ग्रोथ माईंडसेट : सीमांच्या पलीकडील अवकाश

TheMindTalks
0

 

ग्रोथ माईंडसेट : सीमांच्या पलीकडील अवकाश

आपल्या सगळ्यांना हत्तीची गोष्ट माहिती आहे, हत्तीला एका सध्या दोरखंडाने एका छोट्या खांबाला बांधलेले असते. त्याला तो दोरखंड तोडणे किंवा तो खांब उखडून टाकणे अजिबात अवघड नसते. अगदी लहानपणी जेव्हा तो हत्ती एक छोटेसे पिल्लू होते जेव्हा त्याला त्या दोरखंडाने खांबाला बांधले होते, तेव्हा तो दोरखंड आणि खांब त्याच्यासाठी मोठे होते. त्याला तो खांब उखडवणे अवघड होते. पण आज जरी हा हत्ती ताकदीने त्या खांबापेक्षा आणि त्या दोरखंडापेक्षा 10 पटीने मोठा झाला असला तरी सुद्धा तो त्या खांबाला उखडून टाकू शकत नाही!

 का नाही तो सुटका करून घेत?  कारण काय असते ह्यामागचे?

ह्यामागे हत्तीचा एक माईंडसेट असतो कि जो त्याच्या लहानपणीच फिक्स झालेला आहे, मी ह्या दोरखंडाला आणि खांबाला तोडू शकत नाही. हाच माइंडसेट घेऊन तो मोठा होतो त्यामुळे हत्तीला त्याच्या क्षमता ओळखता येत नाही .

माइंडसेट हा आपल्या सगळ्यांच्या जीवनातील एक असा घटक आहे कि जो आपले आयुष्य घडवतो आणि बिधडवतोही!

माईंड सेट म्हणजे काय ?

माईन्डसेट म्हणजे आपला आपल्यावरचा आणि आपल्या मूलभूत क्षमता आणि गुणवैशिष्ट्यांवरचा विश्वास!

कॅरेल ड्वेक ह्या मानसशात्रज्ञ ने माईन्डसेट वर अनेक संधोधने केले, वेगेवेगळ्या व्यक्तींच्या माईंडसेट चा अभ्यास केला. त्यावरच्या निष्कर्षानुसार त्यांनी माईंडसेट चे दोन प्रकार जगासमोर मांडले. फिक्स्ड म्हणजे निश्चित माईंडसेट आणि ग्रोथ म्हणजे विकास माईंडसेट.

 

      फिक्स्ड माईंडसेट च्या व्यक्तींना आपली बुद्धिमत्ता, हुशारी, आपले गुणवैशिष्ट्य आणि स्वभाव हे अचल अथवा स्थिर वाटतात. आता त्यात काही बदल होणार नाही किंवा करायचा नाही अशी त्यांनी धारणा करून घेतलेली असते . त्यामुळे ते नवीन आव्हाने घेण्यास टाळाटाळ करतात, त्यांच्या प्रयत्नांना लवकर यश आले नाही कि प्रयत्न सोडून देतात, पटकन माघार घेतात, इतरांचे यश आणि हुशारी त्यांना धोका वाटते,  त्यांच्यावरची योग्य टीका किंवा सूचना त्यांना समजून घेता येत नाही. अश्या व्यक्ती त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी यश मिळवतात.

            ग्रोथ माईंडसेट च्या व्यक्तींचा बदल आणि विकास ह्यावर विश्वास असतो. आपली बुद्धिमत्ता, हुशारी, आपले गुणवैशिष्ट्य आणि स्वभाव हा प्रयत्नपूर्वक आणि सातत्य ठेवून बदलता येतो,  त्यात सुधारणा करून आपला सर्वांगीण विकास करता येतो अशी त्यांची धारणा असते. आपली प्रतिभा अनेक मार्गानी विकसित करण्यावर अश्या लोकांचा भर असतो.  ह्या दृष्टिकोनामुळे त्यांच्यात नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि लवचिकता निर्माण होते.  ते आव्हानांचा सामना करायला नेहमी तयार असतात, अपयश सकारात्मकतेने स्वीकारतात, प्रयत्नांना हार मानून मध्येच सोडून देत नाही, इतरांचे यश आणि हुशारीकडे प्रेरणा म्हणून पाहतात, स्वतःवरील टीका आणि सूचना खिलाडूवृत्तीने स्वीकारून त्यानुसार स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करायला तयार असतात .

आपल्या आयुष्याच्या,प्रोफेशनल, पर्सनल , फॅमिली आणि सोशल ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये फिक्स्ड माईंडसेट आपल्याला मागे खेचतो किंवा आहे त्या ठिकाणी ठेवतो तर ग्रोथ माईन्डसेट आपल्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जातो.

