नात्यांना श्वास देणाऱ्या सीमारेषा

TheMindTalks
0

 

नात्यांना श्वास देणाऱ्या सीमारेषा

आपण जन्माला आल्याबरोबर वेगवेगळ्या नात्यांमध्ये गुंतले जातो. खरंतर कोणतीही व्यक्ती नात्यांशिवाय नसतेच,हे नाते आपले जगणे समृद्ध करतात .आपल्या आयुष्यातील वेगवेगळी नाती आपल्याला आधार देतात,  प्रेम देतातआपले अस्तित्व हे अर्थपूर्ण बनवतात!

    पण कधी कधी हीच नाती जगणे ही अवघड करून जातात. त्यांच्यापासून पळता ही येत नाही आणि त्यांच्यासोबत राहणे ही जमत नाही अशी त्रिशंकूसारखी अवस्था होऊन जाते

जेव्हा नात्यांमध्ये तणाव, अपराधभाव, अपेक्षांचे डोईजड होणे, दुर्लक्षिले जाणे, जास्तीचा हस्तक्षेप, वरचढपणा,भावनिक गुदमरने आणि थकवा निर्माण होतो तेव्हा ही नाती नकोशी वाटायला लागतात! एकेकाळी एवढे सुन्दर असलेले नाते अचानक ह्या वळणावर का येऊन थांबले हे सुद्धा लक्षात येत नाही.

        शीला ला सकाळच्या सुंदर हवेत फिरायला जायला आवडायचे, तो तिचा मी टाइम असायचा, कोणाशी बोलता स्वतःशी संवाद साधत किंवा एखादे गाणे मनात घोळवत तिला पहाटेचे वातावरण एन्जॉय करायला आवडायचे! तिचा दिवसाचा मूड ह्या सकाळच्या तिच्या फिरण्यामुळे फ्रेश असायचा. एकदा सोसायटीमध्ये फिरताना एक 3/4 वर्षांनी मोठ्या ताई भेटल्या आणि थोड्या गप्पा झाल्या, पण त्या तिच्या सकाळच्या वेळी रोजच तिच्यासाठी थांबून राहायच्या, तिच्यासोबत चालताचालता अखंड बडबड चालू असायची त्यामुळे हिचा मी टाइम डिस्टर्ब व्हायला लागला. त्या ताईं दिसल्या की हीची चिडचिड व्हायला लागली .

कविता आणि रमेश च्या संसारात कविताचे प्रत्येक बाबतीत अतिजागरुक आणि चौकस असणे रमेश ला अस्वथ करून जाते.

अरुण ला रात्री 10 नंतर शांत मेडिटेशन संगीत ऐकत झोपायचे असते , पण त्याचा चुलत भाऊ प्रकाश नेमकी 10 नंतर त्याला फोन करणार आणि अश्याच इकडच्या तिकडच्या गोष्टी करत पाऊण तास घेणार, हे कधीतरी नाही तर दर 2/3 दिवसांनी होते, अरुण ची त्याचा फोन आला कि चिडचिड सुरु होते, पण त्याला वाईट वाटेल म्हणून हा काही बोलता फोन वर हुंकार भरत राहतो.

अतुल आणि मोना दिसताना हॅप्पिली मॅरीड कपल , पण अतुल ला मोना च्या प्रत्येक निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याची आणि वर्चस्व दाखवण्याची सवय ! त्यामुळे मोनाला गळचेपी झाल्यासारखी वाटत राहते , आत्मविश्वास डगमगतो,पण नवरा म्हणून विरोध करत नाही.

आकाश ला समोरच्याशी बोलताना पाठीवर किंवा खांद्यावर मारत हसायची सवय आहे, दिप्तीला त्याचे सगळ्यांसमोर असे मारणे अजिबात आवडत नाही, प्रचंड राग येतो. पण तो सिनिअर असल्याने त्याला वाईट वाटेल म्हणून ती काही बोलत नाही.

ह्या उदाहरणांवरून काय दिसते ? का एका बाजूने ह्या नात्यांमध्ये फ्रस्टरेशन आहे ?

कारण त्यांनी आपल्या बाबतीत पाळायच्या मर्यादा दुसऱ्यांना स्पष्टपणे सांगितल्या नाहीत !

नात्यांमध्ये सीमारेषा असणे आणि त्यांचे पालन होणे अतिशय महत्वाचे असते !






आपल्या आजूबाजूला कितीतरी नात्यांमध्ये एका बाजूने काहीच सीमारेषा आखल्याने दुसऱ्या बाजूने त्या नात्यावर आक्रमण होते, अपेक्षा ही वाढू लागतात आणि ह्या ओझ्याखाली नात्यांमधील एक व्यक्ती गुदमरून जाते तर दुसरी व्यक्ती ही आनंदी नसते हे आपण कित्येकदा पाहतो.  सीमारेषा नात्यांना वेगळे करत नाही तर ती नात्यांना मोकळेपणा आणि सहजता देते.

