भावनांच्या ग्रे शेड्स.. ( Series..) भाग 7

TheMindTalks
0

 

भावनांच्या ग्रे शेड्स.. ( Series..) भाग 7  (शेवट)

मत्सर(Unhealthy jealousy) आणि हेवा (Healthy jealousy)

ज्यावेळी आपल्या समोर प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते आणि आपण आलेल्या प्रतिकूल प्रसंगाचा अर्थ पुढीलप्रमाणे लावतो :

आपल्या जोडीदाराबरोबरच्या संबंधांना किंवा आपल्या खूप जवळच्या लोकांच्या सोबत असलेल्या नातेसंबंधांना तिसऱ्या व्यक्तीपासून धोका आहे .

हे नातेसंबंध बिघडायला तिसरी व्यक्ती कारणीभूत आहे .

हि भीती काल्पनिक असली तरी जोडीदाराचे ,आपल्या जवळच्या लोकांचे काही वर्तन ,तिसऱ्या व्यक्तीचे वर्तन आणि बोलणे ह्यातून आपली तशी ठाम समजूत करून घेतो .

त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल मत्सर आणि हेवा ह्या दोन्ही भावना निर्माण होतात .

ज्याप्रकारचे आपले निष्कर्ष ठळक असतात ती भावना प्रभावी ठरते .

              आपण आपल्याला वाटत असलेल्या धोक्याचे,भीतीचे  अवास्तव ,मोठे चित्र तयार करतो ,आपल्याला आपले आपल्या जोडीदाराबरोबरचे संबंध ह्या तिसऱ्या व्यक्तीमुळे संपणार     असल्याची पूर्णपणे खात्री वाटते .त्यामुळे आपल्या जोडीदाराचे त्या तिसऱ्या व्यक्तीबरोबर च्या साध्या आणि निरुपद्रवी संभाषणातून ,वर्तनातून हि काही वेगळे ,रोमँटिक संबंध असल्याचे अर्थ शोधात राहतो आपल्याला कळलेले अर्थ खरेच असल्याचे समजतो .आपण आपल्या जोडीदाराकडून फसवले            गेल्याचे /बेवफाईचे कल्पना चित्र मनात तयार करून त्याभोवती रुंजी घालत राहतो . जर कधी आपल्या जोडीदाराने दुसऱ्या व्यक्तीच्या सकारात्मक आणि चांगल्या गुणांचे कौतुक केले तर ती व्यक्ती माझ्यापेक्षा सरस, उत्कृष्ट आहे आणि जोडीदार तिच्यासाठी मला फसवू वा सोडू शकतो हि भावना सतत मनात असते त्यावेळी आपण मत्सर अनुभवत असतो .

मग हे असे विचार सुरु झाले कि आपण आपल्या जोडीदाराचे आपल्यावर प्रेम आहे ,काळजी आहे याची त्याच्याकडून सतत खात्री करून घेत राहतो .

आपल्या जोडीदाराचे वागणे ,बोलणे ,लहानसहान  कृतींवर लक्ष ठेवून काही पुरावे हाती लागतात का याचा शोध सुरु होतो .

जोडीदारावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवू पाहतो ,आपल्या जोडीदारावर आपल्याला फसवले  गेल्याचा सूड उगवायचा असतो .

जेव्हा आपण आपल्याला वाटत असलेली भीतीचे अवास्तव अवडंबर करत नाही ,आपल्या जोडीदाराच्या इतरांबरोबरच्या साध्या संभाषणातून , वागण्यातून गैरसमज करून घेतला जात नाही तसेच आपला जोडीदार आपल्याला फसवत असल्याचे काल्पनिक चित्र हि मनात बनवले जात नाही ,जोडीदाराने दुसऱ्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचे केलेले कौतुकामुळे  आपल्याला असुरक्षितता जाणवते पण ती फक्त त्या प्रसंगानुरूप आणि प्रसंगापुरती असते  अवास्तव किंवा अतिरंजित असुरक्षितपणा जाणवत नाही तेव्हा आपण हेवा अनुभवत असतो

अश्यावेळी आपण कोणतेही टोमणे मारता जोडीदाराने व्यक्त केलेल्या प्रेमाचा स्वीकार केला जातो तसेच वारंवार प्रेमाच्या खात्रीची आवशक्यता नसते .आपण आपल्या जोडीदारावर ,त्याच्या वागणे ,बोलणे कृतींवर कोणताही संशय  घेता अंकुश ठेवत नाही .जिथे आपल्याला असुरक्षितता जाणवते त्या गोष्टी जोडीदाराबरोबर बोलून स्पष्ट करून घेतली जाते .

मत्सर मध्ये आपण स्वतःला असुरक्षित समजत असतो आणि मनात तयार केलेल्या काल्पनिक चित्रण मध्ये स्वतःला गुरफटून घेतो इथे सुड असतो तेच हेवा मध्ये जर असुरक्षित जाणवले तरी त्यात गुरफटून जाता त्यातून बाहेर पाडण्याचे मार्ग अवलंबिले जातात, इथे संधी असते.

 

तसे पहिले तर सकारात्मक भावनांबद्दल नेहमी बोलले जाते लिहिले जाते पण प्रतिकूल प्रसंगांमध्ये सकारात्मक राहणे हे एक अवघड आव्हान आहे कि जे प्रत्येकालाच शक्य होत नाही . सकारात्मक भावना प्रतिकूल प्रसंगात काय घडलेय ,काय घडू शकते ,काय वास्तववादी परिणामांवरून आपले लक्ष बाजूला करून कल्पनेतील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करते .पूर्णपणे नकारत्मक भावना हि हानिकारक असतात त्याही आपल्याला खरी परिस्थितीचे अवलोकन करू देता स्वतःच्या नकारात्मक विचारांच्या वावटळीत फिरवत ठेवतात.इथे हि वास्तववादी परिणाम वा शक्यतेचा विचार करता कल्पनेतील नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित होते .त्यात अजून एक तोटा असतो कि ह्या नकारात्मक परिणामांचे आपण अतिरंजित चित्र तयार करतो आणि ते खरंच मानत असतो .

पण जर उपयुक्त नकारात्मक भावना आपण अनुभवायला शिकलो तर त्या आपल्याला उपयोगी ठरतात ! उपयुक्त नकारात्मक भावना प्रतिकूल परिस्थितीला नैसर्गिक प्रतिसाद देतात त्याच वेळी त्या प्रसंगाचे  जे वास्तववादी परिणाम होऊ शकतात किंवा झालेत ह्यांच्याकडे कोणतेही अतिरंजित चित्र मनात धरता लक्ष  केंद्रित करतात .

म्हणूनच नकारात्मक भावनांकडून  सकारात्मक भावनांकडे वळताना मधला उपयुक्त नकारात्मक भावनांचा आधार घेतला तर आपण कोणत्याही अतिरंजित कल्पनेत रमता खऱ्या खुऱ्या भावनांचा नैसर्गिक आणि स्वाभाविक अनुभव घेऊन स्वतःमध्ये प्रतिकूल परिस्थितीचा स्वीकार ,त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा स्वीकार आणि तोंड देण्याची तयारी ,स्वतःचाही एक व्यक्ती म्हणून स्वीकार हे सगळे पैलू विकसित होण्यास मदत होते.   (समाप्त)

Rohini Phulpagar

Psychologist psychotherapist

9604968842


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)