आपल्या रोजच्या जीवनात ग्रोथ माईन्डसेट आपल्याला अनेक मार्गानी मदतगार ठरतो :

पर्सनल डेव्हलपमेंट :

ग्रोथ माईंडसेट सेट, पर्सनल डेव्हलपमेंट हा आयुष्याचा प्रवास आहे ही जाणीव जागरूक ठेवतो.  नवनवीन गोष्टी सतत शिकत राहिल्याने आणि प्रयत्नशील राह्ल्याने आपल्या जन्मजात क्षमता आपण आणखी वाढवू शकतो ह्यावर विश्वास असल्याने व्यक्ती आव्हाने स्वीकारतो, स्वतःवर फाजील आत्मविश्वास ठेवण्यापेक्षा नवीन कौशल्ये शिकण्याच्या संधी शोधण्याची आणि आपले क्षितिज विस्तृत करण्याची शक्यतांवर भर देतो. ह्यामुळे कुतुहूल आणि उत्सुकता निर्माण होते. हे कुतुहूल आणि उत्सुकता व्यक्तींना अडथळ्यांना आणि संकटाना तोंड देण्यास सुसज्ज करतात. अश्या अपयशांना कायमचे अडथळे पाहण्यापेक्षा मौल्यवान धडे देणारे तात्पुरते अडथळे पाहतात . हि लवचिकता व्यक्तींना प्रतिकूल परिस्थितीमध्ये नैराश्यामध्ये ढकलत नाही तर सतत ध्येयाने प्रेरित करते.

शैक्षणिक गुणवत्ता :

ग्रोथ माईंडसेट असलेले विद्याथी शैक्षणिक संदर्भात प्रभावी धोरणे आखतात, गरज पडल्यास मदत घेणे, सेल्फ स्टडी मध्ये सुधारणा करणे, कठीण असाइनमेंट मध्ये प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करणे ह्या गोष्टी पुढाकाराने करतात त्यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारते आणि ते ज्या विषयांचा अभ्यास करतात त्याबद्दल अजून सखोल समज निर्माण होते.

ग्रोथ माईंडसेट चे विद्यार्थी प्रेरणादायी असतात, अभ्यासाबाबत सातत्याने कष्ट आणि प्रयत्न केल्यास गुणवत्ता सुधारते असे त्याची धारणा असल्याने ते सहज विचलित होत नाहीत ध्येयापासून बाजूला जात नाही . त्यामुळे साहजिकच त्यांचे शैक्षणिक अनुभव सकारत्मक बनतात.

व्यावसायिक यश :

आताच्या गतिमान जगात व्यवसायात आणि कामाच्या ठिकाणी सतत नवीन बदल होत असतात, रोज नवनवीन आव्हाने तयार असतात. ग्रोथ माईंडसेट असलेल्या व्यक्तींना ह्या बदलांशी आणि आव्हानांशी जुळवून घेणे अवघड जात नाही. ते नवीन बदलांशी स्वतःला अड्जस्ट करण्याची क्षमता निर्माण करतात, अश्या व्यक्ती नवीन कौशल्ये शिकण्यास , नवीन उपक्रम आणि नवीन भूमिके साठी तयार असतात . आजच्या ह्या गतिमान जगात हि लवचिकता उपयोगाची ठरते. ह्या व्यक्तीमध्ये स्वतःतील नेतृत्वगुणांना सामोरे आणणे ,समस्या सोडवताना पुढाकार घेणे, सर्वांगीण उपायांचा विचार करणे, कामात सतत सुधारणा करणे , अडथळ्यांना सर्जनशील उपाय निर्माण करण्याच्या संधी म्हणू पाहणे असे वैशिष्ट्ये असतात .

नातेसंबंध :

ग्रोथ माईंडसेट असल्याने व्यक्ती नात्यांमधील संवाद आणि संबंध सुधारू शकतात. असे लोक स्वतःबद्दलचा अभिप्राय खुल्या मनाने ऐकतात आणि स्वीकारतात. त्यामुळे त्यांचे सगळ्या ठिकाणी आपसांतील परस्पर संबंध सुधारतात. प्रभावी संवाद निर्माण झाल्याने संघर्षाकडे सूडबुद्धीने बघता एकमेकांना समजून घेण्याची आणि नातेसंबंध सुधारण्याची संधी म्हणून बघतात . त्यांची रचनात्मक आणि सकारात्मक संवाद करण्याची , तडजोड करण्याची आणि समस्या सर्व संबंधित व्यक्तींना फायदा होईल अश्या योग्य मार्गाने सोडवण्याची तयारी असते

ग्रोथ माईंडसेट निर्माण करण्यासाठी काही टिप्स :

1. आपला माईंडसेट ओळखणे:  ग्रोथ माईंडसेट निर्माण करण्यासाठी आपला सध्या कोणता माईन्डसेट आहे हे ओळखणे गरजेचे आहे. जर व्यक्ती स्वतःबाबत जागरूक नसेल तर ती स्वतःमध्ये सुधारणा करू शकत नाही. जेव्हा तुम्ही एखादी चूक करता किंवा तुम्हाला आव्हानांना सामोरे जाण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला काय वाटते आणि काय जाणवते ह्याचे परीक्षण करा.

