पर्सनॅलिटी डिसऑर्डर (part 2)

TheMindTalks
0

पर्सनॅलिटी डिसऑर्डर (part 2)

पर्सनॅललिटी डिसऑर्डर च्या आधीच्या भागात आपण संशयी व आत्मकेंद्रित  पर्सनॅलिटी डिसऑर्डर चे प्रकार नि त्यांच्यात आढळणारी लक्षणे पहिलीत ह्या भागात भावनिक आणि उतावीळ पर्सनॅलिटी व चिंतायुक्त पर्सनॅलिटी डिसऑर्डर चे प्रकार आणि त्यांच्यात आढळणारी लक्षणे पाहुयात !


Personality Disorder

भावनिक आणि उतावीळ पर्सनॅलिटी:

भावनिक आणि उतावीळ पर्सनॅलिटी डिसऑर्डर ग्रुप मध्ये  पुढील पर्सनॅलिटी डिसऑर्डर येतात :

अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर:

ह्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर च्या व्यक्ती रागीट, उद्धट असतात . चोरी, नशा, व्यसने, जुगार ,सर्रास खोटे बोलणे ह्यांचे त्यांना वावडे नसते . समाजाच्या वा कायद्यांच्या नियमांचा धाक नसतो . त्यांना जे काही पाहिजे ते त्यांच्या मनाप्रमाणे साम दाम दंड भेद वापरून ते मिळवतातच ! ह्यात इतरांना किती त्रास होतो वा नुकसान होते ह्यांच्याशी काही देणंघेणं नसते . नेहमी आक्रमक नि मारामारीच्या पावित्र्यात असतात . स्वतःकडून झालेल्या वाईट कृतींबद्दल अपराधीपणा किंवा खेद कधीच नसतो !

बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर:

बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर च्या व्यक्तींमध्ये रिक्तपणाची कधीही न संपणारी भावना असते . त्यामुळे त्या व्यक्ती भावनिकरीत्या दुसऱ्यावर खूप जास्त प्रमाणात अवलंबून असतात पण त्याचवेळी त्यांचे कौटुंबिक, मित्र किंवा प्रियव्यक्तींसोबतचे संबंध अस्थिर आणि मालकीहक्क दर्शवणारे असतात .ह्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर असणाऱ्या व्यक्तींमध्ये अस्थिर आणि विकृत स्व-प्रतिमा,रागाच्या समस्या, ज्यामध्ये तर्कहीन, तीव्र राग किंवा राग नियंत्रित करण्याच्या समस्या,आपल्या शरीरापासून वेगळे झाल्याची भावना,तीव्र आणि त्वरीत बदलणारे मूड,इतरांवर विश्वास ठेवण्यास त्रास होणे आणि इतर लोक काय इच्छित आहेत याची अतार्किक भीती,आत्मघाती विचार किंवा तश्या प्रकारच्या धमक्या देणे, मनातील आवेगपूर्ण विचारानुसार वर्तन, ज्यामध्ये बेसुमार खर्च करणे, असुरक्षित व अति लैंगिक संभोग, जास्त प्रमाणात खाणे किंवा पिणे, बेपर्वा वाहन चालवणे किंवा इतर काही बेपर्वा कृती करणे अशी  लक्षणे आढळून येतात.

हिस्टीरिओनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर:

ह्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर च्या व्यक्तींना  सगळ्या ठिकाणी आकर्षण चा केंद्रबिंदू व्हायचे असते . ह्यांच्या भावना उथळ आणि क्षणात  बदलणाऱ्या असतात तसेच भावनांचे नाटकी नि अतिशयोयक्तीपूर्ण  प्रदर्शन असते ! स्वतःकडे इतरांचे लक्ष वेधण्यासाठी शारीरिक हालचाली करत असतात . त्यांची बोलण्याची पद्धत अपरिपक्व ,अतिरंजित ,नाटकी, एखाद्याला गळ घालणारी असते . त्यात तपशील किंवा मुद्देसूदपनाचा अभाव असतो ! आपल्या शारीरिक आकर्षकपनासाठी अति जागरूक असतात .अश्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती वा  एखाद्या परिस्थितीने पटकन प्रभावित होतात !

नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर:

 ह्या व्यक्ती स्वतःच्या अतिप्रेमात असतात . स्वतःबद्दलचे  अतिभव्य चित्रण , स्वतःच्या  क्षमता , प्रतिभा नि वैयक्तिक उपलब्धी ह्याबद्दल अतिशयोक्ती, इतरांनी माझे श्रेष्ठत्व मान्य करायलाच हवे हा अट्टाहास , सतत स्वतःबाबतच्या  शक्ती, यश आणि सौंदर्य यांबद्दलच्या कल्पनांमध्ये व्यस्त असणे.टीका सहन न करता येऊन तीव्र  नकारात्मक प्रतिक्रिया देणे ,इतरांचा फायदा घेणे,इतर लोकांच्या गरजा आणि भावना ओळखण्यास अनिच्छा असणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे , उद्धट वर्तन अश्या लक्षणांनी ह्या डिसऑर्डर ची व्यक्ती परिपूर्ण असते.

