दुखावले जाणे ..

TheMindTalks
1

 

 दुखावले जाणे  (Hurt feeling)

कमल एक २५/२७ वर्षाची तरुण मुलगी ! मंचर ला जाताना एस .टी.मध्ये शेजारी बसली होती . माझ्या हातातील पुस्तक पाहून तिने माझ्या व्यवसायाबद्दल विचारले . जेव्हा तिला कळले कि मी मानसोपचार तज्ञ आहे, तिने तिच्या प्रॉब्लेम बद्दल सांगायला सुरुवात केली .

खूप महिन्यांपूर्वी तिच्या बहिणीने तिला काही शब्द वापरले होते  आणि ते तिला खूप लागले होते . इतके दिवस  उलटून गेले  तरी ती ते शब्द विसरू शकली नव्हती . तिला त्या शब्दांचा आणि बहिणीचा राग हि खूप होता . तिच्याशी बोलताना तिला विचारले कि तुला तिचा नुसता रागच आहे कि अजूनही काही मनात आहे . त्यावर  कमल चे म्हणणे होते कि मला खूप वाईट वाटले ती अशी बोलली म्हणून ! राग आलाय तर बहिणीवर राग व्यक्त करून घे , स्वतःला का त्रास देतेय ? मग कमल चे म्हणणे कि मला राग आलाय पण त्याहून जास्त अजून काहीतरी वाटत आहे , आतल्या आत  घुसमट होतेय , रडायला हि येते ; ती असे कसे बोलू शकते मला ह्याचे वाईट वाटत राहतेय . रागापेक्षाही !

कमल दुखावलेली होती , hurt झाली होती पण तिला तिच्या नेमक्या भावना काळात नव्हत्या आणि त्यामुळे त्यांना कसे हाताळायचे हे हि समजत नव्हते .

 साधारणपणे आपल्याला आपल्या राग ,आनंद ,दु:ख, प्रेम तिरस्कार एवढ्याच वरवरच्या भावना बद्दल जाणीव असते . बहुतेक भावनांना आपण राग ह्या लेबेल खाली झाकून टाकतो . तशीच  दुखावले जाणे ही भावना आहे . कधी कधी आपण प्रचंड राग ह्या शीर्षका खाली तिला दाबून टाकतो .


 दुखावले जाणे किंवा कोणी मला दुखावले म्हणजे काय हे आधी समजून  घेवूयात .

जेव्हा एखाद्या प्रसंगात किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपण  दुखावले गेले आहेत असे आपल्याला वाटते जेव्हा आपण  त्या प्रसंगाचा किंवा त्या व्यक्तीच्या वागण्याचा पुढीलप्रमाणे अर्थ काढतो :

·      माझ्यासोबत अतिशय वाईट वर्तन केले गेलेय,मला वागवले गेलेय वा माझा वापर करून घेतलाय . हे अजिबात योग्य नाही,मी हे अस डिझर्व करत नाही .

·      समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीने मला मान नाही, ह्या नात्याला,व्यक्तींना  मी जेवढे महत्व देत आहे त्यांच्या दृष्टीने तेवढे महत्वाचे ना नाते आहे ना मी आहे !

वरील लावलेले अर्थ आपल्या मनात ज्या भावना निर्माण करतात त्यांना दुखावले जाणे असे म्हटले जाते

ही एक हानिकारक नकारात्मक भावना आहे जी आपल्या मनात आपण निर्माण केलेल्या तर्कहीन आणि ताठर  विचारप्रवाहाने सुरु होते आणि आपण पुढील कित्येक दिवस अस्वस्थेमध्ये घालवतो .

खूप जणांना वाटत असेल न “मला मान नाही ,माझ्यासोबत वेगळी वागणूक केलीय जी मी अजिबात डिझर्व करत नाही ह्यात अतार्किक विचार प्रवाह कसा काय आला ?

आता समजा मी तुम्हाला दोन वेगेवगळे विचार प्रवाह दिले , पहिला : माझ्या सहकार्यांनी ऑफिस मध्ये कध्धीच मला दुर्लक्षित करायला नाही पाहिजे .आणि जर ते तसे वागले तर ते माझ्यासाठी खूप विचित्र , सहन न करण्याजोगे असेल . तसं झालं तर  मी बिचारा दीनवाणा ठरेल !

