मनातले कसं बोलू ! (भाग 1)

TheMindTalks
0


अनेक लोकाना कित्येक वेळी पडणारा प्रश्न आहे हा ! मनातले कसं बोलू !

             खूप वेळा संवाद साधताना किंवा एखाद्या विषयावर संभाषण होत असेल तर एखादी व्यक्ति आक्रमकपणे आणि जोरात आपले म्हणणे मांडत असते तर दुसरी व्यक्ति तिला जे म्हणायचे आहे, जे म्हणणे मांडायचे आहे ते ना मांडता समोरच्याच्या मताशी सहमति दर्शवते. मनातून पटले नाही तरी! सरळ सरळ शरणागती स्वीकारते.  संभाषण च्या ह्या दोन पद्धती आपण बहुतेकजन पाहतो आणि अनुभवतो सुद्धा!

जी व्यक्ति आक्रमकपणे आपले म्हणणे मांडत असते, तिला समोरच्या व्यक्तीला काहीतरी सांगायचे आहे हे ध्यानीमनी येत नाही आणि शेवटी तिचे मत स्वीकारले जाते. तर ह्या व्यक्तीने योग्य संभाषण केलेले असते का ? 

जी व्यक्ति शरणागती पत्करते तिने तरी योग्य निर्णय घेतला असतो का ?

माझे म्हणणे समोरच्याला पटलेच नाही तर? मला बावळट समजले तर? मी काही सांगायला गेलो आणि माझी थट्टा केली तर? माझ्या बोलण्याने समोरच्याला वाईट वाटले तर? माझ्या बोलण्याने वाद वाढला आणि लांबला तर? ह्या प्रश्नाच्या वावटळीत अशी व्यक्ति गुंतून जाते आणि मग पुढील परिणाम टाळण्यासाठी सरळ शरणागती पत्करते! अश्या व्यक्तीला आपला निर्णय योग्य च वाटतो !

 संभाषणाच्या ह्या दोन पद्धती पेक्षा अजून एक पद्धत आहे की जिचा अनेक व्यक्तिमध्ये अभाव दिसतो ती म्हणजे ठामपणा! खंबीरपणा! आपल्याला जे सांगायचे आहे ते ठामपणे सांगणे. Assertive असणे. ठामपणा असणे म्हणजे काय हे ह्या आर्टिकल मधून  आपण समजून घेवूयात.

Assertiveness किंवा ठामपणा म्हणजे व्यक्तीची अभिव्यक्त होण्याची, एक्सप्रेस होण्याची थेट, खंबीर आणि सकारात्मक पद्धत की जी व्यक्ति व्यक्ति मधील संबंध बरोबरीच्या पातळीवर आणण्यासाठी प्रयत्नशील असते. ठामपणा हे असे कौशल्य आहे जे आपल्याला स्वतःला, लोकांना आणि परिस्थितीला चांगल्या प्रकारे मॅनेज करायला शिकवते.

आपण आधी जे संभाषणाचे प्रकार पहिले आहेत त्यातील पहिली पद्धत म्हणजे आक्रमकता (aggressive). हयात व्यक्ति जोरात आणि कधी कधी हिंसक पद्धतीने आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीवर लादत असतो. ह्यामध्ये आक्रमक व्यक्तिच्या गरजा ना आणि इच्छा ना प्राधान्य असते. दुसऱ्या व्यक्तीचे अधिकार डावलले जातात .

दुसरी पद्धत म्हणजे शरणागती (passive). हयात व्यक्ति समोरच्याच्या म्हणण्याला मनात नसतानाही सहमत होते. हयात व्यक्तिच्या स्वतःच्या गरजा नि इच्छा पेक्षा समोरच्या व्यक्तिच्या गरजा नि इच्छा ना प्राधान्य असते. ह्या पद्धतीत व्यक्तिचे स्वतःचे अधिकार डावलले जातात.

तिसरी पद्धत म्हणजे ठामपणा. ( assertiveness). हे आश्वासक संभाषण असते हयात आपल्या स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहणे असतेच पण त्याचवेळी इतरांच्या अधिकारांचा आदर राखला जातो. त्यामुळे ह्या मुक्त आणि आदरयुक्त संवादात तुमच्या गरजा आणि इच्छा सरळपणे आणि थेट सांगितल्या जातात .  



आपल्यामध्ये ठामपणा किंवा खंबीरपणा विकसित करणे हे आपल्यासाठी मदतगार ठरते. ते आपल्याला स्वतःच्या हितासाठी काम करण्यास सक्षम करते, अनावश्यक चिंता ना करता स्वतःच्या अधिकारसाठी उभे राहण्यास आणि इतरांचे हक्क न डावलता स्वतःचे हक्क अबाधित ठेवण्यास,आपल्या भावना आणि गरजा जसे की आपुलकी प्रेम ,माया निराशा, राग ,चीड, खेद, दु:ख इत्यादि प्रामाणिकपणे आणि सरळपणे स्वीकारण्यास शिकवते.

प्रश्न असा निर्माण होतो की काही व्यक्तींमध्ये हा ठामपणा का विकसित होत नाही ?

