मनाचे भरकटणे

TheMindTalks
0

 

मनाचे भरकटणे

मेघा लॅपटॉप वर काम करत होती, नजर स्क्रीन वर होती पण मन कुठे जाग्यावर होते ?  ते तर काल जे ऑफिस मध्ये घडले त्याच्यात आणि उद्या काय होऊ शकेल ह्यात फिरत होते ,मधूनच आठ दिवसापूर्वीच्या ,महिन्यापूर्वीच्या दिवसात हि चक्कर मारत होते ..सुनीता चपात्या करता करता इतकी भरकटत होती कि हाताला चटका बसल्यावर तिला भान येत होते ..संदीप गाडी आणि कित्येक विचार एकाच वेळी चालवत असतो ! दीपक ने एका विषयाचा अभ्यास सुरु केला कि इतर विषय ही त्याचे लक्ष खेचत असतात त्यामुळे त्याचे एकाच ठिकाणी चित्त एकाग्र होत नाही .आपल्यापैकी बहुतेकांना हा अनुभव येत असतो कि एका क्षणात मनात खूप सारे विचार ,कल्पना , दृश्य येत असतात. मनाचा हा चंचलपणा अनादिकालापासून सुरु आहे आणि तो अनंतकाळापर्यंत चालू राहणार आहेच. ह्या चंचलपणाचे  बहिणाबाईंनी " मन वढाय वढाय ,आता होत जमिनीवर आता गेलं आभायात" ह्या शब्दांत वर्णन केले आहे .

बरं  , ह्या मनाच्या भरकटण्याला काही सीमा ही नाही , स्थळ काळाचे बंधन आपल्या बिचार्या शरीराला ! मनाने ते बंधन कधीच झुगारलेले आहे ! एका क्षणात ते दहा वर्षे पाठीमागे जाईल तर क्षणार्धात ते भविष्यात उडी मारेल . पण वर्तमानात जास्त काळ रेंगाळणार नाही . एका क्षणी ते घरात असेल , दुसऱ्या क्षणी ऑफिस मध्ये तर पुढील क्षणात एखाद्या समारंभात , समुद्रकिनारी , टेकडीवर कुठे हि आढळेल ! सगळीकडे भटकेल पण वर्तमानात टिकणार नाही , अजून जिथे जाईल तिथे ही जास्त काळ टिकणार नाही . एका झाडावरून दुसऱ्या झाडावर , एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सतत उड्या मारणाऱ्या मर्कटासारखी त्याची अवस्था असते . म्हणूनच ह्या अशांत मनाला बुद्धांनी "मर्कट मन" ,"मंकी माईंड" म्हटले आहे . मन हे नेहमी भूतकाळात आणि भविष्यकाळात प्रवास करत असतो. हे अस्थिर मन शहाणेही नसते ! जे काही झालेय ,घडलेय  त्याचे अनुमानात्मक चिंतन आणि जे काही घडू शकते , ज्याची संभावना आहे त्याचे निष्कर्षात्मक चिंतन ह्यात  गुंतून राहते .चालू क्षणांवर खूप कमी काळ रेंगाळते . त्यामुळे जे क्षण समोर आहेत त्यातील सौंदर्य , त्याचा आनंद व्यक्ती मनसोक्त उपभोगत ही नाही. पण मागील काही घटनांचे पडसाद आणि पुढे काय घडेल ह्याचे अंदाज ह्यांच्या सतत चिंतनामुळे तणाव मात्र मनसोक्त निर्माण करतो !

पडणाऱ्या पावसात एखादी व्यक्ती तिचे मन  तासापूर्वीच्या काळात किंवा तासानंतरच्या काळात ठेवून चालत असेल तर ती नुसती ओली होणार अंतर्बाह्य भिजणार नाही ! पावसाचा स्पर्श,नाद,पावसाचे दिसणे आणि असणे हि ती अनुभवू शकणार नाही . उद्या होणाऱ्या मिटिंग मध्ये मन ठेवलेल्या बाबा ला त्याच्या लहान मुलाने दिलेली पापी आणि गळामिठी जाणवेल पण स्पर्शून जाणार नाही , त्याच्या ओलसर ओठाचा गालाला होणार ओला स्पर्श किंवा मऊसूत हाताचा मानेला स्पर्श ची अनुभूती मिळणार नाही . चपातीचा गरम गरम येणार वास ,तिचा कलर नि तिचे फुगीरपणा आठवड्यापुर्वीच्या टोमण्यांशी मनाला सोडून स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला कळणार नाही .

