुखणे,शरीर दुखणे,तीव्र डोकेदुखी, वारंवार पॅनिक अटॅक्स येणे. वजनात लक्षणीय वाढ होणे किंवा अतिशय वजन कमी होणे.
पोस्ट पार्टम डिप्रेशन (PPD) कोणामध्ये निर्माण होऊ शकते ?
ज्या आई च्या कुटुंबामध्ये डिप्रेशन किंवा बायपोलर डिसऑर्डर चा इतिहास आहे.मागील प्रसूतीमध्ये जर नैराश्याचा अनुभव आला असेल तर ह्या प्रसूतीमध्ये सुद्धा पोस्ट पार्टम डिप्रेशन येऊ शकते. अनेक बाळंतपणे, जुळ्या मुलांचा जन्म, गर्भधारणेतील
समस्या किंवा प्रसूतीमध्ये
गुंतागुंत आढळणे, आर्थिक समस्या, विशेष किंवा अपंग बाळ ज्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे, कुटुंबातील सदस्यांकडून जास्तीच्या अपेक्षा किंवा दडपण, कुटुंबाकडून बाळाच्या संगोपनात सपोर्ट न मिळणे, जोडीदाराकडून
अपेक्षित सपोर्ट न मिळणे, स्तन्यपान करण्यात अडचण येणे हे सगळे घटक पोस्ट पार्टम डिप्रेशन वाढण्यास मदत करतात.
पोस्ट पार्टम डिप्रेशन हे बाळाच्या जन्मानंतर कधी ही सुरु होऊ शकते. अगदी बाळाच्या जन्मानंतर एक आठवड्यापासून
तर कधी एक महिन्यात, चार महिन्यात, सात महिन्यात किंवा नऊ महिन्यानंतर सुरु होऊ शकते. पण साधारणपणे बाळाच्या जन्मानंतर 1-3 आठवड्यात ह्याची लक्षणे सुरु होतात.
पोस्ट पार्टम डिप्रेशन का
निर्माण होते?
पोस्ट पार्टम डिप्रेशन अनेक घटकांनी निर्माण होते:
बाळाच्या जन्मानंतर आईच्या शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या हॉर्मोन्स ची पातळी एकदम खूप खाली येते त्यामुळे सतत मूड बदलणे ह्या गोष्टी निर्माण होतात.
नवजात बाळाची काळजी घेणे हे कष्टाचे काम असते, पुरेशी झोप आणि विश्रांती न मिळणे हे पोस्ट पार्टम डिप्रेशन ला आमंत्रण देते.शरीरामध्ये गर्भावस्थ्येमध्ये आणि बाळंतपणानंतर
काही बदल होतात; आपण आता पूर्वीसारखे दिसत नाही किंवा बेढब दिसत असल्याने स्वतःबद्दल नाराजी आणि कमीपणाची भावना पोस्ट पार्टम डिप्रेशन वाढवू शकते.
बाळाच्या झोपण्याच्या आणि खाण्याच्या वेळापत्रकाशी
स्वतःला जुळवून घेणे, काम,
जॉब आणि सोशल आयुष्यामध्ये बदल होणे, आपले स्वातंत्र्य हरवून बसल्याची भावना निर्माण होणे ह्या गोष्टी आईच्या मनात तणाव निर्माण करतात.
आपण चांगली आणि परफेक्ट आई होऊ शकू कि नाही ह्याबद्दल मनात भीती निर्माण होणे तसेच आजूबाजूंच्या व्यक्तींकडून
बाळाचे सगळे साग्रसंगीत आणि परफेक्ट करण्याच्या अपेक्षांचे दडपण सुद्धा पोस्ट पार्टम डिप्रेशन ला हातभार लावते.
बाळाच्या काळजी आणि संगोपनात घरच्या सदस्यांची मदत न होणे, जोडीदाराचे उदासीन वर्तन किंवा असहकार, तू आई आहे तर तुच केले पाहिजे हा दृष्टीकोन आई मध्ये निराशा निर्माण करतो.
ह्या दरम्यान जोडीदाराबरोबरचे आणि इतर जिवलग व्यक्तींसोबतचे विसंवाद, ताणलेले संबंध, भांडणे आई मध्ये पोस्ट पार्टम डिप्रेशन वाढवू शकतात.
अचानक निर्माण झालेले आर्थिक संकट, व्यावसायिक संकट सुद्धा पोस्ट पार्टम
डिप्रेशन ला हातभार लावते.
पोस्ट पार्टम
डिप्रेशन वर उपचार कसे करायचे?
पोस्ट पार्टम वर उपचार करताना मेडिसिन आणि सायकोथेरपी ह्या दोन्हीचा उपयोग केला जातो.
मेडिसिन मध्ये अँटीडिप्रेशन, अँटीअँक्सिएटी औषधे ह्यांचा समावेश होतो.
सायकोथेरपी मध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट, कॉपिंग स्किल्स, ऍडजस्टमेन्ट स्किल्स, नकारात्मक भावना आणि विचारांचे विस्थापन ह्या गोष्टी चा समावेश होतो.
ह्या सगळ्यांसोबत पोषक आहार, पुरेशी विश्रांती आणि झोप, घरातल्या सदस्यांचे सहकार्य, हलका व्यायाम, जोडीदाराचा सक्रिय सहभाग ह्या सगळ्यांच्या मदतीने आपण नुकत्याच झालेल्या आईला पोस्ट पार्टम डिप्रेशन मधून बाहेर काढू शकतो.
मातृत्व सुंदर आहे,
पण ते सोपे नाही; बाळ जन्माला येते तेव्हा एक नवीन आई ही जन्माला येते आणि त्या दोघांनाही काळजीची, निगुतीची गरज असते.
रोहिणी फुलपगार

Yes, it's a good information
ReplyDeleteThank you