पर्सनॅलिटी म्हणजे ...

TheMindTalks
0

 पर्सनॅलिटी डिसऑर्डर

What is Personality?


 रमेश ला प्रश्न पडला होता, अनुजचा, त्याच्या जिवलग मित्राचा भाऊ असा तिरसट का आहे ? तो अनुज ची परिस्थिती का नाही समजून घेत ? स्वतःचेच म्हणणे का नेहमी खरे करत असतो ! त्याला स्वतःपुढे  इतरांच्या भावना नि त्यांचा त्रास  कधीच महत्वाचा वाटत नाही !

स्नेहा ला आईशी कसे वागावे कळत नाही ,कारण तिची आई थोडी जास्तच संशयी आहे ! ती  स्नेहावर विश्वास ठेवायला तयारच नाही ! तिच्या प्रत्येक निर्णयावर आई शंका घेत राहते किंवा आपलेच मत दामडते ! स्नेहाच्या छोट्या मोठ्या गोष्टींवर तिला पाठिंबा देण्याचे सोडून तिच्यावर टीका करत राहणार !

रूपाचा नवरा विनय हा अतिशय रागीट होता . थोडे मनाविरुद्ध घडले कि आदळआपट , आरडाओरडा ठरलेला ! थोड्या थोड्या कारणांनी सरळ मारामारीला सुरवात करणारा ! त्याला सामाजिक नियमांचे किंवा बंधनाचे काही देणंघेणं नाही ! त्याला वाटते तेच नियम मग इतरांना त्याचा किती  त्रास होतोय ह्याच्याशी  काही कर्तव्य नाही !

 ह्या प्रसंगातील व्यक्तीचा कधी ना कधी आपल्याशी सामना होतो किंवा  आपल्या आजूबाजूला त्या असतात. अश्या व्यक्ती मध्ये हेकेखोरपणा , स्वतःचेच खरे करणे , प्रत्येक बाबतीत स्वतःचा स्वार्थ वा मताला जास्त महत्व देणे , इतरांना तुच्छ लेखणे , सतत डोक्यात राग घालून घेणे , संशयी वृत्ती , आक्रस्ताळेपणा ,इतरांच्या भावनांची कदर नसणे, स्वतःला अति महत्व देणे  हि वैशिष्ट्ये आढळतात .वरील प्रसंगातील व्यक्ती ह्या विस्कळीत व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी डिसऑर्डर चे ठळक उदाहरणे आहेत !

पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तीची आपल्या सभोवतालच्या वातावरणाचे ,परिस्थितीचे ,प्रसंगाचे अवलोकन करून भावनिक , वैचारिक आणि वर्तनाद्वारे त्या त्या वातावरणाला ,परिस्थिती वा  प्रसंगांना प्रतिक्रिया देण्याची विशिष्ट आणि एकमेवाद्वितीय शैली ! 

हि शैली जर लवचिक , तर्कसंगत, सकारात्मक आणि सर्वबाजुंचा सर्वांगीण विचार करणारी असेल तर त्या व्यक्तीला आणि तिच्या संपर्कातील व्यक्तींना हि त्रासदायक ठरत नाही .

पण हि शैली जर आपल्या सभोवतालच्या वातावरणाचे ,परिस्थितीचे ,प्रसंगाचे  सदोषपूर्ण आकलन करून  ताठर ,हानिकारक आणि अतर्कसंगत असेल तर हि शैली पर्सनॅलिटी डिसऑर्डर चे लक्षणे दाखवते !

ह्या अश्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर चे  कारणे अजूनतरी अस्पष्ट आहेत ,पण काही संशोधनातून असे आढळून आले आहे कि विस्कळीत बालपण नि बालपणातील आघात , शाब्दिक वा शारीरिक मारहाण नि अत्याचार ,पालकांपैकी  एका ला  पर्सनॅलिटी डिसऑर्डर असणे , अति संवेदनशीलता , अति वर्चस्व गाजवणारे पालक वा नातेवाईक ,मित्र  हे घटक पर्सनॅलिटी डिसऑर्डर ला कारणीभूत ठरतात!

