अदृश्य जखमा: बालपणातील आघातांचा प्रौढ मनावर होणार खोल प्रभाव !

TheMindTalks
1

 

 

 

       श्रद्धा 34 वर्षांची, एका आय टी कंपनीची सिनिअर मॅनेजर! पण दररोज सकाळी ऑफिस ला जाताना तिच्या पोटात गोळा उठतो, "आज माहिती नाही मी चांगले प्रेझेंटेशन करू शकेल का? माझ्या टीम चा परफॉर्मन्स माझ्यामुळे कमी दिसतो.मी अजून जरा जास्त कष्ट केले असते तर प्रमोशन मिळून वेगळ्या पोस्ट वर असते, मी काहीच चांगले करू शकत नाही!"

हे विचार जरी आता येत असतील तरी त्यांचे मूळ हे खूप आधी रुजलेत. श्रद्धा च्या लहानपणी तिच्या आई वडिलांची सतत भांडणे व्हायची, वडील दारूच्या नशेत आईला आणि तिला मारहाण करायचे! आई कधी कधी तिचा तणाव श्रद्धावर काढताना तिला ओरडायची, तू माझ्या आयुष्यात असल्यामुळे मला हे सगळे सहन करायला लागतेय, तुझ्यामुळे हे सगळे होतेय! श्रद्धा 6/7 वर्षाची असल्यापासून ती स्वतःला दोष द्यायला शिकली. आज हि ती कोणतीही चूक झाली कि मीच बेकार आहे, चांगली नाही असे स्वतःला दूषणे देते.

41 वर्षाचा बिझनेसमॅन रोहन, सध्या अँगर मॅनॅजमेण्ट साठी उपचार घेतोय! त्याचे लग्न पाच वर्षातच तुटले, तो छोट्या छोट्या गोष्टींवरून भडकायचा, मुलांच्या अंगावर धावून जाणे,बायकोवर क्षुल्लक कारणाने हात उगारणे हे सहन झाल्याने बायको मुलांना घेऊन वेगळी झाली.बिझनेस मध्ये पण कर्मचारी टिकून राहणे, जास्त जनसंपर्क प्रस्थापित होणे ह्या समस्या येऊ लागल्या!

रोहन चे वडील खूप कडक होते, थोडयाश्या चुकीने बेल्ट ने मारायचे, रोहन नववीत असताना एकदा कमी मार्क पडले म्हणून त्याला 3 तास घराबाहेर उन्हात उभे केले होते,त्यावेळी रोहन ने ठरवले कि आता कधीच रडायचे नाही ,दुःख दाखवायचे नाही, तो त्याचा राग आतल्याआत साठवत राहिला, मोठा झाल्यावर त्याच उद्रेक झाला . साठलेला राग बायको, मुले, कर्मचारी ह्यांवर निघायला लागला !

साक्षी इंजिनिअर ची विद्यार्थिनी, तिला कधी कधी पॅनिक अटॅक यायचे, मुलांशी ती मनमोकळे बोलायची नाही, कितीही जवळचे नातेवाईक असो त्यांच्याकडे जायला सहजासहजी तयार व्हायची नाही!

ती लहान असताना आई तिला पाळणाघरात ठेवून जॉब ला जायची, त्या पाळणाघरातील बाईंचा तरुण मुलगा साक्षीला त्रास द्यायचा, नको तिथे स्पर्श करायचा, घट्ट पकडून ठेवायचा आणि धमकी द्यायचा! तिला खूप महिने लागले हे सगळे कोणाला तरी सांगायला! पण त्याचा परिणाम तिच्या आताच्या आयुष्यावर हि होतो आहे ! पॅनिक अटॅक साठी तिचे उपचार चालू आहेत.

सरकारी अधिकारी असलेला 45 वर्षाचा अमित डिस्टर्ब आहे , तो कधी हि रात्री उठतो, फ्रिज खोलतो काहीतरी खातो, त्याला कशातच आनंद मिळत नाही . यंत्रासारखे कामाला जाणे, तिथल्या जबाबदाऱ्या पार पाडणे, घरी आल्यावर सुद्धा कुटुंबात जास्त मिसळता रुटीन काम करणे नि बोलणे असे त्याचे रोजचे आयुष्य चालू आहे !

