इन्फेक्शन मनाचे ..

TheMindTalks
0

 इन्फेक्शन मनाचे

इन्फेक्शन मनाचे - किती घातक असू शकते !!


इन्फेक्शन मनाचे हे शीर्षक वाचून काही जणांना प्रश्न पडला असेल न कि व्हायरल इन्फेक्शन, बक्टेरियाचे इन्फेक्शन ऐकले आहे; 

मनाला पण इन्फेक्शन होते काय ?

होते बरं मनाला हि इन्फेक्शन होते ! ह्या मनाचे इन्फेक्शन कडे जाण्याआधी आपण निरोगी मानसिक आरोग्य आणि मनाची निरोगी स्थिती समजून घेवूयात !

आपण जेव्हा जेव्हा मानसिक आरोग्याबाबत बोलतो तेव्हा एखादा व्यक्ती मानसिक आरोग्याच्या बाबत निरोगी आहे अस आपण तेव्हाच गृहीत धरतो जेव्हा त्याला काही गोळ्या किंवा औषधोपचार चालू नसेल ! आपल्याकडे हा गैरसमज आहे कि ज्याला मानसोपचार तज्ञकडील काही उपचार चालू आहेत अशी  व्यक्ती मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आजारीच असणार,वेडीच असणार आणि कधीच नॉर्मल वागू शकणार नाही .

मानसिक आरोग्य ची व्याख्या : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या म्हणण्यानुसार मानसिक आरोग्य हि म्हणजे व्यक्तीची अशी मानसिक निरोगी स्थिती ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेची जाणीव असते ,दैनंदिन जीवनातील सामान्य ताण तणावांचा सामना करू शकतो , त्याचे कामे कार्यक्षमतेने आणि लाभकारी/उपयोगी पद्धतीने करून कुटुंबाला आणि समाजाला योगदान देतो. यानुसार एखाद्या व्यक्तीला क्षमतांची जाणीव असते म्हणजेच तो किंवा ती स्वतःला पूर्णपणे जाणून,आपल्या मजबूत बाजू ,कमजोर बाजू जाणून असते !  दैनंदिन जीवनातील सामान्य ताण तणावांचा सामना करू शकतो म्हणजे रोजचेच असणारे किंवा अचानक पणे सामोरे येणारे टेन्शन तो सहजपणे हाताळू शकतो आणि अशा पद्धतीने कार्यक्षम असतो कि ज्याचा त्याच्या कुटुंबाला आणि समाजाला उपयोग होवू शकेल .

हि व्याख्या पाहिल्यावर बहुतेकांना वाटते कि मी तर सगळे टेन्शन,ताण सहन करतोच परत हसतमुख राहतो,कोणाला सहसा दुखावत नाही . दुसर्याला त्रास नको म्हणून मी आपला सगळे सहन करतो . म्हणजे मी मानसिक आरोग्यदायी आहेच ! असतोच आपण मानसिक दृष्ट्या निरोगी पण आपल्या मनाची अवस्था त्यावेळी पूर्णपणे तंदुरुस्त असते का !

 


मानसिक रित्या आरोग्यदायी म्हणजे काय हे लक्षात आल्यावर हि जर आपला एखादा मित्र कि ज्याला आपण खूप काळापासून ओळखतो तो आपल्याला म्हणाला कि आजकाल माझे कश्यात लक्ष लागत नाही,जरा मनावर ओझं असल्यासारखे वाटते . हे ऐकून काय वाटेल? तो मानसिकरित्या आजारी आहे ,निरोगी नाही कि त्याची मानसिक स्थिती ,मनाची स्थिती  अस्वथ disturbed आहे ?

मनाची निरोगी अवस्था अथवा मानसिक स्वास्थ्य हे मानसिक आरोग्यासारखेच वाटत असले तरी ह्या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. मानसिक स्वास्थ म्हणजे आपल्या भावनिक, शारीरिक,आध्यत्मिक आणि मानसिक स्व मधील अथवा आत्म मधील समतोलपणा ! इथे कुठेही मनाची स्वास्थ्यपूर्ण वा निरोगी स्थिती म्हणजे फक्त आनंदी राहणे असं नाही ! आपल्याला मानसिक स्वास्थ म्हणजे सतत आनंदी असणे असं वाटत राहते. हे त्यापेक्षा जास्त आहे .

