हानिकारक कोपिंग मेकॅनिझम -2

TheMindTalks
0

 

आपले व्यक्तिमत्व वैशिष्ट्य, सांस्कृतिक नियम आणि महत्वाचे म्हणजे आपले भूतकाळातील अनुभव ह्यावर आपली कोपिंग मेकॅनिझम ची निवड अवलंबून असते. 


मागील भागात कोपिंग मेकॅनिझम म्हणजे काय हे बघितले आहे, ह्या भागात हानिकारक  कोपिंग मेकॅनिझम बद्दल माहिती करून घेवूया . 

बहुतेक वेळा असे आढळून आले आहे की आपल्या कोपिंग मेकॅनिझमचे मूळ हे आपल्या बालपणात दडलेले असते आणि आपण सुरुवातीच्या काळात ज्या शैलीशी जोडतो तेच आपल्या कोपिंग ला आकार ही देतात. जसे की लहानपणी आपल्याला योग्य आणि उपयोगी कोपिंग मेकॅनिझमचे उदाहरण समोर दिसत नसेल किंवा आपल्या योग्य प्रतिसादाची खिल्ली उडवली असेल वा मस्करी केली गेली असेल, तिला चुकीचे ठरवले असेल किंवा एखाद्या व्यक्तीला अस्थिर आणि हिंसक वातावरण मिळाले असेल की जिथे पदोपदी तणावाला सामोरे जावे लागत असेल तरी अश्या व्यक्तींचा कल हानिकारक कोपिंग मेकॅनिझम स्वीकारण्याकडे अधिक असतो . 

     बहुतेक व्यक्तींना उपयोगी आणि योग्य कोपिंग मेकॅनिझम काय असते हेच माहीत नसते त्यामुळे आज्ञानामुळे सुद्धा ते हानिकारक कोपिंग मेकॅनिझम कडे वळतात. यात सामाजिक सपोर्ट आणि  उपयोगी व योग्य कोपिंग मेकॅनिझमबद्दल ची माहिती वा रिसोर्स उपलब्ध नसणे हे व्यक्तीच्या  कोपिंग मेकॅनिझमला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

    साधारणपणे हानिकारक  कोपिंग मेकॅनिझम चे वाईट सवयींमध्ये पटकन रूपांतर होते. आपल्या तणावाना ऑटोमॅटिक आणि चुकीची प्रतिक्रिया सतत देण्याने त्याच प्रतिक्रियेची सवय होवून जाते. अश्या वेळी आपल्या जवळच्या प्रियजणांकडून मदत मागणे किंवा व्यावसायिक मदत घेणे गरजेचे ठरते. 

  व्यक्ति प्रतिकूल प्रसंगाला किंवा तणावपूर्ण भावनिक आवेगाला सामोरे जाण्यासाठी ज्या अपायकारक वा नुकसानकारक स्ट्राटेजी वापरतात त्यांना अयोग्य, हानिकारककोपिंग मेकॅनिझम म्हणतात. 

  हानिकारक कोपिंग मेकॅनिझम समजून घेणे गरजेचे आहे कारण आपल्यामध्ये आपल्या कोपिंग मेकॅनिझम बद्दल जागरुकता निर्माण झाल्यास त्याच्या परिणामाबद्दल आपण सावध होवून पुढील हानी टाळू शकतो. 




  आता आपण काही  अश्या हानिकारक  कोपिंग मेकॅनिझम बघूयात की ज्या आपल्याला आव्हानात्मक आणि अवघड प्रसंगात तात्पुरत्या उपयोगी वाटतात परंतु त्यामुळे  दीर्घकालीन मानसिक, भावनिक आणि शारीरिक नुकसान होते.

1 व्यसनाधीनता : अल्कोहोल,मादक द्रव्यांच्या अधीन होणे , झोपेच्या गोळ्यांची सवय लावून घेणे ही सर्रासपणे स्वीकारली जाणारी अयोग्य, हानिकारक कोपिंग मेकॅनिझम आहे. ह्या पदार्थामुळे तात्पुरता आराम मिळतो पण त्यामुळे व्यसनाधीनता वाढून मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

2 टाळणे आणि नाकारणे : टाळणे आणि नाकारणे म्हणजे प्रतिकूल  आव्हानात्मक परिस्थितीकडे दुर्लक्ष कारणे आणि तणावग्रस्त भावना दडपून टाकणे. ही प्रतिक्रिया आपल्या भावनिक प्रक्रिया करण्यात अडथळा निर्माण करून चिंता आणि तनाव वाढविण्यास हातभार लावतात. जर आपण आपल्या समस्या सोडवण्याचे टाळले किंवा ह्या समस्या अस्तित्वात आहे हेच नाकारले तर आपण त्या कधीच सोडवू शकत नाही. ही मेकॅनिझम व्यक्तीमध्ये गतिशून्यता, साचलेपण, आणि निष्क्रियता निर्माण करते की जी तिच्या भावनिक प्रगतीमधील मोठा अडथळा ठरते .

