माईंडफुलनेस आपल्यासाठी!

TheMindTalks
0

 

                                             समोर एक 30-32 वर्षाचा मुलगा बसला होता! करिअर छान, कुटुंब मस्त, चहातल्या पेल्यातील वादळासारखे छोटे मोठे प्रॉब्लेम जे सगळ्यांच्या आयुष्यात असतात तसे होते त्याची काळजी करण्याचे कारण नव्हते ,सगळे व्यवस्थित! पण ...

हा पण होता म्हणून तो माझ्याकडे आला होता,"मॅडम सतत मन धावत राहते, विचारात गुंतून असते, कधी कधी मी मीटिंग मध्ये असतो पण स्वतःच्या विचारात नकळत हरवतो कि समोर काय चालू आहे हे काही काळ ध्यानात येत नाही. बायको काय सांगते ह्याकडे पण कधी कधी लक्ष नसते दुसऱ्याच विचारात गुंतून गेलेलो असतो! "

दुसरी केस माझ्या एका मित्राच्या सासूबाईंची होती. 60/ 62 वर्षाच्या बाई होत्या, सगळे चांगले होते! मुली, जावई , मुलगा, सून नातवंडे अश्या गोतावळ्यात होत्या. प्रकृती छान होती पण गेले 5-6 महिने तंत्र थोडे बिघडले होते! शांत झाल्या होत्या, स्वतःच्या विचारात हरवून जात होत्या! त्यांच्याशी बोलताना जाणवले कि मन भूतकाळात धावतेय. काही झालेल्या चुका, अपमान , टोचून बोलणे , हातातून निसटलेले क्षण आठवत होते! कधी स्वतःसाठी उभे राहिल्याची खंत वाटायची तर कधी पच्छाताप वाटायचा! हे सगळे आतल्याआत चालू होते त्यामुळे बाह्य जगापासून तुटल्यासारखे झाले होते.

ह्या दोन्ही केस मधील व्यक्तींच्या आयुष्यात समस्या कमी होत्या! पण वर्तमान क्षणांशी त्यांचा संपर्क हरवला होता!  मन भूतकाळात पच्छाताप करत होते,भविष्याबद्दल भीती निर्माण करत होते आणि वर्तमान ?

वर्तमान फक्त निसटत होता!

आणि इथे पहिल्यांदा ह्यांनी माईंडफुलनेस हा शब्द ऐकला!

                            सूर्य रोज उगवतो आणि मावळतो, पण आपण त्याला पाहतो का? आकाशाची निळाई कधी शांतपणे ऑब्सर्व्ह करतो का? श्वास सतत सुरु असतो पण आपण त्याची जाणीव ठेवतो का? जीवन चालू असते पण आपण त्यात उपस्थित असतो का?

ह्या कॅनव्हास वर माईंडफुलनेस म्हणजे जीवनाला पहिल्यांदा खऱ्या अर्थाने भेटणे!

आज माईंडफुलनेस आधारित सायकोथेरपी ही जगातील थर्ड वेव्ह थेरपी मानली जाते. माईंडफुलनेस चे मूळ हे बुद्धिझम तत्वज्ञान आणि ध्यानाच्या टेक्निक मध्ये आहे ज्याला 1979 च्या काळात डॉ.जॉन कबाट-झिन ह्यांनी पाश्चिमात्य देशांमध्ये MBSR (Mindfulness-Based Stress Reduction) सायकोथेरपीच्या स्वरूपात लोकप्रिय केले.

 

                      बौद्धतत्वज्ञानामध्ये , माइंडफुलनेस ला सती म्हटले आहे. सती म्हणजे कोणतेही पूर्वग्रह आणि निर्णायक अनुमान काढता विचार, भावना, संवेदना आणि सभोवतालच्या परिस्थितीबद्दल क्षणोक्षणी जागरूक राहून आपल्या सजगकतेला "द्वारपाल" सारखे सावध ठेवून आपले ज्ञान आणि भावनिक नियमन जोपासण्यासाठी प्रयत्नशील असणे .

                      मानसशास्त्रात माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणाची नॉन जजमेंटल ,सक्रिय आणि खुली जाणीव, ज्यामध्ये एखाद्याच्या अंतर्गत संवेदना, भावना विचार आणि आजूबाजूचे वातावरण यांचा समावेश आहे.

