पॅनिक डिसऑर्डर बद्दल तुम्हाला काय माहित आहे?

TheMindTalks
0

 

फार फार वर्षांपूर्वी जंगलामध्ये एक देव राहायचा! ग्रीक मान्यतेनुसार तो मेंढपाळ आणि गुराख्याच्या देव होता! त्याचे अर्धे शरीर माणसाचे आणि अर्धे शरीर बोकडाचे होते. त्याचे पाय, दाढी, शिंगे बोकडासारखी होती तर चेहरा माणसांसारखा होता!

आपल्याकडे जसे देवांना नाव असते तसे त्या देवाला ही नाव होते. सगळे त्याला पॅन म्हणून हाक मारायचे.

तो निसर्ग देवता होता, जंगलात राहायचा, स्वभावाने सामान्य होता, मेंढ्यांच्या आणि गाई गुरांच्या कळपांचे रक्षण करायचा! पण त्याचे वैशिष्ट्ये होते की तो लहरी होता, कधीही अचानक झोपेतून उठायचा आणि त्याची बासरी वाजवायाचा!  त्याचा बासरीचा आवाज हा कर्कश्य आणि जंगली होता! कधी कधी तो जोरात आरोळी ठोकायचा जी जंगलामध्ये दुमदुमून जायची !

अश्यावेळी जर कोणी व्यक्ती किंवा माणसांचा समूह त्या जंगलातून जात असेल तर ते त्या आवाजाने प्रचंड घाबरायचे, चिंता वाटून दडपण यायचे! त्यांना हातापायाला कॅम्प सुटायचा, हृदय जणू 180 च्या स्पीड ने पळतेय असे वाटायचे, दरदरून घाम फुटायचा, आणि छाती कोणी आवळून धरली आहे असे वाटायचे. श्वास घ्यायला त्रास व्हायचा! एकदम तीव्र भीती त्या काळात स्पर्शून जायची! लोकं अक्षरशः पळत पळत ते जंगल पार करायची! तसे तर पॅन त्यांना काहीही शारीरिक इजा करत नसे किंवा नुकसान हि करत नसे पण फक्त त्याच्या अस्तित्वाच्या कल्पनेने त्यांना तीव्र भीतीचा अनुभव यायचा!  घरी आल्यावर सुद्धा काही जणांना त्या आवाजाची किंवा त्याच्या बासरीवादनाची आठवण झाली तरी तीच जंगलात अनुभवलेली भीती जाणवायची !

पॅन ह्या देवामुळे लोकांना हा त्रास होतोय म्हणून ह्या लक्षणांना पॅनिक डिसऑर्डर असे नाव दिले गेले.

                                        तसे म्हटलं तर आता ना तो पॅन देवता आहे ना जंगल आहे पण तरीही आज खूप लोकं पॅनिक डिसऑर्डर च्या त्रासात आहे.  करोना च्या काळापासून तर ह्याचे प्रमाण खूप वाढले आहे!

पॅनिक डिसऑर्डर हा खरंतर चिंता विकाराचा एक प्रकार आहे! चिंताविकारात आपण सतत भविष्यामध्ये नकारात्मक काहीतरी घडेल आणि मी त्या नकारात्मक गोष्टीना तोंड देण्यास असमर्थ आहे अशी साधारणपणे विचार प्रक्रिया चालू असते ! आता अशी जर विचार प्रक्रिया नेहमीच चालू असेल तर व्यक्तीला खरेखुरे इजा करणारे घटक आणि त्याच्या परिणामस्वरूप वाटणारी भीती आणि काल्पनिक घटक त्यामुळे जाणवणारी भीती ह्यातील फरक लक्षात आल्याने तो काल्पनिक भीतीच्या सावटात राहतो.

पॅनिक डिसऑर्डर ला कारणीभूत ठरणारे अनेक घटक आहेत जसे कि :

फॅमिलीकडून आलेला वारसा: कुटुंबामध्ये कोणाला चिंताविकार अथवा पॅनिक डिसऑर्डर असेल तर 40 % चान्सेस आहेत कि पुढील पिढीमध्ये ह्याची काही लक्षणे दिसू शकतात!

केमिकल लोच्या: मेंदूमधील काही न्यूरोट्रान्समीटर ह्यांच्यामध्ये गडबड झाली असेल तर पॅनिक डिसऑर्डर ची लक्षणे दिसतात. जसे GABA ह्या न्यूरोट्रान्समीटर ची कमतरता भीती आणि चिंतेला वाढवते. सेरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन ह्यामधील असमतोल मूड आणि स्ट्रेस शी संबंधित लक्षणे तीव्र करतात. मेंदूतील अमाय्ग्डला जे भीतीचे अतिक्रियाशील सेन्टर आहे त्यामध्ये आणि तर्कसंगत विचार करणारे मेंदूतील दुसरे प्रीफ्रनटल कॉर्टेक्स सेन्टर ह्यामधील ताळमेळ विस्कळीत झाला तर तेसुद्धा पॅनिक डिसऑर्डर चे कारण ठरते.

आयुष्यातील मोठे चढउतार : जीवनातील अनेक तणाव दायक घटना, लहानपणातील वाईट अनुभव आणि त्यांच्या स्मृती, मोठे आर्थिक,कौटुंबिक, सामाजिक नुकसान, त्रासदायक आठवणी हे सुद्धा पॅनिक डिसऑर्डर ला चालना देतात.

