एकदा सुजलाम, सुफलाम अश्या सुंदरबन राज्यात दुष्काळ पडला! पाण्याअभावी पिके सुकली आणि शेतकरी राजाला महसूल देऊ शकले नाही. राजाला त्या काळात राज्य कसे चालवायचे हे एक मोठे संकट वाटत होते. कालांतराने दुष्काळ संपला, राज्य पूर्वपदावर आले पण राजाची काळजी काही कमी झाली नाही, त्याच्या मनात नेहमी जर पुन्हा दुष्काळ पडला तर? मंत्र्यांनी माझ्याविरुद्ध कट केला तर काय? किंवा शेजारी राज्यांनी हमला केला तर काय होईल ह्या प्रकारचे काळजी भेडसावत राहून त्याची तहान, भूक, झोप उडून गेली .
एके दिवशी एक संत व्यक्ती त्याच्या महालात आला, राजाने त्याला आपल्या सगळ्या काळज्या सांगितल्या! त्या संत व्यक्तीने समस्या समजून घेऊन त्याला सांगितले कि तुमच्या काळजीचे मूळ हे तुमचे काम आणि त्यामुळे आलेल्या तुमच्या जबाबदारी आहेत, तुम्ही तुमचा राजमुकुट मुलाला का देत नाही ? राजा म्हणाला असे नाही करू शकत कारण तो अजून खूप लहान आहे. "ठीक आहे, तुमचे सगळे टेन्शन आणि काळजी मी घेतो तो मुकुट मला द्या!" संत व्यक्ती म्हणाला. राजाने आनंदाने मुकुट संतांच्या स्वाधीन केला.
“आता तुम्ही काय करणार?” संतांनी विचारले .
“मला वाटते काही बिझनेस करावा”.राजा उत्तरला
“बिझनेस ला पैसे कुठून आणणार? कारण तुझे राज्य आता माझे आहे!”
“मग मी काही काळ जॉब करेल आणि पैसे कमावेल” राजांनी उत्तर दिले!
“जॉब करायचाच आहे तर माझ्याकडे कर, मी तसाही माझ्या आश्रमात राहतो , माझ्यावतीने तू महालात राहा आणि सगळं कारभार चालव.”
राजाने मान्य केले . काही दिवसांनी संत परत राज्यात आला आणि विचारले कि कसे चालू आहे तुझे ? आता तू व्यवस्थित खाऊ
,पिऊ आणि झोपू शकतो का ?
राजा म्हणाला हो महाराज आता मी अगदी शांत झोपू शकतो , भूक आणि तहान पण चांगली आहे . मी आधी जे काम करायचो आता हा तेच काम करतोय पण मला आधीसारखा आता कामाचा त्रास होत नाही ,असे का ?
संतांनी उत्तर दिले , राजा आधी तुम्ही हे सगळे काम एक ओझे मानून त्यातील धोक्याच्या संभाव्य घटकांवर लक्ष केंद्रित करत होता , पण आता हे काम एक कर्तव्य म्हणू पाहताना संभाव्य धोक्यांची काळजी ना करता स्वतःची वैयक्तिक जबाबदारी मानून करत असल्याने तुमच्या मनावरील ओझे कमी झाले.
त्यामुळे आयुष्यात जे काही काम कराल ते एक ओझे मानून न करता कर्तव्य मानून केले तर कोणत्याच कामाचा तणाव निर्माण होणार नाही .
ह्या गोष्टीतील राजाप्रमाणे आपण हि आपल्या कामाचे, व्यवसायाचे वेगवेगळे ताण घेत असतो. आजच्या आर्टिकल मध्ये आपण काय असतो हा वर्क स्ट्रेस आणि त्याला कसे आपल्या नियंत्रणात ठेवायचे हे बघूयात !
कामाशी/व्यवसायाशी संबंधित तणाव सध्या जगभरात वाढणारी समस्या आहे जी केवळ व्यक्तीच्या आरोग्यावर, मानसिकतेवर च परिणाम करत नाही तर त्या उद्योग व्यवसायाच्या उत्पादकतेवर ही परिणाम करते. जेव्हा व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा,उपलध साधनापेक्षा आणि अपेक्षांचा सामना करण्याच्या क्षमतेपेक्षा
जास्त मागणी आणि दबाब व्यवसाय वा नोकरीच्या ठिकाणावरून केला जाते तेव्हा ह्या मागण्यांना व्यक्तीकडून दिला जाणारा नकारात्मक मानसिक आणि शारीरिक प्रतिसाद म्हणजे वर्क स्ट्रेस!
