आपण सकाळी काही कामासाठी बाहेर निघालोय, बस मध्ये निवांत बसलोय, पूर्ण खात्री आहे की ही बस आपल्या स्टॉप वर आपल्याला नेवून ठेवणार! बाकी प्रवास थोडा धक्के खात
, थोडे आरामात बसत होईल पण आपल्या ठरलेल्या ठिकाणी आपण नक्कीच उतरणार ! आणि अचानकपणे बस बंद पडते. सगळ्यांसोबत आपल्याला खाली उतरावे लागते! काय काय मनोव्यापार आणि भावनिक आंदोलने चालू असतात त्यावेळी हे ज्याने हा अनुभव घेतलाय त्याला चांगलेच माहीत असते!
आपल्या आयुष्यातील एक दिवसातील हा एक छोटुसा बदल पण आपल्याला डिस्टर्ब करून जातो! जेव्हा आयुष्य मोठे बदल घडवून आणते त्यावेळी कित्येकजण वादळात सापडलेल्या पानासारखे सैरभर होऊन जातात.
प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यात मोठे बदल होत असतात. आयुष्य कोणाला सोडत नाही. अगदी व्यक्ती लहान असल्यापासून! घरातील सुरक्षित वातावरण सोडून नवीन ज्युनिअर के.जी मध्ये जाणे हा त्या पिटुकल्यासाठी मोठा बदलच असतो! शाळा बदलणे, नवीन लोकांच्या संपर्कात येणे, जुने मित्र सुटणे, घर सोडणे, हॉस्टेल ला राहणे, नवीन नोकरी, प्रमोशन , बदली, नोकरी सुटणे, जॉब बदलणे,लग्न, अपत्य, नवीन बिझनेस सुरु करणे, घटस्फोट, जवळचे माणसांचा मृत्यू, जोडीदाराचा मृत्यू, मुलांनी दुसऱ्या शहरात राहणे ...जीवन कधीच एका सरळ रेषेत जात नाही; वेळोवेळी बदलांचे उतार चढाव व्यक्ती अनुभवत असते. त्या प्रत्येकवेळी स्वतःला सांभाळून बदलांना कसे सामोरे जायचे ह्याचा गोंधळ उडतो. आज आपण हे बदल, मागची मानसिकता आणि सामोरे जाण्याची कला समजावून घेऊयात!
व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बदल होत असतात ;सकारात्मक बदल म्हणजे ,पाहिज त्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळणे; नवीन नोकरी; लग्न; नवीन व्यायसायाची सुरुवात, नवीन घर,प्रमोशन! पण हे बदल जरी सकारत्मक असतील तरी ते व्यक्तीमध्ये स्ट्रेस निर्माण करतात, ते आपल्यात नवीन भूमिका आणि नवीन जबाबदाऱ्याबदल मनावर ताण निर्माण करतात! दुसऱ्या बाजूला नकारत्मक बदल जसे नोकरी सुटणे, शारीरिक आजार वा प्रकृतीच्या समस्या निर्माण होणे, घरात जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणे, घटस्फोट ची प्रक्रिया सुरु असणे, बिझनेस मध्ये आर्थिक नुकसान हे सारे नकारत्मक बदल व्यक्तीमध्ये सततचा तणाव निर्माण करतात. हा तणाव व्यवस्थित हाताळला गेला नाही तर नैराश्याची लक्षणे किंवा तीव्र नैराश्य निर्माण होते! आयुष्यातील बदल वयाच्या विशिष्ट टप्प्यावर घडतात असे नाही; व्यक्तीच्या 20, 35, 45 अगदी 60 वर्षानंतर हि घडतात! वयाचा प्रत्येक टप्पा हा एक बदल घडवून आणतो त्याच वेळी त्यासोबत तणावदायक घटक आणि स्वतःला अधिक विकसित करण्याच्या संधी सुद्धा आणतो!
जेव्हा आयुष्य
मोठ्या नकारात्मक बदलांमधून जात असते त्यावेळी आपण खालील भावनिक टप्प्यांमधून जात असतो :
डीनाएल : सुरुवातीला आपण मानसिकरीत्या ह्या बदलांना नाकारतो. आपले बदलांपुर्वीचे आयुष्य आणि त्याचा आलेला कंफोर्टझोन आपल्याला हे बदल स्वीकारू देत नाहीत .
राग : जेव्हा आपल्याला हे बदल अपरिहार्य आहे हे समजते तेव्हा मनात प्रचंड राग आणि चिडचिड सुरु होते;त्यामुळे निराशा किंवा चिंता उत्पन्न होतात.
बार्गेनिंग: त्यानंतर चा टप्पा हा बार्गेनिंग चा असतो; काय काय केले म्हणजे हा बदल टाळता येईल ह्यावर विचार सुरु होतात. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या
प्रयत्नात स्वतःशी आणि इतरांशी वाटाघाटी सुरु होतात.
नैराश्य : बदलांच्या परिणामांशी जुळवून घेताना हा टप्पा दुःख आणि दडपणाने भरलेला वाटू शकतो. ह्या काळात दैनंदिन कामांतील उत्साह किंवा आनंद हिरावून जातो!
स्वीकृती: कालांतराने आपण बदल स्वीकारून,अधिक स्पष्टतेने आणि ताकदीने पुढे जाऊ लागतो.
जेव्हा व्यक्ती पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये दीर्घकाळ थांबते तेव्हा त्याचे निदान ऍडजस्टमेन्ट डिसऑर्डर असे केले जाते.