3 स्वतःला नुकसान पोहोचवणे : आत्महत्येचा प्रयत्न; स्व:ताला जाळून घेवून किंवा धारदार वस्तूने कापून घेवून करणे.  ही कोपिंग मेकॅनिझम त्रासदायक आणि तुम्हाला हवा त्यापेक्षा उलटा परिणाम करणारी आहे. या वर्तनामुळे तात्पुरते नियंत्रण आणि परिणाम साधता येतो पण भावनिक अशांतता वाढते नि शारीरिक अपायांचा धोका वाढतो.

4 नकारात्मक स्व -संवाद : जेव्हा आपण स्वत:ला दूषणे देतो किंवा स्वतःला कमी लेखतो तेव्हा आपण नकारात्मक स्व-संवादा मध्ये गुंतून जातो ह्याच्या परिणामस्वरूप आपला आत्मसन्मान कमी होतो नि नैराश्य वाढते. ह्या कोपिंग मेकॅनिझम मधील नकारात्मक विचारांचा जोर आणि स्वतःबद्दलचे नकारात्मक अनुमान अथवा निष्कर्षमुळे तनाव आणि स्ट्रेस वाढतो आणि खूप काळ टिकतो सुद्धा ! नकारात्मक स्व -संवाद ही सामान्यपणे वापरली जाणारी कोपिंग मेकॅनिझम आहे परत तिचा वापर प्रतिकूलतेमध्ये स्वतःला धोक्यापासून वाचवण्यासाठी संरक्षणात्मक रणनीती म्हणून सुद्धा केला जातो . परंतु ही मेकॅनिझम व्यक्तीला जीवनाच्या अनेक क्षेत्रात मागे खेचते.

5  भावनिक आहार वाढवणे : आपल्या भावना सुन्न करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील तणावाना सामोरे जाण्यासाठी भावनिक आहार किंवा अतिप्रमाणात खाणे अश्या प्रकारच्या कोपिंग मेकॅनिझम अवलंबल्या जातात इतर हानिकारक कोपिंग मेकॅनिझम प्रमाणेच ह्याचे रूपांतर सुद्धा अश्या दुष्टचक्रात होते की प्रतिसादाची ही पद्धतच आयुष्यातील मोठे आव्हान बनून जाते. ज्या व्यक्ति अश्या भावनिक अति खाण्यामध्ये अडकल्या आहेत त्या अपराधिपणा, शरम, आत्म-द्वेष च्या अश्या सापळ्यात अडकतात की त्याचा थेट परिणाम त्यांच्या कोपिंग मेकॅनिझम वर होतो .

6. अलग करणे : आणखी एक हानिकारक कोपिंग मेकॅनिझम म्हणजे स्वतःला सगळ्या सामाजिक संवाद, प्रक्रियेमधून अलिप्त करणे. आपल्या मित्र नातलगापासून स्वत:ला अलिप्त ठेवणे किंवा भीती मुळे स्वतःला एकटे करणे ही मेकॅनिझम मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या निर्माण करते. जेव्हा आपण इतर लोकांशी संबंध तोडतो तेव्हा आपण स्वतःला मानवी परस्परसंबद्ध , संवाद जे भावनिक निकोप वाढीसाठी महत्वाचे आहेत त्यापासून वंचित करतो त्यामुळे तणावातून सावरण्याच्या आणि विकसित होण्याच्या आपल्या संधि कमी होतात .

