महत्व आभार मानण्याचे !

TheMindTalks
2

 


आपण सगळे आयुष्यात सुख मिळवण्यासाठी धडपडत असतो !

चांगला आरामदायी जॉब, आदर्श कुटुंब, आर्थिक स्थैर्यता, समाजात मानमरातब, दुखणे खुपणे नको! सुखाची आपली व्याख्या आणि यादी लांबत जाते! आणि अनिच्छित अश्या सुखाच्या मागे आपण मृगजळासारखे धावत राहतो, आता हातात येईल असे वाटत असताना सुख अजून दूरवर पळते! ह्या सगळ्या धडपडीत आपल्याजवळ जे काही आहे त्याची नोंद घेण्यासाठी, त्याची कदर करण्यासाठी, आभार मानण्यासाठी आपण एक मिनिट तरी वेळ देतोय का ?

आभार मानणे म्हणजेच कृतज्ञता बाळगणे आणि ती व्यक्त करणे. त्याचा सराव करणे एवढे महत्वाचे का असते? ह्या प्रश्नाचे उत्तर माहिती करून घेण्यासाठी आज आपण आभार व्यक्त करण्याची भावना; कृतज्ञता ह्या सकारात्मक भावनेबद्दल समजून घेवूयात.




कृतज्ञता ही एक शक्तिशाली सकारात्मक भावना आहे जी साधे फक्त ‘धन्यवाद’ चा संदेश इतरांपर्यंत पोहोचवून किंवा स्वतःला प्राप्त करून असे सुख आणि आनंद  देतो की  जे आपण इतरत्र शोधत असतो . अजून सोप्या भाषेत, आपल्या दैनंदीन जीवनातील घटक असलेल्या गोष्टीला,घटनेला, किंवा व्यक्तीला महत्वाचे मानून त्यांचा स्वीकार करण्याची, त्यांना आदर देण्याची,त्यांचे महत्व अधोरेखित करून त्यांच्याप्रति आभारी असण्याची मनाची अवस्था म्हणजे कृतज्ञता !

सायकॉलॉजी नुसार कृतज्ञता म्हणजे एखाद्या व्यक्तीमुळे किंवा घटनेमुळे किंवा घटकांमुळे झालेल्या लाभाला दिलेला सकारात्मक भावनिक प्रतिसाद !

कृतज्ञता हा आनंदी आयुष्याचा एक भाग आहे आणि आनंदी राहिल्याने आयुष्यभर चांगले आरोग्य मिळू शकते, म्हणून कृतज्ञता ह्या सकारात्मक भावनेचे फायदे शारीरिक ऐवजी मानसिक आणि सामाजिक क्षेत्रात पटकन दिसून येतात.

सर्व प्रकारची कृतज्ञता ही आनंदाशी संबंधित असते. आपण एखाद्याला धन्यवाद म्हणत असलो तरी किंवा एखाद्याकडून धन्यवाद स्वीकारले तरी त्यातून मिळणारी भावना ही शुद्ध समाधान आणि प्रोत्साहनाची असते. कृतज्ञतेची अभिव्यक्ति दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करण्यास ते टिकवून ठेवण्यास मदत करते. संकटाना सामोरे जाण्यास आणि त्या संकटामधून शक्ति आणि प्रेरणा घेवून पुनः उभे राहण्यास शिकवते .

आनंदामुळे कृतज्ञता निर्माण होत नाही तर कृतज्ञतेमुळे आनंद निर्माण होतो !

हावभावांमधून वा शब्दांमधून केली जाणारी कृतज्ञतेची ही साधी देवाणघेवाण आपल्या एकूण जैविक कार्यप्रणाली विशेषत: मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करण्यासाठी मदतगार ठरते ,मेंदूवर कृतज्ञतेचा परिणाम दीर्घकाळ टाकून राहतो असे संशोधनातून समोर आले आहे .

कृतज्ञता कौटुंबिक आणि व्यावसायिक परस्परसंबंध सुधारण्यास आणि विकसित करण्यास मदत करते . कृतज्ञता आणि आनंद ह्यांमधील संबंध हे बहुआयामी आहेत. केवळ इतरांबद्दल च नाही तर स्वतःबद्दल ही कृतज्ञता व्यक्त केल्याने सकारात्मक भावना प्रामुख्याने आनंद आणि समाधान निर्माण होतात.



आपण कृतज्ञतेचे अजून काही फायदे आहेत ते बघूयात :

शारीरिक आरोग्य :

कृतज्ञतेचा मानसिक आणि शारीरिक  आरोग्यावर होणाऱ्या परिणामा बाबत मागील काही दशके मानसिक आरोग्य संशोधकानी अनेक रिसर्च करून कृतज्ञता आणि चांगले शारीरिक आरोग्यामधील संबंध दाखवून दिले आहेत. रोजची कृतज्ञता डायरी ठेवल्याने ताणतनाव कमी होतो ,झोपेची गुणवत्ता सुधारते आणि भावनिक सजगता निर्माण होते .  कृतज्ञतेचा आणि अधिक उर्जेने कठोर परिश्रम करण्याचा उत्साह ह्यांचा जवळचा संबंध आहे . कृतज्ञतेच्या सरावमुळे शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते .

कृतज्ञतेचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम

कृतज्ञता त्रासदायक भावनांपासून सुटका करते, कृतज्ञता मेंदूतील डोपामीनचे नियंत्रण करून आपल्यात चैतन्य निर्माण करते त्यामुळे वेदनेच्या व्यक्तिनिष्ठ भावना कमी होवून वेदना नियंत्रणात आणता येतात. कृतज्ञता झोपेची गुणवत्ता सुधारते. कृतज्ञतेमुळे उत्तेजित झालेले हायपोथलामस आपल्याला रोज नैसर्गिक गाढ झोप घेण्यास मदत करते . कृतज्ञतेच्या सरावाने मेंदूला चांगली झोप घेण्याची आणि सकाळी ताजेतवाने होण्याची सवय लागते. त्यामुळे आपण उत्साही राहतो . 

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की कृतज्ञता हे नैराश्य विरोधी काम करते. दररोज च्या सरावाने कृतज्ञता ही नैराश्य विरोधी औषधासारखा परिणाम दाखवते. कृतज्ञता दीर्घकाळ आनंद आणि समाधानाची भावना निर्माण करते जिचा उगम आपल्या मेंदूच्या अंतर्गत रचनेमध्ये असतो . जेव्हा आपण कोणाकडून कृतज्ञता स्वीकारतो  किंवा  कोणासाठी व्यक्त करतो तेव्हा आपल्या मेंदूतील भावना नियमन करणारे रसायने स्त्रावले जावून आपल्याला “फिलिंग गुड” चा अनुभव देतात . त्यामुळे आपला मूड बदलतो आणि आतून आनंदी वाटते . कृतज्ञतेच्या सरावामुळे  चिंता विकार आणि नैराश्य वर नियंत्रण मिळवता येते हे मागील काही दशकांच्या अभ्यासातून  स्पष्ट झाले आहे .

कृतज्ञतेमुळे भावनिक लवचिकता वाढते :

कृतज्ञता पुढील प्रकारे भावनिक लवचिकता वाढवण्यास मदत करते – जीवनातील सकरात्मक बाजू बघण्यास मदत करते , नकारात्मक विचाराना सामोरे जाण्यास आणि त्यातून सकारात्मक विचारांची पुनर्बांधणी करण्यास मदत करते . वास्तवात जगण्यास शिकवते आणि कितीही कठोर प्रतिकूलता असेल तरी ती स्वीकारण्यास आणि त्यातून निरोगी मनाने बाहेर पडण्यास मदत करते .फक्त समस्या निराकरण वर लक्ष केंद्रित करते. आपले चयापचय  आणि हारमोनल क्रिया नियंत्रित करून आपले आरोग्य सुधारते . जी लोकं आपल्या आयुष्यात आणि अवतीभोवती आहेत त्यांच्याशी संबंध टिकवून ठेवण्यास आणि त्यांचे कौतुक करण्यास शिकवते त्यामुळे आपल्याला अधिक स्नेह, आदर प्रेम मिळते .

कृतज्ञता व्यावसायिक बांधिलकी निर्माण करते .

 ज्या व्यक्तिना आपल्या कामाबद्दल, व्यवसायाबद्दल कृतज्ञ भाव असतो त्या व्यक्ति अधिक कार्यक्षम ,अधिक जबाबदार  असतात . कामाच्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यामुळे परस्पर बंध निर्माण होतो जो की आपुलकीची ,जवळीकतेची जबाबदारीची भावना उत्पन्न करतो . असे कर्मचारी वा व्यवस्थापक हे टीम चा एक भाग म्हणून आनंदाने जास्तीच्या जबाबदऱ्या उचलतात आणि उत्पादकता वाढवतात

असमाधानी लोक त्यांच्या कमकुवतपणावर अधिक लक्ष केंद्रित करतात , जे काही त्यांना अपूर्ण अयशस्वी  वाटते त्यावर जास्त भार देवून स्वतःशी संघर्ष करत राहतात . आपण स्वतःवर शंका घेणे थांबवून आपल्याजवळ जे आहे त्याचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली पाहिजे.  कृतज्ञतेच्या सरावाने आनंद आणि समाधान जोपासता येते . त्यासाठी काही सोप्या क्लृप्ती आहेत जय आपल्याला मदतगार ठरू शकतात :

स्वतःचे कौतुक करा :

तुमच्या घरातील आरश्यासमोर उभे रहा आणि स्वतःशी स्वतःबद्दल पाच चांगल्या गोष्टी बोल . तुम्ही भूतकाळात काय यश मिळावले होते किंवा तुमचे सध्याचे प्रयत्न , तुमची प्रतिभा ,तुमचे बलस्थ बाजू ,तुमचे गुण हयाबद्दल बोल. जसे की दयाळू ,कष्टाळू ,शिस्तप्रिय , संवेदनशील , वेळ पाळणारा ,शब्दाला जागणारा , चांगला मित्र इत्यादि असे चांगले शब्द वापरुन स्वतःची प्रशंसा करा . त्यामुळे ज्या भावना निर्माण होतात त्यांचा अनुभव घ्या .

