मार्गदर्शित कल्पनाविलास

TheMindTalks
0

 एखादी व्यक्ति जर कामात व्यग्र नसेल, थोडी रीलॅक्स असेल तर ती दोन कामामध्ये व्यस्त असते; एक म्हणजे वेगेवगळे विचार आणि दुसरे म्हणजे कल्पनाविलास! 

           आपण प्रत्येकजण नेहमी काहीना काही कल्पना विश्व तयार करत असतो, त्यात काही काळ रममाण ही होतो. हा कल्पना विलास सुखद, दुख:द, प्रेरणादायी, निरर्थक, आशादायी, विनोदी, पुढील कामांचे प्लॅनिंग, असा अगदी कसाही असतो.

                 व्यक्ति कल्पनांच्या जगात अगदी नकळतपणे रमते, मग त्या कोणत्याही प्रकारचे कल्पनाविलास असो! दुखद किंवा निराशाजनक कल्पनाविलास व्यक्तिमध्ये नकरात्मकता निर्माण करतो तर प्रेरणादायी आणि सुखद कल्पनाविलास व्यक्तिमध्ये सकारात्मकता निर्माण करते. जसे की एखाद्या व्यक्तीला दोन दिवसांनी इंटरव्हूला जायचे आहे, तयारी झाली ही आहे पण त्याचे त्या दोन दिवसांनतरच्या परिस्थितीचे कल्पनाविलास त्याची इंटरव्हूला तोंड देण्याची मानसिकता ठरवते! जर तो कल्पनाविलास मध्ये त्याचा इंटरव्हू चांगला झालाय, चांगला फिडबॅक मिळालाय असे पाहत असेल तर तो आत्मविश्वासाने नि उत्साहाने अजून तयारीला लागणार; पण त्याचा कल्पनाविलास तो इंटरव्हू मध्ये अडखळतोय, त्याला प्रश्नांची उत्तरे नीट देता येत नाही असे पाहत असेल तर तो घाबरून जावून तयारीला लागणार पण बॅक ऑफ माइंड त्याला स्वतःबद्दल शंका असणार, आत्मविश्वास कमी होणार!

               हा कल्पनाविलास शात्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन करून सुद्धा निर्माण करता येतो हे आपल्यातील अनेक व्यक्तींना माहिती नसेल! आजच्या आर्टिकल मधून ह्या शात्रशुद्ध मार्गदर्शित कल्पनाविलास बद्दल माहिती घेवू.

                 अगदी प्राचीन काळापासून मार्गदर्शित कल्पनाविलास किंवा प्रतिमानिर्मिती ही एक उपचारपद्धती वापरली जात आहे. आजच्या काळात कोचिंग, समुपदेशन, मानसोपचार, वेदना निवारण, नैराश्य ,चिंताविकार,सायकोसोमटीक आजार,कर्करोग, आत्मविश्वास वाढवणे, ध्येय साध्य करणे अश्या अनेक ठिकाणी मार्गदर्शित कल्पनाविलास चा उपयोग केला जातोय.


मार्गदर्शित कल्पनाविलास म्हणजे असे तंत्र ज्यामध्ये व्यक्ति तीच्या मनामध्ये सकारात्मक प्रतिमा किंवा सकारात्मक परिस्थितीची जाणीवपूर्वक कल्पना करते. ह्या प्रक्रियेदरम्यान शरीराला आणि मनाला रीलॅक्स करण्यासाठी तसेच मनात सकारात्मक भावना निर्माण होण्यासाठी आपल्या पंचेइंद्रियांचा वापर करून कल्पनाविलास निर्माण करते आणि त्यातून निर्माण होण्याऱ्या सकारात्मक भावनांची अनुभती घेते. या तंत्राला मार्गदर्शित व्हिज्युअलायझेशन आणि इमेजरी थेरपी देखील म्हणतात.



