आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक वेळी तरी अशी आलेली असते की आयुष्याचा काही काळ पच्छातापाने झाकोळला जातो. कोणाला तरी बोललेले कटू शब्द, दिलेला नकार, नाकारलेल्या संधी, उशिरा घेतलेले निर्णय, कळत नकळत केलेले अपमान, जाणून बुजून वा अजाणतेपणी केलेले दुर्लक्ष, वेळेवर नाकारलेली मदत, आवाक्यात असताना सुद्धा नाकारलेले सहकार्य!
हे त्यावेळच्या निर्णय आणि कृती च्या वेळी जरी लक्षात नाही आले तरी काही काळाने जेव्हा व्यक्ती त्या गोष्टी बघते, त्यातील तथ्य किंवा परिणाम समोर आल्यावर एकच विचार मनात येतो .. “अरेरे मी असे वागले नसते तर बरे झाले असते” आणि ह्या विचारासोबत एक नकारात्मक समिंश्र भावना मन व्यापून टाकते; ती म्हणजे पच्छाताप
पच्छाताप म्हणजे
अशी नकारात्मक बोधनीक किंवा
भावनिक अवस्था
ज्यामध्ये वाईट परिणामासाठी स्वतःला दोष देणे,जे घडले असेल त्याबद्दल दुःखाची भावना वाटणे
किंवा आपण भूतकाळात घेतलेले निर्णय
रद्द करू शकत असतो तर ही खेदजनक इच्छा
सतत मनात घोळवत राहणे.
हा पच्छाताप दोन प्रकारचा असतो : कृतीबद्दलचा पच्छाताप म्हणजे मी जे केले ते चुकीचे होते
निर्णय न घेतल्याबद्दलचा पच्छाताप म्हणजे जे करायला पाहिजे होते ते केलेच नाही
पच्छातापाचे मानसशात्रीय पैलू :
- भावनिक आणि बोधनीक पैलू : पच्छातापामध्ये नैराश्य, खेद, अपेक्षाभंग सारख्या भावना आणि वैचारिक प्रक्रिया जसे माझ्याकडून चूक झाली, परिस्थिती वेगळी असायला पाहिजे होती, कदाचित आता वेगळे परिणाम असते, मी चुका दुरुस्त करू शकलो असतो तर.. ह्यांचा समावेश असतो.
- विरोधाभासी अपेक्षा : ह्यामध्ये भूतकाळातील घटनांची मानसिकरीत्या सतत उजळणी करत राहणे आणि पूर्णपणे वेगळ्या आणि चांगल्या परिणामस्वरूप परिस्थितीची कल्पना करणे असते. "मी जर हे नसते केले तर ते घडले असते"
- वाईट परिणामांबद्दल घृणा : अधिक अनुकूल परिणाम घडण्यासाठी भूतकाळातील घटना बदलता आली तर ह्या अपेक्षांवर ही नकारात्मक भावना आधारित आहे. भूतकाळातील घटना बदलता येत नाही हि अगतिकता जे वाईट परिणाम झालेत त्यांच्याबद्दलची घृणा निर्माण होंऊन व्यक्त होत राहते.
- स्वतःला दोष देणे : पच्छातापामध्ये अनेकदा स्वतःला जबाबदार धरून दूषणे दिली जातात.
पच्छातापाचे होणारे
परिणाम : पच्छातापाचे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.
पच्छातापाच्या आगीत होरपळत राहिल्याने नैराश्य, चिंताविकार, अतिविचार, स्वतःबद्दलची
नकारात्मक इमेज, अगतिकता , स्व
-सन्मान कमी वाटणे हे मानसिक परिणाम दिसतात तर शारीरिक परिणामांमध्ये सतत चा ताण,
स्नायूंमध्ये ताठरता, डोकेदुखी, खांदे दुखी , शारीरिक थकवा, एनर्जी कमी जाणवणे, झोप डिस्टर्ब होणे भुकेचे आणि पाचनसंस्थेचे चक्र बिघडणे हे दीर्घ काळ पच्छातापामध्ये राहिल्याने निर्माण होते.
