जुनाट वेदना: मन आणि शरीर यांचा परस्पर संबंध (भाग 2)

TheMindTalks
0

 

             जुनाट वेदना: मन आणि शरीर यांचा परस्पर संबंध (भाग 1) मध्ये आपण वेदनांच्या व्याख्या, स्वरूप आणि थिअरीज जाणून घेतल्या होत्या. आजच्या भागात आपण वेदनांसोबत येणारे अदृश्य सोबती, आणि वेदनेचे दुष्टचक्र बघणार आहोत .

आपण मागच्या भागात पाहीले की वेदना एकट्याच नसतात तर त्या त्यांच्या फ्रेंड्स ना पण सोबत आणतात . ते फ्रेंड्स म्हणजे :

चिंता (Anxiety)

एखाद्या विशिष्ट परिस्थितीत काय घडेल याचा अंदाज येणे, परिस्थितीवर आपल्याला नियंत्रण ठेवता येणे किंवा अपेक्षित परिणाम साध्य करता येणे या भावनेतून निर्माण होणारी काळजी, भीती, अस्वस्थता किंवा धास्तीची अप्रिय मानसिक अवस्था म्हणजे चिंता.

चिंताग्रस्त भावना या वेदना सोबत येणाऱ्या भावनिक घटकांपैकी एक आहेत. वेदनेच्या बाबतीत परिस्थितीवर कन्ट्रोल नसण्याची अगतिकता, वेदनेच्या बाबतीत अपेक्षित परिणाम मिळाल्याची अस्वस्थता, वेदनांपासून कधीच सुटका होण्याची भीती हे सगळे घटक आपली चिंता वाढवतात. आपली चिंता तीव्र झाल्यास वेदनांची तीव्रता वाढू शकते; तर चिंता कमी झाल्यास वेदना जाणवण्याची वारंवारता कमी होण्यास मदत होऊ शकते.

नैराश्य (Depression)

नैराश्य ही एक क्लिनिकल मानसिक अवस्था आहे. यामध्ये दुःख, निराशा, रिक्तपणाची भावना किंवा पूर्वी आनंद देणाऱ्या गोष्टींमधील रस अथवा आनंद कमी होणे अशी लक्षणे जवळजवळ दररोज, दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ दिसू शकतात. दीर्घकाळ वेदनांमध्ये एक प्रकारची निराशा निर्माण होते, वेदना कधी कमी होईल कि नाही याबद्दल आशावाद संपत येतो त्यामुळे एकप्रकारची असहायता वाढीस लागते, रोजच्या आयुष्यातील आनंद कमी होतो.सततच्या वेदनांमुळे दैनंदिन कामांवर मर्यादा येणे, झोप बिघडणे, सामाजिक सहभाग कमी होणे, काम करण्याची क्षमता कमी होणे आणि असहायता निर्माण होणे यामुळे हळूहळू उदासीनता, निराशा आणि आनंद कमी होण्याची शक्यता वाढते.

नैराश्यामुळे मेंदूची वेदनांवर प्रक्रिया करण्याची पद्धत बदलू शकते. वेदनांकडे अधिक लक्ष जाणे, नकारात्मक विचार, कमी झालेली शारीरिक हालचाल, झोपेतील समस्या आणि coping क्षमता कमी होणे यामुळे वेदना अधिक तीव्र किंवा त्रासदायक वाटू शकतात.

राग (Anger)

एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या किंवा आपल्याशी संबंधित व्यक्तींच्या हिताला धोका निर्माण करणारा अन्याय किंवा चुकीची कृती झाल्याचे जाणवल्यास, त्याच्या प्रतिसादात निर्माण होणारी नाराजीची भावनिक अवस्था म्हणजे राग. त्याची तीव्रता सौम्य चिडचिडीपासून तीव्र संतापापर्यंत असू शकते.वेदनांमध्ये एकतर परिस्थितीवर राग असतो, किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांवर राग असतो . एकाही डॉक्टर ला ह्यावर इलाज करता येत नाही , मी एवढ्या त्रासात आहे घरच्यांना माझी काळजी नाही , मलाच एवढा त्रास ,बाकी सगळे मजेत जगत आहेत , ह्या प्रकारच्या विचारांनी राग आणि चिडचिड वाढते जे वेदनांना हवा देण्याचे काम करतात

ताण (Stress)

ताण वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवला जाऊ शकतोकामाचा ताण (Work Stress), कौटुंबिक ताण (Family Stress), आंतरवैयक्तिक ताण (Interpersonal Stress) म्हणजे इतर व्यक्तींशी असलेल्या संबंधांमधून निर्माण होणारा ताण, आणि अंतर्वैयक्तिक/स्वतःच्या अंतर्गत संघर्षातून निर्माण होणारा ताण (Intrapersonal Stress).