वर्तमानामध्ये ,चालू क्षणामध्ये एक सौंदर्य दडलेले असते, एक निर्मिती होत असते . फक्त त्यावेळी जागरूक राहून सजग राहून त्या क्षणाचा आस्वाद घेण्याची गरज असते. चालू क्षणांमध्ये जर व्यक्ती  सजग राहून त्या क्षणात हजर असेल  तर तिला पावसाच्या पडणाऱ्या थेंबात सप्तरंग दिसतात , उडणाऱ्या पक्षाची लवचिकता जाणवते, सूर्यकिरणांचा उबदारपणा जाणवतो ,बोबड्या शब्दातील आपल्यावरचा विश्वास दिसतो ,सिग्नल वर थांबले असताना वेगेवेगळ्या आवाजाचे मिश्र संगीत ऐकू येते, समोर आलेल्या ताटातील अन्नाच्या पाठीमागे असलेली मेहनत आणि कष्ट दिसतात, निसर्गातील अनेक चमत्कार नव्याने कळतात ,माणसाला नव्याने ओळखता येते असे अगणित फायदे मिळतात . हा क्षण पुढील क्षणाची निर्मिती करत असतो ! मग जर हा चालू क्षण व्यक्तीच्या सजगतेचा असेल कि जो व्यक्ती  पुढे त्या काळाचे सौंदर्य उलगडून ठेवतो तर त्याच्या पुढील जन्माला येणार क्षण हि तेवढाच सजग असणार आहे , त्यांच्यापुढील आणि त्यांच्यापुढील असे कित्येक क्षण जागरूकतेने, सजगतेने भरलेले असतील ! हेच नवनिर्मितीचे सौंदर्य आहे !.

आता प्रश्न हा आहे कि  जर मन अनादिकालापासून अनंतकालपर्यंत चंचल आहे तर ते स्थिर होऊ शकते का ? खरंच मर्कट मनावर ताबा मिळवता येतो का ?

तर ह्याचे उत्तर होय आहे .

ह्या जगात अशक्य असे काही नाही अगदी मनावर ताबा मिळवणे पण हि अशक्य नाही . पण त्यासाठी व्यक्तीला हात धरावा लागतो माइंडफुलनेस चा ! ह्याचा हात धरला नि त्याचा सतत सराव  केला कि  दाही दिशा नि सप्तपाताळ फिरणारे तुमचे मन तुम्हाला विचारल्याशिवाय कुठे हि भरकटणार नाही . तुकोबारायांनी म्हटलेच आहे :"असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे."



माइंडफुलनेस म्हणजेच सजगता  !जागरूकता! आता आहे त्या क्षणावर लक्ष केंद्रित करणे ,ह्या क्षणांमध्ये येत असलेल्या प्रत्येक अनुभवाचा जाणीवपूर्वक तटस्थभावनेने ,कोणतेही निष्कर्ष ना काढता अनुभूती घेत जागरूकता वाढवणे . चालू क्षणात मनातील विचार ,शरीरातील संवेदना , समोर घडत असलेल्या घटना, उच्चारलेले शब्द , खात असलेल्या अन्नाची जिभेवरची चव,ऐकू येत असलेले आवाज , नाकाला  जाणवणारे वास , हवेचा स्पर्श ह्या सगळ्या गोष्टीवर  जेव्हा व्यक्ती सजगतेने आणि जाणीवपूर्वक लक्ष देतो ,ह्यातून कोणतेही अनुमान काढता जसे आहे तसे बघायला लागतो आणि ह्याचा सराव करतो तेव्हा त्याच्या मनाचे भरकटणे आपोआप मंदावत जाते .