आपले शरीर ,मेंदू आणि जीवनशैली अशी आहे कि जिथं अनेक प्रसंगांची ,भाव भावनाची सतत ये जा चालू असते. सतत आनंदी राहण्यापेक्षा ह्या प्रसंगाना आणि भावनांना समतोलपणे पार करणे हि मानसिक स्थिती स्वाथ्यपूर्ण असण्याची गुरुकिल्ली आहे आणि स्वास्थदायी मनाची ही स्थिती मानसिक आरोग्याची एक सकारात्मक सुरुवात असते.

मग आपल्या मनाला इन्फेक्शन होवून मनाची अवस्था स्वास्थ्यपूर्ण नाही, अस्वस्थ आहे हे कधी म्हणू शकतो ? 

पुढील काही लक्षणे आहेत कि जे मनाची अस्वस्थ स्थिती दर्शवतात:  

·       मन सतत भूतकाळात घडलेल्या गोष्टींवरच अडकून आहे .

·       डोक्यात सतत नकारात्मक, काळजी निर्माण करणारे वा  भूतकाळात घडलेल्या घटनाबद्द्ल विचार चालू असतात .

·       भावनांना ओळखता येत नाही

·       भावना आणि विचार खरे वाटतात.

·       भीतीदायक वीचारांची धास्ती वाटू लागते

·       एखाद्याकडून किंवा स्वतःकडून झालेली एखादी चूक सहजासहजी न विसरू शकणे .

·       आजूबाजूंच्या बद्दल मनात अनामिक संशय असणे वा भीती असणे.

·       भविष्याबद्दल चिंता वाटत राहणे .

·       स्वतःच्या निर्णय क्षमतेवर विश्वास नसणे .

·       मनात खूप काळ अढी वा राग धरून राहणे .

·       एखाद्यावर शाब्दिक वा शारीरिक सूड घेण्याची इच्छा असणे

·       स्वतःच्या क्षमतांबद्दल कमीपणा बाळगणे ,आत्मविश्वास कमी करणे .

·       सतत एका अनामिक दडपणाखाली वावरणे .

·       आपल्याला जे नकारात्मक वाटत आहे तेच होईल ह्याची खात्री बाळगणे .

·       लोकं काय म्हणतील ह्याचे दडपण बाळगणे .

·       आपल्याकडून काहीच चूक होवू नये ह्या बद्दल अतिजागृकता ठेवणे .

·       काहीतरी वाईट होईल हि अनामिक भीती .

·       पटकन राग येणे ,चिडचिड वाढणे किंवा पटकन रडू येणे .

·       विनाकारण आजुबाजुच्या लोकांवर ओरडणे व त्यानंतर स्वतःला खूप वेळ वाईट वाटत राहणे .

·       एकटे पडले असल्याची भावना आणि असहाय असल्याची भावना सतत असणे .

·       कोणीच आपल्याला कधीच नावे ठेवू नये हि अपेक्षा ठेवणे व त्याबाबतीत सदा सतर्क राहणे

·       टीका वा समीक्षा सहन न करता येणे .

हि अशी मनाची स्थिती असणे म्हणजे आपण मानसिक रोगी आहोत असे अजिबात नसते !! 

मानसिक स्थिती बिघडने हे तात्पुरते असते जसे व्हायरल इन्फेक्शन झाल्यावर ताप येतो, शरीर दुखते, अंग कसकसते, अशक्तपणा जाणवतो. ह्याचा अर्थ असा होत नाही ना कि आपण  रोगी झालोत ! आपल्याला इथं फक्त त्या इन्फेक्शन मुळे जाणवणाऱ्या लक्षणांचा त्रास होत असतो.तसेच आहे हे ! मनाची स्थिती अस्वथ आहे म्हणजे आपण रोगी नाहीत तर  मनाला ज्याचे इन्फेक्शन झालेय त्यामुळे जाणवणारी लक्षणे आहेत.

मानसिक स्थिती अस्वस्थ  होण्यास काही कारणे असतात , काही आव्हाने असतात कि ज्याला सामोरे जाण्यास आपण मनाने तयार नसतो . कधी कधी काही आव्हाने अचानकपणे समोर येतात. काही व्हायरस म्हणा बक्टेरिया म्हणा त्यांची लागण मनाला होते !त्यापैकी काही कारणे:

·       जवळच्या नातलगाकडून भूतकाळात झालेला अपमान, फसवणूक वा लागेल असे बोलणे .

