कृतज्ञता

TheMindTalks
0

 

"आपल्या कृतज्ञतेच्या पात्रतेच्या गोष्टी आपण अनेकदा गृहीत धरतो- सिंथिया ओझिक

कृतज्ञता

आज रमा आपल्या बालमैत्रिण माधुरीला खूप दिवसातून भेटत होती, भरपूर गप्पा ,जुन्या आठवणींना उजाळा देणे  चालू होते. पण एक-दोन  तासात रमा वैतागायला लागली. माधुरी कडे सुखद आठवणीपेक्षा तक्रारी आणि अडचणीचे विषयच जास्त होते. ह्या सगळ्या गोष्टीतुन रमा ही गेली  होती  पण तिला त्याबाद्दल आता काही तक्रार नव्हती किंबहुना ज्या गोष्टी तेव्हा कष्टदायक वाटत होत्या त्या आता नॉर्मल वाटायला लागल्या आहेत . रमा ने भेट आटोपती घेतली .  तिच्या डोक्यात विचार येत होता कि माधुरीकडे कितीतरी अश्या गोष्टी आहेत कि ज्याबद्दल तिने आनंदाने बोलले पाहिजे, कृतज्ञ राहिले पाहिजे. कितीतरी चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे माधुरीमध्ये कृतज्ञतेची भावना विकसित झाली नाही.

कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड

कृतज्ञता ही अनेक सकारात्मक भावनांपैकी एक आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्या जीवनात काय चांगले आहे यावर लक्ष केंद्रित करणे आणि आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी मनातून त्याबद्दल जाणीव असणे आणि त्याबद्दल आभारी असणे होय. कृतज्ञता ज्याला इंग्रजी मध्ये ग्रॅटिट्यूड म्हणतात त्याला आपण धन्यवाद व्यक्त करणे , कौतुक करणे वा आभारी असणे हि म्हणू शकतो.

कृतज्ञ राहण्यासाठी वा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या आयुष्यात खूप मोठे लक्षात येईल असे घडलेच पाहिजे असे नाही . तुम्ही ज्या गोष्टीना गृहीत धरून त्यांची नोंद हि घेत नाहीत अश्या कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला , आपल्या सोबत आहेत. जसे कि आपली  पंचेंद्रिय आज व्यवस्थित कार्यरत आहेत , ज्यांना ऐकू येत नाही, दिसत नाही, वास येत नाही, स्पर्श जाणवत नाहीत, त्यांना ह्या निरोगी पंचेंद्रियांचे महत्व कळते . आपली विचारशक्ती शाबूत आहे, स्मरणशक्ती  काम करतेय,आपले सगळे अवयव कार्यरत आहेत ह्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहतो का आपण ? निसर्ग चक्र अनुभवने, मनात वेगवेगळ्या भावना निर्माण होणे, कार्यरत राहणे, चालू शकणे ,शांत झोप लागणे ,भूक लागणे, उबदार पांघरून असणे , डोक्यावर छप्पर असणे, नोकरी किंवा उपजीविकेचे साधन असणे, भिजण्यासाठी पाऊस असणे , उबदार प्रकाशासाठी ऊन असणे , गप्पांसाठी मित्र -मैत्रीण असणे , नातेवाईक /भावंडं असणे, कुटुंबाचे सोबत असणे, आईवडील हयात असणे, दमून भागून घरी आल्यावर हातात चहाचा कप मिळणे किंवा चहा करू शकू असे सामान घरात असणे अश्या अगणित गोष्टी आहेत कि व्यक्तीने त्याबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे , कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे . अगदी मोबाइल ची बॅटरी दिवसभर राहणे, ओला कॅब बुक केल्यावर दहाव्या मिनिटाला गाडी येणे, प्रवासात ट्राफिक न लागणे , बिना कटकटीचा दिवस जाणे , समोरचा लगेच आपल्या मताशी सहमत होणे , बिना कुरकुर करता जोडीदाराने ओ .टी. टी. वर कार्यक्रम बघू देणे ह्या गोष्टी घडल्यास मनात जे तरंग उठतात ते कृतज्ञता असते ; कल्पना करा ,गोष्टी अश्या प्रकारे घडल्या नाहीतर आपली कशी अवस्था असते !आपण आनंदी होतो ,पण कृतज्ञता व्यक्त करत नाही ! ना जोडीदाराशी ना स्वतःशी ! ह्या गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात. ह्या आयुष्यात असतातच त्यात काय नवल ! असा ही बहुतेकांचा दृष्टिकोन असतो ; पण ज्यांच्या आयुष्यात ह्या पैकी काही गोष्टी नसतात त्याना ह्याचे किती महत्व असेल कल्पना करून बघूया. आपल्यापैकी किती तरी लोक असे भाग्यवान आहेत कि ज्यांच्या आयुष्यात ह्या गोष्टींची रेलचेल आहे आणि तरीही त्यांना आयुष्याबद्दल काही तक्रारी आहेत. सगळ्यात महत्वाची कृतज्ञता आपण रोज सकाळी जिवंत असतो आणि आपल्याकडे एक नवीन दिवस असतो काहीतरी साध्य करण्यासाठी, नवीन शिकण्यासाठी, झालेल्या चुकांपासुन काहीतरी शिकण्यासाठी , क्षमा करण्यासाठी ,क्षमा मागण्यासाठी , सेल्फ डेव्हलपमेंट साठी आणि आयुष्य सुंदर करण्यासाठी! ह्या संधी साठी हि आपण कृतज्ञ राहिलेच पाहिजे,नाही का ?

जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा आपण किती भाग्यवान असतो यावर विचार करण्यास थोडा वेळ लागतो - मग ती छोटी गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट.



कृतज्ञतेची भावना जोपासणे का महत्वाची आहे ?

फक्त कृतज्ञता जाणवणे चांगले नाही तर  कृतज्ञतेची सवय लावणे देखील आपल्यासाठी उपयोगी ठरू शकते. इतर सकारात्मक भावनांप्रमाणेच, नियमितपणे कृतज्ञता व्यक्त करणे आपल्या  शरीरासाठी, मनासाठी आणि मेंदूसाठी मददगार ठरतात हे अनेक संशोधनातून सिद्ध झालेय.

ह्या सकारात्मक भावनांचा आपल्याला काय आणि कसा उपयोग होतो हे पाहुयात :

कृतज्ञता आपल्याला  नकारात्मक भावनांपासून, विचारांपासून आणि त्यांच्या सोबत येणार्‍या चिंतेपासून दूर करते.

जेव्हा आपल्याला कृतज्ञता वाटते तेव्हा आपल्याला आनंदी, शांत, आनंदी किंवा प्रेमळ देखील वाटू शकते त्यामुळे

 आनंदी आणि सकारात्मक मूड निर्माण करते . विचारांत आणि वर्तनात लवचिकता वाढते .संयम, नम्रता आणि समजूतदारपणा वाढीस लागतो,शारीरिक आरोग्य चांगले राहते ,चिंता ,ताण तणाव कमी होतो .एकटेपणा दूर होतो ,चांगली झोप लागते, थकवा कमी जाणवतो, सामाजिकदृष्टया हितकारक वर्तन वाढते तसेच परस्परसंबंध मजबूत करते.दैनंदिन जगण्यातील समाधान वाढून रोजच्या जगण्यात रुची निर्माण होते. भौतिकवाद आणि चंगळवाद ची इच्छा कमी होत जाते .

कृतज्ञतेची भावना आपल्याला अधिक सकारात्मक शक्यतांसाठी मोकळे करतात ; ते आपली नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि चांगले निर्णय घेण्याची क्षमता वाढवतात.

कृतज्ञतेमुळे अनेक सकारात्मक कृती होऊ शकतात ; एखाद्याने आपल्यावर केलेल्या दयाळूपणाबद्दल जेव्हा आपल्याला कृतज्ञता वाटते तेव्हा आपण त्या बदल्यात दयाळूपणा करण्याची अधिक शक्यता असते.तुमच्या कृतज्ञतेचा दुसऱ्याच्या कृतीवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो.लोकांचे आभार मानल्याने ते पुन्हा दयाळूपणा दाखवतील.

कृतज्ञता आपल्याला चांगले संबंध निर्माण करण्यात मदत करते;जेव्हा आपण आपल्या जीवनातील लोकांबद्दल मनापासून कृतज्ञता अनुभवतो आणि व्यक्त करतो, तेव्हा ते प्रेमळ बंध निर्माण करतात, विश्वास निर्माण करतात आणि आपल्याला एकमेकांजवळ येण्यास मदत करतात.

अनेक भावनिक आणि मानसिक प्रॉब्लेम्स मध्ये ग्रॅटिट्यूड डायरी लिहिणे ही  एक फायदेशीर कृती ठरली आहे.  डिप्रेशन च्या अनेक व्यक्तींमध्ये जिथे निराशावाद आणि अगतिकता जाणवत असते तिथे कृतज्ञतेची भावना निर्माण करण्याची आणि ती व्यक्त करण्याची सवय आशावाद आणि सेल्फ वर्थ ची जाणीव निर्माण करते .

कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची  सवय  विकसित करण्यासाठी खूप काही विशिष्ट वा वेगळे करण्याची गरज नाही . त्यासाठी आपल्या रोजच्या २४ तासातले फक्त १० मिनिटे बाजूला काढावे लागतात :

एक डायरी राखणे आणि सकाळी उठल्यावर आपल्याला जाणवत असलेल्या कोणत्याही गोष्टींबद्दल डायरीमध्ये कृतज्ञता व्यक्त करणे .उदा. मी कृतज्ञ आहे कारणमला तास शांत झोप लागली, माझे शरीर वेदनारहित आहे, बाहेर छान पाऊस पडतोय वा छान ऊन पडलेय. अगदी कधीच गृहीत धरणाऱ्या आणि सवयीच्या गोष्टीपासून सुरुवात करणे . जसजसे पुढे जाऊ तसे अनेक गोष्टी जाणवतात .

रात्री झोपताना दिवसभरतील धडामोडींमधील कोणत्याही गोष्टींबद्दल आणि भेटलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता जाणवून डायरीमध्ये व्यक्त करणे .

सकाळचे मिनिटे आणि रात्रीचे मिनिटे तुमच्यासाठी अनंत आनंदाचे दरवाजे उघडतील .

लवकरच आपल्या आनंदाची सुरुवात करायला हरकत नाही , हो ना ?



 

तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहण्याची आणि सतत आभार मानण्याची सवय लावा. आणि सर्व गोष्टींनी तुमच्या प्रगतीला हातभार लावला आहे म्हणून तुम्ही सर्व गोष्टींचा तुमच्या कृतज्ञतेमध्ये समावेश केला पाहिजे.”

राल्फ वाल्डो इमर्सन

 

रोहिणी फुलपगार

7840908441

themindtalks4u@gmail.com

 

 

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)