दुसरा : मला आवडेल कि माझ्या सहकार्यांनी ऑफिस मध्ये मला दुर्लक्षित करू नये ; पण फक्त मला वाटते आहे म्हणून मला आवडेल तसे माझ्या सहकार्यांनी वागायचे बंधन नाही . जरी त्यांनी मला दुर्लक्षित केले तरी ते खूप विचित्र नसेल मी ते ते सहन करू शकतो . फक्त सहकारी  दुर्लक्षित   करतात म्हणू मी काही बिचारा दीनवाणा ठरत नाही.  

ह्या दोन्ही उदाहरणामध्ये जर खरच तुम्ही ऑफिस मध्ये एकटे पडलात तर कोणता विचार प्रवाह तुम्हाला  भावनिक स्थिरता देवून तुमच्या  कार्यक्षमतेवर परिणाम होवू देणार नाही ? बरोबर , दुसरा विचारप्रवाह तुम्हाला जास्त अस्वस्थ न करता कार्यक्षम राहायला मदत करेल .

आता ह्या उदाहरणातून तुम्हाला कळलेच असेल कि आपला तर्कहीन आणि ताठर  विचारप्रवाह ही हानिकारक नकारात्मक भावना निर्माण करत असतो .

दुखावले जाणे हि भावना हानिकारक कशी काय ठरते ?

आपण जे काही झाले आहे त्यामुळे आपल्यात जे काही निर्माण झालेय ते सतत कुरवाळत बसतो .उदा .  कमलच्या बहिनीने तिला जे  शब्द वापरले ,जी वागणूक दिली त्या प्रसंगाची तिने सतत मनातल्या मनात उजळणी सुरूच ठेवली . त्यामुळे त्या उजळणी सोबत रागाची, मला मान नाही ,महत्व नाही यांची  पण आवर्तने मनात सुरु झाली . त्याचा परिणाम म्हणजे चिडचिड , पटकन रडू येणे , कोणी काही बोलले तरी लागणे ,अन्याय झाल्याची भावना ह्या सगळ्या गोष्टी सुरु होतात . आपण स्वतःला एकटे , कोणालाच आपली काळजी नाही असं समजायला लागतो .मग भूतकाळात पण ज्या वेळी ह्या भावना निर्माण झाल्या त्या घटनांवर जास्त फोकस सुरु होतो ! आपण त्या व्यक्तीशी संवाद कमी करतो किंवा पूर्णपणे तोडतो ! आपल्याला त्याच्या कोणत्या वागण्याचे वाईट वाटलेय आणि का वाटलेय हे त्याला न सांगता नुसते धुसफुसत राहतो किंवा त्याला कसं दुखावता येईल  हे शोधत राहतो ! 

ह्या दुखावले जाणे च्या दु:खातून बाहेर कसं पडायचं ? 

सगळ्यात आधी हे जे दुखावले गेले ची भावना तुमच्यावर कसा परिणाम करायला लागलीय हे ओळखायचे ! सतत ह्या भावनेत राहिल्याने आपल्या कार्यक्षमतेवर , दैनंदिन जीवनातल्या कोणत्या गोष्टींवर ह्याचा परिणाम व्हायला लागलाय , आपला आनद हरवायला लागलाय का ह्याचे परीक्षण करायचे ! आपल्याला समजून जाते कि हि नकारात्मक भावना कुठे आपल्याला मागे खेचत आहे . हे समजल्यावर आपण त्यातून बाहेर पडायचा मनापासून प्रयत्न करतो !

आपण दुखावलो गेलोय ह्याला इतर व्यक्तींपेक्षा आपण स्वतः कारणीभूत आहोत हि जबाबदारी स्वीकारायची !

आपण जबाबदार म्हणजे आपला  तर्कहीन ,ताठर विचारप्रवाह कि जो समोरच्याने आपल्याला मान च द्यावा , महत्व च द्यावे , आपल्यासोबत आपल्याला जे योग्य वाटतेय तेच आणि तसेच वर्तन करावे हा आपला आग्रह जबाबदार आहे . कारण आपल्या भावनांना आपण च जबाबदार असतो इतर कोणीही नाही .