चिंतायुक्त पर्सनॅलिटी :

चिंतायुक्त पर्सनॅलिटी डिसऑर्डर च्या प्रकारात पुढील पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतात :

अव्हॉइडन्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर:

ह्या प्रकारातील व्यक्तींचा इतर व्यक्तींना वा परिस्थीती ला जास्तीत जास्त टाळण्याकडे कल असतो ! सामाजिक  कार्यक्रमात किंवा  सार्वजनिक समारंभात ह्या व्यक्ती संभाव्य टीकेच्या , नाकारले जाण्याच्या  भीतीने जाण्याचे टाळतात . जोपर्यंत ह्यांना खात्री पटत नाही तोपर्यंत त्या मैत्री करत नाहीत किंवा आपुलकीचे नातेसंबंध तयार करत नाहीत! ह्यांना खूप कमी मित्र आणि नातेवाईक असतात . अपमानित  होण्याच्या किंवा थट्टा बनण्याच्या अनामिक भीतीने अश्या व्यक्ती नातेसंबंधात एक पाऊल मागेच ठेवतात ! स्वतःचे हसे होण्याचे ,अपमानित होण्याचे , नाकारले जाण्याचे विचार जास्त प्रभावशाली असतात . त्यांना स्वतःबद्दल कमीपणाची भावना अधिक असते !आपण इतरांपेक्षा गौण आहोत ह्या भावनेमुळे ह्या डिसऑर्डर च्या व्यक्तींचा कल सगळ्यांना टाळण्याकडे जास्त असतो !

डिपेन्डन्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर :

डिपेन्डन्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर च्या व्यक्तींच्या महत्वाचे दोन वैशिष्ट्ये असतात : पहिले वैशिष्ट्ये म्हणजे ह्या व्यक्ती आपल्या आयुष्यातील सगळे निर्णय दुसर्यांना घेऊ देतात .त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो आणि त्यामुळे त्यांना वाटते कि त्यांच्यात स्वतंत्रपणे काही करण्याची किंवा निर्णय घेण्याची क्षमता नाही !

दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना हे असे दुसऱ्यांवर अवलंबून असण्याची स्थिती सोडायची नसते ! एखाद्या रोजच्या कामासाठी ही त्यांना खूप सारे सल्ले नि खात्री हवी असते . इतरांच्या मताशी वा निर्णयाशी कधीही असहमत नसतात कारण  इतरांच्या रागाची किंवा सोडून जाण्याची भीती त्यांच्या मनात घर करून असते ! अशी व्यक्ती मग इतरांच्या इच्छा ,गरजा नि मतांना प्राधान्य देतात . त्या पूर्ण करण्यासाठी धडपडत राहतात .आणि जर काही कारणाने इतरांच्या अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाही तर स्वतःला अपराधी मानून दोष देत राहतात . स्वतःच्या  इच्छा ,गरजा, मते त्यांना महत्वाची वाटत नाहीत किंवा त्या दडपून टाकतात ! अश्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर च्या व्यक्तींना वेगळे पडण्याची भीती जास्त असते तसेच त्यांची इतरांकडून काळजी घेतली जावी,सरंक्षण केले जावे ह्या गरजा ही जास्त प्रमाणात असतात ! त्यामुळे ते इतर लोकांच्या  च्या अधीन असतात ,त्यांना चिकटून राहत असतात ! त्यांना जर कधी स्वतंत्रपणे काही करण्यास दिले तर सतत   भीतीयुक्त चिंतेच्या सावटाखाली वावरतात . थोडक्यात काय तर ह्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर च्या व्यक्ती सहजपणे इतरांना स्वतःवर वर्चस्व गाजवण्याची परवानगी देतात !

ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर :

ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये  मनात सतत नको वाटणारे नकारात्मक  विचार येत असतात ,त्यांना घाबरून व्यक्ती त्या  विचारांपासून सुटका करून घेण्यासाठी एखादी कृती वारंवार करत राहतो ! हे वर्तन त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत जाते ,व्यक्ती नेहमीच अस्वस्थ आणि बैचैन राहते !   ह्यांच्यामध्ये परिपूर्णतेचा अट्टाहास असतो , म्हणजे एखादे काम परफेक्टच जमायला पाहिजे ! ह्या प्रयत्नात हातातील काम कधीच पूर्ण होत नाही .ह्या व्यक्ती पैशाच्या बाबतीत अत्यंत काटकसरी असतात . वेळेच्या काटेकोरपणाबाबत दुराग्रही असतात ! नैतिक नियमांचे कठोर पालन करणाऱ्या असतात. छोट्या छोट्या गोष्टींकडे बारीक लक्ष असणे, वागण्या बोलण्याची ताठर नि कठोर पद्धत,जुन्या आणि निरुपयोगी वस्तू जपून साठवणूक करणे ,काम योग्य पद्धतीने केले जाणार नाही ह्या भीतीने कोणतेही काम वाटून देण्यास नकार देणे , सगळ्या कामाच्या नि पद्धतींच्या ,व्यवहाराच्या याद्या बनवणे व त्या वारंवार तपासून त्यात सुधारणा करत राहणे ,नियम आणि अटींचे काटेकोर पालन , इतरांवर वर्चस्व गाजवण्याची  जबरदस्त आंतरिक गरज ही सगळी लक्षणे ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर च्या व्यक्तींमध्ये दिसतात !

