मनोरंजनाची दुनिया आणि आपण..!

TheMindTalks
0
  

मनोरंजनाची दुनिया आणि आपण


आज संध्याकाळी सोसायटी मध्ये राऊंड मारताना राधिका दिसली .जरा गप्पा मारु या म्हणून बसले बेंच वर तिच्या शेजारी. स्वारीचा मूड जरा बिघडलेलाच वाटत होता.. बघू या काय चाललंय मनात ! थोडसं 'काय'.. 'कसे'.. 'का'.. 'कुठे'.. 'कधी'.. ने सुरुवात केली की समोरचा धबधबा कोसळायला सुरुवात करतो..अनुभव आहे.
                          हळूहळू सुरुवात झाली, बघा ना ताई !! कसा वागतो हा रमेश ! व्हॅलेन्टाईन डे ला मला फक्त विश केले, बाकी काही नाही. ना गिफ्ट ना बलून ना औटिंग! बाकी काही नाही तर एखादं चॉकलेट, बलून तरी द्यायचे ना..त्याचे माझ्यावरील प्रेम कमी होत चाललेय, तो माझी कदर करत नाही, व्हॅलेन्टाईन डे ला तो मला चॉकलेट ही देऊ शकत नाही म्हणजे काय? मी तिची सगळी बडबड ऐकून घेतली आणि एक प्रश्न केला, तुला त्याने व्हॅलेन्टाईन डे ला चॉकलेट, बलून, काहीतरी गिफ्ट दिले पाहिजे किंवा रोमँटिक डिनर ला नेले पाहिजे असे का वाटतेय
    अग का म्हणजे ?असेच करतात.. तू फिल्म्स किंवा सिरिअल मध्ये नाही का पाहत! त्या अमुक फिल्म मध्ये शाहरुख ने नाही का माधुरी साठी असेच केले होते..आणि त्या xyz सिरिअल मध्ये पण अभि ने प्रज्ञा साठी हेच केले होते.त्यांचे खूप प्रेम होते म्हणूनच केले ना अभि ने प्रज्ञा साठी..
म्हणजे हे सगळे नाही केले तर जोडीदारा चे प्रेम नाही किंवा कदर नाही !! मनात हसायलाच आले.
फिल्मस्.. सिरिअल्स चा किती मोठा प्रभाव असतो ना आपल्या जगण्याबद्दल च्या धारणेत..(psychology च्या term  मध्ये core beliefs)
प्रेमाचे प्रतीक लाल गुलाब च आहे हा समज/विचार धारणा किती तरी पिढ्यांचा आहे.. कश्या मुळे तयार झाला बरं हा समज? पिवळा, गुलाबी, पांढरा गुलाब दिला तर काय प्रेम संपून जाते की प्रेमच नसते?पण हा समज इतका स्ट्रॉंग आहे ना ,14 फेब्रुवारी ला लाखोंची उलाढाल होते Red Roses ची मला वाटते यात खूप मोठा वाटा फिल्मस्, सिरीयल आणि व्हिडीओ अलम्बस चा असतो.
Films ह्या प्रत्येक पिढीचे वैचारिक धारणा (beliefs) बनवण्यात मोठी भूमिका असते.एका पिढीत असे होते की प्रेम म्हणजे बलिदान.. एकाने दुसऱ्या साठी आपल्या प्रेमाचे, भावनांचे बलिदान करणे आणि त्या काळातील films ही तश्याच असायच्या.., दिल अपना प्रीत पराई, दिल एक मंदिर, मैं चूप रहूनंगी.. खूप मोठी लिस्ट आहे यातील आदर्श नायक/नायिका म्हणजे जो सर्वात जास्त आपले सुख त्यागतो..
  तसेच घरातील नात्या बाबत पण..आदर्श सून म्हणजे 24 तास घरातील काम तोंडातून ब्र न काढता करणे,परत नवऱ्याचे , सासू सासऱ्यांचे त्यांना झोप येईपर्यंत पाय दाबून देणें.. मग ती सून आशा काळे, अलका कुबल च्या पंगतीला बसते.
सासू ,नणंद ह्या त्रास देण्याऱ्या च असतात..थोड्याश्या कडक स्वभावाच्या सासूला किंवा ननंदेला ललिता पवार ची उपमा मिळते.
