स्टोअर्ड चेतना

TheMindTalks
4

 

माझ्या समोर खुर्चीवर बसलेले गृहस्थ बोलत होते , "मॅडम मला आता जो त्रास होतोय , ज्या गोष्टींचा विचार येतोय हे सगळे / वर्षांपूर्वी घडले होते, काही माझ्या जवळचे लोक त्या वेळी तसे वागले ..मध्यन्तरी मी सगळे विसरून हि गेलो पण आता मला त्याचे बोलणे , माझ्यासोबतच वागणे आठवते , त्यापैकी कोणी हि जरी समोर आले तरी किंवा त्याचा उल्लेख आला तरी त्याचे माझ्यासोबतचे वागणे बोलणे आठवून त्यांचा राग येतो, चीड येते . कधी कधी अचानकपणे जरी काही भूतकाळातील वाईट घटना आठवल्या कि दुःख होते , चिडचिड होते. मधले काही वर्ष ह्या गोष्टींचा विसर पडल्यासारखे झाले होते ,पण हे असे आता का होत असेल ? "

हा प्रश्न बहुतेकांना पडत असतो . एखादी ला सुरुवातीला नवीन घरात रुळताना झालेला त्रास पुढे कित्येक वर्ष मनात घोळत असतो .  एखाद्याला करिअर मध्ये उभे राहताना दिले गेलेले टेन्शन पुढे कित्येक वर्षाने बाहेर येऊन हि मनस्ताप देत राहते .

 अश्या अनेक गोष्टी आपल्या  अंतर्मनात साठून असतात आणि जरी आपल्याला वाटत असते कि आपण त्या गोष्टी विसरलो तरी हि कालांतराने त्या बाह्यमनात येऊन  अस्वस्थ करत असतात . हे असे का घडत असेल ? आपण ज्या गोष्टी विसरून गेलोय असे आपल्याला वाटत असते त्या काही काळाने का बर डोकी वर काढत असतील ? ह्यामागे कोणते कारण असेल ?

ह्या सगळ्याचे कारण आहे आपली स्टोअर चेतना .

बौद्ध मानसशात्रानुसार व्यक्ती ला आठ प्रकारच्या चेतना जाणवतात;  पहिले पाच हे शारीरिक इंद्रियांवर आधारीत आहे, जेव्हा डोळे एखादा आकार बघतात,कान एखादा आवाज ऐकतो,नाक एखादा वास घेतो,जीभ एखादी चव घेते, शरीर  एखादा स्पर्श अनुभवतो तेव्हा ह्या चेतना  जाणवतात. सहावी चेतना आहे मनाची जाणीव ! जेव्हा एखादया वस्तूचेआकलन होते तेव्हा हि निर्माण होते. सातवी आहे मानस चेतना कि जी मनाच्या चेतनेला ला उभारण्यास मदत करते आणि  पाठिंबा देते . आठवी चेतना आहे,स्टोअर चेतना ! जी ह्या सगळ्या वरील चेतनांचा पाया किंवा मूळ आहे.

आपल्या  मनाला जर जमिनीची उपमा दिली तर आपले विचार ,अनुभव हे त्या जमिनीत पडणारे बीज आहे .  ह्या मनरूपी शेतामध्ये प्रत्येक बीज साठवले जाते , त्याचे संवर्धन केले जाते मग ते बीज सुखकारक फुले निर्माण करणारे  असो वा टोकदार काटेरी तण निर्माण करणारे असो ! हे सगळ्या प्रकारचे बीज आपल्या स्टोअर चेतनेमध्ये साठवले जाते . असे बिज स्टोअर चेतनेमध्ये आल्यानंतर स्टोअर चेतनेचे मुख्य तीन कामे सुरु होतात : पहिले काम  म्हणजे आपण जे जे अनुभव घेतो  त्या सगळ्या बीजांचे जतन आणि साठवणूक करून ठेवणे . आपण  जे काही आकलन करतो,अनुभवतो  आणि कृती करतो ह्या सगळ्यांचे बीज प्रतिनिधित्व  करतात  त्यामुळे त्यांचे  स्टोअर चेतनेमध्ये साठवणूक होते. जसे मॅग्नेट  लोखंडाचे कण खेचते तसे स्टोअर चेतना आपल्या अनुभवाचे, कृतींचे, विचारांचे बीज खेचून घेते ! दुसरे काम आहे त्या बीजांचे पुनःरोपन करणे ,लागवड करणे. त्या बीजांचे घटकत्व अंगीकारणे . जसे एखाद्या टोपलीत जर आपण संत्री ठेवली तर त्याला आपण संत्रांची टोपली म्हणतो , पण त्या टोपलीत संत्री नसतील तर ती नुसतीच टोपली राहते , संत्र्यांची टोपली राहत नाही ; तसेच स्टोअर चेतना त्या त्या बीजांची साठवणूक हि आहे नि ते घटक हि आहे ! तिसरे आणि महत्वाचे काम म्हणजे ह्या बीजांची स्व वा अहं (सेल्फ) सोबत जवळकीता आणि सलंग्नता निर्माण करणे. मानस,सहा  प्रकारच्या  चेतना  आणि  स्टोअर कॉन्शिअसनेस ह्यांच्यामधील गुंतागुंतीच्या सूक्ष्म प्रक्रियेमुळे हे संबंध निर्माण होतात .