आपण कोणत्या कारणांनी दुखावलो गेलोय हे शोधायचे म्हणजे  समोरच्याच्या वागण्याचा मी असा कोणता अर्थ काढलाय कि जो मला एवढे अस्वस्थ करत आहे . उदा . कमलच्या बोलण्यातून असे कळले बहिणीने कमल जशी नाही त्याच्या विरुद्ध तिचे चित्रण केले होते व त्यानुसार तिला दोष दिला गेला . म्हणजे कमलने सख्या बहिणीने माझे अयोग्य मुल्यांकन केलेय जे तिने करायला नको होते ! हा अर्थ काढला कि जो तिला जास्त त्रास देत होता .

हे लक्षात आले कि आपण दुखावले जाण्याच्या भावनेला तर्कसंगत पद्धतीने सामोरे जातो .

तर्कहीन आणि ताठर विचारप्रवाहा पेक्षा  तर्कसंगत आणि लवचिक विचारप्रवाह स्वीकारला कि पुढच्या गोष्टी सोप्या होवून जातात .

मला मान मिळावा ,महत्व द्यावे समोरच्यानी माझी कदर करावी ,मला योग्य ती वागणूक मिळावी हि माझी अपेक्षा आहे . पण ह्या माझ्या अपेक्षानुसार इतर व्यक्ती वागतील किंवा तसेच प्रसंग घडतील असे नाही . फक्त मला वाटतेय म्हणून समोरच्याने  त्याचे मत बदलावे हा माझा हट्ट अतर्कसंगत आहे , वास्तववादी नाही  असा लवचिक विचारप्रवाह भावनाची दिशा बदलून तीव्रता कमी करायला मदत करतो .

भावनांची दिशा मग तसं दुखावले जाणे कडून अपेक्षाभंग कडे वळते . अपेक्षाभंग सुद्धा नकारात्मक भावना आहे पण ती उपयोगी नकारात्मक भावना आहे . अपेक्षाभंग ह्या भावनेत अस्वस्थता कमी प्रमाणात असते,तसेच ह्यावर सकारात्मक काय पावूल उचलायला हवे ह्याचा हि विचार सुरु होतो . जसे कि समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे ठामपणे सांगणे  . तिला ते पटले पाहिजे हा आग्रह न करता स्वतःला व्यवस्थित आणि मुद्देसूद व्यक्त करणे . कारण तिला पटलेच पाहिजे हा आग्रह परत  भवनीक आवर्तने सुरु करतो .  दुखावले जाणे ह्यत आपण व्यक्तीला जबाबदार धरतो तर अपेक्षाभंग ह्या भावनेत आपण व्यक्तीला दोष न देता  त्याच्या वर्तनला वा वागणुकीला जबाबदार धरतो त्यामुळे दोषारोपण करायचे सोडून सकारत्मक बदला चा विचार करायला लागतो . इतर व्यक्तींच्या मानसिकतेवर वा विचारप्रवाहावर, घटनांवर आपला १०० टक्के कंट्रोल नाही हे मान्य करून आपल्या नियंत्रित क्षमता ओळखणे हे जमले कि समोरचा असा कसा वागू शकतो ह्या प्रश्नात आपण अडकत नाही .

भूतकाळातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडून वर्तमानात लक्ष केंद्रित करणे . जेवढा वेळ आपण भूतकाळ कवटाळतो तेवढ्या काळ ह्या भावना  आपल्या सोबत राहतात . भूतकाळ सोडल्याने आपण स्वतंत्र होवून भावनिक वादळांना तोंड देण्यास समर्थ बनतो .

आपल्या वेदनांना बरे करा जेणेकरून आयुष्यातील इंद्र्धनुला स्पर्श करू शकाल !

 

रोहिणी फुलपगार

मानसोपचारतज्ज्ञ

9604968842

www.themindtalks4u@gmail.com

 

 

Post a Comment

1Comments

Post a Comment