पच्छाताप हा दोन्ही पद्धतीने म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक पद्धतीने व्यक्त होतो. पच्छातापाच्या भावना जेव्हा सकारात्मक पद्धतीने व्यक्ती हाताळतो तेव्हा पच्छाताप हे ओझे ना जाणवता बदलाची सुरुवात ठरते. परीक्षेच्या वेळी केलेली टंगळमंगळ जेव्हा नापासाच्या किंवा कमी मार्कांच्या रूपात पुढे येते तेव्हा विद्यार्थी पच्छातापाने अजून जोरदार अभ्यासाला लागतो.
आपले बोलणे एखाद्याच्या जिव्हारी लागते हे कळल्यावर पच्छातापामुळे
व्यक्ती बोलताना कोणाचे मन दुखावले जाणार नाही ह्याची काळजी घेते.
एखाद्याच्या आजारपणात आपण हजर नव्हतो हा पच्छाताप व्यक्तीला इतर लोकांना मदत करायला भाग पडतो.
पच्छाताप हा व्यक्तीला संपूर्णपणे बदलून एक नवीन व्यक्ती बनवतो ह्याची अनेक उदाहरणे आहेत. सम्राट अशोक कलिंग युद्धांतील पच्छातापाने शांतिदूत बनला आणि जगभरात बुद्धांच्या शांती, करुणेच्या संदेशाचे प्रसारण केले.
पच्छातापाने वाल्यासारखा दरोडेखोर वाल्मिकी बनून रामायणाची रचना केली.
कितीतरी गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्ती पच्छाताप मुळे गुन्हेगारी मार्ग सोडून चांगल्या मार्गाला लागल्याचे संशोधने आहेत.
हे असे बदल व्यक्तीमध्ये का घडून येतात :
पच्छाताप हा फक्त व्यक्तीला निराशा आणि आत्मदोषाच्या अंधारात ढकलत नाही तर त्याचे काही सकारात्मक बाजू आहेत कि त्यामुळे व्यक्तीला प्रकाशाची वाट सापडते. पच्छाताप हा एक प्रकारचा मानसिक अलार्म आहे कि जो भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती टाळतो आणि भविष्यातील चांगले निर्णय घेण्याची शिकवण देतो.
आपण ज्या गोष्टींबद्दल पच्छाताप करत आहोत त्या गोष्टी आपल्यासाठी किती महत्वाच्या आहेत हे दाखवून त्या गोष्टींचे, माणसांचे महत्व अधोरेखित करतो. आपल्या मूल्यांची जाणीव करून देतो.
स्वतःच्या चुका समजल्यावर आपल्याला इतरांबद्दल सहानुभूती वाढते, आपण परिस्थितीला,स्वतःला आणि इतरांना दोष देण्यापेक्षा
समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
कधी कधी पच्छाताप इतका प्रबळ असतो कि तो जीवनात मोठे बदल घडवून आणण्याची शक्ती देतो. शिक्षण, करिअर, नातेसंबंध, आरोग्य ह्यात सुधारणा करण्यास प्रवृत्त करतो.
पच्छाताप जर एवढे सकारात्मक बदल घडवतो तर मग पच्छाताप समस्या का बनतो?
पच्छातापाची सुरुवात आणि त्याचे टिकून राहणे हे टप्प्याटप्प्याने होते, ज्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे नकार! व्यक्तीने केलेल्या अयोग्य गोष्टी किंवा चुकीच्या निर्णयाला आणि त्याच्या परिणामांना स्वतःच नाकारणे. दुसरा टप्पा म्हणजे परकेपणाची भावना! ह्यात व्यक्ती विश्वास ठेवू शकत नाही कि त्यांनी ही अशी परिस्थिती किंवा परिणाम घडवून आणली आहे;
स्वतः बद्दल परकेपणाची आणि गोंधळाची भावना. तिसरा टप्पा म्हणजे जी काही चूक झाली आहे किंवा चुकीचे निर्णय घेतले आहेत त्याबद्दल स्वतःला शिक्षा करण्याची इच्छा! चौथा टप्पा म्हणजे चिंतन! जे घडले त्यावर चिंतन करणे,त्याबद्दलचे विचार आत्म-तिरस्काराने सतत मनात घोळवणे.