वर्क स्ट्रेस निर्माण होण्याची प्रमुख कारणे :
·
आपल्या क्षमतेपेक्षा
जास्त कामाचा लोड
·
आपल्या जॉब प्रोफाइल पेक्षा वेगळे काम
·
एका विशिष्ट्य पद्धतीने झाले पाहिजे आणि एका विशिष्ट वेळेत झाले पाहिजे हि मागणी,
·
व्यक्तीला स्वतःच्या काही स्किल्स आणि इनपुट्स वापरता न आल्याने एक प्रकारची बाह्यनियंत्रणाची भावना निर्माण होणे, व्यक्तीचे शिक्षण आणि स्किल्स पेक्षा वेगळ्या प्रकारचे काम देणे,
·
सतत एक विभागातून दुसऱ्या विभागात बदली करणे,
·
कामाचे तास फिक्स ना ठेवता वारंवार बदलणे,
·
नोकरी /व्यवसायातील असुरक्षितता
·
स्वायत्ततेचा अभाव
·
कामाच्या ठिकाणी राजकारण
·
ओव्हर सुपरव्हिजन
·
कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि मानसिक,शारीरिक छळ .
·
कामाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा नसणे
·
संवादाचा अभाव किंवा फक्त एकतर्फी संवाद असणे
·
परफेक्शन चे दडपण.
· कामाच्या ठिकाणी डोकावणारे वैयक्तिक आयुष्यातील स्ट्रेस जसे कि घटस्फोट , घरातील प्रिय व्यक्तीचा मृत्यू ,अपघात अथवा मोठे आजारपण .
·
सहकार्यांसोबत चांगले संबंध नसणे .
·
कामासंदर्भात व्यवस्थित मार्गदर्शन वा ट्रेनिंग चा अभाव .
·
प्रोत्साहन अथवा इन्क्रिमेंट न मिळणे .
·
अपेक्षित रिझल्ट न मिळणे .
ह्या सगळ्या कारणांमुळे व्यक्तीमध्ये पुढील वर्क स्ट्रेस ची लक्षणे दिसतात :
शारीरिक लक्षणे :थकवा, स्नायू दुखणे, निद्रानाश, छातीत दाबल्यासारखे वाटणे अथवा धडधड जाणवणे, पोटदुखी ,पाठदुखी, मानदुखी , इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, त्वचाविकार .
मानसिक
लक्षणे : चिंताविकार, नैराश्य, चिडचिड, पटकन राग येणे, स्वनियंत्रण हरवल्यासारखे वाटणे, आत्मविश्वास कमी होणे,कमीपणाची भावना निर्माण होणे, निर्णयक्षमता कमी होणे, लक्ष केंद्रित करण्यास आणि गोष्टी लक्षात राहण्यास अडथळे निर्माण होणे.
वर्तणुकीची लक्षणे :गैरहजेरीचे प्रमाण वाढणे, आजारी पाडण्याचे प्रमाण वाढणे, स्वभावात आक्रमकता दिसणे, पुढाकार घेऊन काम करण्याचे टाळणे, कार्यक्षमता आणि सर्जनशीलता कमी होणे, सहनशीलता आणि संयम पटकन गमावणे, आपसातील परस्पर संबंध कमी होणे,विचारांमध्ये
गढून गेल्यासारखे राहणे,रोजच्या कामातील आणि जीवनातही आनंद घेता न येणे.
पुढील टिप्स वापरून ह्या वर्क स्ट्रेसचा सामना करू शकतो :
स्ट्रेस निर्माण करणारे
घटक ओळखणे
: काम अथवा व्यवसायाच्या
ठिकाणी आपल्याला ज्या घटकांमुळे ताण निर्माण होते किंवा जे घटक हाताळताना आपल्याला अडचणी येतात ते घटक ओळखायचे. जसे कि अतिरिक्त जबाबदारींना तोंड देताना दमछाक होते. जास्तीचा वेळ जातोय, सहकारी चे असहकार्य इत्यादी. तुम्ही तणावात का आहेत हे समजून घेतल्याने आपल्याला पुढील स्टेप्स घेता येतात.
आपण बदलू शकणारे घटक ओळखणे: आपल्यात तणाव का निर्माण होतोय हे लक्षात आल्यावर आपल्या कंट्रोल मध्ये काय घटक आहेत ह्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. आपण काय बदलायचे आणि काय बदलू शकत नाही ह्यावर कृती करता येते .जसे कामाचे तास किंवा दिवस आपल्या कंट्रोल मध्ये नाही , पण ह्यातून उरलेला जो वेळ आहे तो चिंतेत आणि वैतागलेपणात घालवायचा कि त्याचा आपली जगण्याची क्वालिटी सुधरावायाला वापरायचा हा निर्णय आपला असतो . ह्याकाळात तुम्ही फिरायला जाऊ शकता , फॅमिली सोबत क्वालिटी टाइम घालवू शकता किंवा स्वतःला आनंद देईल असे एखादा छंद जोपासू शकतात .