सीमारेषा म्हणजे  "आपण कोण आहोत आणि आपल्याला काय मान्य आहे काय मान्य नाही" हे स्पष्ट करणारी रेषा !

नात्यांमध्ये निरोगी सीमारेषा असणे म्हणजे आपल्या शारीरिक आणि भावनिक, मानसिक आरोग्याचे संतुलन राखण्यासाठीआपण आपल्या आणि इतर नात्यांमध्ये ठरवलेल्या वैयक्तिक मर्यादा निश्चित करणे.

सीमारेषा मध्ये संवादापासून सुरुवात होते, कोणत्या प्रकारचा संवाद किंवा व्यवहार, कृती आपल्याला स्वीकारहार्य आहे आणि कोणती नाही ह्याचे नियम आणि हे नियम पाळले जाण्याची गरज!

ह्या सीमारेषांमध्ये आपल्या गरजा समोरच्याला सांगणे येतेच, पण दुसऱ्यांच्या गरजा ही समजून घेऊन त्यांची  मर्यादा पाळणे येते. इथे आपली जबाबदारी दुसऱ्यांवर टाकता स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे आहे!

नात्यांमधील गरजेच्या सीमारेषा

  • शारीरिक : ह्या सीमारेषांमध्ये एखादे कार्य करण्याची आपली शारीरिक क्षमता, आपले आरोग्याची स्थिती, आपल्याला शारीरिक स्पर्श जसे जवळ घेणे, हात पकडणे ह्यात जाणवणारी असहजता, आपल्या प्रायव्हसी ची गरज, लैंगिक इच्छापूर्ती मधील इंटरेस्ट ह्या गोष्टी येतात .
  • भावनिक:  ह्या सीमारेषांमध्ये आपल्या भावनिक गरजा, आपले विचारस्वातंत्र्य आणि निर्णय स्वातंत्र्यची निवड, भावनिक आरोग्य जपण्यासाठी नात्यांमध्ये स्वतःची स्पेस , त्रासदायक भावना व्यक्त करण्यात येणारी सहजता किंवा असहजता ह्याचा समावेश होतो.
  • वेळ:  ह्या सीमारेषांमध्ये आपण कधी उपलध असू कधी नाही हे स्पष्ट असणे, कामाचे तास, एकटे वेळ घालवण्याची गरजेचा आदर . सोशल मीडिया वर उपलब्ध असण्याची वेळ , स्वतःच्या छंदासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी काढलेला वेळ, स्वतःचे शेड्युल हे घटक येतात.
  • बौद्धिक:  ह्या सीमारेषा आपली श्रद्धा, मते आणि मूल्ये , आपले विचार प्रामाणिकपणे व्यक्त करण्यास सक्षम असणे आणि तुमच्या जोडीदाराचे वेगवेगळे दृष्टिकोन ऐकण्यास आणि त्यांचा आदर करण्यास तयार असणे समाविष्ट आहे.

सीमारेषा तयार करण्यासाठी पुढील गोष्टी महत्वाच्या आहेत:  

स्वतःच्या गरजा आणि मर्यादा ओळखणे : आपल्या जगण्याच्या क्वालिटीवर चिंतन करा, नातेसंबंधात आपल्या  वैयक्तिक गरजा, मर्यादा आणि तडजोडी न करण्यायोग्य गोष्टी काय आहेत हे ठरवण्यासाठी वेळ काढा.

आपल्या भावना ऐका, भावनांकडे लक्ष द्या, कारण त्या सीमा ओलांडल्याचे संकेत देऊ शकतात. उदाहरणार्थ, तुमचा थकवा, तुम्ही तुमचा जास्त वेळ आणि शक्ती खर्च केली आहे हे दर्शवू शकतो.

स्वतःसाठी स्वतःच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण करा, सीमारेषा निश्चित करणे हे एक निरोगी आणि आवश्यक कौशल्य आहे, स्वार्थी कृती नाही हे ओळखा.