जेव्हा तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा ह्यांची सारखी पुनरावृत्ती होते तेव्हा पच्छाताप व्यक्तीसाठी समस्या बनते. जर व्यक्तीच्या निर्णयामुळे वा वर्तनामुळे निर्माण झालेले नकारात्मक परिणाम बदलण्याची शक्यता अगदीच कमी असते त्यावेळी तिसरा आणि चौथा टप्पा ह्यांची सतत पुनरावृत्ती होऊन व्यक्ती डिप्रेशन, तीव्र दुःख आणि चिंता ह्यात गुरफटून जाते.
पच्छातापाच्या नकारात्मक पैलूंना कसे सामोरे जायचे?
- पच्छातापाला एक भावना म्हणून स्वीकारणे : आपल्या इतर भावनांप्रमाणे
पच्छाताप हि एक भावना आहे जी आपल्या अस्तित्वाला टिकून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आयुष्यात चुका सुधारून पुढे जाण्यात मदतगार ठरणाऱ्या पच्छातापामधील
पैलूंना स्वीकारणे. आपल्या मेंदूचा आपल्या निवडींवर पुन्हा एकदा विचार करण्यास सांगण्याचा हा मार्ग आहे!
- सोडून देणे : भूतकाळातील काही चुका अथवा निर्णय जे नकारात्मक परिणामांना कारणीभूत आहेत त्यांबद्दल जास्त चिंतन न करता स्वतःला क्षमा करण्याचे मार्ग शोधणे. आपण जर स्वतःला दोष देत राहिलो तर हे दोषारोपण नैराश्यात बदलू शकते. जे घटक बदलण्याचे तुम्हाला शक्य आहे ते आवश्य बदल करा पण जे बदलू शकत नाही त्यापासून स्वतःला मानसिकरीत्या दूर करा.
- स्वतःला पूर्णपणे दोष न देणे: भूतकाळातील ज्या गोष्टींबद्दल आपल्याला पच्छाताप होतोय त्या गोष्टीला कारणीभूत अनेक घटक असतील जसे आपले अज्ञान, कमी समज, त्यावेळेचे वातावरण, निर्णयक्षमता
कमी असणे, डोक्यात वेगळ्या कल्पना आणि अपेक्षा असणे. त्यामुळे व्यक्ती म्हणून आपण इम्परफेक्ट असल्याचे मान्य करून पुढे सुधारणा करण्यास वाव असल्याचे समजून घेणे.
- परिस्थिती अधिक सकारात्मकतेने पुनर्रचना करणे: जीवनाचा एक प्रवास म्हणून विचार करा. ह्या प्रवासात प्रत्येकजण चुका करतो. ह्या चुका म्हणजे स्वतःबद्दल महत्वाचे धडे समजण्याची संधी आहे असे मानून भविष्यात स्वतःची माणूस म्हणून अधिक चांगली प्रगती कशी करायची हे ठरवण्यासाठी भूतकाळातील पच्छातापाचा वापर करा.
पच्छातापाची भावना खोल आणि वेदनादायी असली तरी ती माणसाला अधिक सजग, परिपक्व आणि संवेदनशील बनवते. आपण केलेल्या चुकांचा स्वीकार करून स्वतःला माफ करून वर्तमानावर लक्ष केंद्रित केले तर हा भावनिक प्रवास उपचारासारखा ठरतो.
कालच्या ओल्या सावल्या,
आजच्या प्रकाशात विरघळू दे..
पडलेल्या पावलांना
नव्या वाटेचे धैर्य लाभू दे .
पच्छातापाच्या धुक्यात
विचारांची वाट चुकते..
त्या वाटेवर आशेचा
नवा अंकुर उगवू दे..
काल नव्हतो जितका मजबूत
आज तेवढा सशक्त उभा राहू दे
रोहिणी फुलपगार
Psychologist
and life coach