·       आताही घरातून किंवा जवळच्या लोकांकडून मिळणारा अनादर वा होणारे दुर्लक्ष

·       आर्थिक संकट वा भविष्यातील आर्थिक संकटाची भीती .

·       परीक्षेचे वा अभ्यासाचे टेन्शन.

·       सतत इतरांबरोबर केली जाणारी तुलना.

·       नोकरी मिळण्याचे टेन्शन

·       आपण स्वतः आपली इतरांबरोबर करत असलेली तुलना .

·       व्यसनी किंवा आजारी जोडीदार.

·       कुटुंबात आजारी व्यक्ती असणे .  

·       कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून  व्यवस्थित वागणूक न मिळणे वा वरिष्ठाचा दबाव

·       एखादे लांबलेले आजारपण किंवा अपघात

·       मुल नापास होणे .

·       प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा त्याचे आयुष्यातून निघून जाणे .

·       स्वतःकडून झालेली एखादी चूक त्याबद्दल स्वतःला क्षमा करू न शकणे .

·       चार चौघात झालेला अपमान .

·       जवळच्या आणि प्रिय व्यक्तींकडून अपेक्षाभंग .

अशी काहींही कारणे असू शकतात कि ज्यामुळे मानसिक स्थिती अस्वस्थ disturbहोते . आता तर सोशल मेडिया वर पोस्ट ला वा रील ला लाईक कमी मिळाले किंवा स्टेटस ला रिप्लाय नाही आला तरी मनाची स्थिती बिघडते.

जसे व्हायरल इन्फेक्शन झाल्यावर आपण फिजिशिअन कडे जावून उपचार करून शारीरिक स्थितीची काळजी घेतो तसेच घरात हि काही प्रतिबंधकउपाय करतो. सकस आहार घेतो मग मनाचे  इन्फेक्शन झाल्यावर हि आपण योग्य ती काळजी घेवून, तज्ञाकडे उपचार घेवून मनाच्या स्थितीमध्ये सुधारणा करू शकतोच ना !

आपण आपले मानसिक स्वास्थसाठी जागरूक राहून त्यसाठी प्रयत्न करायला पाहिजे कारण:

·       चांगली मानसिक स्थिती आपल्याला अधिक कार्यक्षम बनवून आपल्याला आपल्या पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सक्षम बनवते.

·       निरोगी मनाची स्थिती असल्यास आपण स्पष्टपणे विचार करू शकतो .

·       आपली अस्वथ मानसिक स्थिती आपल्याला शारीरिक आरोग्याच्या बाबतीत पण असुरक्षित बनवते. सततच्या मानसिक अस्वथतेमुळे व्यक्तीला हृदय रोग .मधुमेह, स्ट्रोक अश्या त्रासांची शक्यता तंदुरुस्त  मानसिक अवस्थेच्या व्यक्तींपेक्षा अधिक जास्त असते . उदा .जे सतत मागील घटनांचे मनात रवंथ करून वा भविष्यातील न घडलेल्या गोष्टींची चिंता करून सारखी मनाची स्थिती अस्वस्थ करून घेत असतील त्यांना टाईप २ चा मधुमेहाची शक्यता जास्त असते

·       आपल्या मानसिक स्थिती प्रती जागरूक राहून त्यांचे योग्य काळजी घेतली तर पुढील मानसिक आजार टाळले जावू शकतात. उदा .एखाद्या व्यक्तीला मित्राची किंवा जवळच्या नातलगाची आर्थिक स्थिती पाहून हा किती पुढे गेला मी मागे राहिलो ह्या तुलनात्मक विचारात सतत गुंतून घेवून मनाची अवस्था अस्वस्थ केली व दीर्घकाळ अश्याच अवस्थेमध्ये राहिला तर पुढे त्याला गंभीर नैराश्य विकार उद्भवू शकतो .

·       आपली स्वास्थ्य/ चांगली मानसिक स्थिती आपल्याला अधिक सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यास आणि जीवनाचा अधिक आनद घेण्यास मदत करते .

·       जेव्हा आपली मानसिक स्थिती निरोगी आणि चांगली असते ,तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील कठीण आणि आव्हानात्मक प्रसंगाना अधिक चांगल्याप्रकारे तोंड देवू शकतो .

