ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स - भाग-2

TheMindTalks
1

ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स ( ANTs)

भाग -2

ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स भाग 2

(ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स भाग 1 मध्ये  ANTs म्हणजे काय ,त्याचे स्वरूप आणि त्यांचा व्यक्तीच्या मानसिकतेवर होणार परिणाम ह्यावर आपण चर्चा केली. भाग -2 मध्ये ANTs चे वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत)

ह्या ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स (ANTs) चे वेगवेगळे प्रकार असतात. एकाच प्रकारचे ANTs आपल्या सगळ्यांच्या मनात येत नाही, जशी विचारप्रणाली तयार झालेली असते, त्याप्रमाणे ANTs सुरू असतात.

जसे की:

"कोणीही मला समजून घेत नाही."

"माझ्या मुळे माझ्या जवळच्या लोकांना खाली मान घालावी लागली."

"मला नाही वाटत, मी हे करू शकतो."

"माझ्या इच्छेनुसार माझे आयुष्य पुढे जात नाही.

"आता कश्यात ही रस वाटत नाही."

"मी यापुढे काही सहन करू शकत नाही".

"मला वाटते, मी चुकीच्या ठिकाणी/माणसांत आहे. मी वेगळया ठिकाणी पाहिजे होतो."

"मला मी असहाय्य असल्यासारखे वाटते."

"मी दुबळा आहे किंवा अपयशी आहे किंवा माझ्यातच काही कमी आहे."

"माझे भविष्यात सगळा अंधार आहे."

असे अनेक निगेटिव्ह विचार मनात pop up होत असतात.
 
पण हे विचार पण आपण कोणत्या प्रकारे स्वतः ची विचार प्रणाली बनवली त्यावर अवलंबून असते. म्हणजे बघा, मुंग्यांची वसतिस्थान म्हणजे वारूळ! आता ज्या प्रकारचे वारूळ त्या प्रकारच्या आपल्याला चावणाऱ्या मुंग्या!!
चला तर मग आपण आपल्यात कोणते वारूळ  घर करून राहिलंय आणि त्यातून कोणत्या ANTs बाहेर पडतात हे बघू या!

हया वारुळाना सायकोथेरपि च्या भाषेत "कॉग्नेटिव्ह डिस्टोरशन " म्हणजेच  व्यक्तीच्या विचारातील  स्वतः बद्दल, आजूबाजूच्या लोकांबद्दल तसेच अवतीभवती च्या जगा बद्दल असलेला नकारात्मक पूर्वग्रहदूषितपणा असे म्हटले जाते. 

त्याचे काही प्रकार पाहूया :

1.  काही व्यक्तींना नेहमीच दोन टोकाचा विचार करण्याची मानसिकता असते. एकतर सगळे व्हाईट किंवा सगळे ब्लॅक ! मग यामध्ये ग्रे शेड्स असतात ह्याकडे अश्या व्यक्तींचे लक्षच नसते! एखाद्या गोष्टी च्या फक्त दोन साईड पाहत असल्यामुळे किंवा एखाद्या घटनेचे दोनच पर्याय पाहत असल्यामुळे मधला पर्याय पण असू शकतो, तो वाजवी पण असू शकतो हे विसरून जातात आणि स्वतः ला त्रास करून घेतात. जसे ,पाणी एकतर गरम किंवा थंड पाहिजे, कोमट पाणी पण असते हे ह्यांच्या लक्षात येत नाही.
ह्या विचार प्रणालीत"प्रत्येकाला", "नेहमीच", "कधीच नाही" असे शब्द सतत येत असतात.

2.  काही व्यक्तींमध्ये सतत सगळ्या गोष्टी स्वतः वर घेऊन ,स्वतः ला सगळा दोष देण्याची मानसिकता असते. दुसऱ्या च्या चुका पण आपल्या अंगावर घेणे तसेच सतत स्वतः ची तुलना समोरच्या व्यक्तीबरोबर करून स्वतःमध्ये कमी लेखणे!
उदा. जर मुलाची शाळेतून तक्रार आली तर ह्या मानसिकतेची आई चे लगेच ANTs पुढीलप्रमाणे सुरू होतील,"ह्या सगळ्या ला मीच जबाबदार आहे! मी पूर्ण लक्ष दिले असते तर असे झाले नसते!माझ्या मुलाला माझ्यामुळे शाळेत असल्या प्रसंगाला सामोरे जावे लागले! मी चांगली आई नाही!" ह्यात  शाळेतील तक्रारी ला   अजूनही काही कारणं असतील ह्या कडे दुर्लक्ष करून स्वतः ला दोष देत बसतात.

