नकारात्मक विचारांवर मात - सकारात्मक मनाचा प्रवास!
लहानपणी मी माझ्या दादांकडून एक गोष्ट
ऐकली होती. एक बिचारा गरीब माणूस शेतीतील, घरातील कामाने वैतागलेला असतो , त्याला शेतात एक हंडा सापडतो
,पण त्यात धन नसून एक यक्ष असतो. यक्ष प्रसन्न होतो आणि शेतकऱ्याला सांगतो कि मी आता तुझ्यासोबत राहणार पण मला तू सतत काम दिले पाहिजे नाहीतर मी तुझे डोके खाऊन टाकेल. शेतकरी त्याला शेत नांगरण्याचे काम देतो, घर बांधण्याचे, विहीर पाण्याने भरण्याचे, पूर्ण बाग खोदण्याचे,
सगळ्या झाडावरील नारळ काढण्याचे, अगदी झाडांची पाने हि मोजण्याचे काम देतो, पण हा यक्ष असतो! सगळी कामे चुटकीसरशी पूर्ण करतो, शेतकऱ्याकडे येऊन “मला काम दे नाहीतर तुझे डोके खातो” असं म्हणायला लागला. गरीब माणूस बिचारा घाबरून पळायला लागला . इथपर्यंत गोष्ट संपते , पण मला वाटते कि खरी गोष्ट
इथूनच सुरु होतेय, यक्षाचा डोके खाण्याचा शब्दशः अर्थ डोक्यात जाण्याचा असणार ! यक्षाने गरीब माणसाला गाठले आणि त्याच्या डोक्यात प्रवेश केला. झाले ! तिथून माणसाचे डोके अखण्ड
कामाला लागले .
आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात मेंदूरूपी यक्ष आहे , तो सतत कार्यरत आहे , तो विचारांचा अखंड प्रवाह वाहत ठेवतो .त्याला काही देणेघेणे नाही कि किती विचार सकारात्मक आहे , किती नकारात्मक आणि किती न्यूट्रल विचार
आहेत. पण आपला मेंदू काही शांत बसत नाही त्याचप्रमाणे आपल्यालाही स्वस्थता लाभू देत नाही.
खरंतर आपले विचार
म्हणजे आपला स्वतःशी संवाद असतो, आणि तो स्वतःशी बोलणे किंवा
स्वतःला काही प्रतिमा दाखवणे ह्या स्वरूपात आपला मेंदूरूपी यक्ष करत असतो! हा संवाद सकारात्मक,नकारात्मक आणि बिनकामाचा असा असतो .
आपल्या ह्या विचारांपैकी नकारात्मक विचार आपल्याला जास्त त्रासदायक ठरतात
आणि आपल्या प्रत्येकाची त्याच्यापासून सुटका करून घेण्याची धडपड चालू असते.
आपले मन हे एकाद्या विस्तृत बागे सारखे
आहे ज्यात तण, कुसळे, काटेरी वेली सोबत सुवासिक फुलझाडे , फळझाडे नाजूक
फुलांच्या वेली सुद्धा उगवतात. पण जर आपण त्या बागेची मशागत केली नाही, त्रासदायक तण , गवत वेळीच नष्ट केले नाही तर फुलझाडे , फळझाडे कशी जोपासणार? जेव्हा आपण हे तण, गवत बाजूला करतो तेव्हा बाग फुलते, बहरते! आपल्या मनाचे हि तसेच आहे जेव्हा आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांना बाजूला करू शकतो तेव्हाच आपल्या मनातील सकारत्मक आणि उत्साहवर्धक विचारांची जोपासना होते .
आपली मनाची बाग संतुलित राहण्यासाठी नकारत्मक विचार कसे हाताळायचे आणि त्यांना कसे बाजूला करायचे ते पाहुयात !
A आपल्या नकारात्मक विचारांचे स्वरूप समजून
घ्यायचे
नकारत्मक विचार हे स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक असतात, ह्या विचारांची सतत पुनरावृत्ती होत असते आणि ज्या संभाव्य वाईट अंदाजाबद्दल असतात त्यांचे अतिरंजितपणे चित्रण करतात. ह्या विचारांमध्ये सतत स्वतःला किंवा
दुसर्यांना दोषारोपण करणे चालू असते. हे परिस्थितीमधील तथ्य ना पाहता
जे परिस्थितीचे अनुमान काढले तेच सत्य मानतात.
नकारात्मक विचारांचे पुढील पॅटर्न आहेत :
- अतिरंजितपणा: सर्वात वाईट परिणामांची कल्पना करणे आणि त्यानुसार स्व संवाद करणे.
- टोकाची भूमिका घेणे: ह्यात आपण ब्लॅक अँड व्हाईट म्हणतो तशी पूर्ण दोन टोकाच्या विचारांना बाळगणे, मध्यममार्गीय आणि लॉजिकल विचारना इथे थारा नसतो.
- अतिसामान्यीकरण: आपण पराचा कावळा करणे म्हणतो त्याप्रमाणे हे विचार एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा मोठा बाऊ करून अवडंबर करतात.