समोरच्या व्यक्तीला आपल्या मर्यादा आणि गरजा स्पष्टपणे सांगणे : नातेसंबंधात समोरच्या व्यक्तीला आपल्या मर्यादा स्पष्टपणे सांगताना आपल्याला काय नको आहे यापेक्षा आपल्याला काय हवे आहे ते स्पष्टपणे सांगा. इथे तू किंवा तुम्ही असे वागता ह्यापेक्षा वाक्यात स्वतःचे सर्वनाम “मी” वापरा सीमारेषा आरोपात्मक वाटू नये म्हणून आपल्या  स्वतःच्या दृष्टिकोनातून आपल्या गरजा मांडा. उदाहरणार्थ, "तुम्ही रात्री उशिरा तणावपूर्ण गोष्टींबद्दल माझ्याशी नेहमी बोलता" असे म्हणण्याऐवजी, "रात्री ९ नंतर जेव्हा आपण यावर चर्चा करतो तेव्हा मला खूप त्रास होतो" असे म्हणा. “तू नेहमीच माझी तुलना इतर लोकांशी करते” ह्यापेक्षा “मला तुलना केलेले आवडत नाही” असे म्हणा.

तू नेहमीच पराचा कावळा करून परिस्थिती बिघडवते ह्यापेक्षा “परिस्थितीचे पूर्ण अवलोकन करून मग माझ्याकडून स्पष्टीकरण मागितले तर विवाद होणार नाही असे म्हणा”  

शांत आणि दृढ राहा, जास्त माफी न मागता किंवा जास्त स्पष्टीकरण न देता शांत, दयाळू पण ठाम स्वरात संवाद साधा. सुरुवातीला एक किंवा दोन सोप्या सीमारेषा पालन करण्याचा सराव करा, जसे की दर आठवड्याला विशिष्ट वेळ हवा आहे.

आपण आखलेल्या सीमारेषांचे सातत्याने पालन करा: आपल्या सीमारेषा सातत्याने अंमलात आणा.

परिणामांशिवाय सीमारेषा ही फक्त एक सूचना आहे. जर तुम्ही सीमारेषा निश्चित केली तर तुम्ही वर्णन केलेल्या कृतीचे पालन करण्यास तयार असले पाहिजे. तुम्हाला कदाचित लगेच परिणाम दिसणार नाहीत पण दूरगामी आणि दीर्घकालीन परिणाम दिसण्यासाठी आखलेल्या सिमारेषांचा आदर राखा, त्यासोबत सुसंगत रहा;तुमच्या सीमा सातत्याने मजबूत करणे अत्यंत महत्वाचे आहे.

पहिल्यांदा सीमा निश्चित करताना अपराधीपणा किंवा अस्वस्थता वाटणे सामान्य आहे, विशेषतः जर आपला स्वभाव इतरांना  खुश करणारा किंवा इतरांच्या मर्जीनुसार वागणारा असेल तर! नातेसंबंधात इतरांना वाईट वाटेल किंवा उगाच भांडण होईल म्हणून मनाविरुद्ध वागणाऱ्या व्यक्तींना सीमारेषा आखणे सुरुवातीला कठीण जाईल, अस्वस्थता वाढेल. ही भावना तात्पुरती आहे आणि निरोगी पायंडा  स्थापित करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे हे ओळखा.

जर आपण निश्चित केलेली सीमारेषा  ओलांडली गेली असेल, तर शांतपणे आणि स्पष्टपणे सांगा की “सीमारेषा ओलांडली गेली आहे. ते मला अस्वस्थ करते आहे  आणि ह्याची मला तुम्हाला पुन्हा जाणीव करून द्यावी लागेल “.

 

आपल्या नातेसंबंधातील इतर नात्यांचे ही ऐका आणि त्यांच्या मर्यादांचा आदर करा: जेव्हा आपण सीमारेषा ठरवतो त्याच वेळी दुसऱ्या व्यक्तींच्याही सीमारेषा असणार ह्याचे भान राहू द्या!

सीमारेषा ही दुतर्फा मार्ग असायला हवी. आपल्या नातेसंबंधातील व्यक्तींच्या गरजा ऐका आणि परस्पर आदर वाढवणाऱ्या पद्धतीने तुमच्या गरजा व्यक्त करा. परस्परांचा आदर करा.

आपल्या  स्वतःच्या सीमा निश्चित करणे (आपण काय कराल किंवा काय करणार नाही) आणि दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे (त्यांनी काय करावे) यातील फरक जाणून घ्या.

 सीमारेषा खरंतर प्रेमाची नवी भाषा आहे , मी तुम्हाला आदर देतो, पण स्वतःला ही विसरत नाही ,मी तुझे ऐकते पण माझे ही म्हणणे सांगते, मी तुमच्या सगळ्यांची काळजी घेतो  पण स्वतःचीही  ही तेवढीच काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. ह्यातून सीमारेषा स्पष्ट होते 

नाती जपायची असतील तर मी ला हरवू नका कारण नातं तेच खरं जिथे स्वातंत्र्य आणि सन्मान दोन्ही असतात सीमारेषा नसतील तर नाती गुदमरतात.  

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)