अमित लहान असताना त्याचे वडील आजारी पडायचे,त्यावेळी त्यांची सगळी दवाखाण्याची जबाबदारी, त्यांची सेवा, त्यांची चिडचिड, तणाव सहन करणे हे सगळे अमित च्या छोट्या खांद्यावर पडले होते. त्याला खेळायला, रडायला, लाड करून घ्यायला वेळच मिळाला नाही, तो स्वतःच एक पालक झाला होता, अकाली प्रौढ झाला ! त्यात परत सगळ्यांकडून जबाबदारी पूर्ण करण्याची अपेक्षा, चांगले मार्क्स पाडून लवकर स्थिर होण्याची अपेक्षा ! ह्यासगळ्यात त्याच्या भावना दडपल्या गेल्या! आज हि तो सगळ्यांची काळजी घेतो पण त्याला काय वाटते किंवा काय पाहिजे हे त्याला ओळखता येत नाही. सध्या तो ही उपचार घेतोय ,ज्यात त्याला 8/9 वर्षाचा अमित दिसतोय ज्याला खेळायचे,बागडायचे आहे. ह्या अमित  शी तो ओळख वाढवायला लागलाय !

ही जी प्रातिनिधिक सगळी उदाहरणे आहेत , त्यांच्यामध्ये दिसणारे बदल हे आता लगेच झाले नाहीत! त्यांच्या लहानपणी जे ओरखडे उमटलेत मनावर, ज्या जखमा झाल्यात पण त्या अदृश्य राहिल्यात त्याचे हे परिणाम आहेत. अश्या खूपप्रकारच्या अदृश्य जखमा घेऊन आपल्या आजूबाजूला लोकं वावरत असतात!

 

 

बालपणीचे आघात काय असतात ?

बालपणीचे आघात म्हणजे अशी कोणतीही परिस्थिती किंवा घटना ज्यामध्ये लहान मुलांना असुरक्षित, खूप भीतीदायक , प्रचंड दडपण आणि हतबल वाटते आणि ज्यामुळे त्याच्या मेंदूत,भावनिक पातळीवर आणि शारीरिक पातळीवर खोल दीर्घकाळ परिणाम होतो जो प्रौढ वयापर्यंत सोबत असतो ! ह्या बालपणीच्या आघातात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे आघात सायलंट असतात ,ह्या अनुभवातून जाणारी मुले हे त्यांचे दुःख व्यक्त करू शकत नाहीत, कित्येक वेळा त्याच्या जवळच्या माणसांना त्याची कल्पना नसते किंवा ते मुलांवर विश्वास ठेवत नाहीत. कधीकधी आपले मूल कोणत्या परिस्थितीतून जायचे हे आई वडिलांना समजून ही घ्यायचे नसते कारण त्यांना ती कमजोरी वाटते.त्यामुळे अनेकदा हे आघात शान्तपणे सहन केले जातात. त्यामुळे त्याचे दीर्घकालीन परिणाम प्रौढवयापर्यंत जाणवतात!

बालपणीचे आघात पुढील प्रकारे असतात :

शारीरिक आघात : पालकांकडून किंवा जवळच्या माणसांकडून, शिक्षकांकडून, जबाबदार व्यक्तींकडून जाणूनबुजून शारीरिक मारहाण आणि इजा करणे. शारीरिक दहशत,मारहाण आणि धमकी ह्यामुळे मुले भीतीच्या वातावरणात जगतात, रात्री दचकून उठतात, सारखे सावध असल्यासारखे राहतात.

भावनिक आघात:  भावनिक शोषण मध्ये सतत टीका, दुसऱ्यांशी तुलना, तुच्छ लेखणे, सोडून जाण्याची धमकी, शिव्या अथवा वाईट आणि घालूनपाडून बोलणे अश्या गोष्टी मुलांसोबत घडल्या जातात त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास कमी होणे,स्वतः बद्दल शरम वाटणे , अपराधीपणा आणि निरुपयोगी असल्याची भावना वाढल्या जातात.

लैंगिक आघात: एखाद्या प्रौढ अथवा वृद्ध व्यक्तीने सत्तेचा आणि अधिकाराचा, बळाचा वापर करून लहान मुलांवर लादलेली कोणतीही लैंगिक कृती म्हणजे त्या मुलावर होणार लैंगिक आघात! ह्यामध्ये अनुचित स्पर्श, छेडखानी,बलात्कार अशी कृत्ये येतात! ह्यामुळे मुलांमध्ये स्वतःबद्दलचा आत्मसन्मान कमी होणे, गोंधळून जाणे,स्वतःबद्दल तिरस्कार निर्माण होणे असे अनेक बहुआयामी परिणाम घडतात.