ह्यासाठी व्यक्तीला मदत करतात ते तिचे श्वास ! चालू क्षणांवर लक्ष केंद्रित करण्याचा सराव करण्यासाठी श्वासांवर लक्ष केंद्रित करावे लागते . शरीर आणि मन ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे आपले  श्वाछोश्वास ! जसे समुद्राच्या लहरीवर हेलकावे खाणाऱ्या जहाजाला एका ठिकाणी स्थिर जहाजाचा नांगर करतो त्याच प्रमाणे जेव्हा व्यक्तीचे मन भरकटत असते  तेव्हा  तिला परत वर्तमानात येण्यासाठी श्वासांची  एकाग्रता मदत करते ! माइंडफुलनेस च्या सरावासाठी खूप काही वेगळे करण्याची गरज नसते , काही थोडयाफार गोष्टी ची प्रॅक्टिस ठेवली कि झाले . जसे :

·        रोज माइंडफूल ब्रिथिंग मेडिटेशन म्हणजेच सजगतेचे श्वासांचे ध्यान १० मिनिटे करणे .

·        माइंडफूल इटिंग म्हणजेच जेवताना इतर गोष्टी जसे टीव्ही, मोबाइल बंद ठेवून समोरील अन्नाचे दृश्य , वास आणि चव ह्याची पूर्ण अनुभूती घेणे .

·        वॉकिंग मेडिटेशन म्हणजेच चालताना सजगतेचे ध्यान .

·        जेव्हा लक्ष्यात येते कि मनाचे भरकटणे वाढले आहे , त्यावेळी आहे त्या ठिकाणी माइंडफूल ब्रिथिंग मेडिटेशन करणे . ह्यासाठी व्यक्तीला स्पेशल  जागेची वा विशिष्ट अवस्थेची गरज नसते , तुम्ही चालताना ,उभे असताना ,गर्दीत , एकटे असताना कुठे हि माइंडफूल ब्रिथिंग करू शकता . 

·        रोज सजगतेची प्रॅक्टिस करण्याचे स्वतःचे काही मार्ग शोधणे .  जसे कि माझा  एक क्लायंट रेड सिग्नल लागला कि ग्रीन सिग्नल लागेपर्यंत माइंडफूल ब्रिथिंग करत असतो . अजून एक क्लायंट सकाळचा चहा हा पूर्ण सजगतेने घेत असते. हि तिची प्रॅक्टिस असते .

 माइंडफुलनेस थेरपी ला बुद्धिस्ट मानसशास्त्र मध्ये महत्वाचे स्थान आहेच पण जगभरात झालेल्या वेगवेगळ्या संशोधनाने हे हि सिद्ध झालेय कि माइंडफुलनेस  प्रॅक्टिस हि  चिंता विकार,नैराश्य, अतिकाळजी आणि अति विचार ,  लहान मुलांमधील आणि पौंगडावस्थेतील मुलांमधील वर्तन समस्या , व्यसनाधीनता ह्यावर उपयोगी ठरत आहे .

आपले मन हे सारखे घर सोडून बाहेर पळणाऱ्या मुलासारखे असते , माइंडफुलनेस ची प्रॅक्टिस हि त्या मुलाला सतत घरी घेऊन येणाऱ्या पालकांसारखी आहे , जितके मुल अवखळ तितके पालकांना जास्त श्रम करावे लागतात . त्याचप्रमाणे व्यक्तीला हि माइंडफुलनेस ची प्रॅक्टिस सतत ठेवावी लागते , जरा ढील मिळाली  कि हे मनाचे अवखळ मुल घराबाहेर निसटण्याची संधीच शोधत असते . त्यामुळेच  सजगतेचा ,माइंडफुलनेस चा हात घट्ट धरला कि सतत घर सोडण्याची भीती राहत नाही .

 


Rohini Phulpagar

psychothrapist 

7840908441

themindtalks4u@gmail.com

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)