       मानसशात्रानुसार मार्गदर्शित कल्पनाविलास चे मूळ हे मल्टि-सेन्सॉरी व्हीज्यूअलायझेशन मध्ये आहे ज्यामध्ये क्लायंट ला काही लहान श्वासोच्छ्वासाच्या व्यायामानंतर डोळे मिटून सुचनांच्या सहाय्याने काल्पनिक जगात मार्गदर्शित करण्यात येते. मार्गदर्शित कल्पनाविलास मुळे जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वर्तन आणि वैचारिक  बदल घडवून आणण्यासाठी आंतरिक परिवर्तनासाठी प्रेरणा आणि दिशा मिळते. ह्यामध्ये आपल्या फक्त पंचेंद्रियांचाच समावेश नसतो तर आपले विचार, भावना, संवेदना,सेल्फ टॉक, आणि अफर्मशन चा सुद्धा समावेश केला जातो.

मार्गदर्शित कल्पनाविलास परिणामकारक ठरतो कारण शरीर आणि मेंदू आपल्या काल्पनिक अनुभवाना सुद्धा तेवढ्याच तीव्रतेने प्रतिसाद देते जेवढ्या तीव्रतेने ती प्रत्यक्ष अनुभवाना देत असते. मेंदू काल्पनिक नकारात्मक अनुभवाना तीव्र प्रतिसाद देवून आपल्यामध्ये चिंता,राग ह्यांचा प्रवाह सुरू करतो जेणे करून आपल्यामध्ये इतकी अस्वस्थता वाढते की काल्पनिक भीती आपल्याला खरी वाटायला लागते. तेच मेंदू सकारात्मक अनुभवाना प्रतिसाद देवून आपल्यामध्ये आनंदाचे तरंग निर्माण करतो. त्यामुळे मार्गदर्शित कल्पनाविलास चा उपयोग ताण-तनावांच्या काळात रीलॅक्स होण्यासाठी, भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, सकारात्मक भावनांची जाणीवपूर्वक जोपासना करण्यासाठी केला जातो.

आताच्या मॉडर्न जगात मार्गदर्शित कल्पनाविलास चा उपयोग बहुतेक मानसोपचार उपचारात, ध्यानधारनेत, वेदना नियंत्रण आणि व्यवस्थापनात, स्पोर्ट मानसशात्रात, उद्योगधंद्यात यश मिळवण्यासाठी, झोपेची समस्या, परीक्षेत चांगल्या कामगिरीसाठी , दु:खद प्रसंगातून सावरण्यासाठी, शोकातून बाहेर पाडण्यासाठी होतो. त्याची परिणामकारकता अनेक संशोधनातून सिद्ध झालेली आहे . 

                तुम्ही सुद्धा कधी कधी आपल्या धावपळीच्या आयुष्यातून एक पाच -सात मिनिटांचा ब्रेक घेवून कल्पना विलासात जावून रीलॅक्सशेसनचा अनुभव घेवू शकतात. त्यासाठी एक छोटा कल्पनाविलास तुमच्यासाठी :

एका आरामदायी ठिकाणी शांत बसा किंवा झोपा. शरीर रीलॅक्स करा. आपल्या आजूबाजूच्या स्थितीचे भान घ्या. श्वासोच्छ्वास संथ आणि नॉर्मल चालू राहू द्या . आता कल्पना करा की तुम्ही एका शांत नदीकाठी बसले आहेत. नदीच्या पाण्यावरून येणारी थंड झुळूक तुमच्या शरीराला स्पर्श करत आहे. वाहत्या पाण्याचा मंद मंद आवाज तुम्ही अनुभवत आहेत. नदीवर येणाऱ्या पक्ष्यांची किलबिल ऐकत आहात. नदीच्या काठावरील हिरवी, पिवळी, लाल फुले आणि  त्यांचा सुगंध तुमची चित्तवृत्ति प्रफुल्लित करत आहे . तुम्हाला सगळ्या जगाचा विसर पडला आहे. फक्त नदीचा किनारा आणि तेथील दृश्याची अनुभूति तुम्ही घेत आहेत. तुम्हाला खूप रीलॅक्स आणि आनंदी वाटते आहे. तुम्ही अजून काही काळ ह्या दृश्यामध्ये राहू शकतात. जेव्हा बाहेर यायचे तेव्हा ज्या ठिकाणी आणि ज्या अवस्थेत आहात त्याची जाणीव करा आणि हळुवार ह्या कल्पना विलासातून बाहेर या! “


एकदा नदीकाठी जावून या आणि मार्गदर्शित कल्पनाविलासचा अनुभव घ्या.

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)