                                           पर्सनॅलिटी डिसऑर्डर चे लक्षणे हे एकतर किशोरवयात किंवा तारुण्यावस्थेत अश्या वेळी दिसून येतात ज्या वेळेस बहुतेकदा व्यक्ती सामाजिक संबंध निर्माण करत असते ! शिक्षण घेत असते ,नवनवीन स्किल्स शिकत असते , करिअर घडवण्याच्या धडपडीत असते ! आयुष्याच्या ह्या वळणावर हे जे  विकृत नि स्व -विध्वंसक वर्तन आणि भावना असतात त्यांचे आयुष्यावर दूरगामी परिणाम घडतात ! मग अश्या व्यक्ती प्रौढावस्थेत जोडीदाराला मारहाण ,शिवीगाळ ,संशय , अपत्यांचा शारीरिक ,मानसिक छळ, कामाच्या ठिकाणी खराब रेकॉर्ड , व्यवसायात नुकसान , बिघडलेले सामाजिक नि कौटुंबिक संबंध ,कमकुवत आर्थिक बाजू ,,एकटेपण  नैराश्य, जुगार ,व्यसने , कर्जबाजारपण ,आत्महत्या अश्या परिणामांना सामोरे जातात !

 ज्या व्यक्ती पर्सनॅलिटी  डिसऑर्डर असणाऱ्या व्यक्तींबरोबर राहतात त्यांच्यावर हि नकारात्मक  परिणाम होत असतो ! कारण पर्सनॅलिटी  डिसऑर्डर असणाऱ्या व्यक्तींचा इतरांना ,परिस्थितीला सामोरे जाण्याची ,प्रतिसाद देण्याची  एक फिक्स पद्धत ठरलेली असते त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीमध्ये अडजस्टमेन्ट अवघड जाते . परिणामी समोरच्या व्यक्तीला पर्सनॅलिटी  डिसऑर्डरअसणाऱ्या व्यक्तीनुसार अडजस्टमेन्ट करावी लागते . बहुतेकदा ती मनाविरुद्ध असते ; त्यामुळे त्यांच्यात नि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीं ,मित्रपरिवार ,कामाच्या ठिकाणच्या सहकारी यांच्या सोबतच्या संबंधांमध्ये  एक प्रकारचा तणाव असतो .

त्याच वेळी जर दुसऱ्या व्यक्तींनी अडजस्टमेन्ट केली नाही तर पर्सनॅलिटी  डिसऑर्डर असणाऱ्या व्यक्तीमध्ये राग ,चिडचिडेपणा , नैराश्य , हिंसात्मक आणि आक्रमक वर्तन , माघार घेणे ह्या गोष्टी निर्माण होतात ! असे हे एकमेकांवरील तणावाचे दुष्टचक्र जोपर्यंत त्यांची गरज पूर्ण होत नाही तोपर्यंत चालूच राहते .

पर्सनॅलिटी  डिसऑर्डर  वर उपचार करणे थोडे अवघड जाते कारण अश्या लोकांना त्यांच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत हेच मान्य नसते त्यामुळे ते उपचारा साठी तयार नसतात !

पर्सनॅलिटी  डिसऑर्डर वर उपचार हे औषधोपचार आणि सायकोथेरपी ह्या दोन्हीच्या साहाय्याने करता येतात ! काही मूड -स्टॅबिलिझर , अँटी डिप्रेसंट औषधें आणि वर्तनामध्ये व विचारांमध्ये मध्ये बदल करण्याच्या,सामाजिक -कौटुंबिक स्किल्स विकसित करण्याच्या पद्धतींचा सराव करून घेऊन , तसेच वैयक्तिक सायकोथेरपी, ग्रुप सायकोथेरपी थेरपी आणि सपोर्ट ग्रुप च्या माध्यमातून पर्सनॅलिटी  डिसऑर्डर च्या व्यक्तींचे आयुष्य सहज ,विधायक आणि आनंदी करता येऊ शकते !

 या आधीचा भाग येथे पहा :-

जादुई पर्सनॅलिटी म्हणजे काय ... ती कशी असते ??? 

 

Rohini Phulpagar

Psychotherapist 

9604968842

www.themindtalks.com

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)