पर्सनॅलिटी डिसऑर्डर ची लक्षणे सामान्यतः लहानपणी किंवा वयात येताना दिसतात व कित्येक वेळा ती पुढे प्रौढावस्थेत तशीच चालू राहतात ! अश्या व्यक्तींच्या संकुचित आणि ताठर विचार प्रक्रियेमुळे त्यांचा दैनंदिन आयुष्यातील ताणतणावाला सामोरे जाण्याची पद्धत नकारात्मक आणि हानिकारक असते ! ह्या पद्धतीची सवय पडते ! ह्या व्यक्तींना त्याची विचार करण्याची पद्धत आणि प्रतिक्रिया देण्याची पद्धतीमध्ये बदल करने रुचत नाही कारण त्यांच्यात  काही प्रॉब्लेम आहे हेच त्यांना मान्य नसते ,मात्र त्यांच्या अश्या  विकृत वर्तनाने आजूबाजूच्या व्यक्ती स्ट्रेस मध्ये जातात .

पर्सनॅलिटी डिसऑर्डर चे  मुखत्वे तीन भागात वर्गीकरण केले आहे

  • Ø  संशयी व आत्मकेंद्रित  पर्सनॅलिटी डिसऑर्डर 
  • Ø  भावनिक आणि उतावीळ पर्सनॅलिटी डिसऑर्डर
  • Ø  चिंतायुक्त पर्सनॅलिटी डिसऑर्डर

 संशयी आत्मकेंद्रित पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये पुढील प्रकार येतात

पॅरानॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डर:  अश्या व्यक्ती अतिप्रमाणात संशयी असतात . त्यांना सतत वाटत असते कि दुसरे लोक त्यांना मुद्दाम त्रास देतात किंवा हानी पोहोचवतात . इतरांच्या हेतूबद्दल सतत नकारात्मक इव्हॅल्युएशन होत असल्याने कोणाशी मनमोकळे वागत नाही . इतरांबरोबर काम करण्यात अडचणी येतात त्यामुळे एकटे राहणे पसंद करतात . स्वतःवरचा टीकेबाबत जास्त जागरूक असतात. मनात एखाद्या छोट्या गोष्टीबद्दल खूपकाळ अढी नि राग ठेवणे , सहजासहजी क्षमा न करणे ,पटकन चिडणे , कोण आपल्याबत कसे वागते ,बोलते ह्या बाबत जास्त जागरूकता नि संशय हे प्रामुख्याने आढळते .

स्कीझोईड पर्सनॅलिटी डिसऑर्डर: अश्या व्यक्तींमध्ये जवळीकता ,आपलेपणा ,कुटुंबात सामावून राहणे  हे गुणधर्म नसतात . त्यांना कोणाशी जवळीक साधने जमत नाही मग ते कौटुंबिक असो कि व्यावसायिक असो ! ह्यांच्यामध्ये अलिप्तता हा गुण जास्त असतो . एकटे राहणे जास्त पसंद करतात .ते  सहजासहजी आनंद उपभोगू शकत नाही , त्यांच्यावरच्या टीकेने वा स्तुतीने त्यांच्यावर काही परिणाम होत नाही . रोमँटिक किंवा लैंगिक संबंधांमध्ये रुची नसते एकप्रकारचा  भावनिक थंडपणा , अलिप्तता , एकटेपणा हे ह्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर चे वैशिष्ट्य आहे

स्किझोटायपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर : अश्या व्यक्तीमध्ये विचारांची नि वर्तनाची एक विचित्र पद्धत आढळून येते . इतर लोकांचे संभाषण ,बोलणे ,हसणे ह्याचा नेहमी स्वतःशी संबंध जोडला जातो (जरी तसे नसेल तरीही !) म्हणजे मलाच उद्देशून आहे किंवा माझ्याशी संबंधित आहे . सोशल अंक्झाईटी  जास्त असते, ग्रुप मध्ये किंवा एकाद्या कार्यक्रमात सहभाग घेण्याची भीती असते . काही विचित्र आणि अतर्कसंगत विचार जसे कि माझ्या मनात काय चालू आहे दुसर्यांना लगेच कळेल , मी इतरांचे विचार इथे बसून कंट्रोल करू शकतो , काही प्रमाणात भ्रम , बोलण्याची अस्पष्ट नि अतिरंजित पद्धत , संशयी स्वभाव , जवळीकतेचा नि दुसर्यांवरचा विश्वासाचा अभाव हे मुखत्वे वैशिष्टये आढळतात .

  (भावनिक आणि उतावीळ पर्सनॅलिटी डिसऑर्डर व चिंतायुक्त पर्सनॅलिटी डिसऑर्डर बद्दल ह्या लेखाच्या पुढील भागात माहिती घेऊयात. )

 

core beliefs : मी आणि बाभळी

रोहिणी फुलपगार

Psychotherapist 

 9604968842

themindtalks4u@gmail.com

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)