भुलवणारे स्वप्न

TheMindTalks
0

  

भुलवणारे स्वप्न

खूप वेळ ती गॅलरीत उभी राहून क्षितिजाकडे पाहत होती.

खूप वेळा असं  घडायचं! क्षितिजावर दिसत असलेले इंद्रधनू तिला बोलावत आहे असं वाटायचं!

जरी आपल्या चौकटीत तिने स्वतःला बांधून घेतलेलं, तरीसुद्धा कितीतरी वेळा भान हरपून क्षितिजावरचे इंद्रधनू

 अनिमिष नेत्रांनी पाहिलेलं. त्याच्या दिशेने पाऊल उचलायची मात्र तिने कधी हिम्मत केली नाही!

तिचा राजवाडा होता ना ! त्या राजवाड्यातच तिचे विश्व सामावलेले!

बरोबरच आहे , आयुष्यातील अर्ध्यापेक्षा जास्त वर्ष ह्या राजवाड्याच्या चौकटीत बांधून घेतलीय तिने!

आता जरा निवांतपणा आला होता,आजूबाजूची नाती जरा विसावत चाललीय, जबाबदाऱ्या ही थोड्या सैलावल्यात!

आणि तिचे स्वप्नाळू मन पुन्हा एकदा जागे होऊ पाहतेय, त्यात हे दिसणारे सप्तरंगी इंद्रधनू!

हे इंद्रधनू तर सदा कदा तिला साद घालतेय असेच तिला वाटत राहायचे.

दुरून त्याचे ठळक दिसणारे मोहक असे दोन तीन रंग, पण त्या रंगानेही गारुड केले तिच्यावर!

आणि आता तिला त्या इंद्रधनूतील सात हि रंग पाहण्याची, अनुभवण्याची ओढ लागलीय!

अशीच एक दिवस ती त्या इंद्रधनूकडे एकटक बघत होती, तितक्यात त्यातून एक स्वप्न अलगद तिच्या डोळ्यात

उतरलं आणि म्हणालं," माझे बोट पकड, मी तुला इंद्रधनुष्यातील सात ही रंगांची सफर घडवून आणील! आपण

इंद्रधनू वर स्वार होऊन क्षितीजाच्या पलीकडे जाऊ! आपली साथ अंतापर्यंत असेल!"

झालं! "ती " विरघळली! आतापर्यंत तिला वाटायचं इंद्रधनू पर्यंत जायचा ध्यास हा वेडेपणा आहे , आता ह्या वयात

हा वेडेपणा पूर्ण करणारे स्वप्न डोळ्यात कुठून येणार ? त्यामुळेच कि काय कळेना पण तिने पटकन त्या स्वप्नाचे

बोट पकडले आणि क्षितिजाकडे निघाली! खूप आशा,आकांक्षा मनात भरून, आनंदाने बागडत!

राजवाड्याच्या बाहेर पाऊल टाकताना थोडीसी बावरली,घाबरली, पण स्वप्नाचा उबदार स्पर्श हाताला लागला

आणि ती निघाली बिनधास्तपणे!

पण जसजशी ती इंद्र्धनुष्याजवळ पोहोचली , तसे त्याचे मोहक वाटणारे वेगवेगळे रंग तिला स्पष्टपणे दिसायला

 लागले.जाणवायलाही लागले! तरी ती निघाली ! स्वप्न होते ना बरोबर !

जसजशी जवळ जायला लागली तसतसे तिला जाणवायला लागले की, अरे! हे तर इंद्रधनुष्य नाहीच मुळी! हे तर

 इंद्रजाल आहे. पावसाच्या थेंबांनी आणि सूर्याचा काही प्रकाश वापरून केलेला एक भ्रम!

ह्या इंद्रजालाला फसवून आपण इथपर्यंत आलो! ती धाडकन भानावर आली आणि स्वप्नाच्या हातातील आपले बोट

 सोडून त्याला विचारती झाली का असा वागलास माझ्याशी? का मला इंद्रधनुष्याच्या रंगाचे  आश्वासन देऊन

 इंद्रजाल दाखवले?

स्वप्न हसले! तिचा हात हातात घेऊन म्हणाले, अगं राणी मी स्वप्न आहे, माझे कामच आहे ना भुलवायचे! पण तू का

 भुललीस?तुला माहीत नव्हते का आजपर्यंत इंद्रधनुतील सातही रंग हे खरे नाहीच! तो माझ्यासारख्यांनी तयार

 केलेला भ्रम आहे, भास आहे! मी शोधातच असतो अशा स्वप्नाळू डोळ्यांच्या! जिथे मला तीव्र आसक्ती दिसते त्या

 डोळ्यात मी अलगद उतरतो आणि मग सगळ्या जरी नसल्या तरी थोड्याफार तुझ्यासारख्या माझे बोट पकडून

 निघतात प्रवासाला! आपल्या राजवाड्याची चौकट मोडून!त्यांना ते उन्मुक्त वाटते. स्वातंत्र्य वाटतं!