ह्याची अनेक कारणे असतात, त्यातील काही महत्वाची कारणे पाहुयात .

माणूस म्हणून असलेले आपले मूलभूत हक्क माहीत नसणे.

               सर्व व्यक्तीना काही मूलभूत अधिकार आहेत. जेव्हा आपण ठाम असतो तेव्हा आपण ते अधिकार ओळखलेले असतात आणि जेव्हा इतरांकडून त्यांची अवहेलना  केली जाते तेव्हा त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपण घेतो.

त्यातील काही वैयक्तिक हक्क जे महत्वाचे आहेत परंतु अनेकदा विसरले जातात :

  • ·         मला जे हवे आहे ते मागण्याचा अधिकार
  • ·         ज्या  मागण्या किंवा विनंत्या, आग्रह मी पूर्ण करू शकत नाही त्यांना नाही म्हणण्याचा अधिकार
  • ·         माझ्या सर्व भावना, सकारात्मक किंवा नकारात्मक भावना व्यक्त करण्याचा अधिकार
  • ·         माझे विचार, माझे मन बदलण्याचा अधिकार
  • ·         चुका करण्याचा आणि imperfect असण्याचा म्हणजेच परिपूर्ण नसण्याचा अधिकार.
  • ·         माझ्या स्वतःच्या मूल्यांचे आणि विश्वासाचे पालन करण्याचा अधिकार.  
  • ·         माझे स्वतःचे प्रधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार.  
  • ·         मला स्वतःसाठी वेळ मिळवणे आणि स्पेस मिळवण्याची गरजा पूर्ण करण्याचा अधिकार .
  • ·         माहिती विचारण्याचा अधिकार.  
  • ·         फक्त माझ्या भावना आणि वर्तनासाठी जबाबदार असण्याचा अधिकार.  

जेव्हा आपण ठाम असतो, assertive असतो तेव्हा आपल्याला  वरील हक्कासोबत च जसे हे माझे अधिकार आहे तसेच ते इतरांचे ही अधिकार आहेत ही जबाबदारीची जाणीव सुद्धा असते.

स्वतःच्या  भावनिक कोंडीत अडकणे .

बहुतेक व्यक्ति स्वतःसाठी ठाम नसतात कारण त्यांनी काही भावनिक निष्कर्ष काढलेले असतात आणि त्या निष्कर्षाना चिटकून राहतात. त्यामुळे त्यांना दैनंदिन आयुष्यात सुद्धा खंबीरपणे संभाषण साधता येत नाही . त्यातील काही पुढील प्रमाणे असतात :

  • ·         आपण ठामपणा दाखवला तर आपण आक्रमकता दर्शवतो अशी भीती.  
  • ·         आपल्यामुळे समोरच्या व्यक्तिच्या भावना दुखावू अशी भीती आणि मग अपराधिपणा
  • ·         आपल्या ठाम व्यक्त होण्याच्या पद्धतीमुळे दुसऱ्या व्यक्तिच्या रागाची किंवा नापसंतीची, नाराजीची भीती .
  • ·         स्वतःच्या गरजाना प्रधान्यक्रम दिल्याने येणारे अपराधिपणा आणि शरम.
  • ·         समोरच्याला स्वतःच्या गरजा आणि इच्छा चे महत्व सांगण्यात अस्वस्थ वाटणे किंवा अपमानास्पद वाटणे.  
  • ·         इतरांकडून स्वार्थी असे लेबल लागण्याची भीती.  
  • ·         आपल्या ठामपणा व्यक्त केल्यामुळे नाकारले जाण्याची किंवा नापसंत केले जाण्याची भीती.
  • ·         योग्य निर्णय घेण्याच्या स्वतःच्या क्षमतेबद्दल असुरक्षित वाटणे.

जेव्हा एखादी व्यक्ति आपल्या गरजा आणि इच्छांशी सारखी सारखी तडजोड करत राहते तेव्हा ती व्यक्ति स्वतःला ठामपणाची कौशल्ये निर्माण करण्यापासून आणि त्या कौशल्याचा सराव करण्यापासून वंचित करते आणि स्वतःला विकसित  होवू देत नाही. ह्याचा अर्थ असा होतो की आपण ठामपणा आणि स्वतःबद्दलच्या सकारात्मक मर्यादाचा आनंद घेवू शकत नाही.  

अश्या प्रकारच्या भावनिक कोंडीमुळे व्यक्तीचा स्वाभिमान आणि स्व -आदर कमी होत जातो आणि कालांतराने  त्याच्या म:नशांतीवर, आनंदावर, समाधानाच्या पातळीवर नकारात्मक परिणाम होवून शरीरावर ही नकारात्मक परिणाम होतो. (क्रमश:)

 

पुढील भागात ठामपणा कसा निर्माण करायचा ह्याचे काही टिप्स पाहणार आहोत.


रोहिणी फुलपगार

Psychologist

9604968842.

 

 

पुढील भागात ठामपणा कसा निर्माण करायचा ह्याचे काही टिप्स पाहणार आहोत.

 

 

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)