आपले स्वाभाविक गुण : आपल्या स्वभावाचे पैलू जसे कि अति संवेदनशील असणे, कोणतीही गोष्ट पटकन मनाला लावून त्यावर खूप काळ मंथन करत राहणे, सतत काळजी करण्याचा स्वभाव, खोल चिंतन करत राहणे आणि कोणत्याही गोष्टीचे अति विश्लेषण करणे हे आपल्याला पॅनिक डिसऑर्डर च्या दिशने ढकलत जाते.

 

पॅनिक डिसऑर्डर चे घटक पाहिल्यावर लक्षात येते कि पॅनिक डिसऑर्डर कुठून बाहेरून ऑर्डर करावा लागत नाही, आपणच त्याला निर्माण करतोय मग प्रश्न पडतो कि हा पूर्णपणे बरा होतो का ?

तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे "हो, हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो!"

आहे ना आनंदाची बातमी ! पण...

पुढे पण आहे आणि तो म्हणजे तुम्ही पूर्ण सर्वांगीण ज्याला होलिस्टिक उपचार पद्धत म्हटली जाते ती घेणे आणि मध्येच सोडता ती ठरलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करणे. तुमचे डॉक्टर आणि सायकोथेरपीस्ट ह्यांना पूर्णपणे सहकार्य करणे! हे काही पण तुम्ही पूर्ण केले आणि तुमची पॅनिक डिसऑर्डर ची लक्षणे पूर्णपणे थांबली कि हा पॅनिक डिसऑर्डर बरा झाला असे म्हणू शकतो !

सर्वांगीण उपचार पद्धत बघण्याआधी परत एकदा पॅनिक डिसऑर्डर ची लक्षणे डोळ्यांखालून घालून घेऊ :

पॅनिक डिसऑर्डर मध्ये पॅनिक अटॅक येत असताना लोकांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही लक्षणे जाणवू शकतात आणि ही लक्षणे काही सेकंदांपासून ते सरासरी दहा मिनिटांपर्यंत किंवा अत्यंत क्रिटिकल केसमध्ये तीस मिनिटांपर्यंत टिकू शकतात.

पॅनिक डिसऑर्डरच्या लक्षणांची उदाहरणे म्हणजे:

·         शारीरिक लक्षणे

·         धडधडणे (हृदय नेहमीपेक्षा जास्त वेगाने धडधडत असल्याची जाणीव)

·         छातीत दुखणे

·         गुदमरल्यासारखे वाटणे

·         श्वास घेण्यास त्रास होणे

·         घाम येणे किंवा थंडी वाजून येणे

·         शारीरिक थकवा जाणवणे

·         चक्कर येणे

·         हात मुंग्या येणे किंवा सुन्न होणे

·         मळमळ ,पोटदुखी किंवा पोट बिघडणे.

·         बेशुद्ध पडणे

·         मानसिक लक्षणे

·         सेल्फ कंट्रोल गमावण्याची भीती आणि भावना

·         काहीतरी भयंकर घडणार आहे अशी भीती

·         आधी ज्या ठिकाणी पॅनिक अटॅक आला होता अशी काही ठिकाणी टाळण्याची भीती

·         पुन्हा पॅनिक अटॅक येण्याची भीती

·         पुन्हा पॅनिक अटॅक आला तर मदत मिळण्याची भीती

·         पॅनिक अटॅकदरम्यान मृत्यूची भीती

 

पॅनिक डिसऑर्डर मध्ये उपयोगी असलेले प्रभावी उपचार आणि दृष्टिकोन:

कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (CBT):हे प्रायमरी अत्यंत प्रभावी उपचार (७०-९०% यश दर) पद्धत आहे जे रुग्णांना पॅनिकच्या आसपासच्या विचारांच्या पद्धती आणि वर्तनांमध्ये सुधारणा करण्यास मदत करते.

औषधोपचार: लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी निवडक सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (SSRIs) सामान्यतः सायकिऍट्रिस्ट कडून सुरु केले जातात.

जीवनशैलीतील बदल: नियमित व्यायाम, कॅफिन कमी करणे, धूम्रपान आणि अल्कोहोल कमी करणे , सामाजिक सहभाग वाढवणे आणि ताण व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब केल्याने पॅनिक अटॅक चा धोका कमी होऊ शकतो.

स्वीकृती पद्धत: पॅनिक अटॅक चा प्रतिकार न करता त्या लक्षणांना येऊ दिल्याने आणि त्याना सजगतेने हाताळ्याने शरीराला, नैसर्गिकरित्या भीती कमी करण्यास आणि पॅनिक अटॅक चे चक्र थांबवण्यास मदत होऊ शकते.

पॅनिक डिसऑर्डर बाबत एवढ्या गोष्टी जरी तुमच्या लक्षात आल्या तरी नामशेष झालेल्या पॅन देवाच्या नावाचे अस्तित्व आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकू आणि पॅनिक डिसऑर्डर सोबतची लढाई जिंकून आपले आयुष्य भीतिमुक्त आनंदाने जगूया!

 

रोहिणी फुलपगार

9604968842

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)