मी एकटा पडलो तर? मी मागे राहिले तर ?
![]() |
फोमो ची भीती |
आपण सोडून सगळे सहभागी होत आहेत, पुढे जात आहेत आणि या विचारांमुळे निर्माण होणारी एक चिंताग्रस्त आणि चिडचिड होत असलेली रागीट मानसिक अस्वस्थता म्हणजे फोमो!
ह्या महत्वाच्या गोष्टी फक्त घरातील किंवा जवळच्या नातेवाईकांच्या बाबतीत असतीलच असे नाही, मित्र मैत्रिणी ,ऑफिस सहकारी ,आभासी जगातले मित्र की ज्याना कधी भेटलेही नसेल अश्या व्यक्तीच्या बाबतीतील ही ह्या गोष्टी असू शकतात किंवा आपण सतत सोशल प्लॅटफॉर्म वर दिसलो नाही तर मी इतरांकडून विसरले जावू शकते वा दुर्लक्षित होवू शकते ही भीती म्हणजे फोमो !
एक वर्षापूर्वी माझी एक क्लायंट होती जी डिप्रेशन साठी माझ्याकडे आली होती. तिने एका परीक्षेसाठी आय टी मधील जॉब ला ब्रेक दिला होता पण तिच्या सहकाऱ्यांचे,मित्रांचे एंजॉय करण्याचे,ट्रीपचे, वर्कशॉप,सेमिनार चे फोटो पाहून तीला नैराश्य येत होते ,सगळे मस्त आनंदात जगत आहेत ,आपण इथे कुठेच नाही ,आपल्याला कोणी विचारत ही नाही अश्या विचारानी नैराश्य वाढत चाललेले पण तिला कळत नव्हते की ती फोमो ची शिकार बनत चालली होती .
फोमो ही भीती अगदी अनादि काळापासून माणसाच्या सोबत आहे आणि ती आपल्या उत्क्रांतीच्या पायऱ्यांमधून विकसित होत गेली आहे. जेव्हा एखाद्याला समूहापासून दूर केले जायचे किंवा तो समूहापासून हरवून जायचा तेव्हा त्याला एकट्याला भूक , उपासमार.संकटे,हल्ले आजारपण आणि मृत्यू ला सामोरे जावे लागायचे . त्यामुळे आपल्या समूहासोबत राहणे हे मनुष्यामध्ये एक प्रकारची सुरक्षिततेची, प्रेमाची, काळजी घेतली जाण्याची भावना निर्माण करत होता . स्वतःबद्दल एक आत्मविश्वास ही निर्माण व्हायचा . ह्या उत्क्रांती च्या वेगेवेगळ्या बदलामधून जात असताना ही समूहासोबत असल्याचे फायदे आणि गरज आपल्या मेंदुमध्ये घट्ट रुजलेले आहे तसेच समूहाबाहेर फेकले जाण्याची भीती ही मेंदूने धरून ठेवलीय !
यामुळे आपल्या समूहासोबत असल्याने मिळणारी सुरक्षितता, आपण समूहाचा एक भाग असल्याची जाणीव नि खात्री , त्यातून निर्माण होणारा स्व -आदर , समूहातून मिळणारे प्रेम, मान्यता ,जिव्हाळा ही व्यक्तीची भावनिक गरज बनत गेली. जेव्हा समूहमान्यतेची भावना नसते तेव्हा व्यक्तीमध्ये स्वतःबद्दल तिरस्कृत भावना निर्माण होते .
आता जरी मनुष्य टोळीने राहत नाही तरी आधुनिक डिजिटल समूहाबरोबर राहतो आणि हरवले जाण्याची भीती(फोमो) इथे आपले तोंड बाहेर काढते.
फोमो ला अजून मानसिक आजारांमध्ये सामील केले नाही पण ह्याचे वाढते प्रमाण आणि नकारात्मक परिणाम पाहता जगभरातील मानसोपचारतज्ञांचे हयाकडे लक्ष वेधले आहे.
त्यामुळे काही विशिष्ट लक्षणे आणि वर्तन ह्यावरून आपण ह्या भीतीला ओळखू शकतो :
- इतर लोक काय करत आहेत हे पाहण्यासाठी वारंवार झपाटल्यासारखे सोशल मीडिया तपासत राहणे वा स्क्रोल करत राहणे.
- सोशल मीडियावर दिसणाऱ्या इतरांच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्यची तुलना करून मनात नकारात्मक भावना बाळगणे. न्यूनगंड निर्माण होणे .
- सोशल मीडिया च्या जास्त वापराने मानसिक थकवा आल्यासारखे जाणवणे .
- उत्साह कमी होणे , इतरांमध्ये मिसळणे टाळणे, एकटे राहणे.
- सतत सोशल मीडिया स्क्रोल करत असल्याने जी कामे अपूर्ण राहतात त्यांच्यासाठी जास्तीचा वेळ देणे त्यामुळे अपुरी आणि विस्कळीत झोप .
- शारीरिक थकवा जाणवणे .
- निरुत्साह,चिंता,नैराश्य आणि दु:खी मूड निर्माण होणे .
- एकाग्रता साधण्यास अडचणी येणे , जगण्यातील रुचि संपणे .
- फोमो चे जास्त तीव्र लक्षणे म्हणजे मत्सर आणि शत्रुत्व ह्या भावना मनात निर्माण होणे ज्याचा आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम होत जातो .
· फोमो चा अक्राळविक्राळ राक्षस हा फक्त सोशल मीडिया पर्यन्त सीमित नाही, जिथे जिथे आपण समूहापासून वेगळे पडू, एकटे पडू ही भीती असते तिथे फोमो असतो !!!!
याने आजपर्यन्त किती नुकसान केले आहे त्यावर विचार केला तर डोळे दिपुन जातात !!!! सर्वच मार्केटिंग कंपन्या तेच करत आल्या आहेत.
आपण प्रत्येक जण नकळात कधी ना कधी याची शिकार झालेलो असतो किंवा होत असतो !!!
मग आता यावर उपाय काय ?
ते पाहुयात पुढे :