जेव्हा व्यक्ती पाचव्या टप्प्यांपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा पोस्ट ट्रोमॅटिक डिसऑर्डर असे निदान होते.
जेव्हा आयुष्य
बदलांना आपल्या
समोर आणते तेव्हा आपण एवढे सैरभैर का होतो ?
ह्याचे कारण म्हणजे आपण सगळे अनिच्छिततेला तयार नसतो! पुढे काय वाढून ठेवले आहे आणि त्याला मी तोंड देऊ शकेल कि नाही, मी तेवढा सक्षम आहे कि नाही, मी हे सहन करू शकेल कि नाही !हे "जर आणि तर" आपल्याला बदलांमध्ये स्थिर राहू देत नाहीत. त्यामुळे भीती, दडपण, चिंता, नैराश्य, उत्सुकता ह्या मिश्र भावनांनी व्यक्ती गुरफटून जाते.
आयुष्यातील बदलांना सामोरे कसे जायचे ?
जेव्हा ह्या बदलांना सामोरे जाऊन पुढील प्रवासासाठी सज्ज होऊ तेव्हा आपल्या सोबत पुढील गोष्टी ठेवायच्या :
1बदल होत असताना
होणाऱ्या आपल्या
मानसिक प्रक्रिया समजून घेणे: कोणताही बदल अगदी सकारात्मक बदल हि आपल्यात तणाव निर्माण करतो कारण बदलांमधील अनिच्छता मेंदूतील भीतीच्या प्रक्रियेला सक्रिय करते. त्यामुळे आपल्याला आहे त्या स्थितीमध्ये कंफ़र्टबल वाटते. हि भीतीची प्रक्रिया समजून घेऊन तिचा स्वीकार केल्याने आणि लवचिक धोरण स्वीकारल्याने आपण ह्यातून स्वतःचा विकास करू शकतो.
2 नवीन विचारप्रक्रिया तयार करा : बदलांना एक भीती अथवा संकट समजण्यापेक्षा स्वतःच्या क्षमता वाढवण्याची आणि विकसित होण्याची संधी म्हणून बघा.
ज्यावेळी आपला माईंड सेट स्वीकारण्याचा असतो तेव्हा स्ट्रेस कमी होऊन आपण भावनिक मजबूत होतो.
3 माइंडफुलनेस आणि स्वतःच्या प्रति दयाभाव
निर्माण करा: माइंडफुलनेस म्हणजे आपल्या विचार आणि भावना ह्याबाबत सतत जागरूक असणे आणि त्यांना आपल्यावर हावी न होऊ देणे. ह्या सजकतेचा सरावाने आपण बदलांमुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावना आणि विचार ओळखता आले कि आपण नेमके कश्याला घाबरत आहे हे लक्षात येते. ती भीती किती तथ्यहीन आहे हे लक्षात आल्यावर त्यावर कंट्रोल करता येतो.
स्वतःसोबत अवास्तव अपेक्षा आणि त्यांची पूर्तता झालीच पाहिजे हि अपेक्षा सुद्धा बदलांना स्वीकारू देत नाही.त्यामुळे स्वतःप्रती दयाळूभाव निर्माण करणे. "हा बदल कठीण आहे,
मी घाबरतोय, पण हे घाबरणे नॉर्मल आहे!
जरी मला अस्वथ वाटते तरी मी ही परिस्थिती मी सक्षमतेने हाताळू शकतो!"
4 मोठा बदल स्वीकारताना छोटे गोल्स
ठरवणे: जेव्हा एखादा बदल दडपण वाटत असेल तर त्या बदलाविषयी छोटे गोल्स ठरवा. जेव्हा आपण पूर्ण चित्र पाहतो तेव्हा ते खूप मोठे वाटते पण जेव्हा तुकड्यांमध्ये
पाहतो तेव्हा ते चित्र मोठे न वाटता नियंत्रणात वाटते.
5 अनिच्छतता संकट न मानता एक संधी मानणे: बदलांना एक संधी मानली तर बदल स्वीकारणे सोपे जाते.
6 बदलांमुळे होणाऱ्या स्ट्रेस चे मॅनेजमेंट करणे: बदलाना सामोरे जाताना निर्माण होणारा स्ट्रेस कोणाशी तरी शेअर करणे, गाईडन्स घेणे किंवा प्रोफेशनल मदत घेणे.
7 भूतकाळातील बदलांवर चिंतन
करणे: आपल्या आयुष्यातील भूतकाळातील बदलांना आपण कसे सामोरे गेलो किंवा ती परिस्थिती कशी हाताळली ह्याबद्दल चिंतन केल्यास आपल्या जमेच्या बाजू आपल्याला दिसतात. आपल्या झालेल्या चुका , त्यातून शिकलेले धडे,
आपली कणखर बाजू हे परत एकदा उजळणी झाल्यामुळे ह्या बदलांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढतो.
आयुष्य हे छोट्या मोठ्या बदलांनीच बनलेले आहे; प्रत्येक नवीन दिवस एक बदल घेऊन येतो, तो कधी शारीरिक, मानसिक तर परिस्थितीजन्य असतो. हे बदल आपले आयुष्य समृद्ध करतात. त्यामुळे ह्या बदलांना बाहू पसरून आलिंगन दिले कि आयुष्य भरभरून जगात येते.
बदलांच्या वादळातून जाताना, माणूस थोडा तुटतो, थोडा घडतो ...
आणि शेवटी नव्या पहाटेसारखा स्वतःलाच नव्याने भेटतो..
रोहिणी फुलपगार
9604968842
Psychologist
and Life Coach