तणावाच्या क्षणी त्याचा
सामना करण्याचे स्किल्स शिकणे : जेव्हा कामाच्या ठिकणी एखादी तणाव निर्माण करणारी परिस्थिती येते आणि आपल्याला स्ट्रेस जाणवतो तेव्हा आपल्या छातीची धडधड वाढते , श्वास जलदगतीने सुरु होतो,स्नायू ताठर होतात ,अश्यावेळी तणावजनक घटकांवर आणि आपल्यामध्ये जाणवणाऱ्या बदलांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा दीर्घ आणि खोल श्वसन सुरु करायचे आणि जाणीवपूर्वक आपल्याला श्वसनकडे लक्ष केंद्रित करायचे. ह्या श्वसनामुळे आपली चिंतादायक आणि घाबरलेली मनःस्थिती शांत होण्यास मदत होते. आपले हृदयाचे ठोके नॉर्मल झाल्यामुळे आपल्याला परिस्थितीचे अवलोकन करण्यास आणि प्रतिसाद देण्यास थोडा अवधी मिळतो.
कामाच्या ठिकाणी मोकळा
आणि सहज संवाद प्रस्थापित करा: काम अथवा व्यवसायाशी संबंधित आपल्या शंका आणि आपल्यावरील ताणाबद्दल सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी मोकळेपणाने वेळोवेळी चर्चा झाली पाहिजे .कामाच्या ठिकाणी बोलणे उगाच तुलनात्मक आणि अंदाज बांधणे ह्यापेक्षा वास्तववादी आणि प्रोत्साहन देणारे असावे. कामाच्या ठिकाणी आपसातील संवाद सुधारण्यावर भर असावा.
लवचिकता निर्माण करणे : काम आणि व्यवसायातील आव्हाने टाळता येत नाहीत , आपण आतापर्यंत असे छोटे मोठे आव्हाने हाताळलेही असतील! आपण त्या आव्हानांना वस्तुनिष्ठ प्रकारे प्रतिसाद देऊन, पाहिजे तिथे ऍडजस्टमेन्ट करून त्यांचा सामना करायला सक्षम होतो. आपली ताठर भूमिका सोडून आपल्या पद्धतींमध्ये
लवचिकता आणल्यास मोठया आव्हानांचे सकारात्मक अवलोकन करून आपण अनेक पर्याय निर्माण करू शकतो. ह्यासाठी आपला दृष्टिकोन बदलणे, नकारत्मक विचारांना शरण न जाणे आणि समस्येकडे भावनिक होऊन न पाहता वस्तुनिष्ठ आणि व्यावहारिक दृष्टीने पाहणे एवढे बदल आपल्यात केले पाहिजे.
माईन्ड सेट बदलणे: कामाच्या
व्यवसायाच्या ठिकाणी समस्येकडे पाहण्याचा त्याचा अवलोकन करण्याच्या पद्धतीमध्ये
आणि तुमच्या त्या समस्येबद्दलच्या भावना बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा.असे
केल्याने तुम्हला जाणवणारा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. सकारत्मक गोष्टींवर लक्ष
देणे, व्यक्तींना अनकंडिशनली स्वीकारणे, इतरांकडून आणि स्वतःकडूनही अवास्तव आणि अव्यवहारिक अपेक्षा न ठेवणे, प्रत्येक समस्या ही काहीतरी
उपाय सोबत घेऊन येते ह्यावर विश्वास ठवून तिला सामोरे जाणे ह्या गोष्टी माईन्ड सेट
बदलण्यात येतात.
मर्यादा निश्चित करणे: आपली कामाच्या
वेळेच्या आणि पर्सनल आयुष्यातील मर्यादा निश्चित करणे. कोणते गोष्टींमध्ये तुम्हाला रुची आहे, कोणत्या गोष्टी जमत नाहीत, कोणत्या स्किल्स शिकायची आवश्यकता आहे, कोणत्या
प्रकारचा संवाद आणि शब्द तुम्हाला असह्ज करतो ह्याबद्दल च्या आपल्या मर्यादा
इतरांना समजवून देणे आणि त्यांचे पालन होण्याबाबत आग्रही राहणे. त्याचवेळेस
इतरांच्या मर्यादेंचे आपल्याकडून उल्लंघन
न होण्याबाबत काळजी घेणे.
आजच्या वेगवान जगात काम /व्यवसाय हे केवळ उत्पदनाचे साधन राहिले नसून ते आपल्या ओळखीचा, आत्मसन्मानाचा आणि जीवनमानाचा एक भाग बनला आहे.
पण जेवढे काम महत्वाचे आहे तेवढाच त्यातून निर्माण होणारा स्ट्रेस न टाळण्याजोगा आहे.
वर्क स्ट्रेस हा शत्रू नाहीतर काहीतरी संतुलन चुकतेय हे सांगणारा संकेत आहे. त्यामुळे हा स्ट्रेस शांतपणे हाताळणे म्हणजे तुफानलेल्या समुद्रात आपली नौका शांतपणे, न डुबवता किनाऱ्याला आणण्यासारखे आहे!
धन्यवाद
रोहिणी फुलपगार
