HORN NOT OK PLZ

TheMindTalks
0
हॉर्न  नॉट ओके   प्लिज..



 मागचे सात आठ दिवस गाडीचा हॉर्न बिघडला होता आणि दुरुस्त करून घ्यायला वेळ ही नव्हता .त्यामुळे सकाळी ,दुपारी ,रात्री, हायवे, गर्दीचा गजबाजाटा चा रस्ता, गल्ली बोळातील रस्ता येथून कामाच्या वेळेनुसार आणि गरजेनुसार माझे गाडी चालवणे सुरूच होते.
        ह्या सात/आठ दिवसाचे अवलोकन करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हॉर्न चालू नाही म्हणून मला काही प्रॉब्लेम नाही आला गाडी चालवताना !
"अरेच्चा!! असा कसा काही प्रॉब्लेम नाही झाला? हॉर्न सोडून असे वेगळे काय बरं होते माझ्या ड्राइविंग मध्ये की ज्यामुळे सगळे सुरळीत चालले?"
    हे शोधण्यासाठी आधी मला हॉर्न ची गरज का वाटत होती किंवा मला हॉर्न ची इतकी सवय का झाली हे मी तपासायला घेतले!
  साधारणपणे आपण आपल्या रस्त्यात कोणी येत असेल, आपल्याला इजा होण्याची शक्यता आहे असे दिसले किंवा आपल्याकडून एखाद्याला इजा होऊ शकते ह्याची शक्यता वाटल्यास आपण हॉर्न वाजवतो किंवा कधी कधी नुसते सिग्नल ला थांबलोय, ट्रॅफिक पुढे सरकत नाही तरी हॉर्न वाजवतो, एखाद्या वळणावर, गल्लीच्या तोंडाशी जाताना आपण हॉर्न देतोच !
     का बरं हॉर्न वाजवत असतो आपण
  मान्य आहे की आपल्याला, स्वतःला वा
 इतरांना इजा पोहोचू नये म्हणून एक सावधगिरीचा उपाय म्हणून आपण आवाज करतो ! पण हे तेवढेच असते का? हॉर्न वाजवणे हे एक प्रतीक आहे,स्वतः चे अस्तित्व जाणवून देण्याचे ! इतरांच्या नजरेत येण्याचे ! मी आहे ह्या रस्त्यावर, ह्या वाटेवर! इतरांनी माझे असणे लक्षात घ्या आणि आपापले मार्ग ठरवा किंवा मला रस्ता द्या पुढे जायलाअचानकपणे कोणी माझ्या मार्गात येऊ नका. माझा प्रवास चालू असताना इतरांनी माझ्या प्रवासात मला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये .मी तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो किंवा तुम्ही मला त्रासदायक ठरू शकता याची तुम्ही जाणीव ठेवा .हे सगळे तुम्हाला कळावे म्हणून मी आवाज करतेय ,हॉर्न वाजवतेय! थोडक्यात मी रस्त्या वरची परिस्थितीला माझ्या नियंत्रणात आणायला बघतेय


          मग मी गेले काही दिवस असा विनाआवाज करता गाडी कशी काय चालवत होते? इथे माझ्या लक्षात येतंय की मला मोठा आवाज करून इतर लोकांच्या नजरेत काही गोष्टी जाणवून द्यायची गरज पडलीच नाही. मी माझा वेग नियंत्रित ठेवला. जिथे मला वाटले की माझ्यापासून इतरांना धोका संभावतो, मी वेग कमी केला आणि लेन थोडीसी बदलली. जिथे मला स्वतःला धोका होण्याची शक्यता वाटली तिथे ही मी वेगावर नियंत्रण ठेवले, प्रसंगी थांबले किंवा मार्ग बदलला! पण अट्टाहासाने तोच वेग, तोच रस्ता, मार्ग ठेवले नाही.
ज्यांना मला ओलांडून पुढे जायचे होते, त्यांना सहजतेने पुढे जावू दिले.मला गरज वाटली तिथे आणि शक्य झाले तेव्हा मी पण सुरक्षितरित्या ओव्हरटेक केले. हे सगळे शांतपणे, अजिबात हॉर्न वाजवता ! मी रस्त्यावरची परिस्थिती कुठल्याही प्रकारे कंट्रोल करण्याचा कसलाच प्रयत्न केला नाही.
             मी हेच तत्व रोजच्या जगण्यात ही वापरू शकते ना! माझा आयुष्याचा प्रवास ही विना हॉर्न चा करू शकते.
   आपली सुद्धा धडपड चालूच असते ना की आपले असणे इतरांच्या नजरेत जाणवू देण्याची! आपले हॉर्न मग वेळोवेळी कर्कश्य वाजत राहतात कधी नात्यांमध्ये, कधी स्वतः मध्ये तर कधी करिअर मध्येहे हॉर्न नेहमी आवाज करतातच असे नाही काही हॉर्न हे आपल्या बॉडी लँग्वेज मधून पण दिसतात. ह्या हॉर्न चा होतो त्रास आपल्याच जिवलगांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना! त्यांचा त्रासिक ,वैतागलेला प्रतिसाद पाहिल्यावर पण परत आपल्यालाच प्रश्न पडतो की अरे , मी एवढी घसा ताणून सांगतेय/सांगतोय किंवा सांगायचा प्रयत्न करतोय तरी हे समोरच्याच्या किंवा इतरांच्या मनापर्यंत का पोहोचत नाही? ह्या प्रश्नांबरोबर आपली हॉर्न ची तीव्रता वाढते आणि त्याच प्रमाणात आपले डिस्टर्ब होणे पण!