ह्या films ,सिरिअल  एखाद्या व्यक्तीचे भावविश्व कसे व्यापून टाकते विशेषतः स्त्री वर्गाचे, हे त्यांच्या गप्पांमधून, चॅटिंग मधून कळत जाते. सद्याचे तर टॉप विषय म्हणजे सगळ्या सिरीयल चे नायक, नायिका, आणि व्हिलन..
परवा भाजी मंडई त भाजी घेताना दोन लेडीज विक्रम सरंजामे असा कसा निघाला ग.. मला तो किती आवडायचा यावर चर्चा करत होत्या आणि भाजीवाला पण माप करायचं सोडून त्यांची चर्चा ऐकत होता!
    ब्रेकअप झाला किंवा प्रेमाची परिणीती लग्नात नाही झाली तर व्यसनाच्या आहारी जाणे/देवदास  बनणे नाहीतर 'आदमी एक बार जिता हैं, एक बार मरता हैं और प्यार भी एक बार हीं करता हैं 'ह्या तत्वज्ञाना ला जागून आयुष्याला दुसरा चान्स न देता एकटं राहणं.. हे सगळं कुठून येते!
सगळेच काही हे तत्वज्ञान पाळत नाहीत. अपवाद असतोच की! त्यात ही बहुतेक " छोड दे सारी दुनिया किसीं के लिए,ये मुनासीब नहीं आदमी के लिए..प्यार से भी जरुरी कई काम हैं प्यार सबकुछ नहीं जिंदगी के लिए" हे तत्वज्ञान पण आचरणात आणतात..सगळ्या तत्वज्ञानाच्या मुळाशी फिल्मस् च!
  आताच्या तर बहुतेक आयांची आपल्या मुलांना मोठं करण्याची समज ही टी व्ही आणि ऍडव्हरटाईझिंग वर आधारलीय.. ज्या घरात छोटी छोटी मुलं आहेत त्या घरातील शेल्फ वर बोर्णविटा,कॉम्प्लेण, पेडियाशुयर  चे डब्बे, फ्रिज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट, kinder joy, जॅम भरलेले असतात. "मग त्या ऍड मध्ये  दाखवलंय ना,मुलगा किसान जॅम चा पोळी रोल पटकन खातो.. I am complaion boy म्हणत कसा तो छोटा चटचटा उडया मारत खेळायला बाहेर पडतो.. bornvita टाकले की मुलं कशी पटकन दूध पितात" हे आणि इतर अशीच थोड्या फार फरकाने विचार धारणा बनते बहुतेक जणींची..
  थोडक्यात काय तर जसजशी टी व्ही च्या मनोरंजनाच्या जगात सुधारणा होत गेल्या तस तसे ते जग व्यक्तीच्या खाजगी ,वैचारिक ,भावनिक जगात जास्तच शिरकाव करू लागले.. एक सगळे जण observe करू या ना.. जर तुम्ही एखादी सिरीयल रेग्युलर बघत असाल आणि त्यातील एखाद्या पात्राशी कनेक्ट झाला ..त्या पात्राला सिरीयल मध्ये दयनीय दाखवले तर किती तरी लेडीज च्या मनात रिकाम्या वेळी त्या स्पेसिफिक पात्रा बद्दल ऑटोमॅटिक थिंकिग सुरू होते.. किंवा एखाद्या पिक्चर मधला दुःखद सीन जेव्हा नंतर आठवतो तेव्हा तो बघताना ज्या इमोशन्स तयार झालेल्या होत्या त्याच परत अनुभवायास येतात.हेच  सुखद किंवा रोमँटिक सीन बद्दल पण अनुभवयास येते.
आणि आता तर वेब सिरीज नावाचा प्रकार आहे परत धुमाकूळ घालायला.जरा उच्च शिक्षित मॉडर्न म्हणवणाऱ्या लोकांचा ग्रूप सिरीयल ना नाकं मुरडतो, पण रात्र रात्र वेब सिरीज पाहण्यास घालवतो..आणि परत  दिवसभर आता नेक्ट एपीसोड मध्ये काय दाखवणार ह्या विचारात असतो.. रुटीन वर्क चालूच असते.. बॅक ग्राउंड ला हे विचार असतात ना ..