दुर्लक्ष : एखादे मूल दुर्लक्षिले जाते म्हणजे जेव्हा पालक किंवा जवळच्या व्यक्ती मुलाच्या मूलभूत शारीरिक, भावनिक आणि विकासात्मक गरज पूर्ण करण्यास अयशस्वी ठरतात! ह्यामध्ये अपुरी देखरेख, अपुरे पोषण, व्यवस्थित आणि पुरेसे लक्ष आणि वेळ देणे, अव्यवस्थित वैयक्तिक स्वच्छता ह्या गोष्टी घडतात.

कौटुंबिक अस्वस्थता: कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होतो. ह्यात पालकांचे व्यसनी असणे, मानसिक आजाराने पीडित असणे, शारीरिक आजार असणे, पालकांचे विभक्त होणे, घरगुती हिंसाचार, तुरुंगवास, पालकांचे बाहेर अवैध संबंध असणे, आर्थिक संकट येणे अश्या घटकांचा समावेश असतो!

सामाजिक हिंसाचार: सामाजिक हिंसाचार मध्ये हिंसक आणि जातीयवादी दंगे, गुन्हेगारी, टोळीयुद्ध, एखाद्या रोगाची साथ , भूकंप, पूर, सुनामी दुष्काळ ह्यासारखी नैसर्गिक आपत्ती अश्या घटना येतात ज्या मुलांवर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम करतात.

शोक आणि हानी: ह्यात मुलाला जवळच्या व्यक्तींचा अचानक मृत्यू अथवा त्यांनी सोडून देणे, वेगळे होणे ह्या गोष्टी होतात.

हे बालपणाचे आघात मेंदूवर खोल परिणाम करतात जेणे करून ते प्रौढावयापर्यंत त्या जखमा टिकून राहतात कारण बालपणात मेंदू झपाट्याने विकसित होत असतो. असे काही आघात झाल्यावर शरीराची फाइट, फ्लाईट आणि फ्रिज प्रणाली सतत सक्रिय राहते .ह्यामुळे मेंदूतील HPA अक्सिस (हायपोथॅलमीक-पिट्युटरी -ऍड्रिनल अक्सिस) अतिसक्रिय होऊन कॉर्टिझिल हे हार्मोन सतत मोट्या प्रमाणात बाहेर पडते, ह्याच्या परिणामस्वरूप पुढीलप्रमाणे बदल होत जातात

अमिग्डला हे मेंदूतील भीतीचे केंद्र अतिसक्रिय होते -प्रौढ झाल्यावर छोट्या गोष्टीतही प्रचंड भीती, चिडचिड आक्रमकता दिसते .

हिप्पोकॅम्पस म्हणजे स्मृतिकेंद्र आकाराने लहान राहते -प्रौढावस्थेत स्मृतीत गोंधळ आणि अडचण , नवीन गोष्टी शिकण्यास समस्या असे दिसते.

प्रिफ्रंटल कॉर्टेक्स जे निर्णय क्षमता ,भावनिक निंतरांसाठी जबाबदार आहे ते अपूर्ण विकसित होते -प्रौढावस्थेत आवेगपूर्ण वर्तन, स्वनियंत्रण जमणे , निर्णय घेण्यात अडचण ह्या गोष्टी आढळतात. न्यूरल कनेक्शन मध्ये बदल झाल्याने भावनिक शुंन्यता जाणवणे.

ह्या अदृश्य जखमांचे प्रौढ वयात दिसणारे परिणाम :

1 भावनिक अनियमन:  ज्या व्यक्तींनी बालपणातील आघात अनुभवले आहे त्यांना त्यांच्या भावना आणि भावनांचा प्रभाव नियमन करण्यात अडचणी येतात. त्यामुळे वारंवार मूड स्विंग, तीव्र आणि उत्तेजित भावनिक प्रतिक्रिया ह्या गोष्टी जास्त आढळतात.

2 फ्लॅशबॅक आणि नकोश्या आठवणी: व्यक्तींना ऑटोमॅटिक निगेटिव्ह विचारांमुळे मागच्या घटनांचा फ्लॅशबॅक सतत होत असतो ज्यामुळे भूतकाळातील त्रासदायक आणि स्पष्ट आठवणी कधीही जागृत होतात. व्यक्ती अतिविचारांमध्ये गुंतलेली असते.

3 नाकारणे : बालपणातील आघात झालेल्या व्यक्ती जी ठिकाणे अथवा जागा, व्यक्ती त्या आघातांच्या आठवणी करून देतील त्या टाळतात! जसे काही सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रम ,नातेसंबंध किंवा अशी काही कार्ये कि जी ती आघातांशी संबंधित आहे. उदा. कोणाला पालक लहानपणी सगळ्या नातेवाइकांसमोर वारंवार घालूनपाडून बोलले असतील तर जिथे नातेवाईक गोळा होतात अश्या कार्यक्रमांना जाण्याचे टाळले जाते.