              सकारात्मक मानसशास्त्रात (पॉझिटिव्ह सायकॉलॉजि), माइंडफुलनेस म्हणजे विचार, भावना, शारीरिक संवेदना आणि सभोवतालच्या वातावरणाची  हेतुपुरस्सर आणि गैर-निर्णायक जाणीव अशी व्याख्या केली जाते.

                     थिक न्हात हान (१९७६) ह्यांनी "आपल्या जाणीवेला वर्तमान वास्तवात जिवंत ठेवणे" अशी माईंडफुलनेस ची व्याख्या केली आहे.

             अनालयो (२०१६): माईंडफुलनेस स्पष्ट करताना "वर्तमान-क्षणाची जाणीव" आणि स्मृतीचा एक घटक किंवा जागरूक राहण्यासाठी "स्मरण" या दोन्हींवर भर देतात.

                      ब्राउन आणि रायन (२००३): वर्तमान क्षणात घडणाऱ्या अनुभवांकडे लक्ष वेधण्याची एक मानसिक प्रक्रिया म्हणून माईंडफुलनेस चे वर्णन करतात.

                          डॉ.जॉन कबाट-झिन ह्यांनी केलेली माईंडफुलनेस ची व्याख्या  म्हणजे  माइंडफुलनेस हे जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर सध्याच्या क्षणांवर म्हणजेच वर्तमानावर, निर्णय न घेता लक्ष देणे, जागरूकता विकसित करणे!

                                                     आपण ह्या सगळ्या संकल्पना पहिल्या तर आपल्या लक्षात येते कि माइंडफुलनेस मध्ये अवघड काहीही नाही आपल्याला फक्त चालू क्षण मुद्दाम जाणीवपूर्वक, कोणतेही अनुमान/ निष्कर्ष काढता, पूर्वग्रह ठेवता, कोणतेही लेबल चिटकवता जागरूकतेने निरीक्षण करायचे! मग ह्या चालू क्षणांमध्ये आपले जे काही विचार, भावना, अनुभूती , घटना , वातावरण जे असेल ते सगळे सामावले जातात! आणि हे चालू क्षणांमध्ये सजगकतेने राहणे आपल्या मानसिक भावनिक आरोग्याच्या दृष्टीने अनेक पद्धतीने आपल्या उपयोगी पडते.

मागील ४०० हून अधिक अभ्यासांच्या मोठ्या प्रमाणावरील पुनरावलोकनात, जवळजवळ सर्व लोकांना त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करणारी एक प्रभावी मानसिक आरोग्य पद्धत म्हणून माइंडफुलनेस ओळखले गेले. जगभरातील वेगवेगळ्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे.

माईंडफुलनेस आपल्याला कसे मदतगार ठरते हे आपण पाहुयात :

अति विचार कमी होतात : आपले चंचल मन सतत भूतकाळ आणि भविष्यात फिरत असल्याने मन सतत अतिविचारामध्ये गुंतून पडते, त्याचवेळी जर आपण मनाला वर्तमानात राहायचे ट्रेनिंग दिले तर अतिविचारांवर अंकुश येतो.

नैराश्य कमी होते : माईंडफुलनेस मधील एक महत्वाचा घटक असतो, नॉन जजमेंटल दृष्टीकोन! जेव्हा ह्याचा सराव होतो तेव्हा नैराश्य ला कारणीभूत असणारे घटक म्हणजे स्वतःचे आणि परिस्थितीचे नकारात्मक मूल्यांकन कमी होते ,परिणामस्वरूप नैराश्य /डिप्रेशन कमी व्हायला मदत होते.

चिंताविकार कमी होतात: चिंताविकारामध्ये आपले विचार सतत भविष्यकाळात होऊ घातलेल्या काल्पनिक संकटांचा विचार करत आपल्याला काळजीत टाकत असतात! माईंडफुलनेस मधील नॉन जजमेंटल आणि हेतुपुरस्सर निर्माण केलेली वर्तमानाची जाणीव आपल्याला चिंतेपासून दूर ठेवायला मदत करते.

भावनिक नियमन सुधारते: भावनिक नियमन म्हणजे तुमच्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. माईंडफुलनेस मधील जागरूकता आपल्याला आपल्या भावना ओळखण्यास, त्यांना स्वीकारण्यास मदत करते. ह्यामुळे आपण आपल्यामधील उपद्रवी भावनांवर कंट्रोल मिळवू शकतो आणि उपयोगी भावनांचे संगोपन करू शकतो.