ताण किती आहे याबरोबरच व्यक्ती ताणाचा सामना कसा करते (Coping Pattern) हेदेखील महत्त्वाचे असते. वेदनामध्ये हे अतिरिक्त ताण वेदनेची तीव्रता वाढवतात आणि जर व्यक्तीला ह्या तणावांचा सकारात्मक सामना करायला जमले नाही तर वेदनांचा मुक्काम वाढतो!

 

ह्या भावनिक तणावामुळे मुळे व्यक्ति वेदनेच्या दुष्टचक्रात अडकतो .

वेदनेचे दोन चक्र एकाच वेळी चालू होतात:

1 वेदना आणि भावनांचे चक्र

2 वेदना आणि हालचाल टाळण्याचे चक्र

वेदनेमुळे - राग / चिंता / भीती / भावनिक अस्वस्थता, मनःस्थिती खालावणे यामुळे मग नैराश्य; वेदनांची जाणीव अधिक तीव्र होणे आणि पुन्हा वेदना

वेदना दीर्घकाळ राहिल्यास व्यक्तीमध्ये राग, चिंता, भीती आणि अस्वस्थता वाढू शकते. ही वेदना कधी कमी होणार?”, “माझं काही गंभीर तर नाही?”, “मी पूर्वीसारखा होईन का?” अशा विचारांमुळे भावनिक ताण वाढू शकतो.

सततच्या वेदना आणि भावनिक ताणामुळे मूड खालावतो, आवडत्या गोष्टींमधील रस कमी होऊ शकतो आणि काही व्यक्तींमध्ये नैराश्याची लक्षणे विकसित होऊ शकतात.

त्यामुळे वेदनांकडे लक्ष अधिक केंद्रित होणे,कोपिंग क्षमता कमी होणे आणि वेदना अधिक त्रासदायक वाटणे शक्य होते. अशा प्रकारे हे चक्र पुन्हा सुरू राहते. त्याचवेळी अजून एक समांतर चक्र ही सुरु असते ते म्हणजे वेदना आणि हालचाल टाळण्याचे चक्र!

वेदनेमुळे हालचाल/काम टाळणे यामुळे शारीरिक क्षमता हळूहळू कमी होणे परिणामी कमी हालचालीतही वेदना जाणवणे याना टाळण्यासाठी आणखी हालचाल टाळणे त्यामुळे परत वेदना disability वाढण्याची शक्यता!

वेदना झाल्यावर व्यक्तीला स्वाभाविकपणे वाटू शकते ; “हालचाल केली तर वेदना आणखी वाढतील.

त्यामुळे ती चालणे, व्यायाम, घरकाम किंवा इतर शारीरिक कृती कमी करू लागते.

दीर्घकाळ हालचाल कमी झाल्यास स्नायूंची ताकद, सहनशक्ती आणि शारीरिक क्षमता कमी होऊ शकते (deconditioning). परिणामी पूर्वी सहज करता येणाऱ्या कृतींमध्येही थकवा किंवा वेदना जाणवू शकतात.

मग व्यक्ती आणखी हालचाल टाळते आणि वेदनेचे हे दुष्टचक्र दोन्ही पध्दतीने अधिक मजबूत होऊ शकते.

वेदना आपल्याला हालचाल कमी करायला आणि मनाने खचायला लावतात; पण हालचाल खूप कमी होणे आणि सततचा भावनिक ताण पुन्हा वेदनांचा त्रास वाढवू शकतो. हेच वेदनेचे दुष्टचक्र आहे.

वेदनेच्या ह्या दुष्टचक्रा मध्ये आपला एका घटक खूप महत्वाची भूमिका साकारतो.

वेदनेच्या ह्या दुष्टचक्रा मध्ये आपला एका घटक खूप महत्वाची भूमिका साकारतो आपण हा घटक पहिल्या भागात पहिला आहे तो म्हणजे व्यक्तीचे वेदनेबद्दलचे आकलन आणि त्याला दिला जाणारा cognitive रिस्पॉन्स!

हा रिस्पॉन्स अनेकदा आपल्या अतार्किक विचारप्रक्रियेवर अवलंबुन असतो . वेदनांमध्ये सामान्यतः पुढील विचारप्रक्रिया आढळते :

1.  वेदनांबद्दल आपत्तीजनक विचार करणे (Catastrophizing)

Catastrophizing म्हणजे वेदनांबद्दलच्या नकारात्मक परिणामांना प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा खूप मोठे समजणे, वेदनांचा सतत विचार करत राहणे आणि मी याचा सामना करू शकत नाही अशी असहायतेची भावना निर्माण होणे.

जुनाट वेदना मध्ये catastrophizing चे मुख्य तीन घटक दिसतात:

अतिशयोक्ती म्हणजे ही वेदना म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर आहे. हे असेच वाढत जाणार.