4 अतिसावध: ज्या व्यक्तींना बालपणातील आघात झालेत ते अतिदक्षता दर्शवतात. संभाव्य धोके, धोके निर्माण होण्यासारखी स्थिती , आपले कुठे काय चुकू शकते अथवा कोणी आपले निरीक्षण करते का ह्याबद्दल अतिसावधगिरी बाळगतात

5 विश्वास ठेवत नाही:  व्यक्तींना इतरांवर विश्वास ठेवण्यात अडचण येतात कारण त्यांना अतिजवळच्या व्यक्तींकडून, आपली समजणाऱ्या माणसांकडून विश्वासघात, गैरवापराचा, त्यागले जाण्याचा अनुभव आलेला असतो.

6 कमी आत्मसन्मान: बालपणातील आघात व्यक्तीमध्ये आत्म-मुल्ये कमी करून आत्म -सन्मान कमी असल्याची भावना निर्माण करते त्यामुळे शरम, अपराधीपणा आणि अपुरेपणा निर्माण होतो .

7 अस्वस्थ नातेसंबंध: बालपणातील आघात झालेल्या व्यक्तींना नातेसंबंध तयार करण्यात, ते संभाळण्यास आणि टिकवून ठेवण्यास अडचण येऊ शकते. जवळीक , निरोगी संवाद आणि विश्वास निर्माण करण्यास अडथळे येतात.

8 व्यसन: बालपणातील आघातांच्या परिणामां तोंड दिल्याने व्यक्ती भावनिक वेदना कमी करण्यासाठी आणि आराम मिळवण्यासाठी अंमली पदार्थ आणि व्यसनाधीनतेकडे वळतात.

9 शारीरिक आरोग्य समस्या: ह्यात काही व्यक्तींना सतत च्या तणावाने जुनाट आणि दीर्घकालीन वेदना, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आणि ऑटोइम्यून विकार, तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग, इतर दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो.

10 मानसिक आरोग्य समस्या: बालपणातील आघात झालेल्या काही व्यक्तीमध्ये नैराश्य, वेगवेगळे चिंता विकार, पोस्ट ट्रामाटीक स्ट्रेस आजार, बायपोलर आजार, निद्रानाश आढळून येतात.

                आपण जर काही खबरदारी घेतली तर आपण आपल्या मुलांना ह्या अदृश्य जखमांपासून वाचवू शकतो आणि त्यांचे पुढील आयुष्य सुकर करू शकतो. जसे कि आपल्या मुलांशी निरोगी संवाद साधा आणि त्यांना दर्जेदार वेळ देणे. मुलांसोबत अशी दिनचर्या तयार करा कि त्याला सुरक्षित वाटले पाहिजे. त्यांच्या भावना ओळखा आणि त्यांना स्वीकार करणे. आपल्या मुलांना निरोगी वातावरण निर्माण करणे; घराबाहेर त्याच्यावर कोणी लक्ष ठेवते, कोणीं शारीरिक त्रास देते किंवा कोणी वर्चस्व गाजवतेय का ह्याबद्दल सतर्कता बाळगणे. मुलांना आश्वस्त करा आणि ते सुरक्षित आहे ह्याची त्यांना खात्री देणे. त्याच्या सर्व शंका आणि चिंता गांभीर्याने घेऊन त्याबद्दल चर्चा करणे, मुलाच्या वयानुसार त्यांना योग्य शिक्षण आणि माहिती देणे. घरात निरोगी वातावरण निर्माण करणे. वेगवेगळ्या हेल्पलाईन ची माहिती देऊन आणि संभाव्य धोक्यांची माहिती देऊन सावध नि शिक्षित करणे. आपले काही व्यसन किंवा वाईट सवयी ज्या मुलांना धोकादायक वाटतात असे व्यसन आणि सवयी सोडून देणे.

आपल्या मुलाचे प्रौढपण हे बालपणीच आकार घेत असते आणि आपण आकार देत असतो. त्यामुळे ह्या अदृश्य जखमा होऊ ना देणे ह्याबद्दल खबरदारी घेणे आणि जरी जखमा झाल्या तरी आपल्या प्रेमाने आणि विश्वासाने त्याना भरून काढणे ही पालकांची आणि सर्व सुज्ञ व्यक्तीची जबाबदारी आहे.



धन्यवाद

रोहिणी फुलपगार

Psychologist and Life coach

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Post a Comment

1Comments

Post a Comment