माझ्या एका कलीग ने मध्ये माया नावाची वेब सिरीज पहिली.. त्यानंतर तिने माया बद्दल चे तिचे विचार माझ्याशी शेअर केले.. तिचे जे काही belief बनत चालले होते ते ऐकून हसावे की तिला समजवावे हेच कळेना!
टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप च्या पडद्यावर जे पात्र दिसतात, त्यांच्यात आणि तुमच्यात तुम्हाला दिसते कधीतरी काहीतरी साम्य..पण म्हणून तुम्ही ते पात्र विशिष्ट  प्रकारे वागले/वागतेय तर ह्या सिच्युअशण ला मी ही अशी वागले तर काय चुकीचे आहे असा विचार करून आपण त्या पात्रांशी कोरिलेट नाही करू शकत कारण त्या पात्राचा स्पेसिफिक टाइम संपला की त्याची भूमिका ही संपते..
Films, सिरिअल्स, वेबसिरीज मध्ये unpredictable किंवा अचानक काहीही घडत नसते.. त्यांचा असतो ना कर्ता, करविता.. लेखक, दिग्दर्शक, निर्माता. ते जसे म्हणतील तसेच पात्र हलतात, वागतात!
पण आपल्या आयुष्याचे नाही ना तसे.. आपल्याला कोणी स्टोरी राइटर किंवा डिरेक्टर येऊन सांगणार नाही की पुढच्या 2 तासात हा सीन आहे , तू अशी वाग/असा वाग .आपले आयुष्य हे खूपच unpredictable आहे , नाही माहीत दुसऱ्या तासाला कोणता सीन उभा राहणार आहे आपल्या समोर! कशाला हवेत मग हे मायावी दुनियेवर आधारलेले मायावी समज आणि कृत्रिम विचार धारणा?  
वापरूया ना आपली सद्सद्विवेक बुद्धी आणि वस्तूनिष्ठ विचार धारणा आपल्या प्रत्येक नात्यात! मग एखादे वेळी नवरा विसरला वाढदिवसाची तारीख तर त्याला लगेच अरसिक, वाईट ठरवण्या पेक्षा ,व्यक्ती  परिपूर्ण नसते, ती काही गोष्टी, घटना विसरू शकते हे सोपे तत्वज्ञान  मान्य करून स्वतः च द्या ना आठवण त्याला.. घ्या मागून तुम्हाला हवे ते त्याच्या कडून!  पण ह्या साठी जर फिल्मी विचार धारणा कुरवाळत बसला की जसे माझा वाढदिवस हा कसा काय विसरू शकतो! मी आता एवढी important नाही का ह्याच्या साठी.. प्रेम आटून गेलंय याचं.. ! मग काय संपला तुमचा त्या दिवशी चा आनंद!(हे फक्त नवऱ्याच्या बाबतीत नाही तर प्रत्येक नात्यात वापरायला हवे).
शेवटी आपण आयुष्य जगतो म्हणजे तरी काय ? हे जे आपले core belifs आहेत, आपले विशिष्ठ समज ,आपल्या धारणा आहेत जगण्या बद्दलच्या त्या नुसार अनुकूल असे आजूबाजूला घडत गेले म्हणजे आयुष्य सुकर चाललेय असे आपण म्हणतो आणि त्याच्या प्रतिकूल थोडे जरी झाले तरी आयुष्यात काही उरले नाही असे मानतो..
  मग काय चला.. असे प्रतिकुल घडतेय असे वाटले तर चेक करत जायची आपली विचार धारणा, स्पेसिफिक समज वेळोवेळी तर्कसंगत वैचारिक दृष्टिकोनावर.. आयुष्य खुपच आनंददायी नसले तरी ते तुमच्या पुरते आनंददायी आणि सहज, सुकर होऊन जाईल.. कोणत्याही फिल्मी तत्वज्ञान तुमचा आणि तुमच्या नात्यातील आनंद हिरावून घेणार नाही.
आनंदात राहा.. मजेत जगा..

रोहिनी खरात फुलपगार
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट

9604968842

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)