जुनाट वेदना: मन आणि शरीर यांचा परस्पर संबंध (भाग 1)

TheMindTalks
0

 

 

             ह्या आर्टिकल मध्ये आपण जुन्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदनांचे स्वरूप, त्याला कारणीभूत ठरणारे मानसिक घटक आणि वेदना आणि मानसिकता ह्यांचा संबंध स्पष्ट करणारे सिद्धांत तसेच ह्यावरचे मानसोपचार ह्यावर प्रकाश टाकणारा आहोत.

आपल्या आजूबाजूला आपण अनेकदा अश्या व्यक्ती बघतो कि त्या सतत कोणत्या ना कोणत्या दुखण्याने सतत त्रस्त असतात, वेगवेगळ्या डॉक्टर्स कडे चकरा मारून दमलेल्या असतात. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात पण दुखण्याला आराम पडत नाहीवरून हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत असे ही अनेकदा त्यांना ऐकवले जाते त्यामुळे तर ह्या व्यक्ती अजूनच त्रासात राहतात.

सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत, डॉक्टरांना क्लीनिकली काही आढळले नाही,त्यांचे सगळे उपचार करून झालेत, पण वेदना आहेत !

अश्या वेळी खरंच त्या वेदना खोट्या असतात का ? अश्या त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीचे दुखणे हे खरोखर दुखणे नसते का ?

एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मी म्हणेल कि नक्कीच हे दुखणे खोटे नाही, अश्या व्यक्तीला जाणवणाऱ्या वेदना ह्या खऱ्याच आहेत.

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर स्टडी ऑफ पेन ह्या वेदनांचे निदान, संशोधन, आणि उपचारांविषयी काम करणाऱ्या जागतिक संस्थेच्या मते वेदना म्हणजे शरीरातील उतींचे वास्तविक नुकसान आणि हानी किंवा उतींच्या नुकसान किंवा हानी च्या संभाव्य शक्यतेमुळे निर्माण होणारा जटील आणि व्यक्तिसापेक्ष अप्रिय संवेदनात्मक आणि भावनिक अनुभव!

वेदनेच्या व्याख्येतील महत्वाचे भाग म्हणजे ; वास्तविक, संभाव्य शक्यता, व्यक्तिसापेक्ष,अप्रिय, संवेदनात्मक आणि भावनिक अनुभव!

वेदना ह्या वास्तविक शारीरिक हानीमुळे होतातच पण शारीरिक हानीच्या शक्यतेमुळे निर्माण होणाऱ्या भीतीमुळे सुद्धा निर्माण होतात!

वेदना हा एक व्यक्तिसापेक्ष आणि बहुआयामी अनुभव आहे आणि प्रत्येक व्यक्तीला वेदनेचा येणारा अनुभव हा वेगळा असतो.

उदा . एकाच वयाच्या, एकाच सामाजिक, आर्थिक परिस्थिती असलेल्या, एकाच ठिकाणी नि एकाच प्रकारची इजा ,10 पुरुषाना झाली असेल तरी त्या प्रत्येकाची वेदना आणि वेदनेची तीव्रता वेगळी असते . कोणत्याच दोन व्यक्तीची वेदनेची अनुभूति किंवा pain perception 100% मॅच होत नाही.

जेव्हा आपण वेदनेच्या स्वरूपाचा चा अभ्यास करतो तेव्हा त्यात आपल्याला संवेदना,भावना आणि आकलन हे सायकॉलॉजीकल घटक सापडतात.

संवेदनात्मक घटक म्हणजे वेदनेची जागा, वेदनेची तीव्रता आणि वेदनेची संवेदना जसे की जळजळ , एकसारखी वेदना, थ्रोबिंग वेदना, टोचल्यासारखी वेदना.

भावनिक घटकांमध्ये मध्ये वेदनेला दिला जाणारा नकारात्मक प्रतिसाद किंवा वेदनेमुळे होणारी मनाची तीव्र नकारात्मक अवस्था  (उदा . वेदनेची भीती ,वेदनेबद्दल चिंता, वेदनेच्या आठवणीने मळमळ येणे , वेदनेमुळे निर्माण होणारे नैराश्य  )

आकलनात्मक घटकांमध्ये वेदनेला दिला जाणारा cognitive रिस्पॉन्स म्हणजेच बोधनीक प्रतिसाद असतो . ह्या वेदना मला सहनच होणार नाही , मी ह्या वेदनामध्ये च राहणार, कोणत्याही डॉक्टर्स ला ह्या कमी करता येणार नाही , हे किती भयानक आहे.इत्यादी .

व्यक्तीचा cognitive response त्याचे वेदनाबाबत चे आकलन बदलवते! उदा जर एखादा त्याच्या वेदनाचे अतिरंजित चित्रण करत असेल तर त्याच्या वेदनेची तीव्रता जास्त असते .

मग एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो... वेदना तज्ज्ञांनी आपले लक्ष या मानसिक घटकांकडे केव्हा वळवले?

१९६५ मध्ये मेल्झॅक आणि वॉल यांचा 'गेट-कंट्रोल थिअरी ऑफ पेन' आणि त्यानंतर १९९० च्या दशकात डॉ. रोनाल्ड मेल्झॅक यांनी सादर केलेला 'न्यूरोमॅट्रिक्स थिअरी ऑफ पेन' यानंतर, १९६० च्या दशकाच्या अखेरीस वेदना व्यवस्थापनामध्ये मानसिक दृष्टिकोन समाविष्ट करण्यात आला.