- निराधार निष्कर्ष: ह्यात एखाद्या सामान्य घटनेचा काहीतरी अंदाज बांधून , अंदाजांवर आपले मत कायम ठेवतात आणि त्यानुसार नकारात्मक विचार सुरु होता. इथे जे निष्कर्ष काढलेत किंवा अंदाज बांधलेत त्याला काही पुरावा हि नसतो!
- भावनिक तर्क: ह्यात मला वाटतेय एखागी गोष्ट खरी आहे तर ती खरीच असणार आणि त्यानुसारच गोष्टी असणार ह्यावर आधारित नकारात्मक विचार सुरु असतात. मला जे वाटतेय ते योग्य!
- निवडक फिल्टरिंग: सगळ्या सकारात्कम बाजूंकडे दुर्लक्ष करून फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे.
- स्वतःला दोष देणे: ज्या गोष्टींशी आपण संबंधित नाही किंवा आपला काही त्यात रोल नाही अश्या गोष्टींची सुद्धा जबाबदारी घेऊन स्वतःला दोष देत राहणे.
- अवास्तव अपेक्षा: आपल्याकडून, आपल्या जवळच्या व्यक्तींकडून आणि आजूबाजूच्या जगाकडून अवास्तव, स्वप्नरंजित अपेक्षा ठेवणे
जेव्हा आपल्याला नकारात्मक विचारांचा सापळा तोडायचा आहे तर त्यातील पहिली कृती आहे कि आपल्या नकारात्मक विचारांचे स्वरूप ओळखणे.
B आपल्या विचारांना चॅलेंज करणे :
आपल्या नकारत्मक विचारांचा पॅटर्न ओळखला कि दुसरी कृती आहे त्याला चॅलेंज करणे, आव्हान देणे ,त्याची उलटतपासणी सुरु करणे ! ह्यासाठी स्वतः काही प्रश्न विचारने आवश्यक आहे :
· मी जसा विचार करतोय तशी परिस्थिती खरंच भयंकर आहे का ?
·
मी जे निष्कर्ष काढतोय त्याला पुरावा काय आहे हेने करून ह्या निष्कर्षात तथ्य आहे ?
·
माझे भूतकाळातील अनुभव माझ्या सध्याच्या विचारांना तर रंग देत नाही?
·
मी माझ्या नियंत्रनाबाहेरील गोष्टींची जबाबदारी घेत आहे का ?
·
मी पूर्ण
दृश्याऐवजी एका छोट्या तपशिलावर लक्ष केंद्री करत आहे का ?
·
मी परिस्थिती विहंगम दृष्टीने न पाहता कपोत दृष्टीने पाहत आहे काय ?
·
फक्त मला वाटतेय म्हणजे गोष्टी तश्याच झाल्या पाहिजेत हा माझा दुराग्रह आहे का ?
ह्या प्रश्नांनी जेव्हा तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांची उलटतपासणी सुरु करता तेव्हा तुम्हाला आपोआप आपले नाकारत्मक विचार आपल्याला कुठे चुकीच्या ठिकाणी नेत आहेत हे कळते .तुमच्या मध्ये स्वतःच्या विचारांबद्दल एक अंतर्दृष्टी तयार होते जी तुम्हाला सतत जागरूक ठेवते.
C स्वतःशी मैत्री करा.
आपण स्वतःशी खूप नकारात्मक आणि कठोर बोलत असतो. तुमची एखादी जिवलग यक्ती
असेल ज्याच्याशी तुमची
मैत्री तुम्हाला गमवायची नसेल तर तुम्ही त्याच्याशी खूप कठोर आणि नकारात्मक संभाषण नाही करणार! तुम्ही त्या जिवलग
मित्राशी ज्या सकारात्मक , दयाळू, प्रेम आणि कनवाळू च्या दृष्टिकोनातून संवाद साधणार कि जेणेकरून त्याचे नुकसान होऊ नये त्याच पद्धतीने स्वतःशी संवाद साधायचा आहे. स्वतःशी समजूतदारपणे वागण्याचा वारंवार सराव करायचा आहे. आपल्या विचारांची पुन:रचना करून नकारत्मक विचारांना सकारात्मकतेकडे वळवायचे प्रयत्न करायचे .
जसे ,
- मी हि परिस्थिती हाताळू शकत नाही ह्या ऐवजी हे आव्हान तात्पुरते आहे ,मी ह्यांच्यातून बाहेर पडू शकतो.
- मला एखादी गोष्ट येत नाही म्हणजे मी अकार्यक्षम किंवा बिनकामाचा नाही , हि माझी शिकण्याची प्रक्रिया आहे आता जरी मला जमत नसेल तरी माळ कधीच जमणार नाही असे नाही .
- फक्त मला वाटतेय म्हणू इतरांनी माझ्यानुसार वागावे हि अपेक्षा व्यर्थ आहे ,कारण इतरांचे सुद्धा एक वैचारिक जग आहे .
- माझ्या अनुकूल परिस्थिती कायमच नसणार आहे ,कधी प्रतिकूल हो असणार आहे आणि त्याला मी तयार आहे ,मि ती परिस्थिती जरी मला त्रास झाला तरी हॅन्डल करू शकतो .