संज्ञानात्मक कार्यांमध्ये सुधारणा:

माइंडफुलनेस तुम्हाला फक्त तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित करण्यास किंवा गोष्टी अधिक सहजपणे लक्षात ठेवण्यास मदत करत नाही तर प्रत्यक्षात लवचिक आणि स्पष्टपणे विचार करण्याच्या तुमच्या क्षमतेत महत्वाची भूमिका बजावतात! माइंडफुलनेसचा सराव तुमचे विचार बदलू शकतात कारण हा सराव आपल्या विचारांवर कोणतेही निर्णय लादता त्यांच्याबद्दल जागरूक होण्याबद्दल आहे. हि जागरूकता तुम्हाला लवचिक आणि स्पष्ट विचारांच्या दिशेने मार्गदर्शित करते.

माइंडफुलनेस आपल्याला अनेक महत्त्वाच्या संज्ञानात्मक क्षमतांचा विकास करण्यास मदत करते जसे कि काही काळासाठी आपले लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असणे, आपल्या आजूबाजूला कितीही लक्ष विचलित करणारे घटक असले तरी आपण आपले विचार आणि लक्ष आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी ठेवण्यास आणि बदलण्यास सक्षम असणे (संज्ञानात्मक लवचिकता),

आपल्या एकाग्रतेत व्यत्यय आणणारे इतर विचार नाकारणे (संज्ञानात्मक प्रतिबंध). इत्यादी.

या संज्ञानात्मक क्षमता विविध प्रकारच्या दैनंदिन कामांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्या आपल्याला जलद विचार करण्यास आणि बदलत्या माहितीशी जुळवून घेण्यास मदत करतात अशी कौशल्ये आपल्याला एका कामातून दुसऱ्या कामात सहजपणे स्विच करण्यास आणि कामांवर लक्ष केंद्रित करणे आणि समस्या अधिक कार्यक्षमतेने सोडवण्यास मदत करतात.

                       मुलांमध्ये एकाग्रता वाढवणे ,त्यांचे वर्तन प्रॉब्लेम्स, शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, सामाजिक आणि भावनिक आरोग्य निरोगी राखणे ह्या मध्ये माइंडफुलनेस प्रभावीपणे मदत करतात.

                  वृद्ध व्यक्तींमध्ये ताण व्यवस्थापन, झोपेचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारणे, वेदना कमी होणे, स्मरणशक्ती आणि संज्ञानात्मक कार्य सुधारणे, उन्नत मनःस्थिती आणि अधिक सकारात्मक दृष्टिकोन, अधिक आत्म-करुणा आणि इतरांशी सहृदय संबंधांची भावना विकसित करणे ह्यासगळ्यांमध्ये माइंडफुलनेस आपल्या मदतीला येतो.

माइंडफुलनेस आपल्याला आपले भावनिक आणि मानसिक आरोग्य जपण्यास कशी मदतगार ठरू शकतो हे आपण पहिले.

आपले आयुष्य जरी आपले असले तरी आपण मनाने त्यात नसतो, आपले मन एक व्हाट्सअप ग्रुप सारखं बनलंय.. थांबणाऱ्या नोटिफिकेशन्स - विचारांची गर्दी, तुलना, अपेक्षा, भीती, जुने संवाद, बोललेले शब्द. कोणी एखादी आठवण टाकते आणि आपण भूतकाळात जातो. कोणी एखादी भीती पुढे सरकावले आणि आपण भविष्यकाळात हरवतो. कोणी एखादा छोटा मेसेज येतो आणि लगेच आपण प्रतिक्रिया देतो. आपण ग्रुप म्यूट करायला घाबरतो आणि शांतपणे वाचायला शिकत नाही.

माइंडफुलनेस म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन्स ला रिऍक्ट होणे नाही तर थोडे थांबणे, निःपक्षपातीपणे पाहणे नि निरीक्षण करणे.

माइंडफुलनेस ही फक्त टेक्निक नाही तर स्वतःकडे पाहण्याची सुरक्षित जागा आहे.

विचार थांबत नाही ..

भावना येणं थांबत नाही..

पण त्यांच्याशी नातं बदलू शकते !

 

रोहिणी फुलपगार

9604968842

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)