2. आव्हानांना संधी म्हणून बघा:  स्वतःला सांगा कि हे आव्हाने तुम्हाला त्रासदायक नाहीत तर नवीन गोष्ट शिकण्याची संधी आहे. सुरुवातीला हे सांगणे कठीण जाईल, माघार घ्यायची इच्छा होईल, पण तरीसुद्धा स्वतःला हे पुनःपुन्हा सांगायची सवय निर्माण करा.

3. सयंम धरा:  ग्रोथ माईंडसेट ही एका रात्रीत निर्माण होणारी गोष्ट नाही, हि एक प्रक्रिया आहे त्यामुळे ह्या प्रक्रियेत संयम महत्वाचा ठरतो, स्वतःला सातत्याने ह्या प्रक्रियेशी जोडून ठेवा.

4. सकारात्मक कृतींवर लक्ष केंद्रित करा: आपण जर आपल्याला मिळालेला रिझल्ट आणि यश ह्यावर लक्ष केंद्रित केले तर फिक्स्ड माईंडसेट मध्ये अडकण्याचा धोका असतो.  त्यामुळे ज्या काही सकारात्मक आणि क्रियात्मक कृती केल्यात त्यावर लक्ष असू द्या त्यामुळे पुढील ध्येयापासून आपण बाजूला जाणार नाही .

5. ग्रोथ माईंडसेट च्या लोकांच्या संपर्कात राहा:  ग्रोथ माईंडसेट च्या लोकांशी चर्चा आणि संवाद केल्याने तुम्हाला त्यांच्या व्हिजन आणि विचारांच्या पद्धतीबद्दल जास्त माहिती होईल. असे लोक तुमच्या आजूबाजूला असले कि त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल .

6. अपयशाकडे पाहण्याची दृष्टी बदला: अपयश म्हणजे आपली हार किंवा आपली अक्षमता म्हणून पाहता एक नवीन धडा, अनुभव, नवीन स्किल शिकण्याची संधी, स्वतःला विकसित करण्याची संधी म्हणून बघा. अपयश तुम्हाला थांबवत नाही तर पुढे जायला प्रोत्साहन देते.

7. स्वतःचे ध्येय लिहून काढा: जगभरातील संशोधने सांगतात कि ज्या व्यक्ती स्वतःचे ध्येय ठरवतात आणि सातत्याने त्या ध्येयांची स्वतःला आठवण करून देतात, ते ध्येय गाठणे अश्या व्यक्तींना शक्य होते .

8. इतरांच्या यशाचा आनंद घ्या:  जर आपल्या आजूबाजूला कोणी यशस्वी झाले असेल तर त्याच्या आनंदात सहभागी व्हा , त्याचे यश साजरे करा .त्याच्यापासून प्रेरणा आणि मार्गदर्शन घ्या .

9. अभिप्राय विचारात जा: आपल्या विचारांबद्दल, वागण्याच्या पद्धतींबद्दल, आपल्या कृतीबद्दल आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून वेळोवेळी अभिप्राय आणि सूचना विचारत राहा . खूप वेळा असे होते कि आपल्याला आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते पण इतर व्यक्ती आपल्याकडे त्रयस्थपणे पाहत असल्याने त्यांच्या सूचना आणि अभिप्राय मार्गदर्शक आणि उपयोगी ठरतात .

10. स्वतःबद्दलचे नकारात्मक अवलोकन करू नका: जरी एखाद्या गोष्टी मध्ये किंवा कौशल्यामध्ये तुम्ही पारंगत नसाल किंवा काही घटकांमध्ये अपयश येत असेल तर स्वतःची हरलेली किंवा कमी क्षमता असलेली व्यक्ती अशी समजूत करून स्वतःमध्ये कमीपणाची भावना निर्माण करायची नाही किंवा स्वतःला दूषणे देत बसायचे नाही तर मी अजून स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो, नवीन स्किल्स शिकण्याची क्षमता आहे, मी मला पूर्णपणे वेगळा घडवू शकतो हा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा. आताचे आलेले अपयश हा काही शेवट नाही तर सुरुवात आहे असे ग्रोथ माईन्डसेट असलेल्या व्यक्ती स्वतःला बजावून अडथळ्यांना पार करतात.

                                      ग्रोथ माईंडसेट ही केवळ एक मानसशात्रीय संकल्पना नसून जीवन जगण्याची पद्धत आहे, हि पद्धत आपल्यालाआपण जिथे आहोत तो शेवट नसून आपण सतत स्वतःचा विकास करू शकतो आणि आयुष्याची क्वालिटी सुधारू शकतो हे सांगत असते! ग्रोथ माईंडसेट आत्मसात केल्यास ,प्रत्येक आव्हान ही संधी ठरते,प्रत्येक अपयश हा अनुभव बनतो आणि प्रत्येक प्रयत्नातून आपण अधिक मजबूत व्यक्ती घडवतो.

 

धन्यवाद

रोहिणी फुलपगार

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)