- आजच्या दिवसात काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या पण त्यामुळे पूर्ण दिवस खराब नाही गेला त्यातून इतर काही गोष्टी शिकायला मिळाल्या.
अशाप्रकारचा स्व संवाद
तुमच्या नकारात्मक विचारना थारा देणार नाहीत
.
D सृजनशील ध्येय
आणि सकारात्मक लोक
आपल्या आजूबाजूला सकारत्मक लोकं असू द्या, आपले ध्येय हे सृजनशील ठेवा . आपल्या सभोवती अनेक प्रकारची लोक असतात त्यावर आपला कंट्रोल नाही पण कोणत्या लोकांच्या सानिध्यात जास्त राहायचे आणि कोणत्या लोकांसोबत कमीतकमी राहायचा प्रयत्न करायचा ह्यावर आपला कंट्रोल असतो. मराठीत एक महान आहे , ढवळ्या शेजारी बांधला पवळा , वाण नाही पण गुण लागला, हि म्हण अनेक अर्थाने खरी ठरते, आपला मेंदू
हा अनुकरणातून पटकन शिकतो किंवा ज्याची त्याच्यासमोर सतत आवृत्ती होते , मग ते विचार असो,वर्तन
असो ते स्वीकारतो. त्यामुळे आपल्यासभोवती अश्या लोकांची निवड करा कि जेणे करून तुमच्या नकारात्मक विचारांना जास्त चालना मिळणार नाही .
E वर्तमानात जगा
जेव्हा आपण नकारात्मक विचारांत असतो तेव्हा आपण वर्तमान जगात नसतो . आपण भूतकाळातील घडून गेलेल्या घटना,अपमान, चुका आणि पच्छाताप किंवा भविष्यकाळातील चिंता,धोके संकटे ह्यामध्ये जगत असतो. त्यामुळे जेव्हा नकारत्मक विचार
सुरु होतील तेव्हा जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूला जे चालू आहे त्या सध्याच्या घडामोडींवर लक्ष केंद्रित करण्याचा सर्व करा . ह्यासाठी तुम्हाला माईंडफुलनेस चा सराव करावा लागेल . मुद्दाम आणि प्रयत्नपूर्वक आपले भूतकाळात आणि भविष्यकाळात फिरणाऱ्या म्लान वर्तमानात आणायचे आणि पुनःपुन्हा आणायचे. त्यासाठी काही ध्यान
आणि दीर्घ श्वासाचे व्यायामाचा सराव करणे अपेक्षित आहे. जसे आनापान, स्क्वेअर श्वसन, पोटातून श्वसन , बॉडी स्कॅनिंग इत्यादी.
अजून बाकीचे छोटे मोठे उपाय म्हणजे तुम्ही काय वाचता काय ऐकता आणि काय पाहता
ह्याबाबत जागरूकता बाळगणे . आपण जे काही पंचेंन्द्रिय मार्फत मेंदूला खाद्य
पुरवतो ते आपल्या नकारात्मक विचारांची निर्मिती करतात. सोशल मीडिया वरचे खूप काही आपण आपल्यामध्ये घेत असू कि जे तर्कहीन आणि वास्तवापासून दूर करणारे असते तर आपले विचार हि हळूहळू तसेच आकार घेतात.
आपल्याला नकारात्मक विचारांचा खूप त्रास होत असेल तर ते सगळे एका पानावर लिहून ते पण फाडून टाकणे किंवा
आपल्या जवळच्या व्यक्तींशी ह्याबत संवाद करणे. एका वेळी एकाच समस्येवर लक्ष केंद्रित करणे.
आपल्याला अगदी गरज पडली तर ह्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची मदत घेणे .
नकारात्मक विचारांवर मात करणे म्हणजे त्याला शत्रू समजणे नव्हे
त्या विचारांना समजून
घेऊन त्यांना योग्य
दिशा देणे आहे. प्रत्येक दिवस हा नवा आरंभ असतो -नवे विचार, नवी ऊर्जा ,नवीन शक्यतेची संधी घेऊन येतो, मनातील नाकारत्मक विचारांमुळे अस्वस्थ न होता त्यांना योग्य तार्किक आणि सकारात्मकतेमध्ये रूपांतरित करा. प्रत्येक वेळा जेव्हा मन खचेल, विचारांचे दडपण वाढेल
तेव्हा स्वतःला सांगा, मीच ह्या सगळ्याचा निर्माता आहे, मीच कर्म आणि कर्ता, मीच ह्या सगळ्यांना बदलावणारा!
धन्यवाद
रोहिणी फुलपगार
9604968842

हा लेख खूप छान आहे, रोजच्या जीवनात वर्तमाणात जगण्याची आणि तेही सकारात्मक विचारासाहीत कसा विचार करावा याचे मार्ग दर्शन करणारा आहे. सर्वांनी हा लेख पूर्ण वाचावा अशी मी शिफारस करेन.
ReplyDeleteThank you 🙏
Deleteधन्यवाद.... खूप छान माहितीपूर्ण लेख
ReplyDelete