पण मला काय वाटतं माहित आहे का? जी आपल्या सौख्यपूर्ण उबदार राजवाड्यातून ही दूरस्थ दिसणाऱ्या इंद्रधनू

ला भुलते  ती शेवटपर्यंतच्या प्रवासात काय साथ करणार? त्यामुळे जेवढा काही एकत्र प्रवास आहे त्याचा आनंद

 उपभोगायचा आणि दुसऱ्या स्वप्नाळू डोळ्यांचा शोध घ्यायचा हे माझे काम !

तिच्या कोणीतरी सटासट तोंडात मारल्यासारखी झाले! ह्या प्रवासासाठी तिने काय काय गोष्टी गमावल्या काय आणि

 कशा तडजोडी केल्या हे आठवले! आणि मग आत्मग्लानीने भरून आले!

तिने स्वतःभोवती एक कोष तयार केला आणि त्यात गुरफटून घेतले स्वतःला!

स्वप्न बोलून गेले पण तिच्या मनावर किती चरे उमटलेत हे पाहायची ही तसदी न घेता स्वप्न मार्गस्थ झाले!



मित्रांनो काय वाटते! तिची गोष्ट ही अशीच संपायला हवी का? तिने पाहिलेले इंद्रधनुचे स्वप्न जे मायाजाल ठरले

 आणि त्या इंद्रधनुला मिळवण्याची तिची धडपड तिच्या असण्यावर, अस्तित्वावर, भरारी घेण्याच्या वृत्तीवर आणि

माणूस असण्यावर वर प्रश्न निर्माण करायला लागले!

असे अनेक प्रश्न घेऊन ती तिच्या कोशात राहिली!

काय चुकले? नेमकी आणि कुठे चुकले? याचा शोध घेत राहिली कित्येक दिवस?

एके दिवशी थोडा कोश बाजूला झाला तर एक स्वच्छ प्रकाशाची तिरीप डोळ्यावर पडली! डोळे अजून नीट

 उघडले तर तिला तिचा मित्र दिसला क्षितीजावर! खरा खुरा. एकटा,  तेजस्वी, आपल्याच प्रकाशाने तळपणारा

 आणि आपल्या तेजाने आजूबाजूचा लोकांना दीपावणारा! कोणत्याही अनेकविध रंगांची सोबत न घेता आपले

आकाश आणि आपला मार्ग एकट्याने ठरवणारा!

किती बरे वाटले तिला त्याला बघून ती विचार करू लागली अरे! हा तर सतत माझ्यात होता, माझा आत्मविश्वास

 माझी सारासार बुद्धी! माझी विचारशक्ती, माझ्या माझ्यावर असलेला प्रचंड विश्वास, कोणत्याही संकटात आणि

 मनाविरुद्ध घडलेल्या प्रसंगात ताठ पाय रोवून विवेकबुद्धीने उभे राहण्याची आपली प्रवृत्ती हाच तर आहे आपला

 स्वयंप्रकाश! यामुळेच तर लवकर इंद्रधनु आणि इंद्रजाल असलेला फरक लक्षात आला आणि फार दूरवर

 जाण्याआधीच जागेवर थांबलो!

एका इंद्रधनुला भुलल्यामुळे ज्या चुका केल्या त्या एक माणूस म्हणून कोणाच्याही हातातून घडू शकतात म्हणून मी

 एक वाईट टाकाऊ व्यक्तिमत्व नाही ठरत ना! ह्या चुकीतून मी शिकेल आणि शिकतेय!

माणूस चुकांमधून शकतो, घडतो!



स्वप्न भंगलं म्हणून मी स्वप्न बघायचं सोडून द्यायचं का? मी स्वप्न अजून उमेदीने बघेल पण ते रंगीबेरंगी मोहक पण

 फसव्या इंद्रधनुचे नसेल तर एकट्या स्वयं तेजाने तळपणाऱ्या, स्वतःचा मार्ग स्वतः ठरवणाऱ्या आणि तो मार्गक्रमण

 करत असताना येणाऱ्या संकटांना स्वतः सामोरे जाण्याच्या क्षमतेचे असेल , नभांगणात तळपणाऱ्या भास्कराचे असेल !

मी मला स्वयंसिद्ध म्हणून सामर्थ्याने पुन्हा उभे राहण्याची असेल !

तिची गोष्ट परत इथून सुरु होते

 पण अशी गोष्ट फक्त "तिची" असते असं हि नाही, कधी तिच्या जागी "तो" सुद्धा असतो

त्याची पण हि गोष्ट असते!

त्याला ही स्वप्न भुलवते, इंद्रधनू च्या सप्तरंगाचे आमिष दाखवून इंद्रजालात ओढते! तो सुद्धा आत्मग्लानीने भरून

जाऊन आत्मदोषाच्या कोशात स्वतःला बंद करतो! पण जर त्याने ही स्वतःची चूक लगेच ओळखून तिला आपल्या

आतल्या सामर्थ्याला झाकोळून देता परत नवीन सुरुवात केली तर ...

त्याची सुद्धा गोष्ट परत इथून नव्याने सुरु होते.

 

रोहिणी फुलपगार

 


 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)