3. काही व्यक्तींच्या विचारप्रणालीत "च" हा शब्द प्रामुख्याने असतो! ह्यात व्यक्ती स्वतःबद्दल,इतरांबद्दल, जगाबद्दल स्वतः चे असे काही नियम बनवतो आणि ते पाळलेच गेले पाहिजेत असा त्यांचा आग्रह/अट्टाहास असतो ,जर हे नियम पाळले गेले नाही तर राग, चिडचिड, कटुता, निराशा याने व्यक्ती सतत घेरली जाते.
उदा. आज संध्याकाळी हीच भाजी पाहिजे, माझ्या मुलाने मी सांगितले ते मला प्रश्न न करता ऐकलेच पाहिजे, घरातील सर्व माणसांनी मी म्हणेल तेच केले पाहिजे..
ही यादी खूप मोठी आहे!!

4.  काही व्यक्तींची विचार प्रणालीत सतत "नेहमीच वाईट घटना वा आपत्ती जनक घटना घडेल आणि ह्या वाईट नकारात्मक घटनेचा आपण सामना करू शकणार नाही/आपत्ती जनक घटनेला सामोरं जाऊ शकत नाही' असे ANTs असतात.
उदा. जर पती ला ऑफिस मधून नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला तर, "काय झाले असेल ! अक्सिडंट तर नसेल झाला ना!! त्यांना काही झाले तर माझे कसे होईल !"
किंवा कुठे जायचं असेल आणि जर रिक्षा चा पर्याय घ्यावा लागत असेल तर," रिक्षा वाला मला रस्त्यावर मध्येच सोडणार तर नाही! जास्त पैसे घेतले तर काय ! चुकीच्या पत्त्यावर जर मला सोडलं तर मी काय करू?" अश्या प्रकारचे ANTs येत राहतात.

5.  काही व्यक्तींच्या विचार प्रणालीत असा ठाम विश्वास असतो की, त्यांना वाटते समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे त्यांना माहीत आहे. ह्या प्रकारच्या व्यक्तींत, त्यांच्या मनात जे नकारात्मक विचार चालू आहेत तेच समोरच्या माणसामध्ये पण चालू आहेत ही पूर्ण खात्री असते, बरं ह्या वाटण्याला काही पुरावा ही नसतो.
उदा.  जर एखाद्या छोट्या चुकीबद्दल बॉस ने काही रिमार्क दिला नाही तरी ह्या विचारप्रणाली ची व्यक्तीचे ANTs सुरू होतात, "माझा बॉस काही बोलत नाही, पण मला माहीत आहे की तो मी किती बावळट आहे हाच विचार करत असणार!"
किंवा वर्गात उत्तर देताना अडखळत उत्तर दिले तर एखाद्या मुलाचं ANTs लगेच सुरू होतात, " सगळे हा किती मूर्ख /ढ आहे असाच विचार करत असणार"!

6.  काही व्यक्तींची अशी ठाम समजूत असते की भविष्यात जे काही घडणार आहे असे त्यांना वाटते ते पूर्ण खरे आहे .पण इथे गोम अशी असते की ह्या विचारप्रणाली मध्ये भविष्य हे नकारात्मक व निराशावादी असते आणि ह्या वाटणाऱ्या भविष्याला काही आधार नसतो. उदा .जर एखाद्या नवीन ठिकाणी जॉब साठी  जॉईन व्हायचे असेल तर आधीच ANTs सुरू होतात, "मला वाटते, ह्या जॉब मध्ये भरपूर काम करून घेतले जाईल, ओव्हरटाईम चे पैसे पण मिळणार नाही"
किंवा "माझा मुलगा सहामाही त दोन विषयात नापास झाला, मला पूर्ण खात्री वाटते की हा शेवटच्या परीक्षेत नापास होणार"!
किंवा संध्याकाळी वाढदिवसाच्या पार्टीची एवढी तयारी केली पण मला वाटते खूप लोक नाही येणार आणि सगळी तयारी वाया जाईल."