वेदनांवर सतत विचार म्हणजे दुखतंय का दुखतंय?... कधी थांबणार?” लक्ष वारंवार वेदनेकडेच जात राहते.

असहायता म्हणजे  मी काहीच करू शकत नाही.  कोणत्याच उपचाराचा फायदा होणार नाही.

म्हणजेच catastrophizing हे वेदना काल्पनिक बनवत नाही; परंतु वेदनेमुळे होणारा distress, disability आणि pain perception वाढवण्यात योगदान देऊ शकते.

2. नकारात्मक शिक्का मारणे (Labelling)

Labelling म्हणजे एखाद्या विशिष्ट नकारात्मक अनुभवावरून स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल सर्वसमावेशक आणि कायमस्वरूपी नकारात्मक निष्कर्ष काढणे.

उदा.:माझं नशीबच खराब आहे. माझ्यावर कोणताही उपचार काम करत नाही.
माझं शरीरच निकामी झालं आहे.  कोणत्याही डॉक्टरला माझ्या वेदना समजत नाहीत.

3  नकारात्मक भविष्यवाणी करणे (Fortune Telling)

Fortune Telling म्हणजे भविष्यात काय होईल याचे पुरेसे पुरावे नसतानाही नकारात्मक भाकीत करणे आणि इतर शक्यता विचारात घेणे.

उदा.ही डोकेदुखी माझी कधीच जाणार नाही. माझ्या वेदना आता आयुष्यभर अशाच राहणार.
मी पुन्हा पूर्वीसारखे काम करू शकणार नाही.
अशा विचारांमुळे भविष्याबद्दल भीती आणि चिंता वाढते. व्यक्ती हालचाल टाळू शकते. त्यामुळे physical deconditioning, कमी self-efficacy आणि वेदनांकडे अधिक लक्ष जाण्याची शक्यता वाढते.

4   फक्त नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देणे (Mental Filter)

Mental Filter म्हणजे संपूर्ण परिस्थितीकडे पाहण्याऐवजी त्यातील एका नकारात्मक भागावरच लक्ष केंद्रित करणे आणि सकारात्मक किंवा सुधारलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे.

उदा. आज दिवसभर दुखत होतं; म्हणजे माझ्यात काहीच सुधारणा नाही.

प्रत्यक्षात त्या व्यक्तीने आज कालपेक्षा जास्त चालणे केले असेल, झोप सुधारली असेल किंवा काही काळ वेदना कमी झाल्या असतील पण लक्ष फक्त वेदनेवर राहते.

किंवा:
मी वेदनेत आहे आणि कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही; कोणालाच माझी काळजी नाही.

सतत वेदना आणि अडचणींकडेच लक्ष राहिल्याने सुधारणा, कॉपिंग क्षमता आणि स्वतःची कार्यक्षमता लक्षात येत नाही. त्यामुळे चिडचिड ,अगतिकता आणि नैराश्य वाढू शकतात.

5 प्रत्येक नकारात्मक घटनेला स्वतःशी जोडणे (Personalization )

Personalization म्हणजे ज्या नकारात्मक घटनेसाठी आपण प्रत्यक्षात जबाबदार नसतो किंवा ज्यामध्ये अनेक कारणे असू शकतात, त्या घटनेचे कारण स्वतःला मानणे.

उदा. मला ही डोकेदुखी होतेय म्हणजे मी काहीतरी चुकीचं केलं असणार. माझ्या चुकीची ही शिक्षा आहे. देव मला माझ्या चुकीची शिक्षा म्हणून ही वेदना देत आहे.


अशा अर्थ लावण्यामुळे वेदनेसोबत अपराधीपणा,  स्वतःला दोष देणे , शरम वाटणे किंवा असहाय ह्या भावना जोडल्या जाण्याची शक्यता असते त्यामुळे आधीच असलेल्या शारीरिक वेदनेवर अतिरिक्त भावनिक ताण निर्माण होतो


खरंतर वेदना वास्तविक असतात; पण आपण वेदनांबद्दल कसा विचार करतो आणि त्यांचा काय अर्थ लावतो, यामुळे वेदनांमुळे होणारा मानसिक त्रास आणि दैनंदिन जीवनावरील परिणाम कमी किंवा अधिक होऊ शकतो.”

जुनाट वेदना मध्ये अशा प्रकारचे विचार निराशा, राग, असहायता आणि उपचारांबद्दल अविश्वास वाढवू शकतात. त्यामुळे व्यक्ती उपचार, व्यायाम किंवा rehabilitation मध्ये सक्रिय सहभाग कमी करतात आणि उपचारांना प्रतिकार करतात किंवा टाळतात

 (क्रमशः )

रोहिणी फुलपगार

 

 

 

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)