१९६५ पूर्वी, वैद्यकशास्त्र मोठ्या प्रमाणावर देकार्तच्या 'स्पेसिफिसिटी थिअरी'वर अवलंबून होते.

या मॉडेलनुसार वेदना म्हणजे ऊतींचे नुकसान असे मानले जात असे. जर एखाद्या रुग्णाने तीव्र वेदनेची तक्रार केली, परंतु डॉक्टरांना तुटलेले हाड किंवा फाटलेली ऊती सापडली नाही, तर त्या रुग्णाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जायचे, तो नाटक करत असल्याचा आरोप केला जायचा, किंवा हे सर्व निव्वळ मानसिक आहे ("हे सर्व तुझ्या मनात आहे") असे सांगितले जायचे. ही एक कठोर, ताठर आणि एकतर्फी पद्धत होती.

१९६५ चा 'गेट कंट्रोल थिअरी' हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

डॉ. रोनाल्ड मेल्झॅक (एक मानसशास्त्रज्ञ) आणि डॉ. पॅट्रिक वॉल (एक न्यूरोफिजिओलॉजिस्ट) यांनी 'गेट कंट्रोल थिअरी' सादर करून हे जुने मॉडेल मोडीत काढले. त्यांनी असे प्रतिपादन केले की, मणक्यामध्ये एक न्यूरोलॉजिकल 'गेट' असतो, जो वेदनांचे संकेत एकतर रोखू शकतो किंवा त्यांना मेंदूपर्यंत पोहोचू देतो. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी दाखवून दिले की हा गेट केवळ दुखापतीच्या जागेवरूनच नियंत्रित होत नाही; तर तो मेंदूतून खाली येणाऱ्या संकेतांद्वारेही नियंत्रित होतो. विचार, चिंता, लक्ष आणि भूतकाळातील अनुभव मणक्यामधून खाली संकेत पाठवून गेट पूर्णपणे उघडू शकतात (वेदना वाढवणे) किंवा गेट बंद करू शकतात (वेदना कमी करणे).

ही पहिलीच वेळ होती जेव्हा विज्ञानाने गणितीय आणि न्यूरोलॉजिकलदृष्ट्या हे सिद्ध केले की मन थेट शारीरिक वेदना प्रक्रियेत बदल घडवते.

'गेट कंट्रोल'ने तीव्र वेदनांचे अचूक स्पष्टीकरण दिले असले तरी, डॉ. मेल्झॅक यांच्या लक्षात आले की, लोकांना फँटम लिंब पेन (अवयव कापलेल्या भागातील वेदना) किंवा कोणतीही दुखापत नसताना संपूर्ण शरीरात होणाऱ्या तीव्र वेदना का जाणवतात, याचे स्पष्टीकरण यातून पूर्णपणे मिळत नाही. यामुळेच त्यांनी १९९० मध्ये न्यूरोमॅट्रिक्स सिद्धांत मांडला. मेल्झॅक यांनी असा युक्तिवाद केला की, मेंदूमध्ये एक व्यापक चेतासंस्थेचे जाळे (न्यूरोमॅट्रिक्स) असते, जे शरीरासाठी आवेगांचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना ("न्यूरोसिग्नेचर") निर्माण करते. तीव्र वेदनेच्या वेळी, हे चक्र अडकून राहते. सुरुवातीची शारीरिक इजा पूर्णपणे बरी झाल्यानंतरही मेंदू "वेदना न्यूरोसिग्नेचर" निर्माण करत राहतो. मनोसामाजिक वातावरण—म्हणजेच दीर्घकालीन ताण, बालपणीचा आघात, भीती आणि सामाजिक एकाकीपणा—हे इंधनाप्रमाणे काम करते, जे या न्यूरोमॅट्रिक्सला धोक्याचे संकेत पाठवत राहते.

या सिद्धांतांनुसार, मनोसामाजिक आणि शारीरिक प्रक्रिया केवळ वेदनेच्या जाणिवेवर, प्रसारणावर आणि मूल्यांकनावरच परिणाम करत नाहीत, तर त्यांच्या प्रभावामुळेच दीर्घकाळ टिकणारी आणि तीव्र वेदना कायम राहते.

या सिद्धांतांमुळे, वेदना व्यवस्थापनाचा पूर्वीचा 'एकतर्फी' दृष्टिकोन—जो केवळ जैविक घटकांवर लक्ष केंद्रित करत होता—बदलून त्यात इतर पैलू, म्हणजेच मनोसामाजिक घटकांचा समावेश झाला. म्हणूनच हे सिद्धांत इतके अत्यंत महत्त्वाचे आहेत.

ह्या सिद्धांतामुळे वेदना उपचारांमध्ये पेशंटचे जेव्हा मानसशात्रीय घटक विचारात घ्यायला सुरुवात झाली तेव्हा लक्षात आले की कोणतीही वेदना एकटी येत नाही; ती नेहमीच आपल्या सोबत्यांना सोबत घेऊन येते.

चला तर मग, वेदनेसोबत येणारे हे अदृश्य सोबती कोण आहेत आणि ते आपल्या वेदनांवर कसा परिणाम करतात, हे या लेखाच्या पुढील भागात सविस्तर जाणून घेऊया. (क्रमशः)

 

रोहिणी फुलपगार

9637665522

Consultant Psychologist, RCI Registered Mental Health Professional,

trained Life Coach (Erickson) RCI CRR No: A121803

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)