               खरंच, हॉर्न देण्याची प्रत्येक वेळी गरज पडतेच का? पडत असेल ही तरी आपल्या हॉर्न ने इतरांचे लक्ष वेधले जाईल याची किती खात्री असते?जर पूर्णपणे खात्री देता येत नाही तर मग स्वतःची पद्धत बदलून पाहू या ना!
        जरी माझे अस्तित्व कोणाच्या नजरेत नाही आले किंवा माझे महत्त्व कोणी मान्य नाही केले तरी माझा प्रवास थांबणार आहे का? मग मी आवाज करता ,हॉर्न वाजवता माझ्या प्रवासाचा आनंद घेऊ शकतो /शकते की नाही?
    शक्य तिथे माझ्या वेगावर, भावनांवर नियंत्रण ठेवून , प्रसंगी माझा मार्ग बदलू शकते/शकतो
माझ्या सभोवताली,आजूबाजूला आवाजाची तीव्रता वाढू देता माझ्या रस्त्यात येणारे धोके माझ्या जागरुकतेने प्रसंगी लवचिकपणाचे धोरण अवलंबून टाळू शकते / शकतो ना? एखाद्या अनपेक्षितपणे सामोरे आलेल्या संकटाचे अवडम्बर करता ,माझी विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि माझे स्व:नियंत्रण त्याचबरोबर आता माझ्याकडे आवाज करण्याचे साधन नाही किंवा मला त्याचा वापर करायचा नाही याची जाणीव ह्या सगळ्यांचा वापर करून मी आलेल्या संकटाचा सामना करू शकतोच !         इथे सगळीकडे हॉर्न वा आवाज हे प्रतीक आहे आपण इतरांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवू शकतो, माझ्या मर्जीप्रमाणे वागायला लावू शकतो ,गोष्टी माझ्या कह्यात राहायला पाहिजे ह्या प्रवृत्तीचे आणि हॉर्न नसणे वा आवाज करणे हे प्रतीक आहे स्व:नियंत्रणाचे, मला दुसऱ्याला ,इतरांना माझ्या कह्यात ठेवयाचे नाही तर माझ्या भावना, माझे प्रतिसाद , माझे मानसिक स्वास्थ्य माझ्या कह्यात ठेवण्याचे!! 
        मग हॉर्न नकोच का आयुष्यात? आपल्या गाडी ला हॉर्न गरजेचा आहे पण अत्यावश्यक नाही. तुमच्या गाडी ला हॉर्न नसेल तर तुमचा प्रवास थांबणार नाही, पण तो प्रवास अधिक जागरूकतेने आणि स्वयंनियंत्रणात होईल.    
            आयुष्याच्या प्रवासाचे ही असेच आहेतुमचे हॉर्न जवळ राहू द्या, पण वापर किती, कसा आणि केव्हा करायचा ह्याचा निर्णय तुमचा! तुम्हाला निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे!



       अरे हो! मी माझ्या गाडीचा हॉर्न दुरुस्त करून घेतलाय बरं का ! पण तो वापरायचा की नाही, आवाज करायचा की नाही हे मी ठरवते रस्त्यावरची परिस्थिती नाही!


रोहिणी खरात फुलपगार
मनोचिकित्सक, मानसोपचार तज्ञ
9604968842

  

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)