 तर आपण हे बीज स्टोअर चेतनेमध्ये साठवले आहेत त्या प्रत्येक बीजांची सुद्धा स्वतःची स्वतःला टिकवून ठेवण्याची क्षमता असते . जर आपण उन्हाळ्यात एखादे बीज पेरले तर ते पावसाळा येईपर्यंत ते स्वतःला टिकवून ठेवते आणि पावसाळ्यात अनुकूल वातावरण मिळाले कि बाहेर येऊन फुलते, मोहोर येतो आणि परत  त्याचे बीज जमिनीवर पडते. ते आत तसेच राहते अनुकूल परिस्थितीत त्याला अंकुर फुटतात ! आपल्या मनाचेही तसेच आहे , त्यात रागाचे , द्वेषाचे,अपेक्षाभंगाचे ,मत्सराचे ,अहंकाराचे , प्रेमाचे ,करुणेचे ,आनंदाचे ,दयेचे असे अनेकविध बीज वेळोवेळी पेरले जातात. प्रत्येक बीज स्वतःला टिकवून ठेवते . आपले रोजचे विचार ,कृती आणि दृष्टिकोन नवनवे बिज आपल्या स्टोअर चेतनेमध्ये पेरतात आणि आपले आयुष्य घडवतात . आपल्यामध्ये हे जे बीज वेळोवेळी पेरले गेलेय त्याला सांभाळून ठेवण्याचे कार्य हि आपल्या स्टोअर चेतनेने इमानेइतबारे केलेले असते . त्यामुळे जरी काही काळ ह्या नकारात्मक विचारांचा नि भावनांचा विसर पडल्यावर आपल्याला ते विचार नि भावना आपल्यात नाही असे जरी वाटत असते तरी ते खरं नसते . त्या भावना नि विचार फक्त अनुकूलतेची वाट बघत स्वतःला टिकवून ठेवत असते . आता  त्यामानाने मन इतर व्यापांमधून थोडे मोकळे झाले कि मग दाबून राहिलेल्या भावना नि विचार अनुकूल प्रक्रियेमधून व्यक्त होतात , आपल्याला अस्वस्थ करतात ! आणि म्हणूनच काही गोष्टीचा आपल्याला काही काळाने वा काही वर्षांपर्यंत त्रास होत राहतो !

आपल्यात साठवून ठेवलेल्या बीजांची एक सवय ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपल्याला परत परत त्याच प्रकारचे विचार,वर्तन करायला भाग पाडते . उदा . एखाद्या व्यक्तीमध्ये जर रागाचे बिज असेल आणि ती व्यक्ती थोड्या थोड्या कारणाने सतत चिडत असेल , रागात येत असेल तर हि रागाची सवय ऊर्जा त्याला पुन्हा पुन्हा छोट्या छोटया गोष्टींवरून राग आणणार आणि हा जेव्हा जेव्हा चीडचीड करेल ,रागात येईल त्या त्या वेळी परत स्टोअर चेतनेमध्ये त्याच प्रकारच्या बीजांचे संवर्धन होत राहील . असे हे चक्र चालत राहणार !