कृतज्ञता डायरी :

कृतज्ञता डायरी ही तुमची अशी वैयक्तिक जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या आयुष्यातील लहान मोठ्या  ज्या  गोष्टींसाठी आभारी आहेत त्या गोष्टी लिहू शकतात. जेव्हा आपण ही डायरी मध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लिहू तेव्हा जाणीवपूर्वक चांगल्या आठवणींवर आणि घटकांवर लक्ष केंद्रित करून ते क्षण ,घटक ह्यांची नोंद करणे .

कृतज्ञता भेट :

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणीतरी असते की ज्यांनी प्रसंगी दिलेला पाठिंबा ,मदत , केलेला स्वीकार आपल्यासाठी महत्वाचा ठरून त्याची मदत झालेली असते किंवा अजूनही होत असते . आपल्या आनंदासाठी आणि यशासाठी आपण त्यांचे ऋणी असतो . असे कोणी असेल आणि धावत्या जगात त्यांच्याशी संपर्क तुटला असेल तर मुद्दाम महिन्यातून एक /दोन वेळा अश्या लोकांच्या भेटी घेवून त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा द्या . शब्दांची देवाणघेवाण करा , त्या व्यक्तीला महत्वाचे असल्याची जाणीव करून द्या . अश्या कृतज्ञता भेटीनमुळे पवित्रता आणि सकारात्मकता वाढते .

कृतज्ञ मित्र :

दररोज च्या सरावासाठी एक कृतज्ञ मित्र शोधा. तो कोणीही असू शकेल , जोडीदार, तुमचा मुलगा किंवा मुलगी ,नोकरीतील सहकारी ,मित्र किंवा सोशल मीडिया ग्रुप वरील मित्र /मैत्रीण ! दररोज काही मिनिटे बाजूला काढून ज्या गोष्टींसाठी तुम्ही आभारी आहेत किंवा कृतज्ञ आहेत त्याबद्दल चर्चा करा . एकमेकाना प्रश्न विचारा आणि आपली कृतज्ञता उघड करा . एखाद्या व्यक्तिसोबत कृतज्ञता सामायिक केल्याने आपली सरावाची प्रेरणा टिकून राहते आणि त्याचा भावनिक कौशल्ये विकसित करण्यास मदत करतात .

आनंद स्वीकारणे :

आनंदी राहण्यास संकोच करू नका . जय गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्यापासून दूर जावू नका . स्वतःला आठवण करून द्या की हे मिळवण्यासाठी तुम्ही पुरेशी मेहनत घेतली आहे आणि आनंदी होण्यास तुम्ही पात्र आहेत . एखादे मोठे यश असो की लहान यश  तुमचा आनंद मान्य करा आणि त्या क्षणासाठी कृतज्ञ रहा . आनंदाचा स्वीकार केल्याने आपण आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल  कौतुक त्याबद्दल आपल्याला अधिक कृतज्ञ बनवते त्यामुळे आपण आपल्या प्रयत्नांची प्रशंसा करायला शिकतो आणि भविष्यात येणाऱ्या अडचणीना तोंड देण्यासाठी स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे तयार करतो .

 

कृतज्ञतेचा सराव करणे आणि स्वतःबद्दल व इतरंबद्दल च्या चांगल्या भावना व्यक्त करणे हे सारखेच आहे. प्रेम आणि स्नेहाच्या सध्या शब्दानी  फक्त समोरच्याला च चांगले वाटत नाही तर स्वतःला ही चांगली भावना निर्माण होते.

कृतज्ञता म्हणजे योग्य गोष्टींबद्दल योग्य वेळी योग्य मार्गाने जे जाणवते ते!  कृतज्ञता ही आत्म-शिस्त आणि अंतप्रेरणा ह्यांचा अविभाज्य भाग आहे .

जरी कृतज्ञता आपल्या ताणतनावापासून, वेदनापासून लगेच सुटका करत नसेल तरी ती आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला शिकवते. आपल्या जवळ जे काही आहे त्याचा स्वीकार करून आणि त्याचे कौतुक करून कृतज्ञता आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेण्यास शिकवते .

 

रोहिणी फुलपगार

माइंड हेल्थ कोच

 

 

  

 

 

      

 

 

 

 

 

 

Post a Comment

2Comments

Post a Comment