7 चलढकल करणे (प्रोकरीस्टीनेशन) ; महत्वाची कामे टाळणे किंवा ती करण्यास विलंब कारणे ही एक हानिकारक कोपिंग मेकॅनिझम आहे, ज्यात आपण आपले महत्वाचे कार्य टाळतो किंवा त्याला उशीर करतो  कारण जर ते परफेक्ट झाले नाही किंवा त्यात अपयश आले तर त्या परिस्थितीला हाताळणे आपल्याला अवघड जाईल असे वाटते. हयात परत विलंबनामुळे आपल्याला तात्पुरती सुटका झाल्यासारखी वाटते कारण इथे आपण शक्यतेच्या क्षेत्रात असतो जिथे ते काम आपण परिपूर्ण पद्धतीने करू आणि त्यात अपयश येणार नाही ह्या कल्पनांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवतो. तथापि दिरंगाईमुळे दीर्घकाळ आपला ताण वाढतो, आत्म कार्यक्षमतेची भावना कमी होते आणि अपराधिपणा, लज्जा ह्या भावना वाढीस लागतात.

8 जास्तीचे काम करणे : आपल्यापैकी बरेचजण एकटेपणा, परकेपणा, उद्देश्यहीन आयुष्य, रिकामेपण, एखाद्या व्यक्तीचा वियोग ह्या सगळ्याना तोंड देण्यासाठी स्वतःला कामात अक्षरश: डुबवून घेतात. व्यक्ति जीवनातील इतर क्षेत्रातील समस्या जसे की कौटुंबिक, नातलग, व्यावसायिक भागीदारी इत्यादि समस्यांपासून पळण्यासाठी कामात गुंतवून ठेवणे हे स्व -संमोहन केल्यासारखे ह्या कोपिंग मेकॅनिझम चा  वापर करतातपरंतु ह्या कोपिंग मेकॅनिझम मुळे तुम्ही समस्या टाळू शकत नाही तर ज्या टाळण्याचा प्रयत्न करत आहेत त्या आधीक आव्हानात्मक बनतात. आपण जेवढा वेळ जास्तीच्या कामाना देतो तेवढे जीवनाचे इतर क्षेत्रांमध्ये रिकामेपण वाढत जाते, पोकळी निर्माण होते. मग ह्या पोकळीला थांबवणे आणि सहन कारणे अवघड होते, इतकेच काय तर जास्त काम केल्याने बर्नआऊट होण्याचा धोका सुद्धा वाढू शकतो . एकूणच जीवनातील समाधान कमी होवून तनावसबंधीत शारीरिक समस्या निर्माण होतात .

9 आक्रमकता :  आक्रमकता अशी हानिकारक  कोपिंग मेकॅनिझम आहे ज्यामध्ये राग ,निराशा ,चिडचिड अस्वस्थता ही अपायकारक आणि अयोग्य मार्गाने व्यक्त होते . आक्रमकतेमुळे जवळच्या नातलगांमधील  संबंध ताणले जावून त्याची परिणीती इतराना हानी पोहोचण्यात आणि प्रियजन दूर जाण्यात होते .    

10 स्क्रीन टाइम वाढवणे : आपण अप्रिय भावना आणि विचार सुन्न करण्यासाठी सोशल मीडिया किंवा ओ टी टी चा आधार घेतो. अवघड आणि आव्हानात्मक काम टाळण्यासाठी जास्तीतजास्त स्क्रीन वर वेळ घालवतो. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्ति कामासाठी स्क्रीन वापरतात, कोणी नवीन कल्पनासाठी, प्रोत्साहित होण्यासाठी किंवा रीलॅक्स होण्यासाठीही स्क्रीन वापरतात . खूप व्यक्तीना सोशल प्लॅटफॉर्म वर वेळ वाया घालवल्यामुळे अपराधी वाटते. स्क्रीन टाइम कोपिंग मेकॅनिझम मुळे ऑनलाइन जुगाराचे , शॉपिंग चे व्यसन लागते कधींकधी आपण एवढा वेळ मोबाइल /लॅपटॉप वर असतो की आपले दैनंदीन कामाला सामोरे जावू शकत नाही, वास्तविक जीवनातील नातेसंबंध आणि स्वतःची काळजी ह्याकडे दुर्लक्ष होते .

         वरील 10 हानिकारक कोपिंग मेकॅनिझम आहेत की ज्यांचा व्यवस्थित अभ्यास केला तर लक्षात येते की ह्यांचा जरी तात्पुरता उपयोग होत असेल तरी ह्यामुळे आपले मानसिक ,भावनिक ,शारीरिक आरोग्य ढवळून निघते.

रोहिणी फुलपगार 

                

                कृतज्ञता बद्दल जाणून घ्या 

                      कृतज्ञता

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)