ह्याचा अर्थ असाही नाही कि आपण स्टोअर चेतनेमधील बीजांची मशागत करू शकत नाही . जशी जमिनीची मशागत करून आपण त्यातील तण बाजूला काढून आपल्याला उपयोगी फुलांची शेती करू शकतो  अगदी तसेच आपण आपल्या स्टोअर चेतनेमधील आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या विचार आणि भावनांना बाजूला सारून आपल्याला उपयुक्त ठरणाऱ्या विचार नि भावनांचे प्रकटीकरण करू शकतो ! त्यासाठी आपण आपल्या मनातील बीजांकडे अधिक  स्पष्टपणे आणि  खोल बघायला शिकण्याची  गरज आहे कारण हे दोन्ही चेतनेची  ची निर्मिती आहे ! आपण सकारात्मक बीजांना  जास्त पाणी दिले पाहिजे आणि  नकारात्मक बीजांना  पाणी नाकारले पाहिजे त्यामुळे सकारात्मकतेचे बीज अधिक स्ट्रॉंग होईल आणि नकारात्मकतेचे बीज कमकुवत होईल. आपल्याला माहितीच आहे कमकुवत बिज लवकर अंकुरित नाही ! ह्यासगळ्यासाठी आपल्या मदतीला येतो माइंडफुलनेस चा सराव !

माइंडफुलनेस चा सराव आपल्याला आपल्यातील नकारात्मक आणि सकारात्मक बीजांना ओळखायला शिकवतो ! कोणत्या बीजांना आपण जास्त पाणी घालून त्यांचे संवर्धन करत आहोत ,त्या त्या बीजांचे अनुकूल वातावरण , त्या बीजांचे उभारून येणे , त्यांचे प्रकटीकरण ह्या सगळ्या गोष्टी माइंडफुलनेस ने ओळखायला सोप्या होतात ! हे एकदा ओळखता आले कि नकारात्मक बीजांचे संवर्धन आणि प्रकटीकरण आपण थांबवू शकतो आणि सकारात्मक बीजांचे जास्तीत जास्त संवर्धन आणि प्रकटीकरण घडवून आणू शकतो !

ह्या गोष्टी साध्य करण्यासाठी बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गांपैकी सम्यक प्रयत्न आणि माइंडफुलनेस म्हणजेच सजगता ह्यांचा वापर करू शकतो . सम्यक प्रयत्नांची प्रॅक्टिस पुढीलप्रमाणे :

पहिली प्रॅक्टिस : आपल्या मनात आतापर्यन्त ज्या नकारात्मक बीजांची निर्मिती  झाली नाही त्या बीजांची  निर्मिती  होण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यासाठी सम्यक प्रयत्न करणे.

दुसरी प्रॅक्टिसज्या नकारात्मक बीज आपल्या मनाच्या चेतनेमध्ये उभारू पाहत आहे त्याना परत स्टोअर चेतनेमध्ये पाठवणे त्यासाठी सम्यक प्रयत्न करणे.

 तिसरी प्रॅक्टिसआपल्या स्टोअर चेतनेमध्ये  असलेले पण अजून मनाच्या चेतनेमध्ये निर्माण  झालेल्या सकारात्मक बीजांना  पाणी देणे,त्यांचे संगोपन  करून त्याचा मनाच्या चेतनेमध्ये उदय होईल ह्यासाठी सम्यक प्रयत्न करणे.

 चौथी प्रॅक्टिस : मनाच्या चेतनेमध्ये सकारात्मक  बीजांमुळे निर्माण  झालेली  मानसिक अवस्था जास्तीत जास्त टिकून  राहण्यासाठी सम्यक प्रयत्न करणे.

ह्या प्रॅक्टिससाठी आपली आपल्या स्टोअर चेतने बद्दल असलेली जागरूकता आणि सजगता म्हणजेच माइंडफुलनेस खूप महत्वाची आहे .

त्यानतंर आपल्याला "हे सगळे इतक्या काळानंतर हि का त्रासदायक ठरतेय ? "असा प्रश्न पडणार नाही  !!

 


Rohini Phulpagar

Psychotherapist

Mind Health coach

9604968842

themindtalks4u@gmail.com

 


Post a Comment

4Comments

Post a Comment