·       आपली स्वास्थ्यपूर्ण मानसिक अवस्था आपल्याला अधिक क्रियेटीव्ह/ सर्जनशील बनवते आणि यामुळे व्यक्ती नवीन गोष्टींचा प्रयत्न करण्यास अधिक मोकळा होतो .

·       चांगली मानसिक अवस्था आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींसोबतचे संबंध सकारात्मक आणि मजबूत करते . आपले कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक सकारात्मक चांगले आपल्या विकासामध्ये मदतगार ठरतात .

·       जेव्हा आपली  मानसिक स्थिती चांगली असते तेव्हा आपला मूड हि चांगला असतो त्यामुळे आपल्या मनात स्वतःबद्दल चांगली भावना निर्माण होते व स्व आदर / self esteem वाढतो .त्यामुळे आत्मविश्वास वाढतो . 

·       चांगली मानसिक स्थिती आपल्या निर्णय घेण्याच्या आणि प्रोब्लेम्स सोडवण्याच्या आपल्या क्षमतेमध्ये सकारात्मक मदत करते .

मेन्टल हेल्थ वेलनेस साठी किंवा मनाच्या चांगल्या अवस्थेसाठी आपल्याला आपल्यात पण काही स्किल्स विकसित करावे लागतात . मेन्टल हेल्थ वेलनेस साठी आपली समाधानाची, (मेन्टल एक्विलीब्रीयम) मानसिक समतोलतेची पातळी सतत उच्च ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागते .

यात खूप गोष्टी येतात पण आपण सुरुवात हि विचार आणि भावनांपासून करूयात. कारण बहुतेक वेळा आपले स्वास्थ्य हरवायला विचार कारणीभूत असतात. त्यामुळे आपल्यात पुढील बदल करणे मनाच्या स्वास्थ्यपूर्ण स्थितीसाठी आवश्यक आहे

·       राशणल तर्कसंगत आणि वास्तववादी विचारांची सवय लावणे. जे तुम्हाला वाटते आहे ,अपेक्षित आहे त्यापेक्षा जे खरे आणि वास्तव आहे ते बघायला शिकणे

·       आपल्या  भावनांना ओळखणे,सामोरे जावून ज्या भावना वेदना देतात त्यांना योग्य दिशा देणे ,समजा एखाद्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले तर त्याच्याबद्दलचा अपेक्षाभंगाचा राग आणि स्वतःबद्दल चा असा कसा मी फसलो म्हणून दोष देण्याचा राग ह्यला दुसऱ्या कमी हानिकारक भावनेमध्ये बदलायचे.  

·       स्वतःला अनकंडीशनली आहे तसे स्वीकारणे . उदा  स्वतःमध्ये वाईट गुणधर्म  आणि चांगले गुणधर्म ओळखून त्यांचा स्वीकार करणे  

·       ३ व ६ चा नियम म्हणजेच व्यक्तीसापेक्ष भेद नेहमी लक्षात ठेवणे .

·       आयुष्याचा अनकंडीशनली स्वीकार करायला शिकणे  

·       आपल्या अपेक्षा आणि इच्छांना तर्कसंगत व वास्तवच्या नजरेतून पाहणे,

·       आपल्या गरजा आणि आपल्या इच्छा  ह्यातील फरक ओळखायला लागणे,

·       आग्रह आणि अपेक्षा ह्यातील फरक लक्षात घेणे .

·       स्वतःची शारीरिक आरोग्याची काळजी घेणे ,कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .

·       वेगेवगळे छंद जोपासणे , समाजात मिसळणे , निसर्गात फिरणे .

·       सामाजिक कार्यांमध्ये भाग घेणे, मित्र मैत्रिणीसोबत गप्पा मारणे ,

·       स्वतःला वेळोवेळी व्यक्त करणे, कामातून आनद आणि समाधान मिळवणे .

·       सकस आहार घेणे , योग्य प्रमाणात शारीरिक हालचाली व व्यायाम करणे  

ह्या सगळ्या स्किल्स आपल्याला जमायला लागल्या म्हणजे  आपण मानसिक स्वास्थ्याच्या दिशेने सकारत्मक वाटचाल सुरु केलेली असते. आपल्या मनाची आताची अवस्था आपल्या पुढील मानसिक आरोग्याला दिशा देत असते .

 

 

रोहिणी फुलपगार

Psychotherapist

9604968842

www.themindtalks.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

.

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)