7.  काही व्यक्तीच्या विचारप्रणाली नुसार त्या छोट्या वा क्षुल्लक घटनेवरून ,अपुऱ्या माहितीवरून मोठे conclusion वा अनुमान काढतात की जे नकारात्मक व निराशावादी असते!
उदा. जर व्यक्ती परक्या शहरात फिरायला गेली आणि तिथे एका ठिकाणी टॅक्सीवाल्या चा तितकासा चांगला अनुभव नाही आला तर लगेच अनुमान निघते की ह्या शहरातील लोकं चांगली नाहीत.
किंवा,  जर अश्या मानसिकतेची व्यक्ती कंपनीत इंटरव्ह्यू ला गेली आणि जॉब नाही मिळाला तर त्याचे ANTs "मला कधीच जॉब मिळणार नाही, माझे काही होऊ शकत नाही"सुरू होतात.

8.  काही व्यक्तींना स्वतः ला सतत नकारात्मक बाजूने पहायची मानसिकता असते, आपल्यात काही सकारात्मक व चांगल्या गोष्टी आहेत हे मान्यच करत नाहीत.
उदा. जर अश्या विचारप्रणाली च्या व्यक्तीच्या स्वयंपाक च्या कौशल्या ची स्तुती केली तर," मला बरं वाटावे म्हणून असे म्हणतात, मला माहित आहे आजचा स्वयंपाक काही एवढा चांगला नव्हता झाला" अशाप्रकारचे ANTs सुरू होतात .

9.  काही व्यक्तीमध्ये सभोवताली च्या घटनेतून वा प्रसंगातून फक्त निगेटिव्ह वा नकारात्मक गोष्टी बघायच्या आणि पोसिटीव्ह वा सकारात्मक बाजू कडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे अशी मानसिकता असते.
उदा. संतोष ने कॉलेज मधील मुलांसाठी एक वर्कशॉप घेतले होते, पण कार्यक्रम सुरू झाल्यावर 10 मिनिटाने 2 मुले उठून गेली.
 वर्कशॉप संपल्यावर त्याला खूप छान फीडबॅक मिळाला पण संतोष चे पूर्ण करण्यासाठी लक्ष जी दोन मुले उठून गेली त्यावर होते आणि त्यामुळे त्याचा कार्यक्रम अपयशी झाल्याच्या  भावनेने  मनात घर केले.

10.  काही व्यक्तींना स्वतः ला आणि दुसऱ्यांना नेहमी नकारात्मक आणि पर्मनंट लेबल लावण्याची मानसिकता असते.
उदा. सुधा आज लवकर मनिषा कडे गेली होती, फोन न करता, तिला सरप्राईज द्यायला !
पण आज मनीषा ला आणि मुलाना सुट्टी होती त्यामुळे त्यांचे रुटीन उशीरा सुरू झाले, सुधा गेली तर घरात पसारा होता आणि सगळे निवांत होते, ह्यावरून सुधा ने मनीषा ला "अजागळ, आळशी " लेबल मनातल्या मनात लावून दिले.
  अर्चना ला पेरेन्ट्स मीटिंग मध्ये पटकन बोलता आले नाही यावरून तिने स्वतः ला "बावळट आणि अडाणी "लेबल चिटकवून घेतले.

11.  काही व्यक्ती मध्ये अशी भावना असते कि त्यांना जे काही वाटते ते खरे आहे. त्यांचे निर्णय हे त्यांच्या भावनेवर अवलंबून असतात.
 उदा. अक्षया ह्या कॉलेज मध्ये जाणाऱ्या तरूणी ला वाटते की ती तिच्या वयाच्या मुलींपेक्षा जाड आहे, तिच्या फ्रेंड्स, पेरेन्ट्स ने समजावून सांगितले की ती जाड नाही, पण तरीही तिने जिम लावली कारण तिची पूर्ण खात्री आहे की जर तिला वाटते तर ती नक्कीच जाड आहे. आणि यानुसार अक्षया चे ANTs सुरू असतात.

वरील  सांगितलेल्या वेगवेगळ्या विचारप्रणाली नुसार व्यक्तीची मानसिकता घडते आणि त्यानुसार ऑटोमॅटिक  निगेटिव्ह थॉट्स सुरू होतात.

(क्रमशः)

ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स भाग -1 साठी येथे क्लिक करा... 


रोहिणी फुलपगार
क्लिनिकल  सायकॉलॉजीस्ट सायकोथिरपिस्ट
9604968842


Post a Comment

1Comments

  1. माहिती खूप छान आहे.अशा व्यक्ती असा विषय मान्य करत नाहीत.आम्हाला खूप वाटत की यावर उपाय करावं खूप सकारात्मक बोलावं पण या व्यक्ती त्यांची मानसिकता सोडत नाहीत.अशावेळी तज्ज्ञाकडे जावं तर तयार होत नाहीत.

    ReplyDelete
Post a Comment